August 3, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

फाल्गुन पौर्णिमा

फाल्गुन पौर्णिमेला पाली भाषेत ‘फग्गुन मासो‘ म्हणतात. ही पौर्णिमा साधारणतः मार्च महिन्यात येते. या पौर्णिमेला भगवान बुद्धाच्या जीवनातील काही घटना घडल्यात, त्या अशा कपिलवस्तूस भगवंताची भेट, पुत्र राहुलची धम्मदीक्षा, नंद याची धम्मदीक्षा, या पौर्णिमेला ज्या घटना घडल्यात, त्यांचा संक्षिप्तपणे परिचय असा-

१) कपिलवस्तूस भगवंताची भेट

यथापि भमरो पुफ्फं वण्णगन्धं महेठयं

पलेति रसमादाय, एवं गामे मुनी चरे ।। (धम्मपदं : ४९)

( ज्याप्रमाणे फुलाच्या वर्णाला किंवा गंधाला कुठलाही उपसर्ग न करता अमर जसा रस ग्रहण करून निघून जातो, त्याप्रमाणे मुनीने गावात विचरण करावे.)”

भगवंत राजगृहात राहात असल्याचे ऐकल्यावर राजा शुद्धोदनाने निरोप पाठविला की, “मरणापूर्वी माझ्या मुलाला पाहण्याची माझी इच्छा आहे. त्याच्या उपदेशाचा फायदा इतरांना मिळाला परंतु त्याच्या पित्याला किंवा त्याच्या नातलगांना तो मिळाला नाही.’

निरोप देणारा दूत भगवंताजवळ पोहचला आणि म्हणाला, “जगवंदनीय तथागता, कमलपुष्प जसे सूर्यादयासाठी उत्सुक असते, त्याप्रमाणे आपले पिताजी आपली वाट पहाट आहेत. ”

तथागतांनी आपल्या पित्यांची विनंती मान्य केली आणि आपल्या बऱ्याच शिष्यांसह ते पित्याच्या घरी जावयास निघाले. शाक्य जनपदात ही बातमी वान्यासारखी पसरली. प्रत्येकाचे अंतःकरण आनंदाने भरून आले होते.

शुद्धोदन व महाप्रजापती नातलग व मंत्री यांच्यासह भगवंतास भेटण्यास निघाली. पित्यासमोर भगवंत बसताच राजा शुद्धोदनाच्या भावना उचंबळून आल्या. त्याला स्वतःच्या मुलाचा अभिमान वाटत होता. तो दुःखात आनंद आणि आनंदात दुःख मानू लागला. पुत्राचा निश्चय पाहून त्याने आपल्या भावना दाबून टाकल्या.

पिता शुद्धोदन म्हणाला, “मी तुला माझे राज्य देईल, तरी ते तू मातीमोल मानशील. ”

त्यावर भगवंत म्हणाले, “आपल्या पुत्राबद्दल आपणास अत्यंत दुःख होत आहे हे मी जाणतो. पण ज्या पुत्राला आपण मुकलात त्याच्याशी ज्या प्रेमबंधनानी आपल्याला जखडले आहे, त्या बंधनांनी आपण स्वतःला सर्व मनुष्यमात्रांशी जखडून टाका म्हणजे सिद्धार्थाच्या ठिकाणी तुम्हाला त्याच्यापेक्षाही थोर पुत्र असल्याचे आढळून येईल.”

आपला पुत्र बुद्ध याची ती मधुर वाणी ऐकून राजा शुद्धोदन आनंदाने बेहोष झाला आणि अश्रूपूर्ण नेत्रांनी उद्गारला, “हे अद्भुत परिवर्तन आहे! दुःखातिरेक आता नष्ट झाला आहे.”

शुद्धोदन स्वगृही परतला आणि भगवान बुद्ध आपल्या शिष्यांसह वनातच राहिले.

दुसऱ्या दिवशी सकाळी भगवान बुद्ध आपले भिक्षापात्र घेऊन कपिलवस्तूमध्ये भिक्षेसाठी निघाले. ही विचित्र वार्ता ऐकून शुद्धोदन त्वरेने निघाले आणि भगवंताला म्हणाले, “तू माझ्या नावाला काळिमा का फासतोस ? तुला व तुझ्या भिक्खूंना मी सहज अन्न पुरवू शकेन हे तुला माहीत नाही काय ?”

भगवंत म्हणाले, “ही माझ्या संघाची प्रथा आहे. ”

“पण हे कसे शक्य आहे?” असे शुद्धोदनाने विचारताच भगवत म्हणाले, “आपण राजाचे वंशज आहोत असे तुम्ही व तुमच्या वंशियांनी वाटल्यास म्हणावे परंतु मी प्राचीन बुद्धाचा वंशज आहे. ते आपले अन्न भिक्षा मागून मिळवीत असत आणि भिक्षेवरच ते नेहमी आपला निर्वाह करीत असत. ”

शुद्धोदन निरुत्तर झाला तेव्हा तथागत पुढे म्हणाले, “जर आपण आपल्या सुख स्वप्नातून मुक्त व्हाल, आपले अंतःकरण सत्यासाठी उघडे कराल, आपण सदाचाराचा उत्साह बाळगाल आणि सत्धम्माचा मार्ग स्वीकाराल तर आपल्याला शाश्वत असा आनंद लाभेल. ”

शुद्धोदनाने हे सर्व शांतपणे ऐकले व म्हटले, “बाळ! तू त्याप्रमाणे वागण्याचा मी प्रयत्न करीन. ” जे म्हणतोस

२) पुत्र राहुलची धम्मदीक्षा

पुत्ता मत्थि धनमत्थि, इति वालो विहञ्ञति ।

अत्ता हि अत्तनो नत्थि, कुतो पुत्ता कुतो धनं । (धम्मपदं : ६२)

( पुत्र माझे आहेत, धन माझे आहे, असा विचार करून मूर्ख मनुष्य दुःखी होतो..

शरीर (च) स्वतःचे नाही तर कुठचे पुत्र अन् कुठचे धन ? )

शुद्धोदनाने तथागतांना आपल्या घरी आणले आणि घरच्या मंडळींनी त्यांचे आदराने स्वागत केले. पण राहुलची आई यशोधरा मात्र पुढे आली नाही. शुद्धोदनाने यशोधरेला बोलावणे पाठविले, परंतु ती म्हणाली, “खरोखर, जर माझा काही मान ठेवायचा असेल तर सिद्धार्थ स्वतःच माझ्याकडे येतील आणि मला भेटतील.’

आपल्या सर्व नातलगांना व मित्रांना भेटल्यावर भगवंतांनी विचारले, “यशोधरा कुठे आहे ?” आणि तिने येण्याचे नाकारले हे समजल्यावर ते उठले आणि तडक तिच्या दालनात गेले.

यशोधरा आपल्या दालनात विचारमग्न स्थितीत बसली होती. भगवंतांनी प्रवेश केला तेव्हा काठोकाठ भरून वाहणाऱ्या पाण्याच्या पात्राप्रमाणे ती इतकी प्रेमनिर्भर झाली की तिला स्वतःला सावरणे शक्य झाले नाही.

ज्याच्यावर आपण प्रेम केले तो पुरुष सत्याची शिकवण देणारा जगतृवंदनीय भगवान बुद्ध आहे हेही ती विसरून गेली. तिने त्याचे पाय धरले आणि ती एकसारखी रडू लागली.

तिचे दुःख शब्दातीत होते. तिच्या जीवनातील उदात्त वृत्तीमुळे तिच्या आध्यात्मिक पुण्याईच्या कीर्तीत भर पडली होती. आणि तिला अद्वितीय व्यक्तिमत्त्व प्राप्त झाले होते.

त्यानंतर यशोधरेने सात वर्षे वयाच्या राहुलला राजकुमाराच्या वैभवाला साजेसे कपडे घातले आणि ती त्याला म्हणाली-

“महान ब्रह्माप्रमाणे दिसणारा तेजस्वी चेहऱ्याचा हा सत्पुरुष तुझा पिता आहे. मी अजूनही पाहिल्या नाहीत अशा द्रव्याच्या मोठमोठ्या खाणी त्यांच्याजवळ आहेत. त्याच्याकडे जा आणि ती संपत्ती तुझ्या ताब्यात देण्याविषयी त्याला विनंती कर. कारण पित्याची मालमत्ता वारसाहक्काने पुत्राकडेच आली पाहिजे. ”

राहुल उत्तरला, माहीत नाही. ” “कोण माझा पिता ? शुद्धोदनाखेरीज दुसरा पिता मला यशोधरेने मुलाला उचलून घेतले. तेथून जवळच भिक्खूंच्या बरोबर अन्न सेवन करीत असलेल्या भगवंताकडे खिडकीतून बोट दाखविले आणि ती राहुलला म्हणाली, “तो बघ तुझा पिता, तुझा पिता शुद्धोदन नव्हे. ”

राहुल भगवंताकडे गेला आणि त्याच्या चेहऱ्याकडे पाहून निर्भयपणे आणि प्रेमाने म्हणाला, “आपण माझे पिता आहात ना ?” आणि त्याच्याजवळ उभा राहून तो म्हणाला, “श्रमणा, आपली छाया देखील आनंदमय आहे !” भगवंत शातच राहिले.

भोजन आटोपल्यावर तथागतांनी त्याला आशीर्वाद दिला आणि ते राजवाड्यातून जाऊ लागले. परंतु राहुल त्याच्या मागोमाग गेला आणि त्याच्याकडे आपला वारसाहक्क मागू लागला. कोणीही त्याला अडविले नाही. स्वतः भगवंतानेही त्याला प्रतिबंध केला नाही.

सारिपुत्ताकडे वळून भगवंत म्हणाले, “माझा पुत्र आपला वारसा मागतो आहे. चिंता आणि दुःख उत्पन्न करणारे नाशवंत असे धन मी त्याला देऊ शकत नाही. परंतु ज्याचा कधीही क्षय होणार नाही अशा पवित्र जीवनरूपी धनाचा वारसा मात्र मी त्याला देऊ शकेन ”

राहुलला उद्देशून अत्यंत आस्थेने तथागत म्हणाले, “सोने, रुपे आणि रत्ने यापैकी माझ्याजवळ काहीही नाही, परंतु आध्यात्मिक धन स्वीकारण्यास तू तयार असशील आणि ते वाहन नेण्याइतका व जतन करून ठेवण्याइतका तू समर्थ असशील तर असले धन माझ्याकडे विपुल आहे. माझे आध्यात्मिक धन म्हणजे धम्माचा मार्ग. परमोच्च आनंदाच्या प्राप्तीसाठी मनाच्या संस्काराच्या साधनेला ज्यांनी आपले जीवन वाहिले आहे अशांच्या संघात प्रवेश मिळावा अशी तुझी इच्छा आहे काय ?”

राहुलने निश्चयपूर्वक उत्तर दिले, “होय. ”

राहुल भिक्खूसंघात सामील झाल्याचे जेव्हा शुद्धोदनाने ऐकले तेव्हा त्याला अतिशय दुःख झाले.

श्रामणेर राहुल सुसंस्कृत होता, आज्ञाधारक होता. बुद्धाने राहुलला जो उपदेश दिला तो ‘अंबलट्ठिका राहुलोवाद सुत्ता’त नोंदविला आहे. राहुलने ध्यानात प्रावीण्य मिळविले. पुढे त्याला अर्हतपद प्राप्त झाले.

३) नंद याची धम्मदीक्षा

सिद्धार्थ गौतमाचा सावत्र व मावस भाऊ म्हणजे नंद. तो महाप्रजापती गौतमीचा पुत्ररत्न होता. ‘ महाप्रजापती गौतमीने सिद्धार्थास दुग्धपान करविले आणि आपले बाळ नंद यास दाईच्या हवाली केले. महाप्रजापतीने ‘सावत्र आई’ या शब्दाचा अर्थच बदलवून टाकला.

भगवान बुद्ध जेव्हा कपिलवस्तूला आले होते ते भोजनापरान्त भगवान बुद्धाने आपले भिक्षापात्र नंदच्या हातात दिले; त्यास आशीर्वाद दिला. ते भिक्षापात्र नंदकडून परत न घेता पुढे चालू लागले.

युवराज नंद भगवान बुद्धाच्या मागोमाग चालू लागला. भगवान बुद्ध कोणत्याही क्षणी भिक्षापात्र परत मागतील असे त्याला वाटले. पण भगवंताने मागितले नाही. त्यामुळे नंद बुद्धाच्या मागे आदराने चालत राहिला.

राजकुमार नंद बुद्धाच्या मागोमाग भिक्खूसंघासह जात आहे, हे लक्षात येताच त्याची सुविद्य पत्नी त्याच्या मागे धावत निघाली आणि म्हणाली, “हे राजन मागे फिरा.” हा कातर स्वर नंदच्या हृदयात शिरला. तो खिन्न झाला. परंतु बुद्धाप्रति असलेल्या आदरामुळे त्याने भिक्षापात्र बुद्धाला परत केले नाही.

बुद्धाच्या तात्पुरत्या निवासापर्यंत नंद सोबत गेला. तिथे पोहचल्यावर बुद्धाने नंदला विचारले, भिक्षू होणार काय?’ या प्रश्नाचे उत्तर त्याने होकारार्थीच दिले.

नंद श्रामणेर झाल्यावर त्याला संन्याशी जीवनात आनंद येत नव्हता. तो नैराश्याने ग्रासला होता. पत्नीबद्दल तो सातत्याने विचार करायचा. सोबत असलेल्या भिक्खूंना त्याने आपली व्यथा सांगितली. परत संसारात जाण्याची इच्छा व्यक्त

करू लागला. भगवान बुद्धाला ही गोष्ट कळताच बुद्धाने त्याची खात्री करून घेतली. नंदने ही गोष्ट कबूल केली आणि पत्नीबद्दल चिंता वाटते असे तो म्हणाला.

नंदला योग्य वळणावर आणण्यासाठी बुद्धाने प्रयत्न केला. आपल्या परामानसिक शक्तीचा उपयोग करून नंदला तावतींस नावाच्या स्वर्गात अप्सरा दाखविल्या. स्वर्गात पोहोचल्यावर तेथील अप्सरांकडे अंगुलिनिर्देश करून भगवान नंदला म्हणाले, “तुझी पत्नी जनपद कल्याणी या अप्सरांपेक्षा जास्त सुंदर आहे काय ?”

नंद म्हणाला, “अप्सरा अधिकच सुंदर आहेत.’

बुद्ध म्हणाले, ‘आनंदित हो नंद! मी सांगतो तसे केल्यास या अप्सरा तुला मिळतील, तसे मी वचन देतो.”

नंद म्हणाला, “असे असल्यास मी खुशीने भिक्खूचे पवित्र जीवन जगेन. ”

नंदची ही मनोवृत्ती भिक्खूंच्या लक्षात येताच ते त्याचा धिक्कार करू लागले. त्यामुळे नंदला हे लज्जास्पद वाटले. तो प्रामाणिकपणे साधना करू लागला. आणि अल्पकाळातच त्याने अर्हतपद प्राप्त केले.

त्यानंतर नंद भगवंताकडे आला आणि म्हणाला, “भगवंत, मी आपणास एका वचनातून मुक्त करू इच्छितो. ते वचन आहे मी सांगतो तसे केल्यास या अप्सरा तुला मिळू शकतील.’ ”

बुद्ध म्हणाले, “नंद, सांसारिक वस्तूंचा मोह जेव्हा तू त्यागलास आणि तृष्णारहित झालास त्या क्षणीच मी वचनमुक्त झालो. ”

नंदची प्रव्रज्या ही फाल्गुन पौर्णिमेलाच झाली होती.

संदर्भ :

१. धम्मपदं, संपा. डॉ. धनराज डाहाट, संकेत प्रकाशन, नागपूर, द्वि.आ. २०११, पृ. २१.

२. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, डॉ. भी.रा. आंबेडकर, सिद्धार्थ प्रकाशन, मुंबई, पृ.१२९ .

३. धम्मपदं, पृ. २५.

४. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, पृ.१३१.

५. बौद्ध धर्मावरील चार निबंध, धर्मानंद कोसंबी, म.रा. साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई, पुनः प्रकाशन १९८२, पृ. २९९

Phalgoon Purnima