July 28, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

पक्षांच्या व जातींच्या हार्दिक सहकार्यानेच राजकीय पेच सुटतील – डाॅ. बाबासाहेब आंबेडकर

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना म्युनिसीपालिटीतर्फे देण्यात आलेल्या मानपत्रास डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उत्तरादाखल भाषण केले.

गुरुवार दिनांक २८ सप्टेंबर १९४४ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर राजमहेंद्री येथे आले.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बरोबर श्री. पां. ना. राजभोज, जनरल सेक्रेटरी फेडरेशन आणि श्री. व्ही. रामकृष्णन्, ए. सी. एम. लेबर डिपार्टमेंट हे होते. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना म्युनिसीपालिटीतर्फे म्युझियम हॉलमध्ये मानपत्र देण्यात आले. म्युनिसीपल चेअरमन श्री. सोमिना कामेश्वरराव आणि म्युनिसीपल कमिश्नर श्री. के. व्यंकटाद्रि चौधरी यांनी त्यांचे स्वागत केले. डाॅ. बाबासाहेबांचे अद्वितीय विद्यार्जन, त्यांनी केलेली अस्पृश्यांतील जागृती आणि त्यांच्यासाठी व कामगारांसाठी त्यांनी केलेली कामे, याबद्दलचा मानपत्रात उल्लेख करून म्युनिसीपालिटीने लोकोपयुक्त व अस्पृश्यांना हितकारक अशी कोणती कामे केली, याबद्दलची माहिती देण्यात आली होती. सरकारकडे काही मागण्याही केलेल्या होत्या.

म्युनिसीपालिटीने दिलेल्या मानपत्रास उत्तरादाखल डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या भाषणात,
म्युनिसीपालिटीने लोकोपयोगी कामे केल्याबद्दल डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्युनिसीपालिटीचे अभिनंदन केले. अस्पृश्यांच्या शिक्षणाची सोय केल्याबद्दल त्यांनी तिचे आभार मानले. भारतातील ही एकच म्युनिसीपालिटी अस्पृश्यांच्या शिक्षणासाठी प्रयत्न करीत आहे, इतर म्युनिसीपालिट्यांनी हा धडा गिरवावा, असे डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी उद्गार काढले.

गांधी-जीना वाटाघाटी फिसकटल्याबद्दल त्यांनी दुःख प्रदर्शित केले. या वाटाघाटी, मुळी एकांगीच होत्या. त्यात अल्पसंख्यांक जातींना स्थान नव्हते. राजकीय प्रश्न सोडविण्याची ही खरी रीत नव्हे. सर्वांनी एकत्र बसावे, घटना तयार करावी, या घटनेवर सह्या कराव्या आणि त्या घटनेप्रमाणे आम्हाला भारतात राजवट करू द्या अशी मागणी करण्याकरिता शिष्टमंडळ लंडनला पाठवावे. ते मंडळ एकट्या गांधींचे असले तरी चालेल. पण त्यांनी भारताची मागणी व्यवस्थितपणे मांडली पाहिजे. मी हे असे म्हणतो याचे कारण गांधींनी आतापर्यंत भारतात विलक्षण राजकीय जागृती निर्माण केली, पण तिचा फायदा देश स्वातंत्र्यासाठी कसा करून घ्यावा, याची दूरदृष्टी गांधीजींजवळ नाही दूरदृष्टी ज्या देशात नाही त्याचा सत्यानाश होतो असे जुन्या करारात एक वचन आहे. गांधींच्या संबंधात त्याची आठवण होते. शिवाय गांधींजवळ संपूर्ण स्वातंत्र्याची आच नाही. गांधींची तुलना कधी कधी अब्राहम लिंकनशी करण्यात येते. लिंकन हा प्रथम संयुक्त राष्ट्र कसे उभारता येईल हे महत्त्वाचे मानीत होता. त्याच्या निर्मितीसाठी निग्रोंची गुलामगिरी ठेवणे अगर नष्ट करणे हे त्या निर्मितीच्या प्रश्नावर अवलंबून असावे, असे मानीत होता व त्याप्रमाणे त्याने प्रथम गुलामगिरी नष्ट करण्याचे नाकारले व काही वर्षांनी म्हणजे १८६३ साली त्यांनी गुलामगिरी नष्ट केल्याचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. कारण गुलामांचा उपयोग लढाया जिंकून युनियन अभंग ठेवणे, हे त्याला जरुरीचे वाटले. गांधींचेही असेच आहे. त्यांना स्वातंत्र्य हवे, पण वर्णाश्रमही हवा. समाजात संपूर्ण समता त्यांना नको आहे. अशा वृत्तीच्या पुढाऱ्यांजवळ दूरदृष्टी कशी असणार ? स्वातंत्र्याचा प्रश्न निघाला की अल्पसंख्यांक जाती आपापल्या संरक्षणासाठी जादा राजकीय हक्क मागतात. असले हक्क मागणे म्हणजे राष्ट्रद्रोह होय, अशी भावना गांधी व काँग्रेस यांनी देशात पसरविली आहे. भारताला स्वतंत्र करण्यासाठी १८८५ मध्ये काँग्रेस उत्पन्न झाली. पण गांधींच्या नेतृत्वामुळे काँग्रेसने पाकिस्तानचा प्रश्न उत्पन्न केलेला आहे.

अशा परिस्थितीत भारताचे राजकीय पेच कसे सुटणार ? फक्त पक्षांच्या व जातींच्या हार्दिक सहकार्यानेच सुटतील.

🔹🔹🔹

संकलन – आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे