जसा चंद्र पौर्णिमेस परिपूर्ण असतो व स्वतः प्रकाशमान होऊन अंधाराचा नाश करतो, त्याचप्रमाणे विश्ववंदनीय महाप्रज्ञावान भगवान बुद्धाने जगातील अज्ञानांधकार आपल्या जानाच्या आलोकानो नाश केला आहे. भगवान बुद्ध होण्याच्या अगोदर सेनानी पुत्री सुजाताने वडाखाली चैत्र पौर्णिमेला खीर दान केली होती. आपला नैवेद्य घेण्यासाठी वन देवताने दरवर्षी असेच यावे, त्यावर बोधिसत्व सिद्धार्थाने म्हटले, भगिनी मी कोणी देव नाही, मी मानव आहे. जगातील दुःखाचा शोध करून दुःखातून मुक्ति मिळविण्यसाठी शोध करीत आहेत. हे बंधुराज, सत्याचा साक्षात्कार झाल्यावर मला येऊन भेटाल असे अभिवचन द्या. तिच्या म्हणण्याप्रमाणे बोधिसत्याने वचन दिले आणि बोधिचा लाभ झाल्यावर तिला भेट दिली, त्या दिवशी चैत्र पौर्णिमा होती.
आजही हिंदु धर्मातील स्त्रिया आजकाल वटवृक्षाची ऋषी म्हणून जेष्ठ पौर्णिमेला वटसावित्रीच्या नावाने पूजा करतात. वडाच्या झाडाची ऋषी म्हणून जी पूजा केली जाते. ती शाक्यमुनी बुद्धाची पूजा आहे. तो सुजाताचा विजय आहे. आज तिने दिलेल्या दानाची परंपरा आपणास प्राचीन इतिहासामध्ये (बौद्ध इतिहास) पहाण्यास मिळते,
🔹ज्येष्ठ पौर्णिमेचे महत्व🔹
ज्येष्ठ पौर्णिमेला पाली भाषेत जेठ्ठमासो म्हणतात. ही पौर्णिमा साधारणतः जून महिन्यात येते. या पौर्णिमेला तथागत बुद्धाच्या जीवनातील काही महत्वपूर्ण घटना घडल्यात.
१.तपस्सु आणि भल्लिक यांची धम्मदीक्षा.
२. सुजातास धम्मदीक्षा.
३. संघमित्रा आणि महेंद्र यांनी श्रीलंकेत बोधिवृक्ष लावला.
४. भिक्खू महेंद्र यांचे परिनिर्वाण.
तपस्सु आणि भल्लिक यांची धम्मदीक्षा
भगवंतास ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर एक महिना बोधिवृक्षाखाली राहिले आणि पाचव्या आठवड्यात ते गोथर्डच्या पर्वताकडे गेले आणि एक आठवडा तेथे वास्तव्य केले. नंतर मुचलिंद नावाच्या पर्वताकडे आपला मोर्चा वळवला. तेथील राजयतन वृक्षाखाली एक आठवडा वास्तव्य केले. पुढील आठवड्याच्या शेवटच्या दिवशी त्यांच्या दिशेने येतांना दोन गृहस्थ दिसले.ते दोन गृहस्थ म्हणजे तपस्सु आणि भल्लिक हे दोन व्यापारी बंधू होते. ते पाच गाड्यावर माल लादून त्या रस्त्याने जात होते. व्यापारी बंधूंना भगवंत दिसताच त्यांना वंदन करून त्यांच्या जवळ असलेल्या मध व पोळ्या दिल्या व खाद्यपदार्थ स्वीकारण्याची विनंती केली. भगवंतांनी त्यांची भेट स्वीकारली. आपली भेट स्वीकारल्याचे पाहून त्या व्यापाऱ्यांनी भगवंतास वंदन केले आणि आम्ही आपणास शरण आलो आहोत. आपले अनुयायी म्हणून धम्माचे सर्व नियम आम्ही पाळू व आम्हास सदधम्माची दिक्षा द्यावी अशी नम्र प्रार्थना केली. तेव्हा भगवंतांनी त्यांना *उपासक* या नावाने संबोधले व त्यांना धम्मात प्रवेश दिला. त्यावेळी संघ नावाची संस्था अस्तित्वात नव्हती.
तथागत बुद्धाच्या धम्माचे काही तरी आठवण असावी म्हणून अशी इच्छा व्यक्त केली तेव्हा भगवंतांनी त्यांचे आठ केस *जटा स्मृतिचिन्ह* म्हणून दिले. हेच भगवंताचे स्मृतिचिन्ह समजून आपल्या गावात त्यांवर एक विहार उभारून त्यात त्यांची स्थापना केली व नित्यनेमाने त्यांची वंदना करू लागले.
ज्या दिवशी ह्या दोन व्यापारी बंधूना सदधम्माची शिकवण देऊन *उपासक* म्हणून दीक्षित केले तो दिवस ज्येष्ठ पौर्णिमा होय.
जेष्ठ उपासिका सेनानी सुपुत्री सुजाताची धम्मदिक्षा
बोधगया येथे ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर तेव्हा त्यांना सुजाताने चैत्र पौर्णिमेला अर्पण केलेल्या खीरीची आठवण झाली आणि सुजाताला दिलेल्या वचनाची (सत्याचा मार्ग प्राप्त झाल्यानंतर मला येऊन भेटावे.) आठवण झाली. त्या वचनपूर्ती साठी सुजताचा शोध घेतला. सुजताच्या पतीस, व तिचा पुत्र यश यास सदधम्माची दिक्षा दिली. सुजाताचे वाराणसीत एकमेव कुटुंब होते की ज्यांनी सर्वप्रथम सहपरिवार दिक्षा (तीन रत्नाची) ग्रहण केली. सुजाता विषयी भगवंत म्हणाले की ” भिक्खुंनो! माझ्या उपसिकांमध्ये प्रथम येणाऱ्या मध्ये सुजाता सर्वश्रेष्ठ आहे.” सहपरिवार सुजातास दीक्षित केलेला दिवस होता ज्येष्ठ पौर्णिमेचा.
संघमित्रा आणि महेंद्र यांनी श्रीलंकेत बोधिवृक्ष लावला
महान सम्राट अशोकांनी जेव्हा त्यांचे धम्मगुरु महास्थाविर मोग्गलीपुत्त तिस्स यांना विचारणा केली की “मला धम्माचा दायाद बनण्यासाठी आणखी काय करावे लागेल? तेव्हा भन्ते म्हणाले” जो कोणी आपला स्वतःचा पुत्र, पुत्री धम्मास दान देतो त्यांना धम्मामध्ये प्रवज्जीत करून भिक्खू बनवितो तोच ‘दायक’ आणि ‘दायाद’ या दोन्ही उपाधीसाठी पत्र बनतो.” तेव्हा सम्राट अशोकाने आपला पुत्र महेंद्र आणि पुत्री संघमित्रा यांना प्रवज्जा धारण करणार का? अशी विचारणा केली तेव्हा दोघांनीही उत्तर दिले की “आपली इच्छा असेल तर आम्ही आजच प्रवज्जीत होऊ, प्रवज्जा ग्रहण केल्याने आमचे व आपलेही कल्याण होईल असे आम्हाला वाटते.” यानुसार आपल्या पित्याच्या इच्छेपोटी महेंद्र आणि संघमित्रा यांनी गृहस्थ जीवनाचा त्याग करून प्रवज्जा घेतली. त्यावेळी महेंद्रचे वय २० वर्षे तर संघमित्राचे वय १८ वर्षे होते.
महामहेंद्र यास प्रवज्जीत होऊन बारा वर्षे झाल्यानंतर त्यांच्या उपाध्यायाने (मोग्गलीपुत्त तिस्स) आणि संघाने त्यांना लंकाद्वीपमध्ये जाऊन बुद्ध धम्माच्या स्थापनेची आज्ञा केली, ती शिरसावंद्य मानून स्थविर उपाध्यायांना वंदन करून सोबत चार स्थविर घेऊन धम्माचा प्रचार व प्रसारासाठी लंकाद्वीप गाठले. तो दिवस होता ज्येष्ठ पौर्णिमेचा.
पुढे काही वर्षांनी भिक्खूनी संघमित्राशी बोधिवृक्षाच्या फांदीसह स्थविर महामहेंद्र यांनी श्रीलंकेस बोलवून घेतले. संघमित्रा अनेक श्रामनेरी सोबत घेऊन लंकेत दाखल झाली व तेथे भिक्खूनी संघ स्थापन केला.
भिक्खू महामहेंद्र आणि भिक्खूनी संघमित्रा लंका द्विपातील अनुराधापूर येथे जम्बुद्वीपातून आणलेली बोधिवृक्षाच्या एक शाखा लावली. तो दिवस होता ज्येष्ठ पौर्णिमेचा.
भिक्खू महेंद्र यांचे परिनिर्वाण.
बुद्ध धम्माचे विरोधक आणि धर्मांध आक्रमकांनी चौदाव्या शतकापर्यंत भारतातून बौद्ध साहित्य नष्ट केले होते. अशा अवस्थेत महामहेंद्र यांनी श्रीलंकेत ते साहित्य सुरक्षित ठेवले. तसेच अडतीस वर्षे श्रीलंकेत धम्मसेवा करून वयाच्या ८०व्या वर्षी महामहेंद्र यांनी जगाचा निरोप घेतला.श्रीलंकेच्या अनुराधापुरम त्यांचे परिनिर्वाण झाले तो दिवस होता ज्येष्ठ पौर्णिमेचा.
(संदर्भ-भीम निर्णय दिनदर्शिका २०२०,माहे-जून व उज्ज्वला गणवीर मॅडम यांचा संपादित लेख.)
ज्येष्ठ पौर्णिमेच्या सर्वांना मंगल सदिच्छा!🌹🌹🌹
वरील प्रमाणे अष्टशीलाचे उपासक/उपासिका व्रत करतात. भोजनामध्ये खीर ग्रहण करतात. धम्माची देशना श्रवण करून महापुण्य संपादन करून घेतात, असा हा जेष्ठ पौर्णिमेचा सण साजरा करावा.
More Stories
अश्विन पौर्णिमा – अस्सयुज मासो Ashwin Purnima
भाद्रपद पौर्णिमा – पोट्ठपाद मासो Bhadrapada Poornima – Potthapada Maso
आषाढ पौर्णिमा Ashadha Purnima