नरेपार्क, (जी. आय. पी. रेल्वे वर्क शॉप समोरील मैदान) परेल, मुंबई येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध जयंती निमित्त केलेले भाषण…..
बौद्ध धर्म प्रचार समितीने दिनांक २७ मे १९५३ रोजी बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याचे योजिले होते. त्या अनुषंगाने श्री. आर. डी. भंडारे, सेक्रेटरी, बौद्ध धर्म प्रचार समिती यांनी दिनांक २३ मे १९५३ च्या जनतामध्ये जाहीर केले की, ” दिनांक २७ मे १९५३ रोजी बुद्ध जयंती निमित्त सकाळी ८ वाजता वरळी, आंबेडकर मैदानावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामुदायिक प्रार्थना कशी करावी याचे मार्गदर्शन करणार आहेत आणि सायंकाळी ५ वाजता नरेपार्क, परेल (जी. आय. पी. रेल्वे वर्क शॉप समोरील मैदान) येथे त्यांचे जाहीर व्याख्यान होईल.”
त्यानुसार मुंबईत नरेपार्क, परेल येथे दिनांक २७ मे १९५३ रोजी सायंकाळी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जाहीर सभेला प्रचंड जनसमुदाय जमला होता.
प्रथम श्री. आर. डी. भंडारे यांनी भगवान बुद्धाच्या फोटोला हार अर्पण केला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाषणासाठी उभे राहिले.
बुद्ध जयंती निमित्ताने आयोजित केलेल्या या जाहीर सभेत बोलताना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,
भगिनींनो आणि बंधुजनहो,
आपण आज सर्वजण बुद्ध जयंती निमित्ताने एकत्र आलो आहोत. आज या ठिकाणी जी बुद्ध जयंती साजरी होत आहे तशी ती अनेक ठिकाणी साजरी होत असली तरी येथील जयंतीला विशेष महत्त्व आहे. बुद्ध जयंतीचा दिवस हा सुट्टीचा दिवस मानला जावा म्हणून मी सन १९४२ सालापासून सरकारकडे मागणी करीत होतो. मध्यंतरीच्या काळात मंत्रीमंडळात असतानाही मी बुद्ध जयंतीची सुट्टी मिळावी म्हणून प्रयत्न करीत होतो. परंतु माझे मनोरथ पूर्ण होऊ शकले नाही. त्यावेळचे गृहमंत्री श्री. मॅक्सवेल यांचीही बुद्ध जयंतीची सुट्टी असावी अशी मनीषा होती. परंतु लढाईच्या काळामुळे ती सफल होऊ शकली नाही. बुद्ध जन्मदिनाची सुट्टी जर जाहीर केली तर आपणास युद्धासाठी मुसलमानांपासून मिळत असलेली मदत मिळणार नाही, या विवंचनेत ते होते. त्यानंतर मला पुन्हा काँग्रेस मंत्रीमंडळात घेतले गेले. मंत्रीमंडळात गेल्यानंतरही माझी जी मागणी होती ती श्री. पंडित जवाहरलाल नेहरुंनी तरी मान्य करावी म्हणून मी त्यांच्या खूप पाठिशी लागलो. माझ्या या मागणीला महाबोधी सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांनीही साहाय्य केले. ३३ कोटी हिंदूंच्या देवांच्या जन्मदिवसास सुट्टी, मुसलमान, पारशी, जैन, ख्रिस्ती या धर्मातील देवांच्या जन्मदिवशी सुट्टी मिळते, मग बुद्धजयंतीस का नको ? एक तर या सर्व सुट्टयांतून एखादी कमी करून ती आम्हास द्या अगर एक सुट्टी जास्त वाढवा, अशी मागणी मी श्री. नेहरूंकडे केली. पं. नेहरूंना बुद्धाबद्दल बराच आदर आहे. सुदैवाने नेहरू सरकारने बुद्धजयंतीची सुट्टी चालू वर्षापासून जाहीर केली. परंतु आपल्या मुंबई सरकारने तिला हरताळ फासला. आपले मुंबई सरकार खूप सुसंस्कृत आहे. मुंबई सरकार कल्चरच कल्चर आहे. वाटल्यास तुम्ही त्यास ‘ॲग्री ‘ कल्चर म्हणा. अशा या सरकारने सुट्टी न दिल्यामुळे ५ वाजता होणारी ही सभा साडेसात वाजता होत आहे.
बुद्धाचे नाव काढले की ज्या हिंदू लोकांना एक प्रकारची भीती वाटत होती व आपणांवर कोणी बाँब टाकीत आहे असे वाटत होते; त्यांच्यामधील कैक लोकांत सुज्ञानपणा येऊन ते आज बुद्धाचा गौरव करू लागले आहेत. मी काही एखादा भविष्यवादी नाही व पुढे काय होईल हे सांगू शकत नाही, पण एक गोष्ट मात्र निश्चित सांगू शकतो की बुद्धाचा धर्म या पृथ्वीतलावर पुन्हा अवतीर्ण होईल. तो कोणत्या मार्गाने येईल हे आज सांगता येत नाही.
मी एक बौद्ध धर्माचा उपासक आहे. मी नुसताच बोध घेतलेला नाही व नुसते बोलतो असे नाही, तर प्रत्यक्ष कृती करून दाखवीन. माझे शेवटचे आयुष्याचे दिवस आता बौद्ध धर्माच्या प्रचारातच खर्च करण्याचे मी निश्चित ठरविले आहे. मी बौद्ध धर्माच्या शेतपेरणीवर आहे व त्यात कोणते पीक येते हे पाहणार आहे. बौद्ध धर्माबद्दल आपणास विशेष आस्था का वाटते, असे अनेक लोक मला विचारतात. डॉ. राधाकृष्णनसारखे तत्त्ववेत्ते म्हणतात की, बौद्ध धर्मात विशेष असे काय आहे ? त्यात व हिंदू धर्मात काय फरक आहे ? उपनिषदांतून बुद्धाने सारे घेतले, असे हिंदू तत्ववेत्ते म्हणतात. मला अशा लोकांबद्दल फारच आश्चर्य वाटते. ज्यांनी कोणी ब्राम्हणांच्या १३८ उपनिषदांचा अभ्यास केला असेल व ती पूर्णपणे वाचली असतील तर त्यात ब्रम्ह व आत्मा या दोन गोष्टी शिवाय काय आहे, असेच त्यांना वाटेल.
उपनिषदांच्या या कारखान्यातील ब्रम्ह व आत्मा या दोन गोष्टींकडे पाहिले तर बुद्धाने त्यांपैकी एकही गोष्ट मान्य केली नाही. बुद्धाने स्पष्ट सांगितले की, मला ईश्वर नको. या पृथ्वीतलावर जन्मास आलेल्या प्रत्येक माणसास सुख व शांती मिळाली पाहिजे व सर्वांनी सुखाने राहिले पाहिजे. बुद्धाने नुसती शांतताच सांगितली नाही. बुद्ध हा खरा विचारवंत होता. त्याच्यासारखा विचारवंत अजूनपर्यंत जगात झालाच नाही.
बुद्धाला वेद मुळीच मान्य नव्हते. हे त्याने स्पष्टपणे जाहीर केले होते. वर्णव्यवस्थाही बुद्धाला मान्य नव्हती. बौद्ध वाङ्मयात बुद्धाने चातुर्वर्ण्यावर पदोपदी प्रहार केलेले आहेत आणि त्यामुळेच त्याला कट्टर हिंदू धर्माचा कडवा विरोध झाला. या देशात तीन महत्त्वाचे पंथ आहेत. (१) हिंदू, (२) जैन, (३) बौद्ध. जैनांबद्दल मला काहीच सांगावयाचे नाही. बुद्धाने जातिभेदावर कठोर प्रहार केले. मी ब्राम्हणांचा द्वेष करीत नाही, परंतु ‘ जरी ब्राह्मण झाला भ्रष्ट। तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ ‘ हे मी मान्य करणार नाही, अशी त्याची विचारसरणी होती.
जातिभेदाचे मूळ कायमचे उपटून टाकण्यासाठी आपण हिंदू धर्माचा त्याग करणे आवश्यक आहे. चैनीत असलेल्यांना पायाखाली काय कुजत आहे, याची जाणीव येणार नाही. ही जातिभेदाची समाजरचनाच जर उलथून पाडावयाची असेल तर आपणास बौद्ध धर्माची शिकवण अंमलात आणली पाहिजे. ही गोष्ट मी निव्वळ गळ्यापासून बोलत नसून बेंबीच्या देठापासून बोलत आहे. ज्याप्रमाणे पांडव हे वनवासात गेले असताना त्यांनी आपली शस्त्रास्त्रे एका शमीच्या झाडावर ठेवून गुप्तपणे वनवास पत्करला व नंतर तीच धनुष्ये घेऊन त्यांनी पराक्रम गाजविला, त्याचप्रमाणे आम्हीही आमची आयुधे बाहेर काढणार आहोत. मी माझा प्रचार तुमच्यापुरताच मर्यादित न ठेवता साऱ्या हिंदू धर्माला या नव्या क्षेत्रात आणण्याचा प्रयत्न करीन. यश कितपत येते ते पाहू. मानवतेचे संरक्षण होण्यासाठी हिंदुस्थानलाच काय पण साऱ्या जगाला बौद्ध धर्माची कास धरावी लागेल, यासाठी मी बौद्ध धर्माचे बायबल लिहिले आहे. ते लवकरच प्रसिद्ध होईल. ते वाचल्यावर बौद्ध धर्म स्वीकारावयाचा की नाही, हे तुमच्या हाती राहील. एकदा तुम्ही जो मार्ग चोखाळला तो तुमच्या लक्षात राहिला पाहिजे. बुद्धाचे एक देऊळ, मी मुंबईत बांधणार आहे. बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आपण प्रत्येकजण या मंगल प्रसंगी प्रतिज्ञा करूया.
🔹🔹🔹
संकलन – आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे
More Stories
स्वातंत्र्य, माणूसकी, समान हक्क मिळतील तेच स्वातंत्र्य – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सत्ता कोणाचीही असो अस्पृश्यांना दडपण्याचाच प्रयत्न होईल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
युद्धोत्तर हिंदुस्थानपुढे मोठमोठे प्रश्न उपस्थित होणार आहेत – डॉ. बाबासाहेब आंबेडकर