ऐतिहासिक विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी तसेच या लढ्यात धारातीर्थी पडलेल्या शूरवीर योद्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी लक्षावधी आंबेडकरी अनुयायी १ जानेवारीला येणार आहेत. त्या अनुषंगाने सुरू असलेली तयारी अंतिम टप्प्यात आल्याची माहिती समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे, शशिकला वाघमारे, अर्चना केदारी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक विजयस्तंभाला अभिवादन कार्यक्रमासाठी यंदा आठ ते दहा लाख नागरिक येण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने प्रशासनाकडून नियोजन केले जात आहे. जिल्हा प्रशासनाकडून संबंधित यंत्रणांसोबत पूर्वतयारीच्या बैठका घेतल्या जात आहेत. अभिवादन कार्यक्रम शांततेत आणि सुरळीत पार पाडणे, तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक विजयस्तंभापासून १०० मीटर परिसरात सभा घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरिता जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. दरवर्षी १ जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक स्तंभास अभिवादन करण्यासाठी राज्यासह देशभरातून नागरिक येतात. यंदा या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात अनुयायी येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे.
प्रशासना कडून करण्यात व्यवस्था : यंदा अनुयायी मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता असल्याने कोरेगाव भीमा परिसरात १७ ठिकाणी वाहनतळांची व्यवस्था करण्यात आली आहे. पीएमपीकडून शहराच्या विविध भागातून ३९० बसगाड्या या ठिकाणी सेवा देणार आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी १३० टँकर आणि पुनर्वापर करता न येणारे दोन लाख ग्लास उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच पुणे जिल्ह्याबाहेरून येणार्या नागरिकांसाठी महामार्गावर मोठे फलक लावण्यात येणार आहेत. कोरेगाव भीमा येथे यंदा तब्बल पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे.
शौर्यभूमी विजयस्तंभ येथे जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय समितीने सर्व पायाभूत सुविधा पुरविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मागील वर्षापेक्षा यंदा दुप्पट सुविधा देण्याविषयी कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. पक्ष संघटना व नेत्यांच्या अभिवादन सभा विजयस्तंभापासून शंभर मीटर लांब होणार आहेत. तात्पुरते शौचालय, पीएमपी बस, पिण्याचे पाण्याचे टँकर, लाईट व प्रकाश व्यवस्था यासह इतर सुविधा मागील वर्षापेक्षा दुप्पटीने वाढविल्या आहेत. महिला अनुयायांना बसण्यासाठी मंडपांची व्यवस्था करण्यात येत आहे. आंबेडकरी साहित्य विक्री करणार्या स्टॉलधारकांना स्वतंत्रपणे जागा व मंडप उपलब्ध करून देण्यात येत आहेत, अशी माहिती डंबाळे यांनी दिली.
कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमस्थळी आणि परिसरामध्ये पहिल्यांदाच हिरकणी कक्ष उभारण्यात येणार आहेत. या सोहळ्यामध्ये महिलांसाठी विशेष उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांनी दिली.
जिल्हा प्रशासनाकडून विविध विभागांच्या समन्वयाने विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येत आहे. याबाबत वाघमारे म्हणाले, ’आरोग्याच्या दृष्टीने रुग्णवाहिका, बाह्यरुग्ण तपासणी विभाग (ओपीडी ), दुचाकी रुग्णवाहिकादेखील कार्यक्रमस्थळी असतील. त्यासोबतच महिलांसाठी स्वतंत्र ओपीडीची व्यवस्था करण्यात येत आहे. त्याचबरोबर स्वतंत्र शौचालये उभारण्यात येत आहेत. या वर्षीपासून महिलांसाठी चेंजिंग रुग्म, हिरकणी कक्ष तयार करण्यास सुरुवात केली आहे. हिरकणी कक्षामध्ये लहान मुलांसाठी खेळण्यांची देखील व्यवस्था करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
आत्तापासूनच काही अनुयायी यांनी कोरेगाव भीमा येथे भेटी देण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या सुविधेसाठी परिसरामध्ये काही शौचालये उभा केली आहेत. पिण्याच्या पाण्याच्या टँकरवर चालकाबरोबरच एका अतिरिक्त व्यक्तीची नेमणूक करण्यात येणार आहे. पाणी पिण्यासाठी कागदी ग्लास दिले जाणार आहेत. याशिवाय संभाव्य कोरोनाच्या धोक्यामुळे नागरिकांना मास्क देण्याचे विचाराधीन असल्याचेही वाघमारे यांनी सांगितले.
More Stories
दीक्षाभूमीवर क्रांतीचा नारा ‘जय भीम’; समतेची मशाल घेत देश-विदेशातून दाखल झाला जनसागर
कवी साहित्यिक किरण लोखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त काव्यसंमेलन, बक्षीस वितरण
बुद्ध धम्म समजणे म्हणजे काय ? What is understanding Buddha Dhamma ?