November 5, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

बौद्ध धर्म हा पुन्हा या देशाचा धर्म होईल

” येथील भिक्षूमित्राने सांगितले की, पुष्कळ लोकांना दीक्षा घ्यावीशी वाटते पण त्यांना मी सांगितले की बौद्ध होणे सोपे नाही. म्हणुन मी आणि माझे लोक मिळून आम्ही काही नियम करणार आहोत. ते नियम जे लोक पाळतील त्यांनाच दीक्षा दिली पाहिजे. बुध्द धर्माची दीक्षा घेतल्यावर तुम्हाला हिंदू धर्मातील मते आणि दैवते बुध्द धर्मात आणता येणार नाहीत. घरात खंडोबा व बाहेर बुद्ध हे चालणार नाही. शिवाय ज्या हिंदू लोकांना बौद्ध दीक्षा घ्यावयाची असेल त्यांनी हिंदू धर्माच्या दुष्कृत्यांचा त्याग केला पाहिजे. जातीला मानणारे लोक बौद्ध होतात व बौद्ध धर्माचा ब्राह्मणी धर्म बनवतात व बौद्ध धर्माचे मुळच नाहीसे करतात. सर्व वाईट चाली बरोबर घेऊन तुम्हाला बौद्ध धर्मात येता येणार नाही.
ज्यांना सवड असेल त्यांनी येथे यावे व बौद्ध धर्म शिकवा व त्यानंतर त्याचा स्वीकार करावासा वाटला तर करावा. नाही तर बारा भाईंची खिचडी करून चालायचे नाही. फक्त बुद्ध धर्मच पाळा इतर काही नाही. हल्ली धर्माला ग्लानी आली आहे. पण मी म्हणतो की धर्माची सर्वांनाच आवश्यकता आहे. माझ्या मते एक गोष्ट निश्चित आहे. धर्माशिवाय समाज जगणार नाही आणि तो धर्म बौद्ध धर्म पाहिजे. समता, प्रेम, बंधुभाव या सर्व गोष्टी जगाच्या उद्धाराकरिता आवश्यक असतील तर त्या बुद्ध धर्मातच सापडतील. मी आज २० वर्ष प्रत्येक धर्माचा अभ्यास केला आहे. सर्व धर्माचा अभ्यास केल्यावर जगाला बौद्ध धर्मच स्वीकारायला पाहिजे, असे माझे मत झाले आहे.”!!!
🔹 डॉ. बाबासाहेब आंबेडकर
(संदर्भ- डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड- १८, भाग-३, पान नं. २२९)
दि.१४ जानेवारी १९५१, वरळी- मुंबई, येथील बुद्धदूत सोसायटीच्या विद्यमाने भरविण्यात आलेल्या कार्यक्रमात मध्यवर्ती सरकारचे कायदे मंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून दिलेले भाषण.
🔹 संकलन- आयु. प्रशांत चव्हाण सर.