December 24, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

 स्वातंत्र्य, माणूसकी, समान हक्क मिळतील तेच स्वातंत्र्य – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

दिनांक ६ जानेवारी १९३९ रोजी महाड येथे सात हजार शेतकऱ्यांच्या पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले निर्भिड व मननीय भाषण.

शेतकऱ्यांच्या पुढे केलेल्या आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,

प्रिय भगिनींनो व बंधुंनो,
मी नगर, खानदेश, निजामचे राज्य या बाजूला दौऱ्यावर गेलो होतो, नुकताच परत आलो. त्रास झाल्यामुळे चार दिवस विश्रांती घेण्याचा विचार केला होता. तरीसुद्धा माझ्यावर या सभेत बोलण्याची पाळी आलीच. मी काही फार वेळ बोलणार नाही, १०-१२ मिनिटे बोलेन. आज मी फक्त तीन मुद्यांवर बोलणार आहे. सात प्रांतात काँग्रेसचे राज्य आहे. बंगाल, पंजाब या प्रांतात इतर पक्षाला नेस्तनाबूद करून काँग्रेसचे राज्य स्थापण्याचा प्रयत्न चालू आहे. तीन-चतुर्थांश भागावर काँग्रेसचे राज्य आहे.

माझे एक मित्र थट्टेने म्हणाले, ” काँग्रेसने अधिकारसूत्रे घेऊन आज १८ महिने झाले. एखादी बाई १८ महिन्यात दोन वेळा बाळंत झाली असती. पण ही बाई अजून गरोदरही राहिली नाही ” हे अगदी बरोबर आहे. या काळातील जनतेच्या सुखासमाधानाच्या गोष्टींची कल्पना देणे गैर होणार नाही.

पहिला महत्त्वाचा प्रश्न हिंदू-मुसलमानांच्या ऐक्याचा प्रश्न आहे. स्वतंत्र मजूर पक्षाच्या सभेत हा प्रश्न निघत नाही. आपण फक्त पोटाचा प्रश्न विचारात घेतो. आधी पोटोबा मग विठोबा, असे आपण वागतो. परंतु इतर प्रश्नांचा उद्भव झाला की पोटाचा प्रश्नही बाजूला पडतो.

या देशात मुसलमान ८-९ कोटी आहेत. हे लोक मजुरी करणारे किंवा गुलाम नव्हेत. महाराष्ट्र सोडून हिंदुस्थानाच्या इतर भागावर औरंगजेब, अकबर वगैरे मुसलमान राजांची सत्ता होती. हिंदुस्थानच्या तीन-चतुर्थांश भागावर मुसलमानांची सत्ता होती. मुसलमानांची महत्त्वाकांक्षा राज्यसत्ता हस्तगत करण्याची आहे. हिंदुस्थानातील ९ कोटी मुसलमानांशीच आपला संबंध आहे, असे कोणी समजू नये. हिंदुस्थानाबाहेरील अफगाणिस्तान, इराक, पर्शिया,
[21:19, 06/01/2024] Marketing: तुर्कस्तान, इजिप्त येथे मुसलमानी सत्ता असून वेळ प्रसंगी ती त्यांच्या पाठीशी उभी आहे. मुसलमान म्हणतात, ‘ पुन्हा एकदा पानिपत होऊ द्या.’ तेव्हा हिंदू-मुसलमानात एकी होणे जरुर आहे. राजसत्ता ज्या काँग्रेसच्या हाती आहे तिच्यावर ही सारी जबाबदारी आहे, आमच्यावर नाही ! हिंदू-मुसलमान लढ्याबद्दल काँग्रेसने काय केले ? जाणूनबुजून काही केले नाही !

गेल्या पाच-सात दिवसात मुस्लिम लीगची सभा पाटणा येथे झाली. त्यातील भाषणांचा ध्वनी लक्षात घ्या. मुसलमान समाजाची घोषणा हिंदूंविरूद्ध सत्याग्रह करण्याची आहे ! पण हा मुसलमानांचा सत्याग्रह म्हणजे गांधींचा सत्याग्रह नव्हे ! ‘ हिंदुस्थान तोडून द्या ‘ हे मुसलमान बहुजन समाजाचे मागणे नाही. मुसलमानांचा दिवाण लीगचा असावा, असे त्यांचे म्हणणे आहे. काँग्रेसने काही प्रांतात मुसलमान दिवाण घेतले आहेत. मग मुंबईतच लीगचा मनुष्य का घेऊ नये ? नुरी ऐवजी देहलवीला का घेऊ नये ? आज ना. नुरी ५०० रुपये घेत आहेत ते सर देहलवी यांनी घेतले असते, यात काय बिघडले असते समजत नाही ! पुन्हा पानिपत करावयाचे आहे काय ?

दुसरा प्रश्न साम्राज्यशाहीस हाकून लावणे हा आहे. इंग्रजांचे साम्राज्य गेले तरी येथील गुजर, सावकार, खोत, गिरणीमालक जाणार नाहीत. ते तुमच्या रक्ताचे शोषण करणारच ! साम्राज्यशाही जावी अशी माझीही इच्छा आहे पण काँग्रेस काय करते ? मध्यवर्ती सरकार (फेडरेशन) अत्यंत किळसवाणे आहे. त्यात लुटारू, राजेरजवाड्यांच्या हातात आमची मानगूट देण्याचा ब्रिटीश सरकारचा प्रयत्न आहे. काँग्रेसच्या हाती सत्ता आहे. त्यामुळे हे नवे संकट टळू शकेल. पण काँग्रेस काय उपाययोजना करू इच्छिते ? इंग्रज सरकार हे फेडरेशन आमच्या माथी मारणार ! याला काँग्रेस पुढारी काय उपाय करणार ?

साम्राज्याचे कट्टर शत्रू काँग्रेसवाले फेडरेशनच्या विरूद्ध आहेत, अशी माझी मुळीच खात्री होत नाही ! एक मोठे काँग्रेस भक्त हवा खाण्याकरिता विलायतेस गेले होते. त्यांना कसला रोग झाला होता, मला माहित नाही ! या काँग्रेसच्या राजकारणातील बड्या झब्बूने इंग्रजाला आश्वासन दिले की, आम्ही फेडरेशनविरुद्ध कितीही ओरडलो, तरी ते आम्ही स्वीकारू. दे. भ. सुभाषबाबूंची फेडरेशनविरूद्ध घोषणा काँग्रेसपक्षाच्या मुखपत्रातून-गायमुखातून म्हणा वाटले तर- जाहीर झाली होती. दुसऱ्या बाजूला सत्यमूर्ति यांनी पत्रक जाहीर केले की, ‘ सुभाषबाबूंना

या विषयावर बोलण्याचा अधिकार नाही.’ सत्यमूर्तिंच्या या लिहिण्याचा काँग्रेस पुढाऱ्यांपैकी कोणी निषेध केला नाही ! यावरून कोठेतरी पाणी मुरते आहे, असे दिसते ! व्हाईसरॉयबरोबर एका गृहस्थाचा संवाद झाला तो असा :-

गृहस्थ : काँग्रेस फेडरेशन स्वीकारणार नाही.

व्हाईसरॉय : मग काय करणार ? तुम्ही कशावरून म्हणता ?

गृहस्थ : सुभाषबाबूंच्या धोरणावरून.

व्हाईसरॉय : सुभाषबाबूंची घोषणा आम्ही ऐकली आहे. पण तुमचा गांधी कुठे काय बोलतोय ? गांधींनी का मौन धरले आहे ?

महात्मा गांधींच्या या मुग्धतेत काहीतरी पाणी मुरत आहे. गांधी हिंदुस्थानला साम्राज्यशाहीचे गुलाम बनविणार आहे !

तिसरा प्रश्न आम्हाला स्वराज्य पाहिजे ते आमच्या स्वातंत्र्यासाठी पाहिजे ! सुखासाठी पाहिजे ! आम्हाला देशात पोटभर अन्न मिळत नाही, घर नाही, सुखसंपत्ती नाही ! ज्या राज्यात स्वातंत्र्य, माणुसकी वगैरे समान हक्क आम्हास मिळतील तेच स्वराज्य !

आमच्याकरिता काँग्रेसने काय केले ? निवडणुकीपूर्वी शिक्षण देऊ, शेतसारा कमी करू वगैरे आश्वासने दिली होती. पण त्याचे आता काय ? मुंबई इलाख्यात असेंब्लीत काँग्रेसचे बहुमत आहे. मग हाती सत्ता नाही, असे कसे म्हणता येईल ? पण काँग्रेसला तुमच्याकरिता काहीच करावयाचे नाही ! काँग्रेसचे स्वातंत्र्य कोठे आहे ? तुमच्या महाडात नुकतेच मुख्यप्रधान ना. बाळासाहेब खेर येऊन गेले. पण त्यांनी तुमच्याकरिता काही सांगितले का ? नाही ! कसे सांगणार ? त्यांना गांधींची आणि वल्लभभाईंची भीती वाटते. सध्या आपल्यावर गुजरात्यांचे राज्य आहे. वरिष्ठ सरकारकडून आलेल्या तीन कोटी जादा रकमेपैकी १ कोटी ९३ लक्ष म्हणजे जवळजवळ २ कोटी रुपये गुजरात प्रांतावर खर्ची पडले. मुंबई इलाख्याच्या तीन भागात महाराष्ट्र दरिद्री आहे. तेव्हा हे तीन कोटी रुपये गरीब महाराष्ट्राकरता खर्च व्हावयास पाहिजे होते. परंतु सर्वात श्रीमंत अशा गुजरात प्रांतावरच ते खर्च करण्यात आले ! रत्नागिरी, नगर वगैरे दुष्काळी जिल्ह्यांना त्याचा फार उपयोग झाला असता ! पण सध्या आपल्यावर गुजरात राज्य करीत आहे ! तीन गुजराती दळण दळतात आणि बाकीचे पीठ भरून भाकऱ्या भाजून गुजरातेत पाठवितात ! हे सारे दिवाण वल्लभभाईंच्या दारची कुत्री आहेत !

ना. खेरांना गुजरातेत एका समारंभाला बोलावून त्यांचा वल्लभभाईंनी भयंकर अपमान केला ! ” मुख्यप्रधान म्हणून आम्ही तुम्हाला बोलाविले नाही तर तुम्ही गांधींचे भक्त आहात म्हणून बोलाविले, नाही तर हाकलून लावले असते !” असे बोलून वल्लभभाईने एका महाराष्ट्रीयाचा भयंकर अपमान केला आहे ! आमच्या नामदार खेरांच्या या अपमानाचा सूड कोण घेणार ? त्याचा सूड मी घेईन. माझ्याविषयी असे उद्गार काढू दे की, त्या वल्लभभाईला मी जोड्यांनी मारीन ! त्यांच्या सभेत मी जातो. ताकत असेल तर त्यांनी माझ्या सभेत यावे.

एक-दोन महिन्यात खोती बील चर्चेला निघेल, पण ते बील पास होणार नाही. काँग्रेसचे राज्य उलथून पाडल्याशिवाय हे होणार नाही. स्वतंत्र मजूर पक्षाचे, शेतकरी कामकरी पक्षाचे राज्य झाल्याशिवाय हे होणार नाही. खोत बेकायदेशीरपणे कुळांना लुटतात, त्यांचा तुम्ही प्रतिकार केला पाहिजे. कबुलायतीचा फॉर्म स्वतंत्र मजूर पक्ष तयार करणार आहे, तो तयार झाल्यावर त्याप्रमाणे तुम्ही वागले पाहिजे, अन्यायाचा प्रतिकार केला पाहिजे. सर्व अधिकारीवर्ग खोतांच्या जातीचा आहे. त्यामुळे त्यांच्याकडून पक्षपात होत असता तुम्ही तुरुंगाची भीती बाळगू नका. तेथे घरच्यापेक्षा वाईट काहीच नाही. आम्ही तुमच्याबरोबर तुरुंगात येऊ पण तुमचा तुरुंगवास म्हणजे गांधींचा तुरुंगवास नव्हे. तो तुरुंगवास कसला ! तुरुंगात रोज त्यांना अत्यंत प्रिय असे शेळीचे दूध, फळे, अंजीर, मोसंबी वगैरेच्या करंड्याच्या करंड्या त्यांच्याकरिता तयार असत ! तुमचा तुरुंगवास यापेक्षा निराळा आहे.

डिस्ट्रिक्ट लोकल बोर्ड निवडणुका लढवा व आपली माणसे निवडून आणा. सत्तेच्या सर्व जागा काबीज करा.

🔷🔷🔷

✍️ संकलन – आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे