पुण्याच्या तहनाम्यानंतर मुंबई येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले मार्गदर्शनपर भाषण….
पुण्याच्या तहनाम्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण ऐकण्यास अखिल अस्पृश्य समाज अत्यंत आतुर झाला होता आणि अशी संधी केव्हा प्राप्त होईल म्हणून तो मोठ्या उत्सुकतेने वाट पाहात होता. वरळी, मुंबई येथील रा. सावंत वगैरे काही तरुण मंडळीनी बुधवार, दिनांक २८ सप्टेंबर १९३२ रोजी रात्रौ श्री. देवराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली एक जाहीर सभा बोलावून ही संधी मुंबईकरांना दिली. दिनांक २८ सप्टेंबर १९३२ रोजी रात्रौ १० वाजता सभेचे नियोजित अध्यक्ष श्री. देवराव नाईक व इतर मंडळी समवेत डाॅ.बाबासाहेब आंबेडकर वरळी, बी. डी. डी. चाळीजवळील मैदानात पोचले. त्यानंतर लगेचच सभेच्या कामास सुरवात झाली. या सभेला जवळजवळ पंधरा हजारांचा जनसमुदाय हजर होता.
योग्य प्रकारे अध्यक्षांची निवड झाल्यावर अध्यक्ष श्री. देवराव नाईक यांचे प्रास्ताविक भाषण झाले.
सभाध्यक्ष श्री. देवराव नाईक यांनी आपल्या प्रस्ताविक भाषणात सांगितले की,
म. गांधींच्या घोर प्रतिज्ञेमुळे सबंध हिंदुस्थान देश हादरून गेला होता व त्यांच्या प्रतिज्ञेचे स्वरूप इतके भयंकर होते की, अस्पृश्यांचे पुढारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म. गांधींच्या म्हणण्यास रुकार दिल्याशिवाय त्यांचे जीवित सुरक्षित नव्हते आणि तशी संमती देणे म्हणजे इतक्या परिश्रमाने अस्पृश्यांना जे काही स्वसंरक्षणार्थ मिळाले होते त्याच्यावर तिलांजली सोडणे होय आणि अनुमती न देणे म्हणजे महात्माजींचे प्राण गमविण्याची जबाबदारी घेणे होय. अशा विलक्षण परिस्थितीत अस्पृश्य समाज व विशेषतः स्वतः डॉ. बाबासाहेब हे सापडले होते. पण अस्पृश्यांच्या सुदैवाने ते या भयंकर दिव्यातून सुखरूप तावून, सुलाखून या दोन्ही गोष्टी साधून बाहेर पडले आणि हा सुयोग एक प्रकारे पददलित वर्गाच्या उज्वल भविष्यकाळाचे शुभ चिन्हच होय. आज अस्पृश्य वर्गास इतिहासात पूर्वी कधीही न मिळालेले असे हक्क प्राप्त झाले आहेत ही गोष्ट खरी. पण आज हिंदू समाजात वावरत असलेली अस्पृश्यता नष्ट झाली म्हणजे त्या हक्काचे सार्थक झाले अशी भ्रामक कल्पना मनात न बाळगता, सर्व अस्पृश्य समाज, हिंदू समाजातील विषमतेस मूठमाती देऊन पूर्ण समानतेच्या भक्कम पायावर स्थिर झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी ग्वाही अखिल हिंदू समाजास त्याने आजच्या आज द्यावी. अध्यक्षांनी आपले भाषण संपविण्यापूर्वी एक प्रतिज्ञा केली की, ‘ आजपासून चार महिन्याच्या आत जनता पत्राचे पाच हजार वर्गणीदार झाल्याशिवाय आपण संपादकाची जागा स्वीकारणार नाही. ‘
सभाध्यक्ष श्री. देवराव नाईक यांच्या भाषणानंतर टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात डाॅ. बाबासाहेब बोलावयास उठले.
पुण्याच्या तहनाम्यानंतर मुंबईत भरविलेल्या जाहीर सभेत केलेल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,
आठ दिवसांपूर्वी अस्पृश्य समाजावर कोणत्या प्रकारचे संकट आले होते त्याचा खुलासा अध्यक्षांनी आपल्या भाषणात केलाच आहे. त्या संकटातून अस्पृश्य समाज बाहेर पडला इतकेच नव्हे तर या संकटामुळे शक्तिहीन न होता तो आज अधिकच बलवत्तर झाला आहे.
राऊंड टेबल कॉन्फरन्सच्या पहिल्या अधिवेशनाच्या वेळी आपण अस्पृश्यांकरिता काही खास मागण्या केल्या होत्या त्या सर्वास विदितच आहेत. दुसऱ्या अधिवेशनात ज्या वेळेस अस्पृश्यांच्या मागण्यांचा प्रश्न निघाला त्या वेळेस सर्व हिंदू प्रतिनिधींनी व खुद्द म. गांधींनी देखील त्या मागण्यास कसून विरोध केला व अस्पृश्यांस संरक्षणासाठी काही सवलती मिळतील असा रंग दिसेना. पददलितांसारख्या सर्व बाजूने नडलेल्या, आर्थिकदृष्ट्या पंगू झालेल्या, धार्मिकदृष्ट्या कमकुवत बनलेल्या, सामाजिकदृष्ट्या कस्पटाप्रमाणे लेखल्या गेलेल्या व राजकीयदृष्ट्या निर्माल्यवत् बनलेल्या अशा समाजास काही सवलती देण्यास जर हिंदू समाज तयार होत नाही तर भावी स्वराज्यात म्हणजे ज्या राज्यात राजकीय सत्तेचा बहुतांश वाटा हिंदुंच्या हातात जाणार त्या राज्यात त्या दुर्बल अस्पृश्य समाजाची काय गत होणार, ही मला मोठी शंका उत्पन्न झाली व मी सर्वांस स्पष्ट बजाविले की, जर भावी स्वराज्यात अस्पृश्य वर्गास जरूर असलेल्या सवलती मिळत नसतील, तर त्या स्वराज्यास अस्पृश्य समाज आपली संमती कदापि देणार नाही. दुसऱ्या अधिवेशनात अस्पृश्यांकरिता मी मागण्या सादर केल्या व त्या मुख्य प्रधानांजवळ रूजू केल्या. तरीपण मुख्य प्रधानांचा जो निवाडा जाहीर झाला त्यात मी मागितलेला स्वतंत्र मतदार संघ काही जागांकरिता आपल्यास देण्यात आला होता. आपल्या मागणीप्रमाणे जरी सर्व जागा आपल्यास मिळाल्या नव्हत्या तरी त्यात समाधान मानण्यास जागा होती व आता आपण पुढील कार्यास लागावे, अशा विचारात मी होतो. संकटाला तोंड देऊन अस्पृश्य समाजाकरिता थोडेबहुत कार्य आपल्या हातून झाले, याबद्दल मला थोडासा संतोष वाटत होता व जीव खाली पडला होता. फार कशाला वन्य पशूंच्या तावडीतून सुटून एखाद्या निवाऱ्याच्या ठिकाणी ज्याप्रमाणे एखादे हरीण स्वस्थचित्त होते त्याचप्रमाणे माझी मनःस्थिती झाली होती. इतक्यात म. गांधींची घोर प्रतिज्ञा कानी आली. अस्पृश्यांच्या सुदैवाने यावेळी मात्र अस्पृश्यांच्या मागण्यास महात्माजीचा विरोध न होता त्यांचा मला पुष्कळ वेळी उपयोग झाला. महात्माजींनी पुष्कळच मिळते घेतले व हिन्दू पुढाऱ्यांशी जो आपला तहनामा झाला त्यात अस्पृश्यांचा फायदाही झाला. पंजाब प्रांतात अस्पृश्यांना एकही जागा मिळाली नव्हती. तेथे त्यास ८ जागा मिळाल्या. शिवाय इतर प्रांतातील अधिक जागा मिळाल्या त्या वेगळ्याच. दुसरा फायदा मध्यवर्ती कायदे कौन्सिलात अस्पृश्यांच्या जागेचे प्रमाण शेकडा १८ ठरविण्यात आले, हा होय. या प्रश्नासंबंधाने मुख्य प्रधानांच्या निवाड्यात काही नामनिर्देश नव्हता. मुख्य प्रधानांच्या निवाड्यात अस्पृश्यास अत्यंत हानिकारक व धोक्याचे असे एक किल्मिष राहिले होते आणि त्या सर्व सवलती २० वर्षानंतर आपोआप नाहीशा व्हावयाच्या होत्या, हे होय. २० वर्षात काही इकडील दुनिया तिकडे होणार नव्हती व या अल्पावधित हजारो वर्षे चालत आलेले अन्याय नष्ट झाले नसते. तेव्हा सर्वसाधारण हिन्दू समाजाचा दृष्टिकोन बदलल्याशिवाय अस्पृश्यांस मिळालेल्या विशेष सवलती काढून घेणे म्हणजेच वाढीस लागलेल्या झाडाची अकाली खच्ची करणे होय. नवीन तहनाम्याप्रमाणे ही परिस्थिती बदललेली आहे. आता असे ठरले आहे की, हिंदू समाज व अस्पृश्य यांच्या परस्पर संमतीनेच या सवलती दूर होतील. हिंदू समाजाने आपल्या प्रत्यक्ष कृतीने अस्पृश्यांचा विश्वास संपादन केला तर या सवलती अस्पृश्य आपणहून सोडतील. नाही तर ही व्यवस्था चालू राहील. हे सर्व ठीक झाले. पण मिळालेल्या फायद्याचा तुम्ही जर योग्य तऱ्हेने उपयोग करून घेणार नाही तर आंधळ्यापुढे रत्न ठेवण्यासारखी तुमची स्थिती होईल. जे मिळाले आहे त्याचा तुम्ही योग्य उपयोग केला पाहिजे. तुम्हास किती सत्ता मिळाली आहे याची योग्य कल्पना येण्याकरिता स्वराज्यातील भावी मुंबई कायदे कौन्सिलाचे चित्र तुम्ही आपल्या डोळ्यासमोर आणा. २०० जागांपैकी कोणत्याही पक्षाकडे निदान ११५ जागा असल्याशिवाय त्यास राज्यकारभार चालविता येणार नाही. या प्रांतात सर्वात अधिक जागा हिंदूंच्या वाट्यास आल्या आहेत ; आणि त्या जवळ जवळ १०० आहेत. या शंभरांना तुमच्या १५ शिवाय राज्यकारभार हाकता येईल का ? मुसलमान वगैरे इतर लहान गटासंबंधी तर बोलावयासच नको. तेव्हा तुमच्या हातात अलौकिक शक्ती आली आहे तिचा उपयोग तुम्ही आपली आर्थिक उन्नती करून घेण्याकरिता केला पाहिजे. दुसरी एक महत्त्वाची व मननीय सूचना तुम्हास द्यावयाची आहे. आज जिकडे तिकडे तुमच्याकरिता देवालयाचे दरवाजे उघडण्याचा प्रयत्न चालू आहे. हा प्रयत्न करणाऱ्यांच्या शुद्ध हेतूबद्दल मला शंका नाही परंतु देवालयात जाण्यास मिळाले म्हणजे तुमचा उद्धार होत नाही, हे तुम्ही विसरता कामा नये. देवालयातील मूर्तीभोवती खेळणाऱ्या आध्यात्मिक भावनेपेक्षा पोटाची खळगी कशी भरतील याची विवंचना तुम्हाला अगोदर बाळगली पाहिजे. खाण्यास पुरेसे अन्न नाही, अंगभर वस्त्र नाही, शिक्षण घेण्याची सोय नाही, द्रव्याच्या अभावी औषध पाणी घेता येत नाही अशा दैन्यावस्थेत सापडलेला आपला समाज आहे. ही परिस्थिती पालटून आयुष्यातील आवश्यक असलेल्या सुखसोयी उपभोगण्यास मिळतील या ध्येयाने तुम्ही आपला पुढील कार्यक्रम आखला पाहिजे. मिळालेल्या राजकीय सत्तेचा उपयोग तुम्ही या दिशेने केला पाहिजे. देवालयात जाण्याचे मार्ग मोकळे झाले, केवळ अस्पृश्यता दूर झाली, म्हणून मिळालेले हक्क गमावणे उचित होणार नाही. आपली आजची दैन्यावस्था ही दैवदुर्विलासाचे फळ आहे, ह्या खुळचट व आत्मवंचक कल्पनेला अजिबात फाटा द्या आणि माझी अशी पक्की खात्री आहे की, या भोळसर कल्पनांना झुगारून देऊन आपल्यातील प्रत्येक इसम राजकारणाकडे नजर ठेऊन राजकीय सत्तेचा योग्य उपयोग करून घेईल तर आपल्या समाजाची दुःखे दूर झाल्याशिवाय राहणार नाहीत. एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट मात्र ही की, तुम्ही जे पुढारी निवडाल व ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवाल ते तुमचे खरे मार्गदर्शक होतील. तुमचे हित व ज्यांचे हित एक असेल व जे स्वार्थी नसतील असेच पुढारी तुम्ही निवडा. दुसऱ्या पक्षाच्या ओंजळीने पाणी पिणारे किंवा त्यांची भाडोत्री कामे करणारे लोक तुमची केवळ फाटाफूट करतील व दिशाभूल करतील. ते तुम्हास दगा दिल्याशिवाय राहणार नाहीत. तरी या नामधारी पुढाऱ्यांपासून तुम्ही दूर रहा. यापुढे आपल्याला पुष्कळ कामे करावयाची आहेत. आज स्थिर अशा आपल्याजवळ संस्था नाहीत. सर्व चळवळीचे केंद्रस्थान म्हणून एखादी स्वतंत्र जागा नाही किंवा हरएक काम करण्याकरिता माणसे नाहीत. या अडचणी दूर करण्याकरता २ लाख रुपयांचा निधी उभारण्याचा मी संकल्प केला आहे. वयात आलेल्या प्रत्येक स्त्री-पुरुषाने या फंडात भर घातली पाहिजे आणि मला खात्री आहे की, तुम्ही मनात आणाल तर एकट्या मुंबईमध्ये तुम्ही हा फंड उभारू शकाल. या कामास लवकरच सुरूवात होणार आहे व तुम्ही सर्वांनी एकदिलाने कंबर कसून या कामास हातभार लावला पाहिजे. तसेच तुम्ही जनता पत्राचा खप वाढविला पाहिजे. ते आपले मुखपत्र आहे. त्या पत्राद्वारे जनतेत स्फूर्ती उत्पन्न होणार आहे. तेव्हा ते पत्र स्वावलंबी करणे तुमचे कर्तव्य आहे.
🔹🔹🔹
डाॅ. बाबासाहेबांचे भाषण सुमारे एक तास झाले. जमलेली मंडळी बाबासाहेबांच्या भाषणातील प्रत्येक शब्द रत्नाप्रमाणे झेलीत होती. त्यानंतर अध्यक्षांचे, डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे व इतर मंडळीचे आभार मानण्यात आले व सभा बरखास्त झाली.
✍️ संकलन – आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे
More Stories
स्वातंत्र्य, माणूसकी, समान हक्क मिळतील तेच स्वातंत्र्य – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सत्ता कोणाचीही असो अस्पृश्यांना दडपण्याचाच प्रयत्न होईल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
युद्धोत्तर हिंदुस्थानपुढे मोठमोठे प्रश्न उपस्थित होणार आहेत – डॉ. बाबासाहेब आंबेडकर