महाकारुणिक तथागत भगवान बुध्द व बोधिसत्व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या सधम्माचे अनुसरण करणे हे समस्त मानवजातीच्या हिताचे, सुखाचे व कल्याणाचे आहे.बौध्द धम्म हा विश्वातील एकमेव सर्वश्रेष्ठ जिवनमार्ग असून प्रत्येक व्यक्तीने या मार्गाने शील सदाचाराचे जिवन जगणे धम्मामध्ये अपेक्षित आहे.कारण धम्माच्या शिकवणुकीनुसार कर्म हेच मनुष्याच्या सुगती वा दुर्गतीचे प्रमुख कारण आहे.त्यामुळेच प्रत्येक व्यक्तीने काया(शरीर),वाणी(वाचा),मन(चित्त)अश्याप्रकारे तिन्ही पातळीवर मनाने सजग(दक्ष)राहून सर्व प्रकारच्या अकुशल कर्मापासून स्वतःचा बचाव केला पाहिजे.जर आपण कर्म करताना सावध राहीला नाहीत तर मनुष्याच्या हातून अकुशल कर्म (पापकर्म)अटळ आहे.व त्या पापकर्माचे दुष्परिणाम देखील याच ठिकाणी(इहलोकी) याच जन्मात इथेच भोगावे लागतील हे निर्विवाद सत्य आहे.याउलट जर प्रत्येकाने धम्म काया, वाचा व शरीराने अनुसरला तर सर्वांनाच सुख,शांततामय जिवन देखील इथेच याच जन्मी व सदासर्वकाळ मिळेल हीच धम्माची खरी शिकवण आहे.यासाठी प्रत्येक बौध्द व्यक्तीने धम्मआचरण समजून घेणे आवश्यक आहे.धम्म आचरण करण्याचे व्यक्तिगत,पारिवारिक व सामाजिक लाभ समजून घेतले पाहिजे.जोपर्यंत प्रत्येकाला धम्माचे दैनंदिन जिवनातील महत्व लक्षात येणार नाही तोपर्यंत धम्म आचरणातून मिळणाऱ्या सुखाच्या सर्व लाभापासून वंचित रहावे लागेल.धम्म आचरण करणे ही जितकी वैयक्तिक बाब आहे तितकीच ती एक सामाजिक गरज देखील आहे. पंचशिलातील पहिले शील *पाणातिपाता वेरमणी सिक्खापदं समादियामी* म्हणजेच मी जीव हिंसा करणार नाही. हे शील पालन न केल्याने कितीतरी नुकसान होते.हिंसा करणारी व्यक्ती ही सर्वत्र क्रूर,डाकू, गुंड,मवाली किंवा बदमाश म्हणूनच ओळखली जाते.तिच्या या क्रूर स्वभावामुळे ती कोणाचे कधी बरे वाईट करेल हे सांगता येत नाही.अशी व्यक्ती मनाने व शरीराने हिंसा करून दुसऱ्याच्या मनाला किंवा शरीराला मोठा आघात पोहचवते.अश्या व्यक्तीपासून सर्वाना धोका असतो म्हणून कोणीही अश्या व्यक्तीच्या जवळ जाणे पसंत करीत नाही. पहिले शील न पालन केल्याचे दुष्परिणाम हे त्या व्यक्तीला भोगावेच लागतात. व्यक्तीगत, पारिवारिक व सामाजिक जिवनात अश्या व्यक्तीला कोणतीच किंमत नसते.पंचशिलातील दुसरे शील म्हणजेच
*अदिन्नादाना वेरमणी सिक्खापदं समादियामि* म्हणजे मी चोरी करणार नाही. हे शील पालन न करणारी व्यक्ती ही चोर,दरोडेखोर, लुटेरे,भ्रष्टाचारी म्हणूनच ओळखली जाते.अश्या व्यक्ती समाजात लपुन छपुन जिवन जगतात. त्यांना समाजात ताठ मानेने सन्मानाने जगता येत नाही.त्यांना व्यक्तिगत, पारिवारिक व सामाजिक प्रतिष्ठा लाभ मिळत नाही.
पंचशिलातील तिसरे शील *कामेसु मिच्छाचारा वेरमणी सिक्खापदं समादियामि* म्हणजे मी कामवासनेच्या अनाचारापासून अलिप्त राहीन.जे लोक या शीलाचे पालन करीत नाही त्यांचे जिवन खुपच दुःखद असते. अश्या लोकांनी केलेला कितीही लपुन छपुन स्वैराचार केला तरी तो कधी ना कधी उघड होतोच.शिवाय त्यामुळे त्यांचे सांसारिक जीवन उध्वस्त होते. आपल्या जिवनाच्या जोडीदाराची फसवणूक करून ते विश्वास गमावून बसतात.त्यामुळे त्यांचा जिवनाचा जोडीदार देखील त्यांना कायमचे सोडून जातो.अश्या लोकांना शेवटी एकटेच रहावे लागते.अश्या लोकांच्या वाईट अकुशल कर्मामुळे दोन कुटुंबे उध्वस्त होतात.यातून बहुतवेळा अश्या व्यक्तीला स्वतः जीव देखील गमावावा लागतो.
पंचशिलातील चौथे शील *मुसावदा वेरमणी सिक्खापदं समादियामि* म्हणजेच मी खोटे बोलणार नाही.जे लोक या शीलाचे पालन करीत नाही त्याला खोटारडा म्हणून लोक ओळखतात.त्याच्या बोलण्यावर कोणीही विश्वास ठेवीत नाही.अशी व्यक्ती आपल्याशी कधीही दगाबाजी करेल अशी लोकांना खात्री असते म्हणून अश्या लोकांशी इतर लोक ज्यास्त संपर्क ठेवीत नाही.पंचशिलातील शेवटचे शील हे *सुरा मेरय मज्ज पमादठाणा वेरमणी सिक्खापदं समादियामि*
मी दारू पिणार नाही अशी शिकवण ग्रहण करतो. जे लोक या शीलाचे पालन करीत नाही त्यांना वरील चार शील न पालन केल्याबद्दलचे जे सर्व दुःख असते ते सर्वच दुःख देखील भोगावे लागते.
एक व्यक्ती त्याच्या कमाईच्या पैशातुन दररोज दारू पित असेल तर वरवर पाहता ती त्याची वैयक्तिक बाब वाटते. परंतु, केवळ ती त्याची वैयक्तिक बाब राहत नसून त्याचे हेच अकुशल कर्म सामाजिक नीति व्यवस्था बिघडविन्यास देखील त्याचे दुरवर्तन कारणीभूत ठरते.कारण तो व्यक्ती दारू पिऊन शरीर, वाणी व मनाद्वारे अकुशलकर्म करतो.दारुच्या नशेमध्ये असताना त्याचे दुसऱ्याला अपशब्द बोलणे, क्रोध व्यक्त करणे,शिव्या देणे हेच वाणीचे अकुशल कर्म होय.अती क्रोधातुन त्याने एखाद्याला मारणे म्हणजे शरीराची हिंसा होय.व मनातून द्वेष,तिरस्कार प्रकट करणे हे मनाचे पापकर्म समजले जाते.त्या व्यक्तीचे दारू पिण्याच्या वाईट सवयीमुळे एवढेच नुकसान होत नाहीतर खऱ्या संपत्तीचा नाश, त्याचे आरोग्य बिघड़ते, त्याच्या शब्दावर कोणीही विश्वास ठेवत नाही,नातेवाईक लोक आदर करीत नाही,शीलभ्रष्ट झाल्याने त्याच्या हातून सतत पाप घडू शकते,त्याची बुद्धीमत्ता देखील प्रभावीपणे कार्य करू शकत नाही.अश्या प्रकारे एक अकुशल कर्म करून ती व्यक्ती तिचे जिवन,गृहस्थी जिवन व सामाजिक प्रतिष्ठा सर्व गमावून बसते.व कायमचे शारीरिक, मानसिक ठायी ठायी सर्वत्र फक्त दुःखच भोगते.यालट जी व्यक्ती पंचशिलातील हे पाचवे शील परिपूर्ण सांभाळते तिचे जिवन सुखी होते.म्हणजेच यावरून धम्म ही दैनंदिन जिवनातील आचरण करण्याची आपली नित्य सवय बनने अतिआवश्यक आहे.तरच व्यक्तीचे स्वतः चे व्यक्तीगत व पारिवारिक जीवन बदलू शकते व भविष्य उत्तमरित्या घडविता येवू शकते.
दैनंदिन जिवनातील पंचशिलाचे महत्व लक्षात घेतल्यावर धम्म आचरणाला आपण किती महत्व द्यायला पाहिजे हेच यावरून आपल्या लक्षात आले असेल.ज्या प्रमाणे पाण्याचा एक थेंब थेंब एकत्र केल्यावर महाकाय विशाल महासागर बनतो.अगदी त्याच प्रमाणे आपली दैनंदिन जिवनातील अगदी लहान कुशल कर्म करण्याची नित्य सवय हीच जिवनातील मोठ्या महान सत्कर्म फळ प्राप्त करून देत असते.त्यामुळे कोणतेही लहान कुशल कर्माला कधीच कमी समजू नये व कोणत्याच लहान अकुशल कर्माप्रती मुळीच बेफिकर राहू नये. कारण धम्म संस्कृति रुजविन्यासठी तथागत भगवान बुद्ध यांनी धम्मपालन गाथेमध्ये सांगितल्याप्रमाणे सर्व प्रकारच्या अकुशल(पाप)कर्मापासून दूर राहणे, सर्व कुशल कर्म करीत राहणे व चित्ताला निर्मळ (शुद्ध)करणे हीच शिकवण दैनंदिन जिवनात पंचशिल पालन करून प्रत्येकाने मनापासून धम्म अंगिकारण्याची खरी गरज वाटते.
✒️शब्दाकंन :
आयु.मिलिंद बनसोडे
(बौद्धाचार्य) नाशिक
संपर्क-9960320063
More Stories
Nashik दि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलच्या नुतन इमारत कोनशिला उद्घाटन सोहळा संपन्न झाला
✨ धम्म प्रचार प्रसार सेवा सहयोग सहकार्य आवाहन Donate For Dhamma Prachar
दलाई लामा यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त १३ जुलै रोजी नवी दिल्लीत जागतिक बौद्ध परिषद होणार आहे.