November 5, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

भेदनीतीचा प्रयोग मी माझ्यावर होऊ दिला नाही – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

दलित समाज सेवा सैन्य, मद्रास प्रांतिक डिप्रेस्ड क्लासेस फेडरेशन, दी प्रेसिडेन्सी आदि, द्रवीड महाजन सभा आदि, आंध्र महासभा, अरूंधत्येय महासभा, केरळ डिप्रेस्ड क्लासेस असोसिएशन, लेबर युनियन व आणखी अनेक संस्थांमार्फत मानपत्रे अर्पण करून केलेल्या सत्कार समारंभात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उत्तरादाखल केलेले भाषण ….

दिनांक २८ फेब्रुवारी १९३२ रोजी दलित समाज सेवा सैन्य, मद्रास प्रांतिक डिप्रेस्ड क्लासेस फेडरेशन, दी प्रेसिडेन्सी आदि, द्रवीड महाजन सभा आदि, आंध्र महासभा, अरूंधत्येय महासभा, केरळ डिप्रेस्ड क्लासेस असोसिएशन, लेबर युनियन व आणखी अनेक संस्थांमार्फत मद्रास येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानपत्रे अर्पण करून त्यांचा अभूतपूर्व असा जाहीर सत्कार समारंभ झाला.

मुंबईच्या अस्पृश्य जनतेला मद्रासच्या अस्पृश्य जनतेने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे या जाहीर सभेत जे अपूर्व व अतूल उत्साहाने स्वागत केले त्याबद्दल कदाचित नवल वाटणार नाही. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी आपला विश्वास मुंबईच्या अस्पृश्य जनतेने अनेकवार व्यक्त केला आहे. असे असले तरी मद्रास येथे डॉ. आंबेडकरांचे जे प्रचंड स्वागत झाले तसले स्वागतप्रसंग मद्रास सारख्या शहरातही क्वचितच पाहावयास मिळतात. या दिवशीच्या सभेत अस्पृश्य समाजाचेच कमीत कमी दहा हजारावर लोक जमले होते. हजारो लोकांना जागा न मिळाल्यामुळे परत जावे लागले. अस्पृश्य समाजातील लोकांशिवाय ब्राह्मणेतर स्पृश्य हिंदूंचा, खिश्चन – मुसलमानादिकांचाही समुदाय मोठ्या संख्येने जमला होता.

शहरातील अस्पृश्य समाजापैकी सर्व जातींचे प्रमुख व कायदेकौन्सिलातील सर्व अस्पृश्य प्रतिनिधी तर हजर होतेच पण ‘ जस्टिस ‘ व मुसलमान पक्षातील प्रमुख पुढारीही स्वागतार्थ आले होते.

‘ डिप्रेस्ड क्लासेस सव्हिस आर्मि ‘ (दलित समाज सेवा सैन्य) संस्थेचे अध्यक्ष श्रीयुत सुंदरराव नायडू यांनी या सभेचे अध्यक्षस्थान भूषविले.

‘ पददलित जनतेचा निर्भय व खरा प्रतिनिधी ‘ या यथार्थ शब्दांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जमलेल्या जनतेला अध्यक्षांनी ओळख करून दिली व डॉ. आंबेडकरांनी अस्पृश्य जनतेच्या एकंदर मनोरचनेत केवढी अपूर्व व विलक्षण क्रांती घडवून आणली आहे व त्यांच्यातील माणुसकीला व आत्मसन्मानाला कसे जागविले आहे याचे थोडक्यात व मुद्देसूद वर्णन केले.

अध्यक्षांच्या या प्रास्ताविक भाषणानंतर दलित समाज सेवा सैन्य, मद्रास प्रांतिक डिप्रेस्ड क्लासेस फेडरेशन, दी प्रेसिडेन्सी आदि, द्रवीड महाजन सभा आदि, आंध्र महासभा, अरूंधत्येय महासभा, केरळ डिप्रेस्ड क्लासेस असोसिएशन, लेबर युनियन व आणखी अनेक संस्थांमार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानपत्रे व हारतुरे अर्पण करण्याचा समारंभ झाला.

या वरील सर्व संस्थांचे व जमलेल्या जनसमूहाचे आभार मानण्याकरता डॉ. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा उभे राहिले तेव्हा स्वागतदर्शक टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला.

या सत्कार समारंभात बोलताना डाॅ.बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले,
मद्रासच्या अस्पृश्य जनतेने व इतर मंडळींनी व्यक्त केलेल्या आपलेपणाबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आतापर्यंत अस्पृश्य समाजात आपल्या राजकीय हक्काबाबत एकवाक्यता होती व तिचा विलक्षण प्रभाव इतर समाजावर पडू शकला. रावबहादूर एम. सी. राजांनी एकाएकी व तसे काही कारण नसता या एकतेचा भंग केल्यामुळे आपला आधीच बिकट असलेला मार्ग अवघड झाला आहे. डॉ. मुंजेंच्या भेदनीतीला रावबहादूर राजा हे फार लवकर व अकल्पितपणे बळी पडले. रावबहादूर राजांनी जर थोडासा अधिक दम धरला असता व त्यांनी आधी जाहीर केल्याप्रमाणे नागपूरला सभा भरवून अस्पृश्य जनतेचे लोकमत अजमावून जर डॉ. मुंजेबरोबर करारनामा केला असता तर आपल्या समाजाकरता रा. ब. राजांना अधिक सवलती व अधिक लाभ संपादन करता आला असता. आज त्यांनी पांढरपेशा वर्गातील काही पुढाऱ्यांच्या व्यक्तिगत व शाब्दिक शाबासकीपेक्षा अधिक काही मिळविले नाही. डॉ. मुंजेंबरोबर माझीही वाटाघाटी अनेक वेळा झालेली आहे. त्यांच्याशी मी जरी ‘ पॅक्ट ‘ केलेला नाही तरी त्यांचा माझा काही खाजगी वैरभाव नाही. पण मी जाणतो आणि डॉ. मुंजेही ओळखून आहेत की, ते अस्पृश्यतेपुढे लाचार आहेत. भेद पाडणे ही सोपी गोष्ट त्यांना करता आली. कारण ती त्यांच्या हातची होती. पण स्पृश्य जनतेच्या मनोवृत्तीत बदल करणे त्यांच्या आटोक्याबाहेरचे आहे, हे मी जाणले व म्हणून त्यांच्या व्यक्तिगत भेदनीतीचा प्रयोग मी माझ्यावर होऊ दिला नाही. पण रावबहादूर राजांवर त्यांना सहज छाप टाकता आली. इतक्या सुलभपणे रावबहादूर राजांनी त्यांच्या आहारी जावयाला नको होते.

मी व्यक्तिशः संयुक्त मतदार संघ, सार्वत्रिक मतदानाचा हक्क व अस्पृश्यांकरता राखीव जागा असाव्यात या मताचा पुरस्कार आधीच केला होता. पण माझे हे मत दिसायला जरी ‘ राष्ट्रीय व व्यापक ‘ असले तरी अस्पृश्य जनतेला यापासून बिलकूल फायदा होणार नाही असे आपल्याच अनेक संस्थांनी मला बजावून सांगितले. मी नागपूरला संयुक्त मतदार संघाचा पुरस्कार करताच माझ्यावर रावबहादूर राजांनी केवढा गहजब उडविला होता हे आपल्यापैकी पुष्कळांच्या आजही चांगले ध्यानात असेल. अगदी परवापर्यंत स्वतंत्र मतदार संघाचा मी पुरस्कार करावा असा ससेमिरा माझ्यामागे रावबहादूर राजांचा व इतर प्रमुख पुढाऱ्यांचा एकसारखा लागलेला होता. अशा परिस्थितीत मी माझी व्यक्तिगत आवड-निवड बाजूला ठेवून अस्पृश्यांना जे पाहिजे त्याचा पुरस्कार केला यात वाईट काय केले ? शिवाय राऊंड टेबल परिषदेमध्ये कोणत्या परिस्थितीत आम्ही सापडलो होतो व तेथे अल्पसंख्यांकाचा जो एक करार झाला त्याला अस्पृश्यांच्या वतीने पाठिंबा देणे हे कसे युक्त व आवश्यक होते ही गोष्टही रावबहादूर राजांना अगदी पुरेपूर माहीत आहे व या कराराबद्दलची आपली संमती व संतोष व्यक्त करून मला परवापर्यंत त्यांनी याही बाबतीत पूर्ण पाठिंबा दिला होता. पण तेच आता या करारनाम्यालाही नावे ठेवीत आहेत. यात आता अपराध कोणाचा याचा निर्णय आपण जनतेनेच दिला पाहिजे व पुढाऱ्यांनी तो मानला पाहिजे.

अस्पृश्य समाज संघटित होईल व राजसत्तेची सूत्रे हाती धरील तेव्हाच त्यांची अस्पृश्यता नष्ट होईल. होता होईल तो आपल्या रक्तामासाच्या व आपल्या सुख-दुःखांची स्वानुभवाने जाणीव असणाऱ्या व्यक्तीवरच विश्वास ठेवा. इतरांच्या अघळपघळ आश्वासनांना व सुंदर सुंदर तत्त्वांना भुलून जाऊ नका. राजसत्ता हाती येण्यासाठी एकजुटीने, स्वावलंबनपूर्वक व स्वतःवर व स्वतःच्या संघ शक्तीवर विश्वास ठेवून तुम्ही जर कार्य कराल तर आज जे तुम्हाला तुच्छ लेखतात व वाटेल तसे झुलवितात ते तुमच्या पायावर उद्या लोटांगण घालू लागतील व तुमची सदिच्छा व मैत्री संपादण्याकरता तुम्ही इच्छाल ते न मागता देतील.

🔹🔹🔹

स्वामी सहजानंद यांनी अध्यक्षांचे व पाहुण्यांचे आभार मानल्यानंतर रात्री आठ वाजता सभेचा कार्यक्रम संपला.

संकलन – आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे