अहमदाबाद म्युनिसीपालिटीतर्फे दिलेल्या मानपत्राला उत्तर देताना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले भाषण….
शुक्रवार दिनांक ३० नोव्हेंबर १९४५ रोजी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुंबई प्रांतिक शेडयूल्ड कास्ट्स् फेडरेशनच्या अधिवेशनाला हजर राहाण्यासाठी अहमदाबाद येथे पोचले. आगाऊ ठरल्याप्रमाणे त्याच दिवशी दुपारी अहमदाबाद म्युनिसिपालिटीतर्फे म्यु. गांधी हॉलमध्ये डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानपत्र देण्यात आले.
ते येणेप्रमाणे-
अहमदाबाद म्युनिसीपालिटीने डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना दिलेले मानपत्र
डॉ. बी. आर. आंबेडकर, एम्. ए., पीएच्. डी., डी. एस् सी., बार-ॲट-लॉ, यांस,
आमच्या या ऐतिहासिक शहरी, अहमदाबादला, आज आपले पाय लागले आहेत हे आम्ही आमचे सद्भाग्य समजून आम्ही आपले हार्दिक स्वागत करतो. देशातील प्रमुख पुढाऱ्यांपैकी आपण एक आहात. सहा कोटी अस्पृश्यांच्या अंतःकरणातील आपले स्थान अढळ आहे. खोल गर्तेत रुतलेल्या व पायदळी तुडविले गेलेल्यांच्या उद्धारासाठी स्वतःचे आयुष्य वाहून हिन्दुस्थानातील एका महत्त्वाच्या घटकाचे पुढारीपण आपण जिंकले आहे.
जे लोक अस्पृश्यांच्या सावलीचाही विशाद मानीत असत अशा लोकांच्या हातात सर्व शैक्षणिक संस्था असताही आपण या परिस्थितीतही सर्व प्रकारच्या आपत्तींना तोंड देऊन असामान्य असे शिक्षण संपादन केलेत. कोट्यावधी अस्पृश्यांना शतकानुशतके हीन-दीन परिस्थितीत सक्तीने डांबून ठेवणाऱ्या निंद्य, बुरसटलेल्या विचारसरणीवर प्रखर प्रहार करून अस्पृश्योद्धाराचे दरवाजे सताड उघडे करण्याचे अत्यंत बिकट असे कार्य आपल्या असामान्य बुद्धिमत्तेच्या जोरावर अचाट धीरोदात्ततेने आपणच करू शकलात. आपल्या भगिरथ प्रयत्नाने अस्पृश्य समाजाची शैक्षणिक व इतर प्रगती करून, सामाजिक समता व लोकशाही प्रस्थापित करण्यात आपण पुष्कळच कार्य केलेत. आपल्या देशातील सामाजिक समतेच्या चळवळीचे आपणच खरे दिग्दर्शक आहात.
या देशातील चाळीस कोटी लोकांचे हितसंबंध गोविल्या गेलेल्या हिंदी जनतेचे भवितव्य ठरविणारी हिंदुस्थानची भावी घटना तयार करताना सहा कोटी अस्पृश्य जनतेचा विचार केला जावून त्यांच्या संमतीशिवाय ही घटना अस्तित्वात येऊ शकणार नाही असे सरकारला जाहीर करणे भाग पडले त्याचे कारण आपल्या मार्गदर्शनाखालील अस्पृश्यांच्या चळवळीचे अचाट सामर्थ्य सरकारने पुरते जाणले आहे. हिंदी राजकारणात अस्पृश्यांना प्राप्त झालेल्या या महत्त्वाच्या नि मानाच्या स्थानाचे यश केवळ आपल्यालाच आहे.
हिंदभूच्या मोजक्या सुपुत्रांपैकी, उच्च विचारसरणी, प्रभावी लेखन, बिनतोड नेतृत्व या आपल्या विविध अशा अमूल्य गुणांमुळे हा हिंद देश आपल्याबद्दल जाज्वल्य अभिमान बाळगीत आहे.
बहुसंख्यांकांच्या जुलमी पकडीतून, असहाय्य अशा अल्पसंख्यांकांची, विधायक सूचना करून राजकारणाच्या दीर्घ व्यासंगामुळे अचूक मार्गदर्शन आणि राजकारणातील कोंडी फोडण्याचे सामर्थ्य व प्रस्थापित करण्याची तळमळ यांच्या जोरावर आपण सोडवणूक केलीत. थोडक्यात ” आपण अस्पृश्यांचे उद्धारक आहात. ” आम्ही दुर्दैवी हिंदवासीयांना प्रगतीपथावर नेण्यासाठी आपण चिरायु व्हावेत हीच आमची इच्छा आहे.
आम्ही,
अहमदाबाद
दिनांक
चेअरमन,
व्हाइस चेअरमन आणि
म्युनिसीपल कमिटीचे सभासद, अहमदाबाद.
अहमदाबाद म्युनिसिपालिटीने दिलेल्या मानपत्राला उत्तर देताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,
” मी राहात असलेल्या मुंबई शहराच्या म्युनिसपालिटीने मला मानपत्र देण्यासंबंधीचा ठराव विचारात घेण्याचेही नाकारले, त्याबद्दल मी त्या म्युनिसिपालिटीला मुळीच दोष देत नाही. कारण माझ्या सेवेचे चीज केले जावे या गोष्टीला मी माझ्या आयुष्यात कधीच महत्त्व दिलेले नाही. परंतु तुमच्या म्युनिसिपालिटीने दिलेली ही वागणूक व मी ज्या शहरी राहातो त्या म्युनिसिपालिटीची वागणूक यातील फरक मात्र लक्षात घेण्याजोगा आहे.
या देशामध्ये कायदा व सुव्यवस्था याबद्दल मुळीच आस्था दाखविण्यात येत नाही. १९४२ च्या चळवळीच्यावेळी राज्यकारभाराचा गाडा हाकण्यात किंबहुना देशात शांतता राखण्यासाठी ज्यांनी मदत केली ते काही भावनाप्रधान लोकांना आवडले नाही. परंतु १९४२ च्या चळवळीमध्ये कायद्याला मान देऊन ज्यांनी सुव्यवस्था राखली त्यांचे ते करणे योग्य होते इतकेच नव्हे तर त्यांनी त्याप्रकारे वागून देशाचे हितच केले हे कबूल करणे जरूर आहे.
देशातील राजकारणात बिघाड होऊन कायदा व सुव्यवस्थेला धोका उत्पन झाल्यास देशातील अराजकतेचे निर्मूलन करण्यासाठी प्रयत्न करणे राजकारणी पुरुषांचे कर्तव्य ठरते. ते कर्तव्य जर त्यांनी केले नाही तर राजकारणात वावरण्यास ते नालायक ठरतात. १९४२ च्या ऑगस्ट चळवळीनंतर देशात जी अराजकता माजली त्यावेळी देशात सुव्यवस्था ठेवण्यासाठी आम्ही सहकार्य केले नसते तर जपान किंवा जर्मनी यांच्याकडून हिंदुस्थानची दुर्दशा झाली असती. हिंदुस्थानला या दुर्दशेपासून आम्ही वाचविले ही देशसेवा नव्हे काय ?
देशाला स्वराज्य नको असे कोणीतरी, कधीतरी म्हणू शकेल काय ? मला संपूर्ण स्वराज्य हवे. काँग्रेसच्या पन्नास वर्षाच्या काळात कधीही निर्माण झाली नव्हती अशी परिस्थिती आज निर्माण झाली आहे.
काँग्रेसच्या राजकीय पुढाऱ्यांवरचा मुसलमानांचा विश्वास अजिबात उडाला आहे. सहा कोटी अस्पृश्यांचा कॉंग्रेसवर तर विश्वासच नाही. काँग्रेसचे पुढारी जर मुत्सद्देगिरीने वागले असते तर हे असे झाले नसते. बहुसंख्य हिंदुंनी या गोष्टीचा जरूर विचार करावा.
स्वराज्य आपल्या दृष्टीपथात आहे. ब्रिटिश सरकार आता फार काळ राहू शकणार नाही. परंतु त्याला आजच आपण घालवूही शकत नाही याचे कारण हे की, आपल्यामध्ये (हिंदी लोकात) एकी नाही. आज ज्या ठिकाणी माझा सन्मान होत आहे तो काँग्रेसचा बालेकिल्ला आहे हे मला ठाऊक असताही मी माझी मते स्पष्टपणे बोलून दाखविली याचे कारण हेच आहे की, ही माझी मते काँग्रेस हायकमांडपर्यंत पोहोचली जावीत.
🔹🔹🔹
✍️ संकलन – आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे
More Stories
स्वातंत्र्य, माणूसकी, समान हक्क मिळतील तेच स्वातंत्र्य – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सत्ता कोणाचीही असो अस्पृश्यांना दडपण्याचाच प्रयत्न होईल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
युद्धोत्तर हिंदुस्थानपुढे मोठमोठे प्रश्न उपस्थित होणार आहेत – डॉ. बाबासाहेब आंबेडकर