April 28, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

दुहीमुळे कार्यभाग साधत नाही – डाॅ. बाबासाहेब आंबेडकर

पुणे जिल्हा वतनदार महार परिषदेच्या दुसऱ्या अधिवेशनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले अध्यक्षीय भाषण….

घोडे मुक्कामी आगाऊ जाहीर झाल्याप्रमाणे रविवार दिनांक २२ मे १९३८ रोजी दुपारी ४ वाजता पुणे जिल्हा वतनदार महार परिषदेचे अधिवेशन दुसरे, अखिल भारतीय अस्पृश्यांचे एकमेव पुढारी परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. श्रोतृसमुदाय बराच मोठा जमला होता. डॉ. बाबासाहेब १००० मैलांचा प्रवास करून आमदार रा. रा. भोळे, के. रा. मधाळे, वयोवृद्ध पुढारी रेवजी दगडूजी डोळस यांच्याबरोबर आले. तसेच परिषदेस मुंबईहून अस्पृश्य समाजाच्या कल्याणासाठी अहर्निश झटणारे प्रमुख पुढारी रामभाऊ रावजी बोरीकर, मे. शंकर मोहनजी मिस्त्री, मे. गजाबा दुधावडे वगैरे मंडळी व पुण्याहून वि. बा. भालेराव, डी. सी. मिशन, गायकवाड मास्तर व वाल्हेकर मंडळी हजर होती. बरोबर ४.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्थानापन्न होऊन सभेस रीतसर सुरुवात झाली. मातंग समाजातील ना. स. व शं. स. काळोखे यांनी सुस्वागतपर मे. डॉ. बाबासाहेबांचे नावे गायन केले. नंतर स्वागताध्यक्ष केशव राणूजी शिशूपाळ, ग्राम पंचायत चेअरमन यांचे स्वागतपर भाषण होऊन जमलेल्या लोकांचे आभार मानण्यात आले. नंतर मे. सटबाजी लक्ष्मण, किसन महादेव काळोखे, मे. मारूती शेबाजी गायकवाड, विठ्ठल का. उपशाम, के. टी. भोसले, मे. मधाळे, मे. धोत्रे वगैरे मंडळींची परिणामकारक व कळकळीची भाषणे झाली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे टाळ्यांच्या गजरात बोलण्यास उभे राहिले त्यावेळी त्यांच्या जयजयकाराच्या घोषणा होत होत्या.

पुणे जिल्हा वतनदार महार परिषदेच्या दुसऱ्या अधिवेशनात केलेल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,                                                                                                                                        मी एक हजार मैलाचा प्रवास करून या परिषदेस हजर राहिलो. पुणे जिल्ह्याचे महार लोक हे सर्व जिल्ह्यांपेक्षा अगदी गबाळ आहेत. ते मृतमांस व खरकटे खातात, असे मी ऐकतो! यांच्यात कायमची दुही चालू आहे. दुहीच्या योगाने यांचे कोणतेही काम नीट होत नाही. हे धर्मवेडे आहेत. माझा देवाधर्मावर बिलकूल विश्वास नाही. देवाधर्माच्या खुळचट व वेडगळपणाविषयी एकदा मी माझ्या ” हिंदू ” मित्रांना शंकराच्या पिंडीविषयी माहिती विचारली. त्यांना ती सांगता आली नाही. शंकराची पिंडी काय आहे याचे येथे जास्त स्पष्टीकरण करता येत नाही. ते निव्वळ संभोगदृश्य आहे. या ठिकाणी धर्मश्रद्धाळू प्राण्यांनी वर्गणी गोळा करून एक दिवसाच्या यात्रेकरिता धर्मशाळा बांधणे हे केवळ स्वार्थ साधण्याचे उपाय आहेत. धर्मशाळेला १५० रुपये देऊ केलेत. तुम्ही दोनशे द्याल तर आम्ही तुम्हाला मते देऊ असे वाडे गटाचे म्हणणे होते. म्हणजे वाडे गटातील मंडळी किती नीच आहेत, हे लक्षात येते. जिल्हा बोर्डात एखाद्या दगडास उभा करून मानासाठी मोबदला मागणारा समाजाच्या नुकसानीस किती पात्र होतो याची तुम्हीच कल्पना करा. तेव्हा समाजाने अशांचा संबंध मुळीच ठेवू नये. जरी त्यांनी एखादा दगड मते देऊन निवडला तरी अखेर माझ्याशीच काम आहे. म्हणून स्वतंत्र मजूर पक्षातर्फे मी जे उभे केलेले उमेदवार श्री. केशव राणूजी शिशुपाळ व महादेव बाळाजी कोकणे यांनाच मते देऊन निवडून आणा म्हणजे मी तुमचा आभारी होईन. आजचे काँग्रेस सरकार मुंबई कायदे मंडळात असलेल्या अल्पसंख्यांक गटाचा मुळीच विचार न करता बहुमताच्या जोरावर धुडगूस घालीत आहे व त्यापासून शेतकरी, कामकरी व गरीब मजूर वर्गाची हानी होणार आहे.

महारवतन बिलाची माहिती दिल्यावर सदरहू बिलाला या परिषदेने अंतःकरणपूर्वक पाठिंबा दिला व सर्वानुमते ठराव पास झाला. पुणे जिल्हयात बोर्डिंगे उघडावी व सर्व पुणे जिल्ह्यातील मंडळीने ती उघडण्याचा प्रयत्न करावा असा ठराव पास केला व जीवदया संस्थेस पूर्ण पाठिंबा देण्यास मंडळीस सांगून भाषण संपविले.

🔹🔹🔹

नंतर जीवदया संस्थेचे ऑ. न. निजमुद्दीन साहेब यांनी जीवदया संस्थेला पाठिंबा दिल्याबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अंतःकरणपूर्वक आभार मानले. दरसाल चार आणे देऊन स्वतंत्र मजूर पक्षाचे सभासद होण्याचे ठरले. शेवटी करंदीकर मास्तर यांनी आभार मानल्यावर सभेचा कार्यक्रम समाप्त झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना चहापार्टी व हारतुरे देऊन त्यांचे स्वागत केले. नंतर डॉ. बाबासाहेब व त्यांच्याबरोबर आलेली मंडळी सुमारे ६ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयघोषात पुण्यास गेली.

⚫⚫⚫

संकलन – आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे