November 5, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

अस्पृश्यात भांडणे लावणाऱ्या हितशत्रूंचा डाव ओळखा – डाॅ. बाबासाहेब आंबेडकर

मुंबई येथे अस्पृश्य वर्गाच्या जाहीर सभेत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले भाषण….

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली अस्पृश्य वर्गाची एक जाहीर सभा शुक्रवार दिनांक २९ मे १९३१ रोजी डिलाईल रोड, मुंबई येथे भरली होती. या सभेत कमीतकमी ५ ते ६ हजारपर्यंत लोक जमले होते. मोठ्या प्रमाणात स्त्रीसमुदायही हजर होता. निरनिराळ्या स्वयंसेवक पथकांकडून सभेच्या ठिकाणी बंदोबस्त व शिस्त ठेवण्यात आली होती.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्यावर टीका करणाऱ्या अस्पृश्य समाजातील टिकाकारांच्या टीकेला याप्रसंगी जाहीरपणे उत्तर दिले. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी याप्रसंगी जवळजवळ एक तासपर्यंत भाषण केले.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले,
आजच्या या सभेचा ठराविक असा काही कार्यक्रम अगर सभा भरविण्याला विशिष्ट काही कारण नसल्यामुळे येथे येण्याचे मी टाळणार होतो; पण सभेच्या उत्साही चालकांनी अगदी पिच्छाच पुरविल्यामुळे येणे भाग पडले. आज विशेष काही कारण नसल्यामुळे इतका लोकसमुदाय सभेला जमेल अशी माझी अपेक्षा नव्हती. मी आलो नसतो तर या पाच-सहा हजार लोकांचा खरोखरच फार हिरमोड झाला असता. आपल्या लोकमताचा पारा किती जागृत व जिवंत आहे हे ओळखण्यास अशा सभा एकप्रकारे फार उपयोगी पडतात. सभेचा विषयही निश्चित नसल्यामुळे आज काय बोलावे या विचारातच मी होतो पण पुढाऱ्यांच्या एकी संबंधाचा जो ठराव या सभेने पुढे आणला आहे व त्यावर आतापर्यंत निरनिराळ्या वक्त्यांची जी भाषणे झाली आहेत त्यावरून आज याप्रसंगी कोणत्या विषयावर मी बोलणे समयोचित होईल याचा उलगडा मला झाला आहे. माझा विषय मला सापडला आहे. आपल्या अस्पृश्य समाजातील माझ्या टीकाकारांच्या टीकेला याप्रसंगी जाहीरपणे उत्तर देण्याचे मी ठरविले आहे. इतरवर्गीय लोकांच्या व पत्रकारांच्या टीकेचा उल्लेख या प्रसंगी मी करीत नाही. त्यांच्या टीकेचे स्वरुप, कारण व हेतू यांची आपल्यापैकी पुष्कळांना माहिती आहेच. त्यांच्या आक्षेपांचा समाचार वेळोवेळी मी घेतला आहे व कारण पडले व योगायोग आला म्हणजे पुढेही तो मला घ्यावा लागेल. आज फक्त अस्पृश्य समाजातील काही मंडळींकडून माझ्यावर जे आक्षेप घेण्यात येतात व जे आरोप करण्यात येतात ते किती फोल व निराधार आहेत हेच येथे आज मला सांगावयाचे आहे. माझ्यावर दोन प्रकारची टीका अस्पृश्यातील निरनिराळ्या जातीकडून करण्यात येते. चांभारादी अस्पृश्य वर्गातील काही मंडळी म्हणते की, डॉ. आंबेडकर हे जातीने महार असल्यामुळे अस्पृश्य वर्गाला ज्या काही सवलती मिळतात त्या सवलतींचा व लाभांचा सारा मलिदा ते आपल्या महार जातीलाच चारू घालतात. चांभारांना वगैरे त्यातला काही वाटा ते मिळू देत नाहीत. हा आक्षेप इतका निराधार व खोटा आहे की, याच्याकडे लक्ष देणेही प्रथम मला प्रशस्त वाटेना. माझ्याशी मतभेद असणारे लोक इतर समाजात आहेत तसे ते चांभारादी अस्पृश्य समाजातही असू शकतील हे मी जाणतो. पण कोणत्याही सुविचारी, प्रामाणिक व जबाबदार चांभाराचा असल्या नीच व खोट्या आरोपाला पाठिंबा अगर संमती असेल असे मात्र मला मुळीच वाटले नव्हते. पण ‘ राष्ट्रीय ‘ पत्रातून चांभारांच्या सभेची जी रसभरीत पाने पाहण्यात आली त्यावरून चांभारातील भल्या समजण्यात येणाऱ्या काही पुढाऱ्यांच्या तोंडातून हे नीच आक्षेप निघाल्याचे मला सगजले. राष्ट्रीय पत्रातील हे रिपोर्ट खरे असल्यास मला या चांभार मंडळीबद्दल खरोखरच फार खेद वाटतो. असले खोटे व निराधार आरोप माझ्यावर करून त्यांनी आपला इतका अधःपात करून घ्यावयाला नको होता. माझ्यावर टीकाच त्यांना करावयाची होती तर त्यांनी दुसरा एखादा निराळा मुद्दा अगर निमित्त शोधून काढावयाला पाहिजे होते. पण सवलतीचा मलिदा मी एकट्या महार जातीलाच चारतो व चांभारादिकांच्या तोंडाला नुसती पाने पुसतो हा माझ्यावरील आरोप इतका स्पष्टपणे खोटा व निराधार आहे की, त्याच्या खोटेपणाबद्दल मला अगदी सुलभपणे वाटेल त्याची सप्रमाण खात्री पटवून देता येईल.

ठाणे, पुणे, सोलापूर, सातारा वगैरे ज्या जिल्ह्यांशी माझा निकट परिचय व संबंध येतो असे जरी जिल्हे घेतले व तेथील म्युनिसीपालिटी, लोकल बोर्डस् वगैरे स्थानिक संस्थानातून अस्पृश्यांच्या वतीने जाणाऱ्या प्रतिनिधींची जातवारी पाहिली तरी ‘ महाराला मलिदा चारण्याचा ‘ हा आरोप किती फोल, खट्याळ व दुष्टपणाचा आहे याबद्दल कोणाचीही सहज खात्री पटविता येईल. ठाणे जिल्ह्यात, इतर जिल्ह्यांप्रमाणे महार जात ही बहुसंख्याक जात आहे. पण तिच्यात लायक लोक असूनही ठाणे म्युनिसीपालिटीत, लोकल बोर्डात, स्कूल बोर्डात जे अस्पृश्य सभासद प्रतिनिधी म्हणून आहेत त्यात एकही महार जातीचा प्रतिनिधी नाही. सर्व चांभार जातीचे प्रतिनिधी आहेत. सोलापूर जिल्ह्यातही हाच प्रकार आहे. तेथील म्युनिसीपल स्कूल बोर्डमध्ये व म्युनिसीपालिटीमध्ये चांभार व ढोर समाजातीलच प्रतिनिधी आहेत. एकही महार नाही. आणि इतरांच्या मानाने महारांची संख्या अधिक आहे व त्यांच्यात जागृतीही मोठी झाली आहे. पुणे म्युनिसीपालिटीतही दोन्ही प्रतिनिधी चांभार जातीचे आहेत. सातारा डिस्ट्रिक्ट बोर्डामध्ये सुद्धा एकही महार जातीचा प्रतिनिधी नाही. धारवाड, विजापूर वगैरे कानडी मुलखातही हाच प्रकार आढळून येईल. याप्रमाणे स्थानिक संस्थांतून अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून फक्त महार जातीचेच लोक भरले आहेत हा आरोप आमूलाग्र खोटा व निराधार आहे. पोलीस खाते प्रत्यक्ष व्यवहारात अस्पृश्य समाजाला जवळ जवळ बंदच होते. कौन्सिलमध्ये गेल्यावर या प्रश्नाला मी व माझे सहकारी मित्र डॉ. सोळंकी यांनी चालना दिली व पोलीस खाते अस्पृश्यांना मोकळे होईल अशी खटपट केली. तिला यश येऊन पोलीस खाते अस्पृश्यांना खुले करण्यात आल्याचा सरकारी जाहीर ठराव नुकताच प्रसिद्ध झाला आहे. या प्रयत्नानुसार वरिष्ठ दर्जाच्या पोलीस अधिकारावर जी पहिली नेमणूक झाली आहे ती चांभार जातीतील एका गृहस्थाची झाली आहे. महार जातीतील मनुष्याची वर्णी तेथे आम्हाला लावून घेता आली असती ; पण तसे मी केले नाही. अस्पृश्य वर्गात महार जात ही बहुसंख्यांक आहे. चांभारादी अल्पसंख्यांक जातीचा विश्वास संपादन करणे तिचे कर्तव्य आहे असे मी समजतो व म्हणून महार समाजातील लोकांचा रोष पत्करूनही ज्या काही सवलती मिळतील त्यांच्यातील मोठा हिस्सा चांभारादी अस्पृश्यातील अल्पसंख्यांक जातींना मिळेल अशी मी खबरदारी घेतो. ‘ गोळीला महार व पोळीला चांभार ‘ असे माझे याबाबतीत धोरण आहे असे म्हणून माझ्यावर टीका करणारे व रागावणारे महार जातीत पुष्कळ लोक आहेत, हे मला माहीत आहे. माझ्याविरुद्ध त्यांचा हाच एक मोठा आक्षेप आहे ! अशी वस्तुस्थिती असता मी महारांनाच सर्व मलिदा चारतो व चांभारादी अल्पसंख्यांकांना काही मिळू देत नाही असा माझ्यावर आरोप करणे अत्यंत नीचपणाचे व निराधार आहे. चांभारातील जबाबदार समजल्या जाणाऱ्या पुढाऱ्यांनी असले वृथा आरोप माझ्याविरूद्ध केल्यामुळे महार समाजातील पुष्कळ लोक साहजिकपणे चिडून गेले आहेत. त्यांना माझे विनंतीपूर्वक पण निक्षून असे सांगणे आहे की, त्यांनी आपला राग आवरून धरला पाहिजे. महार लोक हे बहुसंख्यांक आहेत. कोणी काही म्हटले तरी त्यांचे कर्तव्य उघड आहे. इतर अल्पसंख्यांक जातींचे जेणेकरून समाधान होईल तेच धोरण आपण अखेरपर्यंत कायम ठेविले पाहिजे. निष्कारण दोषारोप करणाऱ्या लोकांना याच धोरणाची कास धरून आपण समर्पक उत्तर देऊ शकतो. अस्पृश्यात भांडणे लागावी व महाराविरुद्ध चांभाराला उभे करून आपल्या कार्याचा नाश करावा व आपल्याकडे बोटे दाखवून आपल्याला हिणवावे हा तर आपल्या हितशत्रूंचा एक डावच आहे. तो आपण हाणून पाडला पाहिजे. बहुसंख्य समाज या नात्याने ही जबाबदारी महार वर्गावरच अधिक व प्रामुख्याने पडते व त्यांनी ती सांभाळलीच पाहिजे असे महार समाजाला माझे वारंवार निक्षून सांगणे आहे. ‘ जशास तसे ‘ या न्यायाने चांभारांच्या या आरोपांना तुम्ही उत्तरे देऊ शकता व त्यांच्याशी जशास तसे वागू शकता. पण यात आपल्या चळवळीचे हित होणार नाही. औदार्य व क्षमावृत्ती यांचीच आपण बळकट कास धरली पाहिजे. हेच धोरण आपल्या कार्याला व ध्येयाला शेवटी हितावह व भूषणावह होणार आहे.

महार जातीतील काही लोकांकडूनही माझ्यावर टीका करण्यात येते. मी शिक्षणाचे कार्य करीत नाही. सत्याग्रहाच्या वगैरे चळवळी करतो असा कित्येकांचा माझ्याविरुद्ध आक्षेप आहे. शिक्षणाचा अर्थ माझे हे टीकाकार काय व किती व्यापक करतात हे समजते तर त्यांचे समाधान करणे अधिक सुलभ झाले असते. सत्याग्रहाच्या व माणुसकीचे हक्क मिळविण्याच्या चळवळीत उत्तम शिक्षण असू शकते व मिळू शकते ही गोष्ट त्यांना मला पटवून देता आली असती. पण ते ज्याला ‘ शिक्षण ‘ म्हणून ओळखतात ते शिक्षण देण्याच्या बाबतीतही माझा प्रयत्न माझ्या या कोणत्याही टीकाकाराच्या प्रयत्नापेक्षा मोठा आहे असे मी आव्हानपूर्वक सांगू शकतो. ठाणे, अहमदाबाद, धारवाड वगैरे ठिकाणची बोर्डिंगे मी चालविली आहेत. आज या घटकेला ७० विद्यार्थी माझ्या प्रयत्नाने फुकट शिक्षणाचा लाभ घेत आहेत. माझ्या टीकाकारांनीही या बाबतीतील आपल्या प्रयत्नाचा आढावा काढावा व शिक्षणाकरिता त्यांनी किती पैसा खर्च केला आहे व किती झीज सोसली आहे हे जनतेला सांगावे. स्वतः काही न करता दुसऱ्याने अमुक केले नाही व तमुक करावयाला पाहिजे होते असा पोकळ शिष्टपणा करू नये. वरील प्रकारचे टीकाकार विशेषतः नाशिक जिल्ह्यात मला आढळून आले. त्यांच्या टीकेत काही अर्थ तरी आहे ; पण सातारा जिल्ह्यातील रा. निकाळजे वगैरे महार जातीची काही मंडळी मजवर जी टीका करते तिला शेंडा बुड काहीच नाही. काहीतरी विरुद्ध करून दाखवावयाचे व काहीतरी अद्वातद्वा बोलून पुढारी म्हणवून घ्यावयाचे एवढाच त्यांच्या आयुष्याचा हेतू दिसतो. परवा या निकाळजे वगैरे मंडळींनी सातारा जिल्ह्यामार्फत महार समाजाची एक परिषद बोलावली होती आणि तिचे अध्यक्षपद पुण्याच्या मुजूमदार, इनामदार साहेबांना दिले होते. हे इनामदार साहेब केवळ जातीने नव्हे तर वृत्तीनेसुद्धा पेशवाईचे खरेखुरे वंशज आहेत. पुण्याच्या पर्वती सत्याग्रहाला विरोध करण्यात हे इनामदार साहेब प्रमुख होते. अशा व्यक्तीला अध्यक्ष करून व अस्पृश्यांच्या चळवळीची सूत्रे अशा परकीय व्यक्तीच्या हाती देऊन निकाळजेने काय दाखविले ? अस्पृश्यांची आजची चळवळ स्वावलंबनाच्या व स्वाभिमानाच्या पायावर चालली आहे. मुजूमदार साहेबासारख्याना अध्यक्ष करून या तत्वांवर बोळा फासण्याचा या निकाळजे वगैरे मंडळींनी प्रयत्न केला. यापेक्षा ते स्वतः अगर त्यांच्या मताचे एखादे अस्पृश्य पदवीधर जरी या सभेचे अध्यक्ष झाले असते तरी लोकांना ते आवडले असते पण इनामदार साहेबांना अध्यक्ष करून सभेला तेही आले नाहीत व लोकही जमले नाहीत. रा. निकाळजेसारख्या लोकांशी मी जुळते घेत नाही असा माझ्यावर एक आरोप करण्यात येतो पण यांच्याशी जुळते तरी कसे घ्यावयाचे ? ज्यांना तत्वाची जाणीव नाही व ती करून घेण्याची इच्छा नाही आणि स्वाभिमानाची चाड नाही, फक्त स्वतःचे महत्व वाढविण्याची इच्छा आहे, त्यांच्याशी कोणी झाला तरी काय व कसे मिळते घेणार अगर त्याची समजूत पटवू शकणार ? अशा माणसांना आपल्यासारख्या सामान्य जनतेनेच ताळ्यावर आणले पाहिजे. खरा व लायक पुढारी कोण व आपले हित कोण साधू शकतो याचा निर्णय यापुढे जनतेने दिला पाहिजे व ‘ मला पुढारी म्हणा ‘ असे म्हटल्याने पुढारीपण येत नसते ही गोष्ट पुढारी होवू इच्छिणाऱ्यांनीही ओळखली पाहिजे.

🔹🔹🔹

संकलन – आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे