November 5, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

युद्धोत्तर हिंदुस्थानपुढे मोठमोठे प्रश्न उपस्थित होणार आहेत – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

दिनांक २ जानेवारी १९४० रोजी कऱ्हाड म्युनिसीपालिटीने दिलेल्या मानपत्राच्या उत्तरादाखल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले भाषण….

कऱ्हाड म्युनिसीपालिटीने दिनांक २ जानेवारी १९४० रोजी संध्याकाळी ४ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानपत्र देण्याचे ठरविले होते. या समारंभासाठी डॉ. बाबासाहेब सातारहून ३ वाजण्याच्या सुमारास निघाले. परंतु सातारहून १३ मैलांच्या अंतरावर गाडी नादुरुस्त झाल्याने पुढे जाणे अशक्य झाले. त्याच दरम्यान मुंबईच्या परळ भागातील तंबाखूचे प्रसिद्ध व्यापारी रा. लक्ष्मणराव शेटे हे आपल्या खाजगी मोटारीतून जात असता त्या ठिकाणी येऊन पोहोचले व त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कऱ्हाडपर्यंत नेण्याचे मोठ्या आनंदाने कबूल केले. पण या गाडीस कऱ्हाडजवळ एक भयंकर अपघात झाला. सुदैवाने कोणासही गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या नाहीत. डॉ. बाबासाहेबांच्या डोक्यास, पायास व हातास मार बसला होता. तेव्हा सातारचे बॅरिस्टर करंदीकर यांनी गाडीतील मार लागलेल्या सर्व जणास सरकारी दवाखान्यात नेले व त्यांना पट्ट्या बांधण्यात आल्या. दवाखान्यात थोडी विश्रांती घेतल्यानंतर डॉ. बाबासाहेब म्युनिसीपालिटीतील नियोजित मानपत्र समारंभास जाण्यास निघाले.

म्युनिसीपालिटीचा हॉल आतून व बाहेरून सभासदांनी व इतर नागरिकांनी फुलून गेला होता. प्रथमतः स्थानिक स्पृश्य विद्यार्थिनींनी स्वागतपर गीत गायले व त्यानंतर समारंभास सुरुवात झाली. स्वागतपर गीत गायन झाल्यावर रा. बहुलेकर वकील यांनी म्युनिसीपालिटीचे मानपत्र वाचून दाखविले व म्युनिसीपालिटीचे अध्यक्ष रा. कदम यांनी हे मानपत्र डॉ. बाबासाहेबांस अर्पण केले. मानपत्र अर्पण झाल्यावर डॉ. बाबासाहेब उत्तर देण्यासाठी उभे राहिले.

कऱ्हाड म्युनिसीपालिटीने दिलेल्या मानपत्राच्या उत्तरादाखल केलेल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,
अध्यक्ष महाराज, सभासद, भगिनी व बंधुजनहो,
आपण मला जे मानपत्र दिले आहे त्याबद्दल मी आपला फार आभारी आहे. स्थानिक प्रश्नाबाबत मी काही कामगिरी केलेली नाही. मी कऱ्हाडचा रहिवाशीही नाही. माझी कामगिरी राजकीय स्वरूपाची आहे. अशा परिस्थितीत आपण मला मानपत्र अर्पण करून माझा जो गौरव केला आहे त्यावरून आपला उदारपणा मात्र व्यक्त होतो. आज या समारंभास मला हजर राहता आले ही इष्टापत्तीच होय.

हिन्दुस्थानच्या आजच्या परिस्थितीत जागृती व जबाबदारीची फार आवश्यकता आहे. युद्धोत्तर हिंदुस्थानापुढे मोठमोठे प्रश्न उपस्थित होणार आहेत. स्वराज्य सर्वासच हवे, यात शंका नाही. पण एकाचे स्वराज्य दुसऱ्यास गुलामगिरीत डांबण्यास कारणीभूत होणार नाही, अशी आपण सर्वांनी दक्षता बाळगली पाहिजे. अल्पसंख्यांकांच्या मागण्या या वरील भीतीच्या निदर्शकच आहेत. ही भीती नाहिशी करण्यासाठी व आपणापुढील प्रश्न सोडविण्यासाठी अल्पसंख्य व बहुसंख्य या दोन्ही लोकात आपण जागृती व जबाबदारीची जाणीव उत्पन्न केली पाहिजे, असे माझे सांगणे आहे.

आज हिन्दी राजकारणात मोठी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. हा विचित्रपणा लक्षात येण्यासाठी आपण गेल्या पिढीचे राजकारण व या पिढीतील राजकारण यांची तुलना करू.

गेल्या पिढीतील गोखले, टिळकांचे राजकारण व आजचे गांधी राजकारण यामध्ये एक मोठा फरक आहे. गेल्या पिढीतील राजकारणास विद्वत्तेची जरूरी भासत असे. आजच्या राजकारणात बोटवाती, काडवाती करणारांची जरूरी भासत आहे. विद्वानांची त्यातून खड्यासारखी उचलबांगडी करण्यात येत आहे. आजचे राजकारण हे आंधळ्याच्या माळेच्या हाती गेले आहे. ही अत्यंत अनिष्ट गोष्ट झालेली आहे. देशाची प्रगती होत राहण्यास विविध विचार व वादविवादाचे निरनिराळे प्रवाह आवश्यक आहेत. अशा भिन्न विचारांच्या प्रवाहातूनच हमेशा प्रगती होत असते. आंधळ्याच्या माळेमागून एकाच मार्गाने देश जात राहिला तर तो खळग्यात पडल्याशिवाय रहाणार नाही, हे खास. राजकारणात एकच पंथ निर्माण करणे हा चालू राजकारणातील हेतू आहे. जागृती, नानातऱ्हेचे विचार व साधक-बाधक प्रमाणे यांचे या राजकीय पंथास वावडे आहे. त्याच त्या गोष्टीची री ओढीत राहण्यात फायदा काहीच नाही. आज लोक गांधीवेडे झाले आहेत. गांधीवाक्य हे ब्रह्मवाक्य होऊ पाहत आहे. या गांधी वेडाबरोबरच ढोंगबाजीही खूप वाढू लागली आहे. केवळ स्वार्थासाठी कॉंग्रेसला चार आणे देऊन व्यभिचार करणारे अनेक हरीचे लाल आज पैदा होत आहेत. जागृती व जबाबदारी नाही तेथे तशी बिकट स्थिती होणारच. आपल्या कऱ्हाड म्युनिसीपालिटीत भिन्न मताचे व भिन्न पक्षाचे सभासद आहेत. यावरून स्थानिक मतदार विचारी असावेत, असे मला वाटते. आपल्यात विचार जागृत आहेत म्हणून मी आपले अभिनंदन करतो. आपण दिलेल्या मानपत्राबद्दल पुनः एकदा आपले आभार मानून मी आपले भाषण पुरे करतो.

🔷🔷🔷

त्यानंतर डॉ.बाबासाहेबांनी स्थानिक महारवाड्यातील समारंभात तेथे तिष्ठत असलेल्या अलोट जनसमुदायास आपसात एकोपा राखण्यास व पुढील निवडणुकीत स्वतंत्र मजूर पक्षाचा एक प्रतिनिधी निवडून आणण्यास सांगितले व आपल्या बरोबरील मंडळीसह साताऱ्यास आपल्या निवासस्थानी परतले.

⚫⚫⚫

✍🏻 आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे