January 16, 2026

Buddhist Bharat

Buddhism In India

बा बुद्धा 

बा बुद्धा,
किती रे श्रमलास!
‘अत्त: दीप: भव’ चा नारा दिलास
आमच्या ‘उद्या’ साठी

अरे,
आम्ही तर कान असून बहिरे
वाचा असून मुके अन्
डोळे असूनही आंधळे
मागत्यांच्या जातीचे सगळे

तू दानाचे मार्ग दाविले
आम्ही घेण्याच्या वाटा शोधतो
तेहत्तीस कोटींच्या रांगेत
तुलाही कोंबतो

तुझ्या चीवरच्या चिरफळ्या
दानपात्राच्या वाटण्या करीत
काही महाभाग वाटत बसलेत
स्वस्त होऊन
स्वतः लाच विकत बसलेत

आणुबॉम्बच्या शेजारी तुझी शांती- बिंती
पार चेंगरते आहे
क्षूद्र स्वार्थाच्या लालाईत
निळाईचे आकाश विरते आहे

आम्हीही हतबल होऊन
नुसतेच निरखतो शिलालेख गतकाळाचे
त्यावर मिटलेले डोळे
तुटलेले हातपाय
पुष्कळसे लयास गेलेले अवशेष

तरीही तू हळूच शांतपणे पुतपुटतो पुन्हा एकदा
“चरथ भिक्खवे चारीकं
बहुजन हिताय बहुजन सुखाय.”

(‘का?’ या एकाक्षरी शीर्षकाच्या कवितासंग्रहातून)

प्रा. शिवाजी वाठोरे