February 23, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

हिंदू समाजाने आपली शक्ती सामाजिक सुधारणेसाठी प्रामाणिकपणे खर्च करावी – डाॅ. बाबासाहेब आंबेडकर

विलायतेला ‘ व्हाईट पेपर ‘ बद्दल विचारविनिमय करून या ‘ व्हाईट पेपर ‘ च्या योजनांचा फोलपणा ब्रिटिश जनतेच्या निदर्शनास आणण्यासाठी एक प्रचारक मंडळ नेमण्याकरिता घेण्यात आलेल्या हिंदू पुढाऱ्यांच्या सभेत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले भाषण….

डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्यांचे खरे प्रतिनिधी नाहीत, अशी ओरड करणाऱ्या हिंदू सभावाल्यांना डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सहकार्याशिवाय विधायक अशी काहीच कामगिरी करता येणे शक्य नसल्यामुळे सन् १९३३ च्या जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात (सभेचे स्थळ आणि तारीख उपलब्ध होऊ शकली नाही.) विलायतेला ‘ व्हाईट पेपर ‘ बद्दल विचारविनिमय करून या ‘व्हाईट पेपर’ च्या योजनांचा फोलपणा ब्रिटिश जनतेच्या निदर्शनास आणण्यासाठी एक प्रचारक मंडळ नेमण्याकरिता हिंदू पुढाऱ्यांची सभा घेण्यात आली होती. या सभेत डॉ. गौर, डॉ. आंबेडकर, डॉ. मुंजे, सच्चिदानंदसिंह व पं. नानकचंद वगैरे मंडळींची भाषणे झाली. सर्वांची भाषणे निमूटपणे ऐकून घेतल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाषण करावयास उभे राहिले.

डॉ. आंबेडकरसाहेब भाषण करावयास उभे राहताच आता हे काय बोलतात इकडे सर्व पुढाऱ्यांचे आतुरतेने लक्ष वेधले होते. डॉ. मुंजे तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या पक्षात सामील करून घेण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होतेच.

विलायतेला ‘ व्हाईट पेपर ‘ बद्दल विचारविनिमय करून या ‘ व्हाईट पेपर ‘ च्या योजनांचा फोलपणा ब्रिटिश जनतेच्या निदर्शनास आणण्यासाठी एक प्रचारक मंडळ नेमण्याकरिता घेण्यात आलेल्या हिंदू पुढाऱ्यांच्या या सभेत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या भाषणाचा मतितार्थ असा :—
हिंदुस्थानात आज अस्तित्वात असलेल्या अस्पृश्य वर्गाला स्वतःच्या सर्वागीण उन्नतीसाठी स्वतंत्र मतदार संघाची मागणी करण्यास सर्वस्वी हिंदू समाजच कारणीभूत आहे. आजची हिंदू समाजातील एकंदर परिस्थिती सूक्ष्म रीतीने अवलोकन केल्यास अस्पृश्य समाजाला आपले स्वातंत्र्य संयुक्त मतदार संघातून कधीही मिळविता येणे शक्य नाही आणि ही परिस्थिती उघड्या डोळ्यांनी पाहिल्यावर ज्याचा स्वाभिमान जागृत झालेला आहे, ज्याला स्वावलंबनाचे महत्त्व कळले आहे अशा कोणाही मनुष्याला स्वतंत्र मतदारसंघाची मागणी करणे केवळ नाइलाजास्तव भाग पडले. हिंदू पुढाऱ्यांनी अस्पृश्य समाजाला स्वतःच्या स्वार्थाशिवाय आपल्या विश्वासात कधी घेतले नाही. मुसलमानांच्या राजकीय हक्कांचा प्रश्न उपस्थित होताच स्पृश्य हिंदूंचे धाबे दणाणले व त्यांना अस्पृश्यांविषयी वरपांगी पान्हा फुटला इतकेच. तेव्हा माझी माझ्या हिंदू पुढाऱ्यांना इतकीच विनंती आहे की, हिन्दू समाजाने कृतीने अस्पृश्य समाजाचा विश्वास संपादन करावा व मुसलमानांबरोबर व्यर्थ भांडण्यात आपल्या वेळेचा व शक्तीचा व्यय करू नये. ही सारी शक्ती आपल्या समाजाच्या सामाजिक सुधारणेकडे प्रामाणिकपणाने खर्च करावी. अशारीतीने जर हिंदू समाज आपला पुढील कार्यक्रम आखील तरच अस्पृश्य समाजाला हिंदू समाजाशी सहकार्य करून कार्य करण्याची उमेद प्राप्त होईल.

🔹🔹🔹

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भाषणानंतर डॉ. मुंजे यांचे भाषण झाले. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरसाहेबांच्या भाषणाची संधी साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना हिंदू महासभेचे अध्यक्ष होण्याची विनंती केली, परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर असल्या आमिषाला निष्कारण बळी पडणारे नाहीत ही गोष्ट डॉ. मुंजे यांनाही पक्की ठाऊक होती. म. गांधींशी सुध्दा कोणताही करार करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या लौकिकाला व मानापमानाला महत्त्व दिलेले नाही. आपल्या समाजाच्या सर्वांगीण हिताला जे पोषक होईल तेच कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर आयुष्यभर करीत आलेले आहेत, ही एकच गोष्ट हिंदू महासभावाल्यांनी लक्षात ठेवावी.

***

संकलन – आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे