डाॅ. बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या संस्थांनी इंदोरा, नागपूर येथे अचानक आयोजित केलेल्या जाहीर सत्कार समारंभात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले भाषण….
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मंगळवार, दिनांक १० मे १९३८ रोजी एका क्रिमिनल केसच्या निमित्ताने नागपूर मुक्कामी आले होते. बाबासाहेब नागपूरात येणार असल्याची पूर्वकल्पना नसल्याने कोणालाही बाबासाहेब नागपूरात आल्याचे खरेच वाटेना. पण बाबासाहेब नागपूरात आल्याचे कळताच काम-धंद्यावरून रजा काढून बाबांना बघण्यासाठी मोठ्या संख्येने लोक येऊ लागले. अशारितीने बाबांच्या दर्शनाकरिता हजारोंनी जनसमुदाय जमू लागल्यामुळे आणि त्या दिवशी बाबांना कचेरीचे काम नसल्यामुळे मिळालेल्या संधीचा फायदा घेऊन बाबांच्या दर्शनाचा व मार्गदर्शनाचा लाभ सर्वांना करून देण्याकरिता रात्रीच्या वेळी अर्धा तास देण्याची बाबांना विनंती करण्यात आली. बाबांनी विनंती मान्य केल्यावर स्वतंत्र मजूर पक्ष, नागपूर नगर आणि समता सैनिक दल वगैरे बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या संस्थांनी इंदोरा येथे ताबडतोब जाहीर सत्कार करण्याची व्यवस्था केली. समारंभाच्यावेळी जोराचा वारा, मुसळधार पाऊस व विजेचा कडकडाट असताना देखील बाबासाहेबांच्या दर्शनास लोकसमुदायाचे थवेच्या थवे जमू लागले. सत्यप्रसारक जलसा मंडळ, इंदोरा यांच्यातर्फे भव्य व्यासपीठ उभारण्यात आले. समता सैनिक दलाचे सैनिक आपल्या गणवेषात हजर झाले. या सभेला जवळपास वीस हजारावर स्त्री-पुरुष, आबालवृद्ध जमले व बाबासाहेबांच्या आगमनाची उत्कंठतेने वाट पाहू लागले. रात्री साडेनऊ वाजता डॉ. बाबासाहेबांची मोटार येताच सैनिकांतर्फे प्रथम बँडची सलामी व गार्ड ऑफ ऑनर देण्यात आले. बाबासाहेब व्यासपीठावर विराजमान होताच टाळ्यांच्या कडकडाटाने व त्यांच्या नावाच्या जयघोषाने सर्व पटांगण दुमदुमून गेले. तेव्हा व्यासपीठावर येऊन श्री. आर. आर. पाटील, सेक्रेटरी, मध्यप्रांत आणि वऱ्हाड दलित फेडरेशन यांनी जमलेल्या लोकसमुदायाला उद्देशून म्हटले, ” बंधु, भगिनींनो ज्या देवाची एक तासापासून मोठ्या उत्कंठतेने वाट पहात आहा, तो देव आपल्या सर्वांच्यासमोर विराजमान झाला आहे. त्यांना हार अर्पण करण्यास आपण उत्सुक झाला आहात. मी ज्यांची नावे सूचवीन त्यांनी अनुक्रमाने येऊन बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करावेत. स्वतंत्र मजूर पक्ष, नागपूर नगर दलित फेडरेशन व समता सैनिक दलातर्फे हार अर्पण केल्यावर भारतीय सत्यप्रसारक जलसा मंडळ, बेझनबाग, आंबेडकर सोशल क्लब लायब्ररी, साहित्य चर्चा मंडळ, अस्पृश्य महिला वसतीगृह, आंबेडकर सहाय्यक समाज, विजयी समाज, महार नवयुवक दल, भानखेडा, बालवीर वाचनालय, सिरसपेठ, समताविजयी समाज, कुंभारपुरा वगैरे असंख्य गटांकडून हार अर्पण करण्यात आले. त्यांची यादी देणे स्थलअभावी कठीण होईल. यानंतर श्री. बाबू मेश्राम, इंदोरा यांच्यातर्फे डॉ. बाबासाहेबांच्या कामगिरीवर एक लहानसा पोवाडा म्हणण्यात आला व बाबासाहेबांना दोन उपदेशपर गोष्टी सांगण्याबद्दल विनंती करण्यात आली. क्षणार्धात सुई पडली तर तिचा आवाज ऐकू येईल इतकी शांतता झाली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब बोलण्यास उठत आहेत हे पाहून टाळ्यांचा प्रचंड कडकडाट व त्यांच्या नावाचा जयघोष झाला.
या सत्कार समारंभास उत्तरादाखल केलेल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,
बंधु भगिनींनो,
इतक्या अल्पावधीत वारा, पाऊस व विजांच्या कडकडाटात माझ्या अपेक्षेच्या बाहेर जमलेला लोक समुदाय पाहून मी आपल्या सर्वांचे अभिनंदन करतो. दुसरे असे की, मी ज्या कामाकरिता येथे आलो त्या कामाची मंडळी माझ्या मुक्कामाच्या ठिकाणी माझी वाट पहात आहेत. अशावेळी त्यांना जास्त वेळ तिष्ठत ठेवणे हे देखील मला योग्य होणार नाही. तरी आपला जास्त वेळ न घेता एक दोन गोष्टींचा उल्लेख करून मी माझे भाषण संपवीन. तुमच्या प्रांतात झालेल्या बेकीचा विचार करण्याकरिता मला आता वेळ नसल्यामुळे त्याचा विचार मी पुढे कधीतरी करीन. तुम्हास माहीत असेल की तुमच्या प्रांतात ज्या २० जागा मिळविल्या आहेत, त्या किती त्रासाने व कष्टाने मिळविल्या आहेत. तेव्हा त्या राखणे तुमचे कर्तव्य आहे. अस्पृश्य समाज गरीब व निर्धन आहे. त्याला राजकीय सत्ता हाती ठेवणे महाकठीण आहे. त्यातल्यात्यात कॉंग्रेस सारख्या मोठ्या संस्थेशी टक्कर देणे अत्यंत कठीण आहे. तेव्हा अशा कठीण वेळी ही तुम्हास मिळालेली राजकीय सत्ता राखणे अत्यंत कठीण आहे. तुम्ही निवडणुकीच्या वेळी निवडून दिलेली माणसे आपल्या हिताचे कार्य करतात किंवा नाही हे पाहणे तुमचे कर्तव्य आहे. त्यांच्या कामावर पाळत ठेवणे, कौन्सिलमध्ये जे कार्य होते त्यात आपल्या हिताचे प्रश्न, ठराव वगैरे मांडतात किंवा नाही, हे पाहणे तुमचे कर्तव्य होय. प्रत्येक सेशनच्या शेवटी या लोकांनी केलेल्या कामगिरीचा जाब आज भरविलेल्या सभेप्रमाणे सभा बोलावून त्या सभेत त्यांना विचारू शकता. जे तुमच्या हिताचे कार्य करीत नाहीत त्यांच्याविरुद्ध ते ज्या कॉन्स्टिट्युअन्सीमधून निवडून आले असतील त्या कॉन्स्टिट्युअन्सीमध्ये त्यांच्याविरुद्ध प्रचार करणे हे तुमचे कर्तव्य होय. जसे निवडून देणे हे तुमचे कर्तव्य आहे तसेच त्यांच्या कार्यावर नजर ठेवणे हे तुमचे आद्यकर्तव्य होय. यांच्यावर अशारीतीने पाळत ठेवल्याने ते भीतीने तरी कौन्सिलमध्ये कार्य करतील. अशारितीने तुमचे कार्य चालल्यास तुमच्या हिताचे बरेच कार्य होईल. आज मला वेळ नसल्यामुळे माझे भाषण येथेच संपविणे बरे होईल.
🔹🔹🔹
असे म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपले भाषण संपविले. यानंतर डॉ. बाबासाहेबांचे व जमलेल्या मंडळीचे आभार मानल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयघोषात समारंभ संपला.
⚫⚫⚫
संकलन – आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे
More Stories
स्वातंत्र्य, माणूसकी, समान हक्क मिळतील तेच स्वातंत्र्य – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सत्ता कोणाचीही असो अस्पृश्यांना दडपण्याचाच प्रयत्न होईल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
युद्धोत्तर हिंदुस्थानपुढे मोठमोठे प्रश्न उपस्थित होणार आहेत – डॉ. बाबासाहेब आंबेडकर