दांडारोड, वांद्रे, मुंबई येथील अस्पृश्यांच्या जाहीर सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले भाषण….
श्री. देवराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली दांडारोड वांद्रे, मुंबई येथे रविवार दिनांक १९ फेब्रुवारी १९३३ रोजी अस्पृश्यांची जाहीर सभा झाली. या सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जाहीर स्वागत करून, त्यांचा सन्मान करून त्यांच्या कार्यास मान्यता दर्शविण्याकरिता त्यांना पुष्पगुच्छ ठेवण्याचे रौप्यपात्र अर्पण करण्यात आले. डॉ. बाबासाहेबांचे या सभेतील सर्व भाषण अंतर्मुख दृष्टी ठेवून झाले. त्यामुळे अलिकडे समाजातील ज्या काही व्यक्ती तरुणांस हाती धरून समाजकार्य बिघडवीत आहेत त्यांचा नामनिर्देश करणे भाग पडले.
या सत्कार सभेत बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले,
ठाणे येथील बोर्डिंग व समता सैनिक दल या संबंधी ही मंडळी गैरसमज उत्पन्न करून समाजात दुहीचे बीज पेरण्याचे दुष्ट काम करीत आहेत. ही मंडळी म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून आपल्याच समाजातील आहेत. ती वयोवृद्ध असून मी व आपण सर्वजण त्यांना अद्याप मान देत असू. पण आज त्यांनी आपला अनुभव व आपली बुध्दी गहाण ठेविली आहेत. रा. संभाजी गायकवाड, रा. गोविंद रामजी आड्रेकर व रा. शिवराम गोपाळ जाधव यांनी या मंडळींचे पुढारीपण पत्करिले आहे. यांची बुध्दी वाढत्या वयाप्रमाणे वृद्धिंगत होण्याच्या ऐवजी ती कमी होऊ लागली आहे. आश्चर्य हे की, काही तरुण मंडळीही त्यांच्या नादी लागून आपल्या शक्तीचा, वेळेचा व वक्तृत्वाचा दुरूपयोग करीत आहेत. ही तरूण मंडळी तरी विचाराने वागून आपली सर्व शक्ती समाजात एकी वाढविण्याकरिता खर्च करतील अशी मला आशा आहे. ह्या लोकांचे आजचे कार्य म्हणजे माझ्या गैरहजेरीचा फायदा घेऊन सार्वजनिक कार्याचा नाश करणे एवढेच आहे.
त्यांचे आक्षेप माझ्या ऐकिवात आले ते, थोडक्यात असे आहेत–
१. ठाणे येथील बोर्डिंगमध्ये कोकणस्थ मुलांना प्रवेश मिळत नाही.
२. या बोर्डिंगवर रा. शिवराम गोपाळ जाधवाची सुपरिन्टेडेंन्ट म्हणून नेमणूक करावी.
३. सुभेदार सवादकर यांना सेना दलाचे सर्वाधिकारी का नेमले ?
४. आपल्या चळवळीत इतर जातींचा प्रवेश का ?
कोणाही समंजस माणसास पटेल की हे आक्षेप इतके क्षुद्र आहेत की, त्यांचा एखाद्या सार्वजनिक सभेत उल्लेख करावा लागणे ही दुर्दैवाची गोष्ट आहे. परंतु बारीक सारीक प्रश्नासही काही वेळा महत्त्व येते. पहिला आक्षेप म्हणजे केवळ थोतांड आहे. त्यात सत्याचा लवलेश नाही. मला कोकणस्थांशी प्रतारणा करण्याचे काहीच कारण नाही. मी स्वतः कोकण प्रांतातील असलो तरी माझेजवळ कोकणस्थ-देशस्थ हा भेदभाव नाही. एवढी मात्र गोष्ट खरी की, शिक्षण प्रसाराच्या दृष्टीने पाहता कोकणस्थ महार पाठीमागे आहेत व ते या प्रश्नाकडे लक्ष देतील तेवढे थोडेच आहे. दुसऱ्या आक्षेपाबद्दल इतकेच सांगावयाचे की ज्याने त्याने आपली योग्यता ओळखावी. रा. जाधवांनी आपली उपयुक्तता पटविली असती तर त्यांना दूर करण्याचे कारण पडले नसते. विद्यार्थ्यांचे वसतीगृह म्हणजे अडत्यामार्फत चालविण्याचे दुकान नव्हे. सुपरिन्टेडेंन्टने आपल्या आदर्शपूर्ण आचरणाने विद्यार्थ्यांस शिस्त घालून दिली पाहिजे. त्यांना केवळ शासन करणे हे काही त्यांचे एकच कार्य नव्हे. या अवश्य गोष्टी जाधवांच्या हातून घडत नाहीत हे दिसून आल्यानंतर संस्थेच्या हिताच्या दृष्टीने त्यांना दूर केल्याशिवाय मार्ग कोणता ? आणि या बोर्डिंगकरता सरकारी ग्रँट मिळते तेव्हा संस्था व्यवस्थीतशीर चालविली नाही तर सरकारला जाब द्यावा लागेल. यापुढे ठाणे व महाड येथील वसतिगृहे एका कमिटीमार्फत चालणार आहेत व त्या कमिटीचे सुभेदार सवादकर चेअरमन आहेत. तिसरा आरोप दला संबंधाचा. हे दल एकसुत्री झाल्याशिवाय सध्यातरी त्यास शिस्त येणार नाही. चौथा आक्षेप आपल्या चळवळीत ब्राह्मण, कायस्थ, भंडारी वगैरे जातीतील गृहस्थ का असावेत अशा प्रकारचा आहे. मी तुम्हाला या प्रश्नाला सरळ साधे थोडक्यात उत्तर देतो म्हणजे ते तुम्हाला सहज पटेल. तुम्ही आजारी पडलात म्हणजे डॉक्टरकडे जाता. त्या वेळेस तो महार नसला तर त्यास तुम्ही टाळता काय ? नाही. मग ही शंका तुमचे मनात का ? आजच्या प्रसंगी मला कटू शब्द उच्चारावे लागले याबद्दल मला अत्यंत वाईट वाटते; परंतु कटू कर्तव्य म्हणून तसे करणे मला जरूर पडले. असले प्रसंग न येऊ देणे हे तुमच्या हातात आहे.
🔹🔹🔹
इतके बोलून बाबासाहेबांनी आपले भाषण संपविले. नंतर अध्यक्षांनी समारोपादाखल एवढेच सांगितले की, इतःपर जर कोणी वावदूक गैरसमज पसरवीत आहे असे तुम्हास आढळून आले तर तुम्ही त्यास हात धरून तडक डॉ. बाबासाहेबांकडे घेऊन जा. म्हणजे तुमचा त्याने केलेला गैरसमज दूर होईल. सुभेदार सवादकर, श्री उपशाम, डी. व्ही. प्रधान, कमलाकांत चित्रे, शिवतरकर मास्तर वगैरे मंडळी सभेस हजर होती. त्यानंतर आलेल्या मंडळीस पुष्पहार अर्पण करण्यात आले व सभा बरखास्त झाली.
संकलन – आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे
More Stories
स्वातंत्र्य, माणूसकी, समान हक्क मिळतील तेच स्वातंत्र्य – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सत्ता कोणाचीही असो अस्पृश्यांना दडपण्याचाच प्रयत्न होईल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
युद्धोत्तर हिंदुस्थानपुढे मोठमोठे प्रश्न उपस्थित होणार आहेत – डॉ. बाबासाहेब आंबेडकर