मुंबई येथील आर. एम. भट हायस्कूल मधील इमारत फंडाच्या सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले भाषण….
डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आदेशानुसार एमारत फंडाच्या कार्याला चालना देण्याच्या उद्देशाने दिनांक १८ जून १९३९ रोजी सकाळी ९ वाजता आर. एम. भट हायस्कूल (मे. प्रिं. दोंदे यांची शाळा) परळ, मुंबई येथे सभेचे आयोजन केले होते.
या सभेच्या निमित्ताने श्री. शां. अ. उपशाम, सेक्रेटरी, इमारत फंड, मुंबई यांनी मुंबईतील महार जातीतील प्रमुख गृहस्थांना उद्देशून दिनांक १४ जून १९३९ रोजी एक निवेदन काढले होते. ते येणेप्रमाणे —
” अनेक जोहार, वि. वि. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रस्थापित केलेल्या इमारत फंडाच्या कार्याला जोराची चालना देण्याच्या बाबतीत विचारविनिमय करण्यासाठी ता. १८ जून १९३९ रोजी सकाळी ९ वाजता ठिकाण आर. एम. भट हायस्कूल (मे. प्रिं. दोंदे यांची शाळा) परळ, मुंबई येथे आपण आपल्या चाळीतील चार प्रमुख मंडळीसह येण्याची कृपा करावी. सदर प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्वतः हजर राहाणार आहेत. ”
या निवेदनाप्रमाणे दिनांक १८ जून १९३९ रोजी सकाळी १० वाजता परळ, मुंबई येथील आर. एम. भट हायस्कूल मधील हॉलमध्ये इमारत फंडाच्या सभेस सुरुवात झाली. मुंबई व मुंबई सबर्बन भागातील सर्व कार्यकर्त्यांनी सबंध हॉल चिक्कार भरला होता.
प्रथमतः इमारत फंडाचे सेक्रेटरी श्री. शांताराम अनाजी उपशाम यांनी इमारत फंडाच्या आतापर्यंत झालेल्या कार्याचा आढावा वाचून दाखविला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले.
इमारत फंडाच्या कार्याला चालना देण्याच्या उद्देशाने आयोजित केलेल्या सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले,
भगिनींनो व बंधूंनो,
अस्पृश्य समाजाकरिता सार्वजनिक कार्यासाठी मुंबईत एक प्रशस्त इमारत बांधणे जरूर आहे, असे मी वर्ष – सव्वा वर्षापूर्वी तुम्हाला सांगितले होते व त्यासाठी महार जातीने विशेष पुढाकार घेऊन फंड जमा करावा असेही सांगितले होते. त्या माझ्या सांगण्याप्रमाणे काही ठिकाणच्या लोकांनी फंड जमा करून आतापर्यंत मजजवळ दोन-अडीच हजार रुपये आणून दिले आहेत. मुंबई सारख्या ठिकाणी आपल्या सार्वजनिक कार्याला पुरेशी पडेल अशी इमारत बांधण्यास कमीत कमी एक लाख रुपये खर्च येणार आहे. एकंदर परिस्थितीचा विचार करता १-२ महिन्यातच या कार्याची मुहूर्तमेढ रोविली गेली पाहिजे. तेव्हा तुम्ही यापुढे स्वस्थ न बसता आजपासून या कार्याला सुरवात करा. दरेक चाळीतील माणसांनी आपल्यातील चार पाच किंवा चाळ मोठी असल्यास पाच दहा योग्य माणसांची कमिटी नेमा व त्यांच्या मार्फत आपापल्या चाळीतील माणसांची खानेसुमारी काढा. कमिटीतील सभासदांची नावे १-२ दिवसात कळवा. खानेसुमारी कशी काढावी याबद्दल तुम्हाला स्वतंत्र मजूर पक्षाच्या ऑफिसमध्ये माहिती मिळेल. ८-१५ दिवसात तुम्ही आपापल्या चाळीतील खानेसुमारी काढून स्वतंत्र मजूर पक्षाच्या ऑफिसमध्ये श्री. उपशाम मास्तर यांच्याकडे आणून द्या. सदर माहिती आणून दिल्यानंतर वर्गणीची रक्कम कशी जमा करावयाची याबद्दल तुम्हाला मागाहून माहिती देण्यात येईल.
या सत्कार्याला ज्यांचा पगार महिना ३० रु. पर्यंत आहे त्यांनी कमीत कमी २ रु. व ज्यांचा पगार ५० रु. पर्यंत आहे त्यांनी ५ रु. व ५० रु. पेक्षा जास्त पगार असणारांनी आपला एक महिन्याचा पगार द्यावा. तसेच शिक्षक, शिक्षिका व क्लार्कच्या नोकरीवर असणाऱ्या लोकांनी आपला एक महिन्याचा पगार द्यावयास पाहिजे.
🔹🔹🔹
संकलन – आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे
More Stories
स्वातंत्र्य, माणूसकी, समान हक्क मिळतील तेच स्वातंत्र्य – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सत्ता कोणाचीही असो अस्पृश्यांना दडपण्याचाच प्रयत्न होईल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
युद्धोत्तर हिंदुस्थानपुढे मोठमोठे प्रश्न उपस्थित होणार आहेत – डॉ. बाबासाहेब आंबेडकर