November 5, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

स्वतःची लायकी विद्यार्थी दशेतच वाढवा – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

अखिल भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाच्या ठाणे येथील दलित-विद्यार्थी आश्रमाची तपासणी करण्यास गेले असता डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विद्यार्थ्यांस केलेले मार्गदर्शन….

अखिल भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाच्या ठाणे येथील मुंबई-ठाणे रोडवरील नामदार ‘आगाखान ‘ यांच्या प्रशस्त बंगल्यात असलेल्या दलित-विद्यार्थी आश्रमाची तपासणी करण्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना निमंत्रण देण्यात आले होते. या निमंत्रणावरून दलित-विद्यार्थी आश्रमाची तपासणी करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर रविवार दिनांक २ एप्रिल १९३३ रोजी ठाणे येथे पोचले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आश्रमात आणण्याकरिता आश्रमाचे सुपरिंटेंडेंट श्रीयुत चांदोरकर आणि ठाणे सामाजिक समता सेवा संघाचे खजिनदार श्रीयुत मारुतीराव साबाजी गायकवाड असे दोघे जण स्टेशनवर गेले होते.

यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बरोबर त्यांचे जनरल सेक्रेटरी श्रीयुत शिवतरकर आणि डाॅ. बाबासाहेबांचे मुंबईतील सहकारी कार्यकर्ते म्हणजे बापूसाहेब सहस्त्रबुद्धे, कमलाकांत चित्रे, जाधव, गायकवाड, मडकेबुवा वगैरे पुढारी मंडळी देखील आली होती. डॉ. बाबासाहेबांच्या आगमनापूर्वीच ठाणे शहरातील अस्पृश्योद्धारक स्पृश्य सभ्य नागरिक जमले होते. त्यात ठळकपणे दिसणारे गृहस्थ म्हणजे श्रीयुत एम. एस्. रांगणेकरसाहेब, एल. राॅड्रिक्ससाहेब, आर. एल. रेडेसाहेब, नाखवा, गटनेसाहेब, केसकरसाहेब, कोतवालसाहेब, माधवराव काळदाते, पद्मनाभशास्त्री पालये वगैरे हीतचिंतक होते. दलित समाजातील सर्व लहान-थोर, स्त्री-पुरूष समुदाय मोठ्या संख्येने जमला होता. विशेष म्हणजे स्थानिक गिरण्या, कारखाने वगैरे चालू असताना हा समुदाय एवढ्या मोठ्या संख्येने जमला होता.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर बोर्डिंगच्या इमारतीच्या पायरीवर येताच त्यांच्या नावाच्या जयजयकाराने आश्रमाची इमारत दुमदुमली. सामाजिक समता सेवा संघ, आश्रमीय विद्यार्थी वर्ग आणि अखिल भारतीय दलित सेवक संघ (ठाणे शाखा) चे अध्यक्ष आणि कार्यकर्ते यांच्या तर्फे डाॅ. बाबासाहेबांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर श्रीयुत एम. एस्. रांगणेकर यांनी डॉ. बाबासाहेबांना नियोजित जागी बसविले व श्रीयुत गणपत गोविंद रोकडे यांनी डॉ. बाबासाहेबांनी जमलेल्या समुदायाच्या मित्र संमेलनाचे अध्यक्षस्थान स्वीकारून विद्यार्थ्यांना उपदेशपर दोन शब्द सांगण्याची विनंती केली. श्रीयुत मारुतीराव साबाजी गायकवाड यांनी त्या सूचनेला अनुमोदन दिले. डॉ. बाबासाहेबांनी त्यांच्यापुढील मेजावर असलेली या संमेलन सभेची कार्यक्रम पत्रिका वाचून पाहून, टाळ्यांच्या कडकडाटात अध्यक्षस्थान स्वीकारून, आपल्या भाषणास सुरुवात केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थ्यांना केलेल्या या मार्गदर्शनपर भाषणात म्हणाले,
हा विद्यार्थी आश्रम पूर्वी आम्ही पनवेल येथे प्रथम स्थापन केला होता. तेथे स्पृृश्य समाजापैकी कोणीही आश्रमाला जागा दिली नाही आणि म्हणून एका ‘ ज्यू ‘ गृहस्थाच्या घरात त्याची स्थापना करावी लागली. त्याने देखील पुढे आमची अडवणूक करून घरभाडे चढविण्याचे धोरण ठेविल्याकारणाने तेथून आश्रम ठाण्यास आणावा लागला आणि येथे देखील नामदार आगाखान यांचा हा बंगला त्यांनी समक्ष लिहून आमचे ताब्यात मिळेपर्यंत आश्रमाला जागा मिळण्याचे बाबतीत आम्हाला पुष्कळच त्रास झाला. आणि आता ही जागा मिळाल्यानंतर हा प्रश्न साधारणत: सुटला आहे. माझ्या विद्यार्थी बांधवांना मला इतकेच सांगायचे आहे की, तुम्हाला ही जी व्यवस्था म्हणजे नामदार आगाखान यांचा बंगला, सरकारी ग्रॅण्ट आणि सुपरिंटेंडेंट चांदोरकर आणि त्यांना मदत देणारे दुसरे सहकारी यांची रात्रंदिवस मदत अशा सोयी तुम्हाला मिळाल्या आहेत, यापैकी आमच्या लहानपणी आम्हाला काहीच नव्हते. इतक्या सवलती असताना सुद्धा तुमच्याकडून त्यांचा योग्य उपयोग झाला नाही आणि तुम्ही एखाद्या मार्कानेही नापास झालात तर तुम्ही नालायक हा शिक्का संस्थेवर बसवाल आणि सरकार ग्रँट काढून घेईल. नवीन हक्क, मोठ्या नोकऱ्या वगैरे मिळवावयाच्या तर त्याला स्वतःची लायकी लागत असते. ती लायकी वाढविण्याचे मुख्य काम विद्यार्थी दशेत तुम्ही करीत असताना तुम्ही इतर कोणत्याही चळवळीत पडणे चुकीचे होईल हा दुसरा मुद्दा मला तुम्हापुढे मांडावयाचा आहे आणि तिसरा मुद्दा स्वावलंबन. येथे तुम्हाला पैशाची मदत व्हावी म्हणून गावातील धनिक लोकांना आम्ही मदतीला बोलावू. पण मुख्य मुद्दा, ” तुम्ही, तुमचे भाईबंद, तुमची जात, यांनी स्वतःच्या पायावर उभे राहून काय होईल ते होवो ! आम्ही पुढे आल्याशिवाय राहणार नाही असा निश्चय करून रोजच्या व्यवहारात तो निश्चय तुम्ही अंमलात आणला पाहिजे तरच काही तरी यश मिळेल आणि या सर्व गोष्टी तुम्ही सर्वजण चांगल्या ध्यानात धराल आणि यशस्वी व्हाल. ” अशी आशा करून मी माझे भाषण आणखी न लांबविता येथेच पुरे करतो.

🔹🔹🔹

संकलन – आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे