येवला (नाशिक) येथे मुंबई इलाखा दलित वर्गीय परिषदेत अस्पृश्य हिंदू म्हणून जन्माला आलो, पण हिंदू म्हणून मी मरणार नाही ही धर्मांतराची घोषणा केली त्या परिषदेतील डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे अध्यक्षीय भाषण….
रविवार दिनांक १३ ऑक्टोबर १९३५ ला येवला (नाशिक) येथे मुंबई इलाखा दलित वर्गीय परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेसाठी येवल्याला जातांना शनिवार दिनांक १२ ऑक्टोबर १९३५ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाशिकला पोचले. तेव्हा त्यांना सकाळी ११ वाजता स्टेशनपासून मोठ्या थाटाने मिरवत गावात नेण्यात आले. विहितगाव, नाशिक रोड वगैरे ठिकाणी बाबासाहेबांना मेजवान्या दिल्या.
नाशिक रोड येथे बाबासाहेबांच्या नावे एक वाचनालय सुरू केले होते, त्याच्यासाठी एक पत्र्याची शेड बांधली होती. त्या वाचनालयाचे उद्घाटन बाबासाहेबांच्या हस्ते झाले. त्यावेळी भाषण करताना डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी जनतेला उपदेश केला की,
तुम्ही स्वावलंबी व्हा. स्वतःच्या पायावर उभे राहून आपल्या प्रगतीचे कार्य करा. माझे बरे वाईट झाले तर माझ्यामागे चळवळ चालविण्यास लोक तयार झाले पाहिजेत.
रात्री नऊ वाजता रविवार पेठ, हिरालाल गल्ली येथे सहभोजन झाले. त्यात देशपांडे हे एकच काँग्रेसमन होते. रविवार दिनांक १३ ऑक्टोबरला डाॅ. बाबासाहेब नाशिकहून विंचूरला गेले. मार्गावरील गावागावातून डाॅ. बाबासाहेबांना अनेक ठिकाणी हारतुरे देण्यात आले. विंचूर येथे स्पृश्य वर्गातर्फेही त्यांना चहापार्टी देण्यात आली.
सकाळी डाॅ. बाबासाहेब येवला म्युनिसीपालिटीचे मानपत्र स्वीकारण्यास गेले. मानपत्राला उत्तर देताना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की,
आमच्या चळवळीमुळे स्पृश्य वर्गीयांच्या दृष्टिकोनात बदल घडेल व ते आमच्याशी आपुलकीने वागण्यास तयार होतील, असे दिसत नाही ! तेव्हा आम्ही हिंदूंमधून दूर राहून स्वावलंबनाने आमच्या प्रगतीसाठी झगडत राहू.
रविवार दिनांक १३ ऑक्टोबर १९३५ ला येवला (नाशिक) येथे मुंबई इलाखा दलित वर्गीय परिषद भरली होती. या परिषदेचे स्वागताध्यक्ष श्री. अमृतराव रणखांबे होते. परिषदेची सुरवात रात्रौ १० वाजता झाली. या परिषदेला सुमारे दहा हजार जनसमुदाय हजर होता. स्वागताध्यक्षांचे भाषण झाल्यानंतर परिषदेचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यांनी धर्मांतर करावे, अशी घोषणा करणारे भाषण केले.
‘ येवले येथे ता. १३ ऑक्टोबर १९३५ रोजी भरलेल्या मुंबई इलाखा परिषदेपुढे अध्यक्षस्थानावरून भाषण करताना डॉ. आंबेडकर यांनी सवर्ण हिंदुंच्या जाचातून मुक्तता करून घेण्यासाठी अस्पृश्यांना धर्मांतराचा जो निर्वाणीचा मार्ग सुचविला तो पाहून प्रत्येक हिंदू अंतःकरण हालून गेल्याशिवाय खचित राहिले नसेल. केवळ अध्यक्षीय भाषणातच ह्या मार्गाचा पुरस्कार झालेला नाही, तर सदर परिषदेनेही, हिंदू धर्मातील अस्पृश्य गणलेल्या वर्गाने हिंदू धर्माचा त्याग करून ज्या धर्मात समानतेचे हक्क मिळतील त्या धर्मात प्रवेश करण्याविषयीचाही ठराव मंजूर करून घेऊन आपल्या अध्यक्षांचा सल्ला अनुसरण्याचे जाहीर केले. हिंदू धर्मातील ज्या अन्यायामुळे डॉ. आंबेडकरांसारख्या व्यक्तीलादेखील धर्मांतर करण्यास उद्युक्त होण्याची प्रवृत्ती झाली, त्या अन्यायाच्या व हे अन्याय होण्यास कारणीभूत होत असलेल्या सनातनी म्हणविणाऱ्या लोकांच्या माणुसकीला मुकलेल्या खुनशी वृत्तीचाही त्याचवेळी विचार होणे अवश्य आहे. डॉ. आंबेडकरांच्या ह्या कृत्याचे पातक त्यांच्यापेक्षा ह्या सनातन्यांच्या शिरावर आहे हे मुळीच विसरून चालणार नाही. डॉ. आंबेडकरांनी आपल्या भाषणात अस्पृश्यांचा हिंदूधर्मात किती अमानुषपणे छळ होत आहे; आणि ह्या छळातून मुक्तता करून घेण्याचे आतापर्यंत त्यांचे प्रयत्न सवर्ण हिंदूंच्या असहिष्णू वृत्तीमुळे कसे फशी पाडले गेले आहेत, याचा समग्र पाढा आपला उपर्युक्त निर्णय जाहीर करण्यापूर्वी स्पष्टपणे वाचून दाखविला आहे. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय या प्रत्येक बाबतीत दलित वर्गाची कुचंबणा होत आहे. हिंदू धर्माच्या दडपणाखाली मनुष्यत्वाचे साधे हक्क सुद्धा संपादन करणे अशक्य झाले आहे. त्यासाठी आजपर्यंत केलेला पराकोटीचा स्वार्थत्याग व्यर्थच ठरला आहे. गेल्या पाच वर्षात नाशिकच्या काळ्या रामाच्या देवळात प्रवेश मिळवून त्या योगाने हिंदू समाजात आपला समान हक्क व दर्जा मान्य करून घेण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न, तसेच सत्याग्रहाचा उपाय उच्चवर्णीय हिंदुंची मने वळविण्यास निरुपयोगी ठरला.
या साऱ्या गोष्टींचा निर्देश करून डॉ. आंबेडकर पुढे म्हणतात,
साधे मूलभूत हक्क आम्हाला लाभू देण्यासाठी ‘ स्पृश्य ‘ म्हणून गणल्या गेलेल्या हिंदू लोकांची मनधरणी करण्याच्या निरर्थक प्रयत्नात जे काही थोडेसे द्रव्यसाधन आम्ही जमा केले होते तेही खर्ची घालून बसलो. त्यांच्याकडून झालेली कल्पनातीत मानखंडनाही आम्ही सहन केली. पण हा सारा स्वार्थत्याग निष्फळच ठरला. निमूटपणे व धिम्मेपणे आजपर्यंत आम्ही जे जे हाल सहन केले, त्याचा यत्किंचितही परिणाम ह्या हिंदू लोकांच्या अंतःकरणावर झालेला दिसून आला नाही. आम्ही दुसऱ्या धर्माचे अनुयायी असतो आणि त्यावेळीही आताचेच आमचे उदरनिर्वाहाचे उद्योगधंदे आम्ही पत्करीत असतो तर ह्या हिंदू लोकांना आम्हाला आताप्रमाणे अपमानकारक रीतीने जगविण्याचा किंचितही धीर करवला असता का ?
हिंदू धर्मात जन्म घेतल्याचा आम्हाला लागलेला हा डागच आमच्या प्रगतीच्या आड येत आहे. आमच्या साऱ्या मानहानीचे, सवर्ण हिंदुंच्या आमच्या बाबतीत तुच्छतापर वर्तनाचे तेच एक कारण आहे. असे जर आहे, तर त्या धर्माच्या नावाचा केवळ शिक्का घेऊन बसण्यात काय अर्थ आहे ? ज्याप्रमाणे आम्हाला मनुष्याच्या मोलाने राहता येण्यात सुद्धा मज्जाव केला जात आहे, त्या हिंदू धर्माच्या कलशाचा एक भाग होऊन आम्ही का म्हणून आयुष्य घालवावे ? अशा स्थितीत राहाण्यापेक्षा या धर्मातून बाहेर पडून दुसऱ्या एखाद्या धर्माचा, ज्यामध्ये आपल्याला आज ही मानखंडना सहन करण्याचा प्रसंग येणार नाही, हलक्या नीच दर्जाने वावरण्याची सवय होणार नाही, त्या धर्माचा अंगीकार करणे उचितच नाही का ?
अस्पृश्यानी हिंदू धर्माचा त्याग केल्यानंतर कोणता धर्म स्वीकारावयाचा हे प्रत्येकाच्या मर्जीवर अवलंबून आहे. फक्त समानतेचे हक्क मिळतील असाच धर्म त्यांनी स्वीकारावा.
दुर्दैवाने अस्पृश्य हिंदू असा डाग घेऊन मी जन्माला आलो, पण ती गोष्ट माझ्या स्वाधीन नव्हती. तथापि, हा नीच दर्जा झुगारून देऊन ही स्थिती सुधारणे मला शक्य आहे आणि ते मी करणारच याबद्दल मुळीच संशय नको. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की, हिंदू म्हणवून घेत मी मरणार नाही.
हिंदू धर्मात आपला समान दर्जा प्रस्थापित करण्यासाठी सत्याग्रहाच्या मार्गाने जाऊन काही मिळणार नाही. त्या मार्गाची आता आवश्यकताही नाही, आपला समाज आता हिंदू धर्मापासून विलग व स्वतंत्र असा मानला पाहिजे, अर्थातच नागरिकत्वाच्या व राजकीय हक्कांसाठी आपला झगडा पुढे चालू ठेवणे आवश्यकच आहे आणि याकरिता आपले आपसातले मतभेद, अंतस्थ कलह विसरून जाऊन एकजुटीने संघटीतपणे आपले ध्येय गाठण्याचा प्रयत्न करणे हेच आपले आजचे कार्य होय.
नव्या घटनेत दलित वर्गाने आपले हक्क जोराने पुढे मांडण्यासाठी खरे कळकळीचे प्रतिनिधी निवडणे जरुर आहे. हिंदू धर्माच्या शृंखलांनी जखडून न राहता स्वतंत्रपणे आपले कर्तव्य ठरविण्याची आपली मनापासून इच्छा आहे. हे दलित वर्गाने जगाला स्पष्ट दाखवून द्यावे. एवढीच माझी त्यांना विनंती आहे.’ ( संदर्भ – विविधवृत्त – २० ऑक्टोबर १९३५)
या भाषणाला पाठिंबा देण्याचा ठराव डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडला आणि तो मंजूर करण्यात आला. तो ठराव स्वतः बाबासाहेबांनी लिहून आणलेला होता.’
येवला परिषदेचा ठराव. –
” अस्पृश्य मानलेले वर्ग व स्पृश्य मानलेले वर्ग यामध्ये समता व संघटना घडवून आणण्याच्या हेतूने तितके सामर्थ्य नसताही माणसांची व द्रव्याची अपरिमित हानी सोसून मुंबई इलाख्यातील अस्पृश्य वर्गांनी महाड येथे चवदार तळ्यावर व नाशिक येथे काळाराम मंदिरावर सत्याग्रह केला. काळाराम मंदिराचा सत्याग्रह तर गेली सहा वर्षे सतत चालविण्यात आला. परंतु स्पृश्य मानलेल्या हिंदुंचे किंचितही मतपरिवर्तन झाल्याचे दिसत नाही. इतकेच नव्हे तर स्पृश्य व अस्पृश्य या उभयतांतील होऊ घातलेल्या संघटनेला व तद्जन्य उत्पन्न होणाऱ्या हिंदू समाजाच्या सामर्थ्याला कवडीचीही किंमत देत नाहीत असे त्यांनी आपल्या वर्तनाने सिद्ध केले आहे. म्हणून अस्पृश्य वर्गाची ही परिषद असा ठराव पास करीत आहे की, हिंदुंची मनधरणी करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचा काहीही उपयोग होत नसल्याने त्याबाबतीत अस्पृश्य वर्गाने आपले सामर्थ्य आता विनाकारण मुळीच खर्च करू नये व सत्याग्रहाची मोहीम यापुढे बंद करावी. आणि स्पृश्य मानलेल्या वर्गापासून आपला समाज स्वतंत्र करावा व हिंदुस्थानातील अन्य समाजामध्ये आपल्या समाजाला मानाचे व समतेचे स्थान मिळविण्याकरिता अस्पृश्य वर्गाने एकनिष्ठेने प्रयत्न करावा असे या परिषदेचे मत आहे. ( संदर्भ – जनता – १५ फेब्रुवारी १९३६ )
‘ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मुद्देसूद भाषण आणि त्याला अनुसरून मांडलेल्या ठरावामुळे प्रेक्षकातील तरूण पिढीला फार आनंद झाला. वृद्ध लोक व स्त्रिया हे धर्मभोळे, त्यांना या घोषणेने चमत्कारिक वाटले. तरीही बाबासाहेबांचे पोटतिडिकीने केलेले जळजळीत भाषण ऐकूण त्यांनीही ठरावाला संमती दिली. हिंदू लोक अस्पृश्यांना खालच्या पायरीवरचे हिंदू म्हणून छळतात. ते परधर्मात गेले तर या छळातून मुक्त होतील व स्वतःच्या हिंमतीवर उपजीविका करतील, शिक्षण घेऊन ते स्वतःची प्रगती घडवून आणतील. या मुद्यांवर डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण एक तासभर झाले. सारे लोक मंत्रमुग्ध होऊन भाषण ऐकत होते. ठराव टाळ्यांच्या प्रचंड गजरात मंजूर झाला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यांचे सहकारी येवल्याहून परतले व नाशिकमध्ये त्यांचा मुक्काम असताना मंगळवार दिनांक १५-१०-१९३५ ला आणि १६-१०-१९३५ ला भंगी (मेघवाल) लोकांनी त्यांना चहा पार्टी व भोजन पार्टी दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यांचे सहकारी आपल्या बरोबर जेवतात हे पाहून त्यांना मनस्वी आनंद व उत्साह वाटला.
⚫⚫⚫
✍️ संकलन – आयु संघमित्रा रामचंद्रराव मोरे
More Stories
स्वातंत्र्य, माणूसकी, समान हक्क मिळतील तेच स्वातंत्र्य – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सत्ता कोणाचीही असो अस्पृश्यांना दडपण्याचाच प्रयत्न होईल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
युद्धोत्तर हिंदुस्थानपुढे मोठमोठे प्रश्न उपस्थित होणार आहेत – डॉ. बाबासाहेब आंबेडकर