धुळे येथील जाहीर सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले भाषण….
कोर्टाच्या कामासाठी दिनांक १७ जून १९३८ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर धुळे येथे पोचले तेव्हा स्काऊट पधकांनी त्यांना सलामी दिली. यावेळी बरीच प्रमुख मंडळी हजर होती. बाबासाहेबांचा युक्तिवाद ऐकण्यास कोर्टात तुफान गर्दी झाली होती. अपील संपल्यानंतर वकील मंडळीच्या आग्रहावरून बाबासाहेबांनी कोर्टातील बार लायब्ररीला भेट दिली. तेथे काकासाहेब बर्वे यांच्यातर्फे चहापान झाले. नंतर सायंकाळी राजवाडे संशोधन मंदिराला डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी भेट दिली. यावेळेस तेथे तात्यासाहेब भट वकील, भाऊराव कुळकर्णी वकील, काकासाहेब बर्वे वकील, रा. उपाध्ये, खरटमल, श्री. जाधव, बोराळे वगैरे मंडळी हजर होती. बर्याच वादविवादानंतर पाठक शास्त्री जातीने हजर झाले.
म्यु. शाळा नं. ५ च्या आवारात रात्री जाहीर सभा घेण्यात आली. सभेला सुमारे ५-६ हजार मंडळींचा जमाव होता. तसेच स्त्री समूहही भरपूर होता. प्राणयज्ञ दल संस्थेची मंडळी आपल्या लाल पोषाखात हजर होती. डाॅ. बाबासाहेब सभेच्या ठिकाणी आल्याबरोबर टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. बाबासाहेबांच्या नावाच्या जयजयकाराने सर्व सभास्थान दुमदुमून गेले होते. श्री. यशवंतराव चिंतामण गायकवाड, सौ. कृष्णाबाई अहिरे, गोजाबाई बागले, अहिल्याबाई देवराव, कु. सावित्रीबाई सावंत, सौ. आनंदीबाई जाधव यांची यावेळी स्फुर्तिदायक भाषणे झाली. त्यानंतर पश्चिम खानदेशचे तरुण, उत्साही भावी पुढारी श्री. पुंडलिकराव तुकाराम बोराळे यांचे भाषण झाले. त्यानंतर निरनिराळ्या संघांतर्फे व महार सुशिक्षित स्त्री-पुरुषांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना सुमारे ४० हारतुरे अर्पण करण्यात आले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब टाळ्यांच्या गजरात भाषण करण्यास उभे राहिले.
याप्रसंगी बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले,
प्रिय भगिनींनो आणि बंधुनो,
या भागात बरेच दिवसांपासून येणे झाले नाही. मला निरनिराळ्या जिल्ह्यातील पत्रे आली आहेत. मध्यप्रांत, संयुक्त प्रांत, पंजाब वगैरे प्रांतातून अनेक लोकांची पत्रे आलेली आहेत. किंबहुना हिंदुस्थानातून मला बोलाविण्याविषयी पत्रे आलेली आहेत. सर्व हिंदुस्थानातून मला बोलाविण्याविषयी पत्रे येतात असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. हा देश किती अफाट आहे ! एकट्या माणसाने कितीसा कामाचा बोजा घ्यावा ? दुसरी गोष्ट माझी प्रकृती हल्ली बरी नाही. गेल्या दोन महिन्यात ३८ पौंड वजन कमी झाले आहे. तरीपण इतर भागांच्या मानाने या भागाकडे दुर्लक्ष झालेले आहे. याची भरपाई मी केव्हा तरी करीन इतकेच आश्वासन मी आज देऊ शकतो.
गेल्या दहा वर्षांपासून जे राजकारण व समाजकारण चालू आहे त्या चळवळीचा ओघ कोणत्या थराला जाईल याची मला भीती वाटते. एक गोष्ट मात्र खरी की राजकीय बाबतीमध्ये भीती बाळगण्याचे कारण नाही. डोकावून सुद्धा ज्यांची सावली लोक घेत नव्हते त्यांचीच १५ माणसे असेंब्लीत बसून अधिकाराने व हक्काने आपली गाऱ्हाणी सांगू शकतात. आज मुंबईच्या कायदे मंडळात काँग्रेससारखी प्रबळ संस्था आहे. एवढ्या मोठ्या संस्थेस स्वतंत्र मजूर पक्षाची भीती वाटते. (टाळ्या) ही गोष्ट अस्पृश्य समाजाच्या दृष्टीने काही कमी नाही. काँग्रेसमध्ये आज लाखो रुपये खर्च करणारे सावकार आहेत. शिक्षणामध्ये पारंगत झालेल्या ब्राह्मणांचा भरणा आहे. काही म्हटले तरी ४० वर्षांचा तिच्या पाठीमागे इतिहास आहे. स्वतंत्र मजूर पक्ष स्थापून अवघे एक वर्ष झाले आहे. तरी एका वर्षात कामगिरी इतकी मोठी झाली आहे की स्वतंत्र मजूर पक्षाचे नाव ठाऊक नाही असा एकही स्त्री-पुरुष आढळणार नाही. परंतु त्याची इतर पक्षास भीती वाटते हा राजकारणातील विलक्षण प्रकार आहे. मराठा अगर कुणबी यांना आपणाजवळ याचना करण्याची लाज वाटत होती ते लोक जाहीर रीतीने तिकीटावर उभे राहिले. स्वतंत्र मजूर पक्षात कायस्थ, मराठे वगैरे जातींचा समावेश आहे, ही गोष्ट हिंदुस्थानाच्या इतिहासात अपूर्व आहे. राजकारणातील आपली प्रगती ब्रह्मदेव जरी आड आला तरी थांबवू शकणार नाही. (टाळ्या) हा नदी नाला नाही, पण सिंधू नद आहे. धरण बांधले तरी फूटून जाईल. राजकारणातील हक्क मिळवून घेण्यास अडचण पडणार नाही. १५ माणसांनी काय केले ? काहीही झाले तरी ते आजच सांगणे कठीण आहे. आज २००० वर्षांपासून रूढी मानगुटीवर बसली आहे. तिला समूळ नाहीशी करण्यास १०-२० वर्षे देणे अन्यायाचे होईल. राजकारणात ऐक्य व संघटना जितकी जास्त तितकी लवकर प्रगती होते. या बाबतीत आपल्या समाजाविषयी मला अभिमान वाटतो. इलेक्शनच्या वेळी जो प्रामाणिकपणा, धैर्य व संघटना दाखविली त्याच्या इतका प्रामाणिकपणा, धैर्य व संघटना या प्रांतामध्ये इतर कोणत्याही जातीने दाखविली नाही. आपण दारिद्र्याने व्यापलेले, दुःखाने गांजलेले आहोत, याचा विचार तुम्ही त्यावेळी केला नाही. ज्याचे पोट उपाशी मरते, मारवाडी देईल ते खाईल, अशी ज्यांची स्थिती आहे त्या तुम्ही दाखविलेला प्रभाव प्रशंसनीय आहे. तुम्ही आम्ही खेड्यापाड्यांमध्ये विखरून राहिलेलो आहोत. आपली खेडयात फक्त ५-२५ घरे, इतरांची १०० च्या वरती घरे आहेत. ‘ अमुक एक करा नाही तर तुमची वस्ती हाकलून देऊ ‘ असे जर त्यांनी ठरविले तर ते सहज करू शकतील, अशी तुमची स्थिती होती.
आपल्या माणसांनी स्वतंत्र मजूर पक्ष बलवान केला पाहिजे. त्यांच्या सांगण्याच्या विरुद्ध काहीही जाता कामा नये. त्यात समाजाच्या हिताच्या दृष्टीने तुमचाच फायदा आहे. मला सांगण्यास आनंद वाटतो की काँग्रेसचे अध्वर्यू श्री. वल्लभभाई पटेल यांनी आपल्या शिस्तीचे असे वर्णन केले आहे, ‘ संघटना असावी तर डॉ. आंबेडकरांच्या संघटनेसारखी ! ‘(टाळ्या) तुम्ही या संघटनेमध्ये बिघाड होऊ देऊ नका. हंडाभर दूध नुसत्या मिठाच्या खड्याने नासते. पुष्कळसे अमृत विषाच्या नुसत्या थेंबाने बिघडते. त्याचप्रमाणे स्वार्थी, दुर्गुणी लोक आपला स्वार्थ साधण्यासाठी प्रवृत्त असतात. त्यांची स्वार्थाकडे विचारसरणी असते. अशी माणसे निर्माण होतील, हाच काळ कायम राहील, असे वाटत नाही. धान्य निवडताना खडा आपण फेकून टाकतो त्याप्रमाणे कंटक-स्वार्थी माणसाला खड्यासारखे निवडून टाकले पाहिजे. (टाळ्या) महार जातीत तरी कोणताही मनुष्य स्वतंत्र मजूर पक्षाच्या विरुद्ध निर्माण होऊ नये. राजकारणात संघटना व संघशक्ती केल्याखेरीज काही एक साधता यावयाचे नाही. संघ शक्ती निर्माण करण्याकरिता पैसा पाहिजे, घरामध्ये संसाराला पैसा लागतो. मीठ, मिरचीसाठी पैसा लागतो. पैशाशिवाय काही चालत नाही. त्याप्रमाणे सार्वजनिक कार्याला पैसा लागतो. काँग्रेसजवळ राजकारण खेळण्यासाठी पैसा आहे. मला असे कळले की नुकत्याच झालेल्या डिस्ट्रीक्ट लोकल इलेक्शनमध्ये एका काँग्रेसच्या उमेदवाराने ३००० रू. खर्च करुन यश मिळविले. पैशाशिवाय राजकारणाचा गाडा हाकता येत नाही. दुसऱ्याच्या अंकित न राहता स्वतःच्या पायावर आपण उभे राहण्यास शिकले पाहिजे. यावेळी मी आपणाला महाभारतातील एका गोष्टीची आठवण देतो. भीष्म आणि द्रोण कौरवांच्या बाजूला होते. कौरवांची बाजू खोटी व पांडवांची बाजू खरी, असे त्यांना माहीत होते. ‘ राज्यच काय पण सुईच्या अग्रावर मावेल इतकी मातीही पण मिळणार नाही ‘ असे कौरवांनी पांडवांना सांगितले होते. खरी खोटी बाजू न जाणता भीष्म आणि द्रोण कौरवांच्या बाजूने लढले. सत्याने युक्त अशा पांडवांच्या बाजूने का लढले नाहीत, असे विचारले असताना ‘ आम्ही कौरवांचे अन्न खातो ‘ म्हणून सांगितले. जो दुसऱ्याच्या मदतीवर जगतो अगर जिवंत राहतो तो दुसऱ्याचा गुलाम अगर अंकित झाल्याशिवाय राहणार नाही. मी काँग्रेसच्या हरिजन सेवक संघाचा फंड घेतला नाही. त्यांचे ८-१० लाख रुपये घेतले असते तर मी त्यांचा गुलाम म्हणून राहिलो असतो व मला तुमच्याकरता काही करता आले नसते. त्यांच्या हजारो रुपयांपेक्षा तुमची पावती मला लाखाची आहे. (टाळ्या) तुमचा संसार तुम्ही स्वतःच्या शिरावर घ्या. त्यात तुमचाच फायदा आहे. आपणास काँग्रेसचा पैसा नको. काँग्रेसचे प्रचारक दरमहा ३०-४० रुपये घेऊन काम करतात. आपले सेवक नुसते दरमहा १० रुपये घेऊन काम करण्यास तयार होतील. स्वतंत्र मजूर पक्ष तुमचा आहे. त्यास तुम्ही मजबूत केले पाहिजे.
मी २० वर्षांचा असताना बी. ए. झालो. मला २००० वर पगार सांगून आले आहेत. माझ्या बरोबरीचे मुलगे डिस्ट्रिक्ट जज्ज आहेत. यात मला काय फायदा आहे ? मोटारीतून हिंडतो. बॅरिस्टर म्हणून कोणता लाभ आहे ? तुम्ही पडला गरीब. तुमच्या तक्रारी थोड्याच माझ्याकडे येणार आहेत ! तंटे स्पृश्य वर्गाचे. तेच धनवान लोक ! मला पैसा मिळण्याचा संभवही त्याच लोकांकडून आहे. पण मी तुमच्या फायद्यासाठी त्यांच्याशी झगडतो. म्हणून त्यांना माझी भीती वाटते.
माझ्या पश्चात कोण माणसे किती जबाबदारीने काम करू शकतील ? माझी जबाबदारी कोण घेईल ? मला आशा आहे की काही जबाबदार तरुण निपजतील व ही जबाबदारी ते आपल्या शिरावर घेतील. नाही तर चढणीवर चढलेली गाडी डोंगराच्या माथ्यावर गेल्यानंतर बैलाच्या अभावी घसरून पडते तशी आपली स्थिती होईल. याबद्दल मला मोठी भीती आहे. आज आपण पर्वताच्या उतरणीवर आहोत, चढण चढू लागलो आहोत. आपला अंतिम हेतू अद्याप साधला नाही. यात्रेसाठी निघालो आहोत परंतु अजून देवाला पाहिले नाही. यात्रा संपेपर्यंत आपण सर्वांनी पीठ, मीठ वगैरे सामुग्री बरोबर घेऊन चालावयास पाहिजे. आज राजकारणाची भीती वाटत नाही. परंतु राजकारणाच्या धुळवडीमध्ये जो प्रश्न आम्ही हाती घ्यावयास पाहिजे तो प्रश्न मागे राहिला आहे. आपल्या स्वतःच्या दुष्कृत्यामुळे आपणास जनावराचीही किंमत नाही. कारण तुम्ही गावातील तुकडे मागून खाता व मेलेल्या जनावराचे मांस फाडून खाता. आज राजकारण लढविले तरी त्याचा काय उपयोग ? देऊळ बाहेरून मढविले तर त्याची काय शोभा ? तुम्ही मृतमास खाणे सोडून दिले तर कोण खाईल ? ते मेलेले जनावर गिधाड व कुत्रा खाईल. यात तुमची काय किंमत आहे ? त्याची तुम्हास लाज कशी नाही ? समजा उद्या जाधव मुख्यप्रधान झाला, ही काही अशक्य कोटीतली गोष्ट आहे असे नव्हे, तर त्याला स्पृश्य लोक मान देतील काय ? सध्याप्रमाणे ते आरती ओवाळतील काय ? जे जीवन तुम्ही आज व्यतीत करीत आहात ते जीवन तुम्ही बंद केले पाहिजे व स्वच्छतेने, नीटनेटके राहावयास पाहिजे.
” तुम्ही जर आमचे मृत मांस व तुकडे खाण्याचे बंद करता तर मग आम्ही काय खाणार ?” असा प्रश्न काही लोक विचारतात, त्यांना मला असे सांगावयाचे आहे की, समजा या जवळ असलेल्या चितोड गावच्या दोन मुली ते गाव सोडून मुंबईला गेल्या. त्यापैकी एकीने संसाराला फाटा दिला व वेश्येचा धंदा पत्करला. तिला घडीचा पलंग, तक्या, गाद्या, खुर्च्या, टेबल वगैरे आहे. एक नोकर आहे. इराण्याच्या दुकानावरुन ती मस्कास्लाईस, खिमा, रोटी माडीवरून मागविते. दिवसातून चार पितांबर नेसते, पावडर लावते. किती सुबक जीवन नाही ? दुसरी मुलगी ७ रुपये पगारावर काबाडकष्ट करते. नवऱ्याला एक किंवा दीड रुपया मिळेल त्याच्यावर गुजराण करते, कथलाच्या गोटाशिवाय तिजजवळ दुसरा दागिना नाही. मीठ भाकरी खाऊन कैक वेळा उपाशीही राहते. तेव्हा या दोन मुलींपैकी तुम्ही कोणत्या मुलीला मान द्याल ? देह विक्रय करुन पितांबर नेसते तिला की जी गरीबीने, दुःखाने गांजलेली व अन्नाला मौताज झाली तिला ? मला वाटते सर्व न्यायी माणसे पतिव्रता स्त्रीलाच मान देतील.
तेव्हा तुमची पोटाची खळगी भरो न भरो तुम्ही चांगल्या रीतीनेच वागावयास पाहिजे. स्वाभिमान, धैर्य, नीती काही आहे किंवा नाही ? आम्ही जे करतो ते बरे, वाईट, न्याय, इभ्रत याच्याकडे लक्ष देऊन आपण करतो किंवा नाही याकडे लक्ष दिले पाहिजे. तुम्ही येथून सभेतून गेल्यावर नवीन कार्यक्रमास सुरवात करावी. (स्त्रियांस उद्देशून) इतर स्त्रियांप्रमाणे तुम्हीही आहात. आम्ही तुमचे दूध पिऊन वाढलो आहोत. इतर स्त्रियांची मुले मामलेदार, हायकोर्ट जज्ज आहेत आणि तुमची मुले गुराखी आहेत. याचे कारण तुम्ही नरकात गुंतला आहात. हे तुमचे पाप आहे. तुमचे वर्तन असेच अशुद्ध राहिले तर तुमची मुले ही अशीच राहतील. ‘ नर करनी करे तो नर का नारायण बने. ‘ इतर स्त्रिया काही देवावतार नाहीत. त्याही स्त्रियाच आहेत, त्यांना वाव आहे. तुम्हाला वाव नाही. म्हणून तुम्ही सर्वांनी स्वाभिमानाने व धैर्याने वागावयास शिका. आपले अंतिम ध्येय गाठण्यासाठी कसोशीने प्रयत्न करा.
🔹🔹🔹
असे उपदेशपर दीड तास डॉ. बाबासाहेबांचे भाषण झाल्यावर श्री. पुनाजीराव लळिंगकर यांनी सर्वांचे आभार मानल्यावर सभा ” डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जय !” अशा गजरात बरखास्त झाली.
⚫⚫⚫
संकलन – आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे
More Stories
स्वातंत्र्य, माणूसकी, समान हक्क मिळतील तेच स्वातंत्र्य – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सत्ता कोणाचीही असो अस्पृश्यांना दडपण्याचाच प्रयत्न होईल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
युद्धोत्तर हिंदुस्थानपुढे मोठमोठे प्रश्न उपस्थित होणार आहेत – डॉ. बाबासाहेब आंबेडकर