लष्करात नावे नोंदविलेल्या महार बांधवांनी लष्करी थाटात केलेल्या स्वागत प्रसंगी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले भाषण….
नुकत्याच लष्करात नावे नोंदविलेल्या महार बांधवांनी दिनांक २८ जानेवारी १९४० रोजी रत्नागिरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे लष्करी थाटात स्वागत केले. त्याप्रसंगी बाबासाहेबांनी आपल्या छोट्या भाषणात सर्व मराठा स्पृश्य व अस्पृश्य बांधवांना धडाडीने सैन्यात शिरकाव करून घेण्याचा उपदेश केला.
नुकत्याच लष्करात नावे नोंदविलेल्या महार बांधवांनी लष्करी थाटात केलेल्या स्वागत प्रसंगी केलेल्या आपल्या भाषणात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,
हा सैनिकाचा व्यवसाय, आपल्यातील जाती वैमनस्यामुळे बंद पडला होता. एकेकाळी मुंबईतील सैन्यात तीन चतुर्थांश महार निवडले जात असत व त्यावेळी आपल्या पूर्वजांनी ब्रिटिश सरकारच्या बाजूने पुष्कळ लढायाही मारल्या होत्या. ज्या ठिकाणी पेशवे नामोहरम होऊन इंग्रजांनी आपली सत्ता स्थापिली तो इतिहासप्रसिद्ध कोरेगावचा रणसंग्राम आम्हीच लढविला होता.
सन् १८५७ सालच्या बंडानंतर इतर जातीही सैन्यात शिरल्या. त्यांच्या जातीय भावना दुखावू नयेत म्हणून इंग्रज सरकारने महारांची सैन्य भरती थांबविली व त्यांच्या इमानीपणाचे बक्षिस त्यांना दिले. पुन्हा आता आपल्यास सुवर्णसंधी आली असून तिचा लाभ घेऊन आपण वेळीच आपली पूर्वीची मानसन्मानाची जागा काबीज कराल अशी मला आशा आहे. अशी संधी वारंवार येत नसते. ही गोष्ट ध्यानात घेऊनच आपण आपले कर्तव्य बजाविले पाहिजे, असे माझे तुम्हास सांगणे आहे.
🔹🔹🔹
संकलन – आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे
More Stories
स्वातंत्र्य, माणूसकी, समान हक्क मिळतील तेच स्वातंत्र्य – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सत्ता कोणाचीही असो अस्पृश्यांना दडपण्याचाच प्रयत्न होईल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
युद्धोत्तर हिंदुस्थानपुढे मोठमोठे प्रश्न उपस्थित होणार आहेत – डॉ. बाबासाहेब आंबेडकर