September 27, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

आपण अन्यायाचा प्रतिबंधच केला नाही तर आपला उद्धार होणे शक्य तरी आहे काय ? – डाॅ. बाबासाहेब आंबेडकर

वऱ्हाड प्रांतिक शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनच्या पहिल्या परिषदेत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले भाषण….

अकोला ( वऱ्हाड ) येथे दिनांक ९ व १० डिसेंबर १९४५ रोजी वऱ्हाड प्रांतिक शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनची पहिली परिषद भरली होती. अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, अकोला व मध्यप्रांत अशा दूरदूरच्या ठिकाणाहून या परिषदेला शेकडो प्रतिनिधी उपस्थित झाले होते. परिषदेला पाऊण लाख लोक हजर होते.

परिषदेचे वैशिष्ट्य

अकोला येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे प्रथमच आगमन असल्यामुळे वऱ्हाड प्रांतातील चारही जिल्ह्यातील हजारो स्त्री-पुरुष डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दर्शनाकरिता आले होते. काही भागातून दोन-दोन दिवसांचा प्रवास करुनही लोक आपल्या आवडत्या पुढाऱ्याच्या दर्शनाकरिता व त्यांचा संदेश ऐकण्याकरिता आले होते. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर अकोल्याला येणार असल्याचे आगाऊ माहित असल्यामुळे खास सिनेमातून “अखिल भारतीय बहिष्कृत वर्गाचे एकमेव पुढारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे तारीख १० डिसेंबर १९४५ ला अकोल्याला उपस्थित राहून भाषण करणार आहेत. ” अशा तऱ्हेची जाहीरात दहा दिवस अगोदर दाखविली जात होती. थोडक्यात डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आगमनाविषयी सबंध अकोल्यातील जनतेला नव्हे तर वऱ्हाड प्रांतातील जनतेला आमचे अनभिषिक्त राजे, आमचे पुढारी आम्हाला केंव्हा भेटतील अशी उत्कंठा लागून राहिली होती. अकोल्याला येईपर्यंत ज्या ज्या स्टेशनवर गाडी थांबली त्या त्या ठिकाणी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे हार्दिक स्वागत झाल्यामुळे त्यांना सबंध रात्रभर त्रास झाला होता. प्रतिनिधींना मुलाखती व मध्यप्रांतातील पुढाऱ्यांशी आगामी निवडणुकी संबंधी त्यांनी पाऊण तास चर्चा केल्यावर प्रमुख पुढाऱ्यांचा फोटो घेण्यात आला.

अकोला स्टेशनपासून प्रचंड मिरवणुकीला सुरुवात झाली. या मिरवणुकीची लांबी तीन-चार फर्लांग होती. अकोला स्टेशन ते टिळक मैदानापर्यंतचा रस्ता स्त्री-पुरुषांनी फुलून गेला होता. या मिरवणुकीत अखिल भारतीय शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनचे उत्साही जनरल सेक्रेटरी श्री. राजभोज, भारतीय संस्थानी शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनचे अध्यक्ष सुबय्या, म्यु. कामगार परिषदेचे नियोजित अध्यक्ष श्री. सज्जनसिंग, शांताबाई दाणी (नाशिक), वगैरे प्रामुख्याने दिसत होते, वऱ्हाड प्रांतातील जिल्ह्यातील समता सैनिक दलाने या मिरवणुकीत उत्साहाने भाग घेऊन उत्तम प्रकारे शिस्त सांभाळली होती. दुतर्फा सैनिक दल, मधोमध पुढाऱ्यांच्या मोटारी, मागे महिला मंडळ व इतर जनसमूह व सर्वांच्या आघाडीला नानाविध वाद्यांचे ताफे आणि मर्दानी दांडपट्टयाचा खेळ आणि बैंड अशा उत्साही थाटात व डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयघोषात मिरवणूक चालली होती. मिरवणुकीत ” डॉ. आंबेडकर कौन है। दलितोंका राजा है। “, ” शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनचा विजय असो “, ” हरिजन नावाचा धिक्कार असो “, ” आंबेडकर झिंदाबाद l थोडे दिनमें भीमराज ” वगैरे गगनभेदी घोषणांनी सर्व वातावरण दुमदुमून गेले होते.

अशा अपूर्व सोहळ्यात मिरवणूक ” साध्वी रमाबाई आंबेडकर नगरात ” विसर्जन पावल्यावर श्री. सुबय्या यांच्या हस्ते झेंडावंदनाचा कार्यक्रम झाला. अध्यक्षांनी उभारलेला शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनचा निळा झेंडा उंचावर जाऊन फडकला. समता सैनिक दलाने त्याला खडी सलामी दिली. त्यावेळी टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात व फेडरेशनच्या जयघोषात वातावरण दुमदुमून गेले होते.

समता सैनिक दलाची परिषद श्री. सुब्बय्या यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडल्यावर लगेच महिला परिषद शांताबाई दाणी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सौ. गिताबाई गायकवाड व मिसेस नाईक यांनी महिलांना स्फूर्तिदायक आदेश दिल्यावर परिषदेचे कामकाज संपले.

बरोबर साडेपाच वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मंडपात आगमन झाले. त्यावेळी गगनभेदी घोषणांनी व टाळ्यांच्या कडकडाटानी सारे वातावरण हर्षोत्फुल्ल झालेले होते. ध्येयनिष्ठेनी ओथंबलेल्या त्या अस्पृश्य वर्गाचा स्वाभिमान व स्वावलंबन याचे हे दिव्य प्रतीक पाहून स्वधर्मीय व विधर्मीय लोकांच्या तोंडून आपोआपच धन्योद्गार बाहेर पडत होते.

परिषदेचे कामकाज

परिषदेची सुरूवात बरोबर साडेसहा वाजता नागपूरचे शेंद्रे वकील यांनी आपल्या सुस्वर गायनाने केली. स्वागताध्यक्ष श्री. डी. झेड. पळसपगार यांनी आपल्या भाषणात जमलेल्या मंडळीचे व डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वागत केले.

नंतर अकोल्याचे अकर्ते वकील (काँग्रेस), अमृतकर वकील (हिंदू महासभा), म्युनिसीपल कमिटीचे अध्यक्ष रावबहादूर आठल्ये, मुस्लिम लीगचे सभासद श्री. काझी वकील यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांची मुक्त कंठाने स्तुती करून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ अस्पृश्यांचेच पुढारी ठरत नसून अखिल भारताचे ते पुढारी, तपस्वी आहेत, अशा तऱ्हेची घोषणा करून डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीविषयी व फेडरेशन पक्षाविषयी आदर व्यक्त केला. नंतर डिप्रेस्ड क्लासेस असोशिएशनचे जनरल सेक्रेटरी रावसाहेब ठवरे यांनी आपण हा पक्ष सोडून फेडरेशन पक्षामध्ये सामील कसे झालो यासंबंधी उल्लेख करून आपले भाषण संपविले. तद्नंतर श्री. इंगळे यांनी अखिल वऱ्हाड प्रांतातील अस्पृश्य जनतेतर्फेचे मानपत्र वाचून दाखविले. नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ११०१ रुपयांची थैली अर्पण करण्यात आली.

बरोबर साडेसात वाजता डॉ. बाबासाहेब बोलायला उभे राहिले. यावेळी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट होऊन ” आंबेडकर झिंदाबाद.”, ” आंबेडकर कौन है। दलितोंका राजा है “, वगैरे गगनभेदी जयघोष सारखा चालला होता. जनसमुदाय पुन्हा शांत झाल्यावर बाबासाहेबांनी आपले भाषण सुरू केले.

वऱ्हाड प्रांतिक शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनच्या पहिल्या परिषदेत बोलताना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,
बंधूंनो आणि भगिनींनो,
आतापर्यंतच्या वक्त्यांनी जी भाषणे केली आहेत त्यावरून माझी भूमिका स्पष्ट झाली आहे. तेव्हा त्याचेसंबंधी मी चर्वितचर्वण न करता इलेक्शनसंबंधी बोलणार आहे. तुम्हाला माहित आहे की, यावेळचे इलेक्शन म्हणजे १९३७ सालचे इलेक्शन नाही. यावेळचे इलेक्शन म्हणजे अस्पृश्यांचा जगण्या-मरण्याचा प्रश्न आहे. हा प्रश्न सोडवून आपल्या जीविताचे आद्यकर्तव्यकर्म आपण बजाविले पाहिजे आणि आपली अभेद्य संघटना सर्व जगाला दाखवून दिली पाहिजे. अर्थातच फेडरेशनच्या सर्व उमेदवारांना निवडून आणून आपले राजकीय हक्क संपादन केले पाहिजेत.

राजकीय सत्ता हाती असली म्हणजे मनुष्य काय करू शकतो याचे मी उदाहरण सांगतो. मी व्हाइसरॉयच्या ज्या कार्यकारी मंडळात प्रवेश केला त्या मंडळाचे १५ सभासद आहेत. मी तेथे एकटाच आहे. या गोष्टीला अडीच वर्षावर कालावधी लोटला आहे. तेवढ्या अवधीत मी तिथे राहून काय केले हे सांगितले म्हणजे उलगडा होईल. मी तेथे जाण्यापूर्वी मध्यवर्ती सरकारने अस्पृश्यांच्या शिक्षणाची कसलीही जबाबदारी स्वतःच्या अंगावर घेतली नव्हती. मात्र मुसलमानांच्या अलिगड विश्वविद्यालयाला २० लाख रुपयांची मदत देऊन व बनारस हिंदू विश्वविद्यालयाला १९ लाख भांडवल पुरवून सहाय्य केले आहे. शिवाय या दोन्हीही संस्थांना सालिना ३ लाखाची मदत चालूच आहे. मी तेथे गेल्यानंतर सरकारने अस्पृश्यांकरिता ३ लाख रुपयांची मदत चालू केली आहे. शिवाय ३०० कॉलेज-शिष्यवृत्या प्रत्येकी ६० रुपयांच्या मंजूर झालेल्या आहेत. विद्यार्थ्यांना जर मदत द्यावयाची तर ती भरपूर द्यावयाची असे धोरण आखले आहे. याचवर्षी ३० विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी विलायतेस जातील. आता अशी व्यवस्था केली आहे की, निदान २ वर्षात १५ विद्यार्थी विलायतेला येथून जातील. याप्रकारची पूर्वी कधीही नसलेली ही व्यवस्था आज झाली आहे. आता नोकरी संबंधी पहा. मुसलमानांना शेकडा २०, खिश्चनांना शेकडा साडेआठ, पण आपल्याला मात्र अशा प्रकारचे प्रमाण पूर्वी अजिबात नव्हते. फक्त ‘ यांचेकडे लक्ष पुरवावे ‘ एवढीच शिफारस होती. पण नुकतीच माझी मागणी सरकारला पटून आमचेही नोकऱ्यात शेकडा आठ पूर्णांक एक तृतीयांश असे प्रमाण ठरविण्यात आले आहे. मी तेथे गेलो तेव्हा माझ्या खात्यात अस्पृश्यांचे हमालसुद्धा नव्हते. पण आता डेप्यूटी सेक्रेटरीज २, अंडर सेक्रेटरी १ व एक्झिक्युटिव्ह इंजिनियर्स ३ असे अस्पृश्य वर्गाचे लोक भरले आहेत. कोणी म्हणतात की मी महारांचेच हित करतो. मी महार जातीत जन्मलो याला मी काय करू. पण माझ्याविरूद्ध केली जाणारी ही तक्रार खोटी आहे. माझ्याच खात्यात सिमल्याला २८ क्लार्क पैकी १८ भंगी आहेत. विलायतेला जाणाऱ्या लोकात १ मांग, १ भंगी व चांभार पुष्कळच आहेत. मी आणखी एक गोष्ट यातच सांगू इच्छितो. एक मळकट असा भंगी अस्पृश्यांचा उमेदवार जेव्हा मुलाखती करता सिमल्याला आला तेव्हा त्याला खात्रीने नकार मिळेल हे जेव्हा मला समजले तेव्हा बोर्डावर मी माझे वजन आणून त्याला निवडून घेतले. आता तो उमेदवार परदेशात आहे. मी स्वतःची आत्मप्रौढी करतो असे मात्र समजू नका. सांगण्याचा हेतू हाच की, राजकीय सत्ता हाती असता मनुष्य काय करू शकतो आणि म्हणूनच अस्पृश्य समाजाला इज्जत व माणुसकीसाठी राजकारण काबीज करायला पाहिजे. म्हणजेच फेडरेशनच्या प्रतिनिधींना कायदे मंडळात जाऊन आमच्यावरील जुलूमाविरूद्ध आवाज काढता आला पाहिजे. ही एक आमची मागणी आहे.

१९२० साली गांधींनी हरिजन संघ काढला. या संघातून हरिजन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्या देण्याचा उपक्रम सुरू केला. हेतु इतकाच की, आमच्या स्वाभिमानी चळवळीपासून त्यांना आपल्या गोटात ओढणे. या बाबतीत मी अस्पृश्य विद्यार्थ्यांना इसकेच सांगतो की, असल्या आमिषांचा जितका फायदा घेता येईल तितका घ्या पण कर्तव्याला जागा, हे मला तुम्हाला सांगावयाचे आहे. पुराणातील देव व दैत्य यामध्ये जे युद्ध झाले होते त्या युद्धाला यश येण्याकरता कचाला संजीवनी मंत्र शिकविण्याची देवांनी युक्ती काढून सफलही केली. कचासारखी वृत्ती तुम्ही आपल्या कृतीत उतरुन त्याचप्रमाणे वागा. यातच समाजाचे हित आहे.

या देशात असंख्य जाती व धर्म आहेत. यात सामाजिक समता अगर संघटना नाही. जाती जातील रोटीभेद. बेटी व्यवहार होत नाही आणि कदाचित झालाच तर अपवाद म्हणून समजावा. जर महाराच्या मुलाने ब्राह्मण मुलीशी लग्न केले अथवा ब्राह्मण मुलीने महार मुलाशी लग्न केले तर त्याबद्दल मला काही एक वाटणार नाही. पण मी असे विचारतो की, अशा तऱ्हेच्या विवाहाने अस्पृश्यांची अस्पृश्यता नाहीशी होईल काय ? आमच्या मुली का काळ्या आहेत की नकट्या आहेत का कुरूप आहेत ? मी असेही तुम्हाला विचारतो की, अस्पृश्याने, स्पृश्य वर्गाच्या मुलीशी लग्न करण्यात मतलब काय ?

स्वराज्याच्या प्रश्नावर आमचा मतभेद नाही. पण या स्वराज्यात आम्हाला आमचे हक्क प्राप्त झाले पाहिजे. तुमच्या स्वराज्यात आमच्यावर कुणाचे राज्य होणार या प्रश्नाचे उत्तर द्या असे काँग्रेसला मला सांगावयाचे आहे.

सध्या आपल्या जवळ कोणतेच साधन नाही. स्पृश्य लोक सत्ताधीश आहेत आणि म्हणून ते पाहिजेत त्या गोष्टी ठरवितात. काँग्रेस ही आपली हितशत्रु आहे. त्यांच्याजवळ मुबलक पैसा, वाहनाची साधने व इतर उपकरणे आहेत, ती आपणाजवळ नाहीत. या मोहाला आपल्यातील कितीतरी सहज बळी पडून गेले आहेत, पण मी मात्र पडलो नाही (हशा). तेव्हा मला तुम्हाला हे स्पष्ट सांगावयाचे आहे की, अशाप्रकारच्या साधनांची अपेक्षा न करता केवळ आपल्या पक्षाचे कर्तव्य म्हणून, पायी जाऊन ज्यांना मताधिकार असेल त्यांनी विनामूल्य समाज सेवा घडावी म्हणून, फेडरेशनच्या उमेदवारालाच मते द्यावीत, हेच त्यांचे सर्वश्रेष्ठ कर्तव्य आहे.

देशातील अल्पसंख्यांकांना वाटणारी भीती दूर करण्यासाठी झटत असल्याचे काँग्रेस म्हणते, पण तसे काहीच नाही. सर्व देशाचे प्रतिनिधी असा तिने चालविलेला प्रचार फसवणूक करणारा आहे. मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य जनतेचा पाठिंबा मिळावा म्हणून काँग्रेसच्या पुढाऱ्यांचा हा प्रयत्न आहे. ब्रिटिश निघून गेल्यावर आणि स्वराज्य मिळाल्यावर निरनिराळ्या अल्पसंख्यांकांचे हक्क मध्यवर्ती सरकारात कसे संरक्षिले जातील याचा विचारविनिमय करण्यासाठी काँग्रेसने एक हिंदी गोलमेज परिषद बोलावून वाटाघाटी करावयास पाहिजे होत्या. हे करण्याच्या ऐवजी काँग्रेसने इतर पक्षाला डावलले आणि आपल्याच हाती सत्ता असावी असा दावा सुरू केला. काँग्रेसचा हा दुराग्रह आम्ही कबूल करणार नाही. काँग्रेसपासून अलिप्त राहाण्यासंबंधीच माझा तुम्हाला सल्ला आहे.

आज सकाळी एक गृहस्थ माझ्याकडे आला आणि म्हणाला, आम्हाला सर्वस्वी स्पृश्यांच्या मदतीवर अवलंबून राहावे लागत असल्यामुळे आम्ही जर त्यांच्याविरुद्ध काही तक्रार केली तर ती तक्रार देखील ऐकून घेण्याला स्पृश्य अधिकारी तयार नसतो तेव्हा या गोष्टीला आम्ही काय करावे. तेव्हा मी म्हणतो, हे जरी खरे असले तरी मी तुम्हाला असे विचारतो की, शेळी होऊन अशा प्रकारचे आयुष्य किती दिवस आणखी कंठणार ? कधी ना कधी तरी अन्यायाविरुद्ध तोंड काढावे लागणार नाही काय ? आपण जर या अन्यायाचा प्रतिबंधच केला नाही तर आपला उद्धार होणे शक्य तरी आहे काय ? मी तुम्हासमोर कोट, बूट, पाटलोण घालून उभा आहे. माझ्या हातात सोन्याचे घड्याळ आहे. मी स्वच्छ आहे. मला महार म्हणण्याची कोणाची ताकद आहे काय ? तरी पण मी महार आहे (हंशा). ही स्थिती प्राप्त करून घेण्यासाठी मी जर कच खाल्ली असती तर ही स्थिती प्राप्त झाली असती का ? माझ्या हातात सोन्याचे घड्याळ दिसते ते दिसले असते काय ? (हंशा) तेव्हा सांगण्याचा मतलब हा की, अन्यायाच्या विरूद्ध तुम्ही लोकांनी ‘ जशास तसे ‘ या न्यायाने प्रतिकार करायला शिकले पाहिजे. कर्तव्याला जागरूक रहा. तेव्हा मला तुम्हाला शेवटी इतकेच सांगावयाचे आहे की, यापुढचा काळ अत्यंत आणीबाणीचा आहे. त्या करता आपण आपली तयारी भक्कम पायावर केली पाहिजे आणि आपल्या फेडरेशनच्या सर्वच उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून द्यावयाला पाहिजे. हिंदुस्थान सरकारने, प्रांतिक विधीमंडळामध्ये निवडून आलेल्या प्रतिनिधींमधून घटना समिती निवडली जाणार असल्याची घोषणा केली आहे. या समितीकडून तयार होईल ती घटना बऱ्याच वर्षाकरिता अस्तित्वात राहिल, कदाचित ती कायमसुद्धा होईल. काँग्रेसने आपल्या काही जागा पटकाविल्या तर आपले नुकसान होईल आणि म्हणून आपणाला स्वतंत्र ध्येय गाठता येणार नाही. त्याकरिता अहोरात्र प्रयत्न करुन आपल्या सर्व जागा काबीज केल्या पाहिजेत. इतका तुम्हाला आदेश देऊन मी माझे भाषण संपवितो.

🔹🔹🔹

संकलन – आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे