आंतरराष्ट्रीय महिला दिन : दरवर्षी 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश महिलांच्या हक्कांचा प्रचार करणे हा आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिन हा महिलांच्या आर्थिक, राजकीय आणि सामाजिक यशाचा उत्सव म्हणून साजरा केला जातो, स्त्रियांबद्दल आदर, प्रशंसा आणि प्रेम दर्शवितो. दरवर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिन कोणत्या ना कोणत्या थीमवर आधारित असतो आणि यावेळी ही थीम आहे – शाश्वत उद्यासाठी आज लैंगिक समानता. या वर्षीची थीम लिंग समानतेवर भर देते. काही काळापासून, जगभरात लैंगिक समानतेबद्दल बरीच चर्चा होत आहे. लोक या विषयावर खूप जागरूक झाले आहेत. चला जाणून घेऊया आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा इतिहास आणि त्याचे महत्त्व काय आहे.
आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा इतिहास
संपूर्ण अमेरिका आणि युरोपसहित जवळजवळ संपूर्ण जगभरच्या स्त्रियांना विसाव्या शतकाच्या सुरूवातीपर्यंत मतदानाचा हक्क नाकारलेला होता. पुरुषप्रधान व्यवस्थेतील स्त्री-पुरुष विषमतेचे हे एक ढळढळीत उदाहरण. या अन्यायाविरुद्ध स्त्रिया आपापल्या परीने संघर्ष करीत होत्या. १८९० मध्ये अमेरिकेत मतदानाच्या हक्कासंदर्भात `द नॅशनल अमेरिकन सफ्रेजिस्ट असोसिएशन’ स्थापन झाली. परंतु ही असोसिएशनसुद्धा वर्णद्वेषी आणि स्थलांतरितांविषयी पूर्वग्रह असणारी होती. दक्षिणेकडील देशांना काळया मतदात्यांपासून आणि उत्तर व पूर्वेकडील देशांना तेथील बहुसंख्य देशांतरित मतदात्यांपासून वाचवण्याकरता स्त्रियांना मतदानाच्या हक्क मिळायलाच हवा, अशा प्रकारचे आवाहन त्या करीत होत्या. अर्थात या मर्यादित हक्कांना बहुसंख्य कृष्णवर्णीय लोकांनी आणि देशांतरित कामगार स्त्रियांनी जोरदार विरोध केला आणि क्रांतिकारी मार्क्सवाद्यांनी केलेल्या सार्वत्रिक प्रौढ मतदानाच्या हक्कांच्या मागणीला पाठिंबा दिला. १९०७ साली स्टुटगार्ड येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली.
त्यामध्ये क्लारा झेटकिन या कम्युनिस्ट कार्यकर्तीने `सार्वत्रिक मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करणे हे समाजवादी स्त्रियांचे कर्तव्य आहे.’ अशी घोषणा केली. ८ मार्च १९०८ रोजी न्यू यॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री-कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली. दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता ह्या मागण्या केल्या. या दोन मागण्यांबरोबरच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमीनिरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणीही जोरकसपणे केली. अमेरिकन कामगार स्त्रियांच्या या व्यापक कृतीने क्लारा झेटकिन अतिशय प्रभावित झाली. १९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्नीय समाजवादी महिला परिषदेत, ८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, ८ मार्च हा `जागतिक महिला-दिन’ म्हणून स्वीकारावा असा जो ठराव क्लाराने मांडला, तो पास झाला. यानंतर युरोप, अमेरिका वगैरे देशात सार्वत्रिक मतदानाच्या हक्कासाठी मोहिमा उघडल्या गेल्या. त्यांचा परिणाम म्हणून १९१८ साली इंग्लंडमध्ये व १९१९ साली अमेरिकेत या मागण्यांना यश मिळाले
महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक २८ फेब्रुवारी १९०९रोजी, न्यू यॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला.
रशियन महिलांनी 1917 मध्ये ब्रेड आणि तुकड्यांच्या मागणीसाठी संप केला. फेब्रुवारीच्या शेवटच्या रविवारी संप सुरू झाला. हा एक ऐतिहासिक संप होता आणि जेव्हा रशियाच्या झारने सत्ता सोडली तेव्हा तेथील अंतरिम सरकारने महिलांना मतदानाचा अधिकार दिला. युरोपमध्ये, 8 मार्च रोजी महिलांनी शांतता कार्यकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी रॅली काढल्या.
भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस ८ मार्च १९४३ रोजी साजरा करण्यात आला. ८ मार्च १९७१ ला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष’ म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. आता बँका, कार्यालयांमधूनही ८ मार्च साजरा व्हायला लागला आहे. आजच्या काळात जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा करताना दिसून येतो.
१९७५ या जागतिक महिला वर्षाच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्र संघटनेने आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचे ठरविले. १९७७ साली संयुक्त राष्ट्र संघटनेच्या समितीने विविध सदस्यांना आमंत्रित करून ८ मार्च हा आंतरराष्ट्रीय स्तरावर महिलांचे अधिकार आणि जागतिक शांतता या हेतून साजरा करवा यासाठी आवाहन केले
काही देशात जसे बल्गेरिया आणि रोमानिया येथे हा दिवस मातृदिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी मुले आपली आई आणि आजी यांना भेटवस्तू देतात.
इटलीमध्ये या दिवशी ; पुरुष महिलांना पिवळ्या मिमोसासची फुले भेट देऊन शुभेच्छा देतात.महिला दिन हा आपल्या स्त्रीत्वाचा अभिमान बाळगून त्याचा गौरव करण्याचा दिवस आहे
आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे महत्त्व
महिलांना आदर आणि प्रेम देण्यासाठी लोकांना जागृत करणे आणि महिलांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे यासारख्या गोष्टी लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. महिलांचे मनोबल वाढवण्यासाठी आणि समाजात पसरलेली विषमता दूर करण्यासाठी या दिवसाचे खूप महत्त्व आहे.
More Stories
दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ट्रस्टी चेअरमन डॉ.चंद्रबोधि जी पाटील यांच्या शिखर संस्थेचा नाशिक जिल्हा शाखेची बैठक त्रिरत्न बुद्ध विहार सातपुर येथे पार पडली
अशोका वॉरियर्स आणि कर्जत बुद्ध लेणी संवर्धक यांच्या संयुक्त विद्यमाने कोंडाने बुद्ध लेणीचे संवर्धन
Tashi Dolma didi ज्येष्ठ धम्म प्रचारक ताशी डोल्मा यांचे निधन