December 25, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

मुंबई विद्यापीठ मध्ये ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर अ ज्युरिस्ट’ कार्यक्रमाचे आयोजन; बाबासाहेबांच्या वकिली प्रारंभाचा शताब्दी सोहळा

University Of Mumbai: मुंबई विद्यापीठाचे प्रतिष्ठित माजी विद्यार्थी व भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडन येथील ‘ग्रेज इन’ या संस्थेतून प्राप्त केलेल्या बॅरिस्टर या सर्वोच्च पदवीस आणि मुंबई उच्च न्यायालयाची वकिलीची सनद प्राप्त करून ५ जुलै १९२३ रोजी वकिलीस प्रारंभ केला. या ऐतिहासिक घटनेला १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. या संस्मरणीय आणि ऐतिहासिक घटनेचा शताब्दी सोहळा साजरा करण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या सर कावसजी जहांगीर दीक्षान्त सभागृहात ०९ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजता ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर अ ज्युरिस्ट’ या कार्यक्रमाचे आयोजन केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा, मुंबई विद्यापीठाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र व विधी विभाग आणि अधिवक्ता परिषद कोकण प्रांत यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे मा. राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस, मुंबई उच्च न्यायालयाचे मा. मुख्य न्यायाधीश देवेंद्रकुमार उपाध्याय हे उपस्थित असणार आहेत. तर, महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता डॉ. बिरेंद्र सराफ, बार्टीचे महासंचालक श्री. सुनिल वारे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, बार कौन्सिल महाराष्ट्र आणि गोवाचे अध्यक्ष एड. विवेकानंद घाटगे, उपाध्यक्ष एड. उदय वारूंजीकर, अधिवक्ता परिषदेच्या राष्ट्रीय सचिव एड. अंजली हेळेकर आणि बार्टीचे विधी सल्लागार एड. सिद्धेश तिवरेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होत.

सदर कार्यक्रमात मा. राज्यपाल यांच्या हस्ते प्राचार्य डॉ. बळीराम गायकवाड यांनी संपादीत केलेल्या ‘चिंतनातील क्रांतीसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ आणि डॉ. संभाजी बिरांजे संपादित ‘करवीर संस्थान, बॅरिस्टर आंबेडकर आणि कोर्ट कचेरीतील बहिष्कृत’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन सोहळाही पार पडणार आहे. कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्रानंतर दोन चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले असून नामांकित वक्ते या चर्चासत्रात सहभागी झाले.

‘रोल ऑफ लीगल एज्युकेशन इन सेटींग पाथ फॉर सोशल ट्रान्सफॉर्मेशन बाय डॉ. आंबेडकर’ यावर डॉ. सिद्धार्थ घाटविसवे मार्गदर्शन करणार आहेत. ‘कॉन्ट्रीब्युशन ऑफ डॉ. आंबेडकर इन ड्राफ्टिंग कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया अँड इट्स इम्पॅक्ट ऑन इंडियन डेमॉक्रसी’ या विषयावर महाधिवक्ता डॉ. बिरेंद्र सराफ मार्गदर्शन केले.

‘रायटिंग ऑफ डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ यावर अ‍ॅड. उदय वारूंजीकर हे मार्गदर्शन करणार आहेत. तर ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर- अ रोल मॉडेल (इंडिया अँड वर्ल्ड)’ यावर डॉ. प्रदीप आगलावे हे मार्गदर्शन करणार आहेत. या ऐतिहासिक शताब्दी सोहळ्याला कायद्याचे अभ्यासक, तज्ज्ञ, वकिल आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले होते .