July 26, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

मी पाषाणासारखा घट्ट, मला विरघळण्याची भीती नाही. तुमची स्थिती वेगळी, ढेकळासारखे विरून जाल – डाॅ. बाबासाहेब आंबेडकर

संयुक्त प्रांत शेड्युल्ड कास्ट्स् फेडरेशनच्या ५ व्या अधिवेशनात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले भाषण….

दिनांक २४ व २५ एप्रिल १९४८ रोजी लखनौ येथे संयुक्त प्रांत शेड्युल्ड कास्ट्स् फेडरेशनचे ५ वे अधिवेशन आयोजित करण्यात आले होते.

आपले राजकीय हक्क शाबीत करण्यासाठी तसेच माणुसकीचे समानत्व जाहीर करण्यासाठी गतसाली याच ठिकाणी शेडयूल्ड कास्ट्स् फेडरेशनच्या वतीने सत्याग्रहाची मोहीम चालविली होती. या सत्याग्रहात २००० पेक्षा अधिक दलित स्त्री-पुरुषांनी भाग घेतला होता. त्या सर्वांची लखनौ येथे धरपकड होऊन, त्यांना अटक करुन तुरुंगामध्ये टाकण्यात आले होते. संयुक्त प्रांताच्या अखिल अस्पृश्य जनतेचा हा फार मोठा त्याग होता. सत्याग्रहातून मुक्त झालेल्या स्त्री-पुरुषांची मनोभावे इच्छा होती की, दलितांना मुक्तिचा मार्ग दाखविणारे निर्भय नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दर्शन होऊन, पावन करणारा त्यांचा उपदेश ऐकण्याचे पुण्य लाभावे. या सदिच्छेचे व प्रयत्नाचे दृश्य फळ म्हणजे लखनौ येथे डॉ. बाबासाहेबांनी केलेले हे भाषण. हे भाषण अस्पृश्यांच्या चळवळीस ऐतिहासिक वळण देणारे आहे, याबद्दल संशय नाही.

श्री. गयाप्रसाद, ज. से., संयुक्त प्रांत शे. का. फेडरेशन यांच्या प्रयत्नाने तसेच (१) बाल गोविंद, (२) कन्हैय्यालाल सोनकर, (३) चौधरी बुद्धदेव व (४) मेवालाल सोनकर यांच्या सहकार्याने अधिवेशन यशस्वी झाले. या अधिवेशनात एक लाखापेक्षा अधीक दलित समुदाय सहभागी होता. ऑल इंडिया शेड्यूल्ड कास्ट्स् फेडरेशनचे ज. से. राजभोज हेही हजर होते. श्री. गोपिचंद विप्पल (प्रेसिडेंट, संयुक्त प्रांत समता सैनिक दल), श्री. तिलकचंद कुरील (प्रेसिडेंट, संयुक्त प्रांत शेड्यूल्ड कास्ट्स् फेडरेशन) हे तेथील मुख्य संघटक व आधारस्तंभ होते.

हे अधिवेशन वैशिष्ट्यपूर्ण होते असे म्हणावयास दोन कारणे आहेत. पहिले कारण असे की, काँग्रेस सरकारच्या राज्यात अजूनही अस्पृश्यांचा छळवाद थांबलेला नाही हे जगाच्या उघडकीस या परिषदेवरून आले आहे. दुसरे कारण हे की, देशाला प्रगतीकारक धोरणाकडे नेत नेत, अत्यंत हीनावस्थेत असलेल्या अस्पृश्य समाजाच्या उन्नतीसाठी ज्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे त्या करण्यासाठी दलित फेडरेशन कधीच कचरणार नाही, हे सिद्ध झाले आहे.

या अधिवेशनात डॉ. बाबासाहेब आबेडकरांचे रविवार दिनांक २५ एप्रिल १९४८ रोजी भाषण झाले.

संयुक्त प्रांत शेड्युल्ड कास्ट्स् फेडरेशनच्या ५ व्या अधिवेशनात भाषण करताना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,                  भगिनींनो आणि बंधुनो,
काँग्रेसमध्ये सामील होण्याने आपले काही हित साधेल असे मला मुळीच वाटत नाही. दिवसेंदिवस काँग्रेस दुर्बल होत असून समाजवादी बाहेर पडल्यामुळे ती अधिकच दुर्बल झाली आहे. अशावेळी या दोन्ही पक्षातील चुरशीचा लाभ घेऊन आपल्या पक्षाच्या स्वतंत्र अस्तित्वाने जो पक्ष आपल्या अटी मान्य करील त्याच्याशी सहकार्य करून आपल्याला सत्ता हस्तगत करता येईल. सत्ता ही सामाजिक प्रगतीची गुरुकिल्ली आहे.

काँग्रेसमध्ये जाऊन मागासलेल्या जमातींना सत्ता हस्तगत करणे अशक्य आहे. ती एक मोठी संस्था आहे. आपण त्यात प्रवेश करणे म्हणजे महासागरात पाण्याचा थेंब टाकण्यासारखे होणार आहे. त्या संस्थेत सामील होण्याने आपली उन्नती होणार नाही. जर काँग्रेस निरनिराळ्या गटात विभागली तरच आपल्याला आपला उद्धार करता येईल. काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याने आपल्या शत्रुचे सामर्थ्य मात्र वाढेल. काँग्रेसची स्थिती आज आग लागलेल्या घरासारखी झाली आहे. त्यात प्रवेश करण्याने आपणच भस्मसात होऊ. येत्या दोन वर्षात काँग्रेसचा नाश झाला तर त्यात मला मुळीच आश्चर्य वाटणार नाही.

समाजवादी आज काँग्रेसमधून बाहेर पडले आहेत. त्यामुळे काँग्रेसचे बळ निश्चितपणे कमी होणार आहे. अशा वेळी आपण तिसरा पक्ष या नात्याने आपली स्वतंत्र संघटना केली पाहिजे. जर काँग्रेस किंवा समाजवादी यापैकी कोणालाही हुकमी बहुमत प्राप्त झाले नाही तर ते आपल्या मतांची भीक मागण्यासाठी येतील. अशावेळी आपला पाठिंबा देण्यासाठी आपण आपल्या अटी पुढे करून सत्तेतील समतोलपणा राखू शकतो.

सुमारे १२ वर्षापूर्वी लोथीयन समितीचा सभासद या नात्याने आपण लखनौला आलो होतो त्यावेळेपेक्षा येथील अस्पृश्यांमध्ये राजकीय जागृती अधिक झालेली आहे हे पाहून मला आनंद होतो.

गेल्या वर्षी संयुक्त प्रांतांमध्ये अस्पृश्यांनी केलेल्या सत्याग्रह चळवळीचा उल्लेख मी अभिमानाने करतो. ज्यांनी त्या चळवळीत भाग घेऊन क्लेश सहन केले त्या सर्वांचे मी अभिनंदन करतो. एकदा एखादी गोष्ट साध्य करण्याचा आपण निश्चय केला व त्या दृष्टीने प्रयत्नाला लागलो म्हणजे मार्गात कितीही अडचणी आल्या तरी ती गोष्ट आपण सहज साध्य करू शकतो ही गोष्ट यावरून आपल्या ध्यानी आलीच असेल.

मी काँग्रेस सरकारमध्ये सामील झाल्यामुळे माझ्या अनुयायांपैकी कित्येकांची परिस्थिती गोंधळल्यासारखी झाली आहे. त्यांच्या मनातील किंतू नाहिसा करण्याचा मी प्रयत्न करणार आहे.

आपल्या घोषणेप्रमाणे येथील हिंदू , मुसलमान, शीख, अस्पृश्य वगैरे सर्वांना सत्ता दान करून ब्रिटिश येथून निघून गेले नाहीत. सिमला परिषदेतही फक्त काँग्रेसचे हाती सत्ता देण्यात येणार नाही असे स्पष्टीकरण व्हाईसरॉयने केले होते. १९४६ साली शेड्युल्ड कास्ट्स् फेडरेशनने प्राथमिक निवडणुकी जिंकल्या होत्या व विरोधकांना भुईसपाट केल्यामुळे फेडरेशनचे प्रातिनिधीक स्वरुप प्ररथापित झाले होते. परंतु नंतर ब्रिटिशांनी आपले पूर्वीचे वचन न पाळता हिंदू , मुसलमान व शीख ह्यांचेच हाती सत्ता सोपविण्याचे ठरविले.

आपल्या राजकीय लढ्यातील तो अत्यंत चमत्कारिक काळ होता. सर्वत्र काळोख पसरला होता व आपल्याला आशेचा एकही किरण दिसत नव्हता. जमातीची फार मोठी जबाबदारी माझे शिरावर होती. अशा वेळी माझे मलाच कळत नव्हते. अशा परिस्थितीत कोणत्याही मार्गाने त्यांना नेण्यास मी तयार नव्हतो. परिस्थितीचे योग्य आकलन होईपर्यंत वाट पाहाण्याचे मी ठरविले.

२५ वर्षे काँग्रेस बरोबर लढा दिलात आणि अशा आणीबाणीच्या प्रसंगी मूग गिळून गप्प बसण्याचे धोरण तुम्ही का स्वीकारलेत असा प्रश्न मला विचारण्यात येतो. नेहमीच लढ्याचे तंत्र उपयोगी पडत नाही. कित्येक वेळा दुसऱ्या मार्गाचा अवलंब करणेही आवश्यक असते. ब्रिटिशांनी आपल्याला धोका दिला. आपल्यामध्येही कित्येक फितूर होतेच. एवढ्या मोठ्या प्रचंड संस्थेविरुद्ध लढत देणे त्यावेळी योग्य ठरले नसते. त्याच्यानंतर तडजोडीचा मार्ग शिल्लक उरतो. त्यादृष्टीने आपल्याला बरेच हक्क प्राप्त झाले आहेत. आपल्याला पाहिजे होते तेवढे जरी आपल्या पदरात पडले नसले तरीही आपण पुष्कळच गोष्टी साध्य करू शकलो.

आपल्याला विधिमंडळांतून व नोकऱ्यांतून राखीव जागा मिळाल्या आहेत व आपल्या बहुतेक सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. स्वतंत्र मतदार संघाची मागणी अमान्य करण्यात आली. इतर अन्य अल्पसंख्यांकांनाही ती गोष्ट साध्य करता न आल्यामुळे आपल्याला त्याबद्दल लाज वाटण्याचे काहीच कारण नाही. काँग्रेस बरोबर लढा पुकारण्याची ही वेळ नव्हे. सहकार्य आणि समझोता या मार्गानेच आपण मिळेल तेवढे हस्तगत केले पाहिजे.

मी मध्यवर्ती सरकारात गेलो असलो तरी काँग्रेसचा सभासद झालो नाही. तसा माझा विचारही नाही. मध्यवर्ती सरकारात येण्याबद्दल मला काँग्रेसकडून आमंत्रिण्यात आले व मीही काँग्रेस सरकारमध्ये विनाअट प्रवेश केला.

मी दगडासारखा घट्ट असल्यामुळे पाण्यात विरघळण्याची मला मुळीच भीती नाही, म्हणून मी काँग्रेसमध्ये सामील झालो तरी माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही. परंतु, तुमची स्थिती मात्र वेगळी आहे. पाण्यात पडलेल्या ढेकळासारखे तुम्ही विरून जाल. तेथे राहाणे निरुपयोगी आहे असे मला वाटले तर मी केव्हाही बाहेर पडेन.

परिस्थितीच अशी आहे की, राज्यकारभारात यावेळी आपली माणसे असणे अत्यावश्यक आहे. चांगल्या कायद्यापासून धोक्याची शक्यता नाही हे खरे आहे परंतु चांगल्या कायद्याची दुष्ट अंमलबजावणी केली जाण्याचा संभव आहे. अशावेळी अस्पृश्यांविरुद्ध वागण्याची ज्यांची परंपरा आहे अशी माणसे अधिकारावर असली तर ते आपल्या भवितव्याच्या दृष्टीने वाईट आहे.

सक्तीच्या श्रमाला कायद्याचे अधिष्ठान नाही. परंतु जमीनदार ती पद्धत अंमलात आणीत आहेत. कित्येक ठिकाणी अशा अत्याचारी लोकांचे नातेवाईक अधिकारावर असल्यामुळे अस्पृश्यांनी त्यांचेविरुद्ध केलेले अर्जही ह्या अधिकाऱ्यांकडून दडपले जातात. ह्या ठिकाणी जर अस्पृश्य अधिकारी असते तर त्यांनी आपल्या बांधवांच्या हक्कांचे खचित् रक्षण केले असते.

जर मी काँग्रेसध्ये प्रवेश करण्याचे ठरविले तर तशी उघड घोषणा करीन. अस्पृश्यांच्या हिताची ती गोष्ट असेल तर तुम्हालाही तसे करण्यास मी सांगेनच पण जोपर्यंत मी तुम्हाला काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याबद्दल प्रकट आवाहन केलेले नाही तोपर्यंत मात्र काँग्रेसमध्ये जाऊ नका !

🔹🔹🔹

असा उपदेश करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपले भाषण संपविले.

डाॅ. बाबासाहेब आबेडकरांच्या वरील भाषणावर विपर्यास करणारे वृत्त एका वृत्तपत्राने प्रकाशित केले. त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपले निवेदन दिले. (ते जनताच्या दिनांक ८ मे १९४८ च्या अंकात प्रसिद्ध झाले. ते येणेप्रमाणे…..)

विरोधासाठी विरोध मला मान्य नाही -डॉ. बाबासाहेब आंबेडकर

माझ्या भाषणावर विपर्यास करणारा वृत्तांत पाहून व मंत्रिमंडळातील माझ्या सहकाऱ्यांसंबंधी मी काही अनुचित उद्गार काढल्याचे एका स्थानिक वृत्तपत्राने दिलेले वृत्त वाचून मला अतिशय खेद झाला.

माझे २५ एप्रिलचे ते भाषण उत्स्फूर्त होते. माझ्या भाषणातील काही मुद्दे मी खाली देतो. निरनिराळ्या प्रश्नांवरून माझ्या काही अनुयायांनी मजवर केलेल्या टीकांना उत्तर म्हणून हे मुद्दे मांडले.

पहिला मुद्दा असा :– त्रिमंत्री शिष्टमंडळाच्या प्रयाणापासून मी मुग्धता स्वीकारावी याचे कारण काय ?
दुसरा मुद्दा असा :– मी काँग्रेस सरकारात का सामील झालो ? आणि
तिसरा मुद्दा :– भविष्यकाळी मी काय करावयाचे ठरविले आहे ?

पहिल्यास उत्तर म्हणून मी म्हणालो की, अमात्य त्रयीकडे शेड्यूल्ड कास्ट्स् फेडरेशनने स्वतंत्र मतदार संघाची मागणी केली होती. आमची ही मागणी फेटाळून लावण्यात आली. याला दोन कारणे होती. (१) मुस्लिमांच्या व शिखांच्या मानाने आपला पक्ष कमकुवत होता. (२) आमच्यामध्येच फाटाफूट होती. बरेच पंचमस्तंभी लोक भरले होते.

अमात्य मंडळाच्या निर्णयाने दलित वर्गांना काही वेगळे राजकीय अस्तित्वच नाही, असे ठरल्यासारखे झाले. बरे, राजकीय संरक्षण नाही म्हणजे शेड्यूल्ड कास्ट्स् फेडरेशनने सर्वनाशच ओढवून घेतल्यासारखे आहे असेही मला वाटले. माझ्यापुढे अथांग अंधःकार पसरला. मी तेव्हापासून कोणतेही निवेदन केले नाही, मुग्धता स्वीकारली त्याचे कारण असे आहे.

दुसऱ्या मुद्याबाबत बोलावयाचे तर मी काँग्रेसचा विरोधक व टीकाकार होतो, हे खरे परंतु त्याचबरोबर केवळ विरोधासाठी विरोध करणे मला कधीही मान्य नव्हते. सहकार्याने जर आपला लाभ होत असेल तर सहकार्याच्याच भावनेने वागले पाहिजे. म्हणूनच मी काँग्रेसशी सहकार्य केले. घटनेत जे काही संरक्षण आम्हाला मिळाले ते अशा सहकार्याअभावी मिळविता आले नसते. माझ्या विधानाला पूरक अशी काही उदाहरणेही मी या अनुषंगाने दिली.

मी मंत्रिमंडळात का सामील झालो, त्याचा खुलासा करताना मी पुढील दोन कारणे विशद केली. (१) मंत्रिमंडळात येण्यासाठी मला दिलेले आमंत्रण बिनशर्त होते व (२) बाहेर राहाण्यापेक्षा सरकारात जाऊन अस्पृश्यांच्या हितसंबंधांचे रक्षण करणे जास्त सुलभ होते.

मी माझ्या भाषणात सांगितले की पूर्वग्रहदूषित असे वाईट कायदे आपल्याविरुद्ध होतील, याची भीती दलित वर्गांनी बाळगू नये. त्यांनी भ्यावयास हवे ते वाईट कारभाराला. दलित वर्गाचे लोक या कारभारात नसल्यानेच हा कारभार दूषित होतो. सवर्ण अधिकारी ह्या कारभारात भरले असल्याने राजवटीला दलित वर्गांविषयी सहानुभूती नाही. या सर्व गोष्टी विचारात घेऊन मी सरकारात सामील झालो.

आता तिसरा मुद्दा. काँग्रेसला मिळण्यात काही अर्थ नाही, असे मी म्हणालो. तिसरा पक्ष असणेच जास्त सुरक्षिततेचे ! सरकार झोटिंगशाही बनण्याचा धोका असतो.

सध्याच काँग्रेसमधून समाजवादी बाहेर पडून, काँग्रेस व समाजवादी असे दोन पक्ष तयार झालेत. तेव्हा काँग्रेसला मिळायचे की काय हा आपणापुढे प्रश्न नाही. काँग्रेसला मिळावयाचे की समाजवाद्यांना, हा खरा प्रश्न आहे. समाजवादी पक्ष प्रबळ होण्याची शक्यता आहे. तेव्हा मी असा सल्ला दिला की, या दोन्ही पक्षांचा समतोलपणा राखून त्यादृष्टीने त्यांच्यापासून फायदा उठवणारी सत्ता म्हणून आपण तिसरा पक्ष स्थापावा. केवळ अनुयायांच्या स्वरूपात एखाद्या राजकीय पक्षाला जाऊन मिळण्यात स्वारस्य नाही. त्यायोगे फार तर आपण अधिकारावर चढू, पण त्याने सत्ता अथवा अधिकार मिळतीलच असे नाही.

या अनुषंगाने बोलताना मी म्हणालो की, लोकसंख्येच्या प्रमाणात पाहाता, संयुक्त प्रांतात तुम्हाला २२ टक्क्यांच्या आसपास नोकऱ्यात राखीव जागा मिळणे आवश्यक असता, अवघ्या १० टक्क्यांवर तुमची बोळवण करण्यात आल्याबद्दल तुम्ही एका ठरावाने आताच पंत मंत्रिमंडळाचा निषेध केलात. तुम्हाला हव्या असलेल्या राखीव जागा पंत तुम्हाला का देत नाहीत ? कारण संयुक्त प्रांतिक विधिमंडळात आपणाला हव्या असणाऱ्या बहुमतासाठी पं. पंत तुमच्यावर अवलंबून नाहीत, हे होय. वाटाघाटी करण्यालायक वेगळी पण प्रबळ अशी संघटना स्थापूनच तुम्हाला या २२ टक्क्याची पंतांकडे मागणी करता येईल आणि आपणाला यांच्यावरच अवलंबून राहावे लागणार आहे, हे ध्यानी घेऊन पंत त्यास मान्यता देतील.

यानंतर मी मागासलेल्या जमाती व दलित वर्ग यांच्या ऐक्याच्या प्रश्नासंबंधी बोललो. हे दोनही मिळून देशाची बहुसंख्या बनते. त्यांना या देशावर राज्य करता येणार नाही का ? राजकीय सत्ता हस्तगत करण्यासाठी त्यांनी संघटित होण्याचाच काय तो अवकाश आणि आता प्रौढ मतदानाने निवडणुकी होणार असल्याने हेही कठीण नाही. काँग्रेस सरकार इथे कायमचे राहणार आहे या भावनेने जनता धैर्यशाली बनू शकत नाही असे दिसते. ही चुकीची विचारसरणी आहे. लोकप्रिय लोकशाहीत कुठलेच सरकार कायम राहू शकत नाही. पं. नेहरू व सरदार पटेल यांच्यासारख्या उच्चतेच्या लोकांनी स्थापन केलेले सरकारसुद्धा कायम टिकू शकत नाही, हे लक्षात ठेवा.

मी काँग्रेसवर अथवा मंत्रिमंडळातील माझ्या सहकाऱ्यांवर हल्ला चढविला, हे म्हणणे सत्याचा केवढा अपलाप करणारे आहे, हे माझ्या वरील निवेदनावरून वाचकांच्या लक्षात येईलच.

🔹🔹🔹

संकलन – आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे