November 5, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

बुद्ध धर्मानेच जगाचा उद्धार होणार आहे ( भाग -२ )

” भगिनींनो व बंधूजनहो, आम्ही दोघांनीही तुमच्या समोर भिक्खू चंद्रमणी यांच्या हस्ते बौद्ध धर्माचा अनुग्रह केला आहे. चंद्रमणी हे भारतातील सर्वात वयस्कर भिक्खु आहेत. आता आमचा जो बौद्ध धर्म अनुग्रह झाला तो पाली भाषेत झाला. त्या अनुग्रहाचे मराठी भाषांतर करून, पुन: अनुग्रह घेत आहे.
बंधू-भगिनींनो, अनुग्रह आता तुम्हाला मराठीतही समजला आहे. आता मी तुम्हा सर्वांना बुद्ध धर्माची दीक्षा देणार आहे. ज्यांना हिंदू धर्माचा त्याग करून बुद्ध धर्म स्वीकारावयाचा आहे त्यांनी कृपा करून उभे राहावे आणि माझ्या मागून शब्दांचे उच्चारण करावे.
१. मी ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
२. मी राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
३. मी गौरी- गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देव देवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
४. देवाने अवतार घेतले, यावर माझा विश्वास नाही.
५. बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे हा खोटा आणि खोडसाळ प्रचार होय, असे मी मानतो.
६. मी श्राद्धपक्ष करणार नाही; पिंडदान करणार नाही.
७. बौद्ध धम्माच्या विरुद्ध विसंगत असे कोणतेच आचार कर्म मी करणार नाही.
८. कोणतेही क्रियाकर्म ब्राम्हणांचे हातून करवून घेणार नाही.
९. सर्व मनुष्यमात्र समान आहेत, असे मी मानतो.
१०. मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करीन.
११. मी भगवान बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन.
१२. मी बुद्धाने सांगितलेल्या दहा पारमिता पाळीन.
१३. मी सर्व प्राणीमात्रावर दया करीन, त्यांचे लालनपालन करीन.
१४. मी चोरी करणार नाही.
१५. मी खोटे बोलणार नाही.
१६. मी व्यभिचार करणार नाही.
१७. मी दारू पिणार नाही.
१८. मी प्रज्ञा, शील आणि करुणा या बौद्ध धम्माच्या तीन तत्वांची सांगड घालून माझे जीवन चालवीन.
१९. माझ्या जुन्या, मनुष्यमात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या आणि मनुष्यमात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा मी त्या करतो व बुद्धाच्या धम्माचा स्वीकार करतो.
२०. बुद्ध धम्म हा सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे.
२१. माझा नवा जन्म होत आहे, असे मी मानतो.
२२. इत: पर मी बुद्धाच्या शिकवणीप्रमाणे वागेल अशी प्रतिज्ञा करतो.”!!!!
🔹 डॉ. बाबासाहेब आंबेडकर
(संदर्भ- डॉ.बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड- १८, भाग-३, पान नं. ५१०- ५११)
दि. १४ऑक्टोबर १९५६ रोजी धर्मांतराच्या वेळी बाबासाहेबांनी कार्यकर्त्यांना दिलेल्या 22 प्रतिज्ञा.
🔹 संकलन- आयु. प्रशांत चव्हाण सर.