November 5, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

सार्वजनिक फंडाचा योग्य वापर करावा – डाॅ. बाबासाहेब आंबेडकर

१९३८ साली स्थापन केलेल्या इमारत फंड बाबतची माहिती देऊन पुढे काय करावयाचे आहे ते ठरविण्यासाठी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई येथील दामोदर हॉलमध्ये बोलावलेल्या अस्पृश्य कार्यकर्त्यांच्या सभेत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले भाषण….

” १९३८ साली डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या इमारत फंड बाबतची माहिती देऊन पुढे काय करावयाचे आहे ते ठरविण्यासाठी ” दिनांक १४ जुलै १९५२ रोजी मुंबईतील परेल येथील दामोदर हॉलमध्ये
डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य कार्यकर्त्यांची सभा बोलावली होती.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी बोलावलेल्या अस्पृश्य कार्यकर्त्यांच्या या सभेत बोलतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,
भगिनींनो व बंधुनो,
तुम्हाला मी आज निमंत्रण देऊन या ठिकाणी बोलाविले आहे त्याचा हेतू हा आहे की, १९३८ साली मी मुंबईत इमारत फंड का स्थापन केला हे सर्वास माहीत आहे. या इमारत फंडाची आतापर्यंतची माहिती तुम्हास सांगावी व पुढे काय करावयाचे आहे ते ठरविण्यासाठी आजची सभा घेतली आहे. १९३८ साली इमारत फंड स्थापन केल्यावर चाळीचाळीतून या फंडाचा प्रचार करण्यात आला व अस्पृश्य बांधवांकडून या फंडाला आज १४ वर्षे होऊन गेली तरी आपल्या इमारतीला मूर्त स्वरूप आले नाही. याला अनेक कारणे आहेत. मात्र मी स्वतः १९४२ पासून मुंबई सोडून दिल्लीला गेलो हे याला मुख्य कारण आहे. माझ्या गैरहजेरीत या फंडाचे काम जोमाने झाले नाही. मी असल्याशिवाय काहीही होत नाही ही स्थिती बरी नाही. परंतु तसे झाले ही गोष्ट खरी आहे. माझ्या गैरहजेरीत गेल्या दहा वर्षात लोकांच्या मनात अनेक संशय निर्माण झाले. इमारत फंडाचे काय झाले ? किंवा पुढे काय होणार ? याची कोणालाच कल्पना नाही. मी तुम्हाला आता काही आकडे सांगणार आहे. त्यावरून इमारत फंडाचे काम बंद नव्हते तर ते सुप्तावस्थेत चालू होते असे दिसून येईल. माझ्या मते आतापर्यंत या फंडात बरे पैसे जमले आहेत. इतके की, त्याची तुम्हाला स्वप्नातही कल्पना करता येणार नाही.

आज हा इमारत फंड १,११,२२८ रु. ४ आणे ३ पैसे इतका झाला आहे. अस्पृश्य समाजाच्या इतिहासात इतकी मोठी रक्कम जमल्याचे हे पहिलेच उदाहरण आहे. एक लक्ष अकरा हजार दोनशे अठ्ठावीस रुपये चार आणे, तीन पैसे या रकमेत आपल्या लोकांची रक्कम फक्त ३१,७०९ रु. ४ आणे (एकतीस हजार सातशे नऊ रुपये चार आणे) एवढीच आहे. बाकीची ७५.५०० रुपये (पंचाहत्तर हजार पाचशे रुपये) रक्कम मी वरच्या वर्गांच्या माझ्या मित्रांकडून मिळविली आहे. या रकमेपैकी ३६,५३५ रुपये रक्कम जागा खरेदीकरिता खर्च झाली आहे. मात्र आज ही जागा विकावयास काढली तर दीड लक्ष रुपये कोणीही देईल इतक्या महत्त्वाची ती जागा आहे. या रकमेतून दुसरा मोठा खर्च झाला. प्रेसची इमारत बांधण्यासाठी ३५,००० रुपये खर्च झाले आहेत. वरील दोन्ही बाबींसाठी मिळून ७१,५२५ रुपये खर्च झाले असून, बाकीचे ३९,६९३ रुपये ४ आणे ३ पैसे एवढी रक्कम इंपीरियल बँकेत शिल्लक आहे.

आपल्या लोकांनी जी रक्कम दिली आहे, त्यापैकी, निरनिराळ्या ठिकाणच्या लोकांनी, संस्थांनी व व्यक्तींनी २५ रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम दिली आहे अशांची २५,७०९ रुपये ४ आणे एवढी रक्कम आहे. २५ रुपयांपेक्षा कमी रक्कम देणारांची १,००० रुपये रक्कम आहे व जिचा तपशील समजला नाही अशी ५,००० रुपये रक्कम आहे. रुपयाचा या रकमेचा तपशील का समजला नाही ? तर लोकांनी नेलेली पावती पुस्तके परत आणून दिली नाहीत म्हणून समजला नाही. त्या पावती पुस्तकात आणखीही पैसे जमा झाले असण्याचा संभव आहे व हे जास्त जमलेले पैसे लोकांनी खाल्ले असा संशय उत्पन्न होणे सहाजिकच आहे. तरी हा संशय नाहिसा करण्यासाठी लोकांनी नेलेली सर्व पावती पुस्तके राहिलेल्या पैशासह परत केली पाहिजेत. पुस्तके परत न करणे किंवा जमलेले पैसे न देणे ही फसवणूक आहे व कायद्याने अशा फसवणुकीला गुन्हा ठरविले आहे हे सर्वांनी लक्षात ठेवावे.

आता हा फंड जमवून मुंबईत एक हॉल बांधावा असा माझा विचार आहे. या हॉलचे जे काही उत्पन्न येईल त्या उत्पन्नातून आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाला मदत करता येईल किंवा आणखी काही लोकांच्या हिताची कामे करता येतील. ह्या किंवा पुढच्या वर्षी हॉल बांधून पुरा झाला पाहिजे.

हा हॉल बांधण्यास पावणे दोन लाख रुपये खर्च येईल असा अंदाज आहे. आज आपल्याजवळ इंपीरियल बँकेत ३९,६९३ रुपये ४ आणे ३ पैसे एवढी रक्कम आहे. सध्या इमारतीची जागा लोकांना भाड्याने वापरण्यासाठी दिली आहे. तेव्हा ते काही उत्पन्न मिळते. परंतु हॉल बांधावयाचा झाल्यास या लोकांना नोटिसा देऊन काढावे लागेल. त्यावेळी हे उत्पन्न बुडेल.

हॉल बांधण्यासाठी १ लाख रुपये खर्च येईल व हॉलमध्ये फर्निचर ठेवणे व इतर सोयी करणे यासाठी पाऊण लाख रुपये लागतील असा माहितगार लोकांचा अंदाज आहे. कदाचित थोडी कमी किंवा थोडी जास्त रक्कम खर्च होण्याचा संभव आहे.

तेव्हा एवढी रक्कम कशी उभी करावयाची हा प्रश्न आहे. मला माझ्या ६० व्या वाढदिवसानिमित्त ६०,००० रुपये देण्याचे ठरविले आहे. त्यापैकी आतापर्यंत काहीतरी अकरा बारा हजार रुपये जमलेत असे मला समजले आहे. हीरक महोत्सवाची प्रतिज्ञा तुम्ही केली आहे ती पुरी करण्याची ईर्षा तुम्ही बाळगली पाहिजे नाहीतर ” बोलाचीच कढी, बोलाचाच भात, जेऊनीया तृप्त कोण झाला ? ” असे होता कामा नये. १२ हजार रुपये तुम्ही जमविले आहेत. तर बाकीचे ४८ हजार रुपये तुम्ही उभे केले पाहिजेत. तुम्ही ६० हजार रुपये मला दिले तर, मी ते काही माझ्या खिशात घालणार नाही. हॉलसाठीच मी ते देणार आहे. माझ्या हयातीत हे हॉलचे कार्य झाले पाहिजे अशी माझी फार इच्छा आहे. तरी तुम्ही पैसे जमविण्याच्या कामाला लागा.

काही लोक सार्वजनिक कामाला पैसे देतात. परंतु जे मध्यस्त असतात ते लोक हा पैसा मधल्या मध्येच गडप करतात आणि खातात. तेव्हा आपण दिलेला पैसा ज्या कामासाठी दिला ते काम होईल की नाही याबद्दल संशय असल्यामुळे काही लोक पैसेच देत नाहीत.

असे असेल तर तुम्ही पैसे माझ्याकडे आणून द्या. मी ते स्वीकारावयास तयार आहे. आतापर्यंत मी स्वतः कधीही पैसा घेतला नाही. आता मात्र, या कामासाठी पैसे घेण्याची माझी तयारी आहे. तरी ज्यांना कोणाला पैसे माझ्याकडेच आणून द्यावयाचे असतील त्यांनी ते दररोज संध्याकाळी ७ ते ८ च्या दरम्यान माझ्या बंगल्यावर (राजगृह दादर) आणून द्यावेत. तेथे श्री. उपशाम मास्तर तुम्हाला पावती देतील. ते या फंडाचे एक ट्रस्टी आहेत व हिशेबाचे कामही त्यांच्याकडेच आहे. माझा मुक्काम महिना दीड महिनाच मुंबईत आहे. मी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंबई सोडून दिल्लीस जाणार आहे. तरी मी जाण्यापूर्वीच लोकांनी पैसे माझ्याकडे आणून द्यावेत.

तुम्ही मला साठ हजार रुपये दिले तर जवळ जवळ १ लाख रुपये आपल्याजवळ तयार होतील. तरीही हॉल बांधण्यासाठी आपणास आणखी पाऊण लाख रुपये कर्ज काढावे लागणार आहे व ते मी काढणार आहे. हॉलच्या सव्वा दोन, अडिच लाख रुपयांच्या तारणावर ते मला कोणीही देऊ शकेल. मात्र मागाहून हे पाऊण लाख रुपयेही तुम्हास फेडावे लागणार आहेत. मुंबईत हॉलला किती मागणी आहे हे तुम्ही जाणताच. दरमहा १,००० रुपये हॉलचे उत्पन्न सहज येऊ शकेल. दरसाल १५ ते २० हजार रुपये फेडल्यास थोड्याच वर्षात हॉल आपल्या मालकीचा होऊ शकेल. दुसरी एक हितगुजाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. ‘ जनता ‘ पत्रासाठी एक ट्रस्ट असावा असे मला वाटते. ‘ जनता ‘ ला काही तूट आली तर ती या ट्रस्टच्या पैशातून भरून काढता यावी. आपल्याला वर्तमानपत्राची अत्यंत जरूर आहे. आपल्यावर होणारे जोर, जुलूम व अत्याचार आणि गाऱ्हाणी जनतेला कळविण्यासाठी आपल्याला ” जनता ” वर्तमानपत्र चालविणे आवश्यक आहे. या कामासाठी मी निराळा पैसा जमा केला आहे. ते ३२,००० रुपये (बत्तीस हजार रूपये) मी तूर्त आपल्या हॉलसाठी बिनव्याजी कर्ज म्हणून देण्यास तयार आहे. मात्र पुढे सदर पैसे तुम्ही मला परत दिले पाहिजेत. माझ्याकडे तीन प्रकारांनी पैसे जमा आहेत (१) इमारत फंडाचे, (२) जनतेचे व (३) फेडरेशनचे पैसे. हे मला निरनिराळ्या प्रांतातून मिळालेले आहेत व ते फक्त राजकारणासाठीच खर्च करावयाचे आहेत. म्हणून ते या कामासाठी मला देता येत नाही.

पूर्वीचा इमारत फंड, मुंबई सरकारच्या विश्वस्त कायद्यान्वये शेड्युल्ड कास्ट्स् इंप्रुव्हमेंट ट्रस्ट, मुंबई या नावाने रजिस्टर केला आहे. तेव्हा या पैशाच्या बाबतीत काही अफरातफर होईल ही काळजी बाळगण्याचे कारण नाही. कारण सरकारकडून दरसाल हा हिशेब तपासला जाणार आहे.

मुंबईत सर्व लोकांच्या मालकीचे हॉल आहेत. मुंबईत घरकाम करणाऱ्या तिरळे कुणबी यांनीही परळला ‘ वाघे हॉल ‘ नावाचा स्वतःच्या मालकीचा हाॅल बांधला आहे. ते आपल्या मानाने फार थोडे लोक आहेत. असे असूनही त्यांनी स्वतःच्या मालकीचा हॉल बांधला आहे. या गोष्टीची ईर्षा धरून तुम्ही ताबडतोब कामास लागले पाहिजे. मी परत सांगतो की पावती पुस्तके परत न आल्यामुळे जे जे हिशेब पुरे झाले नाहीत त्या सर्व हिशेबाची पावती पुस्तके व गोळा झालेला पैसा तुम्ही आणून दिला पाहिजे. जे लोक तसे करणार नाही त्यांची गय केली जाणार नाही.

🔹🔹🔹

संकलन – आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे