अपघातातून वाचल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यासाठी मुंबईत घेतलेल्या सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यानी केलेले भाषण….
डॉ. बाबासाहेब आंबेडकर अपघातातून वाचल्याबद्दल रविवार दिनांक ४ फेब्रुवारी १९४० रोजी माझगाव, मुंबई येथे त्यांचे अभिनंदन करण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते.
या अभिनंदन सभेत केलेल्या आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,
अध्यक्ष महाराज, भगिनी व बंधुजनहो,
अपघातातून वाचल्याबद्दल आपण माझे अभिनंदन केले याबद्दल मी आपला ऋणी आहे. माणसांनी फार जगावे अशा मताचा मी नाही. मनुष्य म्हातारा झाला, दांत पडले, हात पाय कापू लागले, म्हातारचळ लागला अशा स्थितीत जगण्यात काय अर्थ आहे ? जगण्यात हशील आहे तोवर जगावे असे कै. गडकरी सांगतात ते खोटे नाही. पण एक गोष्ट माझ्या मनाला लागून राहिली आहे. माझे कार्य अर्धवट राहिले आहे. त्या कामाचा पाया शुद्ध आहे, त्यात प्रामाणिकपणाही भरपूर आहे, मला चांगले सहकारी लाभले आहेत. हे कार्य अर्धवट स्थितीत आहे तोवर काही दिवस जगणे मला आवश्यक वाटते. मी वाचलो याचे खरे समाधान, तुम्हालाही त्यात समाधान वाटते यातच आहे. मी मुंबईत आल्यावर मला भेटावयास येणारे असंख्य लोक ढळढळा रडून माझ्यावर येऊन गेलेल्या संकटाबद्दल दुःख व्यक्त करताना पाहून मी वाचलो ते बरे झाले असे वाटते. आजच्या अभिनंदनाच्या सभेत खरे पाहू गेले तर जास्त काही बोलण्याची जरूर नाही. पण येथे जमलेल्या अफाट जनसमुदायास चालू परिस्थितीसंबंधी मी काही सांगितले नाही तर त्यांची निराशा होणारच. म्हणून आपल्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाबद्दल बोलणे मला प्राप्तच आहे.
गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेसने नवी दोन पत्रे ‘ पूर्णिमा ‘ व ‘ नवयुग ‘ ही खास माझ्यासाठी काढून माझा बहुमान केलेला आहे. त्यातील लेख वाचून दिवसभर काम करून दमल्या भागल्यावर माझी फार करमणूक होत असते. आपल्याबद्दल लोक सारखे लिहित राहतात. आपण नसतो तर त्यांचे जीवन अळणी झाले असते असे पाहून काँग्रेसला माझी मिठाइतकीच आवश्यकता आहे, याची मला जाणीव होते व मला स्वाभिमान वाटू लागतो. मी नसलो तर ही पत्रे कशी खपणार. माझी काळजी वाटून मला चिरंजीव होण्याचाही मोह होऊ लागला आहे. गावमामाने माझा फोटो छापला त्यावरून काय सिद्ध होते ? मी यापुढे संन्यास घेईल देखील, नाही कोणी म्हणावे ? एका पत्राने मी बैठकीस एक शेर भजी खातो असे लिहिले आहे. या नवयुगात भजी खाणे पाप झाले म्हणावयाचे. भजी खाण्याने कोणाच्याही शीलाला व इज्जतीला धोका नाही असा माझा समज आहे. अशा टीका वाचून मी हसतो. माझ्या बंधुंनीही हसावयास शिकावे असे माझे सांगणे आहे. टीका केली तरी वैमनस्य करू नये. मी टीका वाचून कसा हसतो, मलाही पण खमंग प्रतिटीका करता येण्याजोगी आहे याची साक्ष येथे हजर असलेले माझे मित्र नागरिक संपादक रा. चिटणीस देतीलच. दुसरेही काही माझे टीकाकार आहेतच. देशाच्या हितासाठी मी आपले वैयक्तिक हित सोडून देण्यास तयार आहे, पण अस्पृश्य समाजाचे हित सोडण्यास मात्र तयार नाही. कोणाला जात्यंधता वाटली तर खुशाल वाटो.(उपलब्ध अंकातील पुढील बारा ओळी अस्पष्ट आहेत.) त्यांच्या हिताला मात्र मी कधीही विसरणार नाही. अस्पृश्यांचा प्रश्न हा निव्वळ मजुरांचा किंवा शेतकऱ्यांचा प्रश्न नाही. गिरण्यातील कापड खात्यात अस्पृश्याने काम करण्याआड मजूरच येत असतात. काँग्रेसच्या कुळकायद्यानेही अस्पृश्य शेतकऱ्यांचा फायदा होणे शक्य नाही. कारण त्यांच्याजवळ जमीनीच नाहीत. मग बिन जमिनीच्या अस्पृश्य शेतकऱ्यांचे हित कुळकायदा कसे साधणार ? अस्पृश्य हा शेतकरी व मजूर आहे. पण प्रत्येक शेतकरी व मजूर हा काही अस्पृश्य नाही, ही गोष्ट उघड आहे.
अस्पृश्य मजूर डांगे, निमकरांच्या झेंड्याखाली का एकत्र होत नाहीत ? आपल्या निराळ्या युनियन्स का काढतात याचे खरे कारण म्हणजे सगळे मजूर सारखे नाहीत हेच होय. मजूर व शेतकरी हेही जातीभेदाने पछाडले असून त्यातील स्पृश्य मजूर व शेतकरी यांना अस्पृश्य मजूर व शेतकरी यांची हेटाळणी करण्यास दिक्कत वाटत नाही. स्वतंत्र मजूर पक्ष हा अस्पृश्यांचा प्रश्न कधीही सोडणार नाही. मी महार आहे, अस्पृश्य आहे. स्पृश्य लोक दगडा-धोंड्यांना, झाडा-झुडपांना, पशु-पक्षांना व साप- विंचवांनाही देव मानतील पण त्यांना अस्पृश्य पुढारी कसा मानवणार ? बहुसंख्य मजूर व शेतकरी हे स्पृश्यच आहेत ही गोष्ट चालू परिस्थितीत विसरून भागणार नाही.
आमच्या पक्षाचे काय संघ नाहीत ? का रा. प्रधान व रा. मडकेबुवा यांजसारखे कामगार पुढारी आमच्याजवळ नाहीत ? आमच्या पक्षात काय कमी आहे ? पण आम्ही सनातनी नाही. आमचा पक्ष अस्पृश्यांचा पक्ष. मग स्पृश्यांना त्याचा विटाळ कसा होणार नाही ?
आमचे मडकेबुवा हे महार पडले. भाई, संघ, लढाऊ धोरण इतक्यापुरतीच त्यांना माहिती असणार. त्यांना बुरझ्वा, प्रॉलिटॅरिएट, टेम्पो वगैरे जडजंबाळ शब्द कसे पेलणार ? हे शब्द नाहीत तर मडकेबुवा कामगार पुढारी कसे होणार ? पण ते खरे पुढारी आहेत. म्युनिसीपालिटीतील कामगारांना विचारा, रेल्वेच्या पोर्टरांना विचारा. ते सर्व मडकेबुवा हेच आमचे खरे कामगार पुढारी आहेत असे एक आवाजाने सांगतील. चेंबूर येथील कचरापट्टीत काम करणाऱ्या मजुरांचा व इतर म्यु. कामगारांचा त्यांनी एका फटक्यासरशी लाखो रुपयांनी पगार वाढवून दिला. असे हे पुढारी आमच्या पक्षात आहेत. पण नावडतीचे मीठ अळणीच. त्याला कोण काय करणार ?
काही लोक मला मानतात तेवढ्यातच मी संतुष्ट आहे. तत्त्व सोडून मला काँग्रेसचे पुढारी, मजुरांचे पुढारी, शेतकऱ्यांचे पुढारी होण्याचा काहीच हव्यास नाही. (उपलब्ध अंकातील पुढील बावीस ओळी अस्पष्ट आहेत.)
काँग्रेसने आपल्यातून फोडलेले रा. ब. राजा, रा. देवरुखकर व राजभोज हे आपणात परत आले आहेत ही आनंदाची गोष्ट होय. इतर चुकलेली वासरेही परत येणारच अशी माझी खात्री आहे. आपल्यातील मधाच्या लालचीने बारगळलेल्या तरुणांना मी असे विचारतो की, कोणाच्या चळवळीने तुम्हास चाकऱ्या मिळतात याचा विचार करा व आपला मूर्खपणा सोडून द्या. सेक्रेटरिएट मध्ये शिपाई ठेवण्याबद्दल माझे गव्हर्नरशी सन् १९२६ साली पहिले भांडण झाले. त्याची मला चांगलीच आठवण आहे. आज स्वतंत्र मजूर पक्षाने आपल्या समाजास सावलीची जागा निर्माण करून दिली आहे. आपली संघटना करून व सतत चळवळ चालू ठेवून या सावलीचा विस्तार करावयास विसरू नका, एवढेच शेवटी माझे तुम्हाला सांगणे आहे. सावली देणाऱ्या झाडावर कुऱ्हाड चालविणे हे आत्मघातकीपणाच होणार नाही काय ?
🔹🔹🔹
संकलन – आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे
More Stories
स्वातंत्र्य, माणूसकी, समान हक्क मिळतील तेच स्वातंत्र्य – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सत्ता कोणाचीही असो अस्पृश्यांना दडपण्याचाच प्रयत्न होईल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
युद्धोत्तर हिंदुस्थानपुढे मोठमोठे प्रश्न उपस्थित होणार आहेत – डॉ. बाबासाहेब आंबेडकर