June 20, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

बुद्धशरण जाता जाता ‘ बुद्धमय मी झालो ॥

बुद्धशरण जाता जाता ‘ बुद्धमय मी झालो ।
नवा जन्म झाला माझा ‘धम्ममय मी झालो॥
बुद्धशरण जाता जाता …

युग असेच छळता छळता ‘ जाळूनिया गेले !
जीतेपणीच सरणावर मी ‘ मरण पाहिलेले ।
चैतन्य जागविले भीमाने ‘ भीममय मी झालो ॥
बुद्धशरण जाता जाता …

सरगम पंचशिलेची मी ‘ छेडीत निघालो !
अन अष्टशिलाच्या श्रावणात चींब चींब नाहलो ।
धम्मगाथा गाता गाता ‘ तथागतमय मी झालो ॥
बुद्धशरण जाता जाता …

दुःखमुक्त होण्या किती मी ‘ दगड पुजीयले !
पाखंडाच्या अज्ञातात व्यर्थ ‘ जीवन चाललेले ।
भ्रम सारा मिटला माझा ‘ विज्ञानमय मी झालो ॥
बुद्धशरण जाता जाता …

मानव कल्याणाचा दिधला ‘ धम्म हा निर्मल !
बुद्धप्रकाशात न्हाऊन गावे ‘ भवतु सब मंगलं ।
वृथा तृषा सरली आता ‘ मंगलमय मी झालो ॥
बुद्धशरण जाता जाता …

भीमबाबा सांगुन गेले ‘ हो तु तुझा स्वामी !
स्वयंप्रकाशीत होऊन गा तु ‘ “बुद्धं नमामि ” ।
संघशरण गेलो आता ‘ संघमय मी झालो ॥
बुद्धशरण जाता जाता ‘ बुद्धमय मी झालो ॥

नमो बुद्धाय जय भिम🙏