November 5, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

विज्ञानाच्या आड चाले अंधाराची आरती..! – दत्तकुमार खंडागळे

परवाचा महाराष्ट्र भुषण पुरस्कार प्रदान सोहळा झाला. या प्रसंगी अनेक धर्माधिकारी भक्तांचा उष्माघाताने मृत्यू झाला तर काही भक्तांचा चेंगरून मृत्यू झाल्याची बातमी आहे. या चेंगराचेंगरीचा व्हीडीओ समोर आला आहे. सदरचे चित्र अतिशय भयंकर आहे. चेंगराचेंगरीत आणि उष्माघाताच्या तडाख्यात सामान्य जीव मरतात. हा एकूण प्रकार पाहता शाहीर संभाजी भगत यांचे बोल आठवल्याशिवाय रहात नाहीत. त्यांनी मांडलेले शब्द जसेच्या तसे या लोकांना लागू पडतात. सध्या जे चाललय त्याबद्दल त्यांनी नेमकेपणाने भाष्य केलय.
आले आले गारदी, उजेडाचे पारधी। विज्ञानाच्या आड चाले अंधाराची आरती। मानव्याच्या जागरी हे जागेपणी घोरती ।
भाषा भविष्याची अन भुतकाळ घोकती ।
जिर्ण स्तुती समशेरी हे वाटा नव्या रोखती।
होम-हवन, मनुवाद, यज्ञ-स्तवन, भजन-पुजन, धर्मखुळ उभे चुळ ।
मेंदूची घ्या काळजी ।। शाहीर संभाजी भगत यांचे
हे शब्द या प्रवृत्तीला चपखलपणे बसतात. त्यांनी भोळ्या-भाबड्या बहूजन समाजाला आवाहन करताना मेंदूची काळजी घ्यायला सांगितली आहे. पण आपल्याला मेंदू नावाचा अवयव आहे याचाच विसर पडलेला बहूजन समाज मेंदूची काळजी कधी घेणार ? त्याच्याकडून ही अपेेक्षा ठेवायची म्हणजे रेड्याच्या कासेत कासांडी घेवून दुध काढायला बसल्यासारखे होईल. लोकांच्या डोक्यात मेंदू असता तर अशी येड्याची जत्रा भरली नसती आणि उन्हाने होरपळून मेली नसती. इतके जीव गेले तरी या प्रसंगातून लोक शहाणे होतील असे वाटत नाही. तसे असते तर बलात्कार करणा-या व सदर आरोपात जेलची सजा भोगणा-या आसारामसाठी अजून मोर्चे निघाले नसते. हजारो लोकांनी अजून त्याला आपला भगवान मानले नसते. बलात्कारी आसारामला भगवान मानणा-या गाढवांची संख्या आजही खुप मोठी आहे. अशा स्थितीत लोक शहाणे होतील ही अपेक्षा ठेवणेच मुर्खपणाचे आहे. या लोकांना शहाणे करायला, जागे करायला जाणा-या लोकांचेच मुडदे पाडायला ही मंडळी मागे-पुढे पाहत नाहीत. आजवर ज्यांनी ज्यांनी हा प्रयत्न केला त्यांच्यासोबत हेच झाले. हा इतिहास आहे. संत कबीर, महात्मा बसवेश्वर, संत चोखामेळा, संत तुकाराम यांच्या पासूनचा हा प्रवास दाभोळकर-पानसरें अण्णांच्यापर्यंत येवून थांबतो. भटाळलेला समाज प्रबोधन करणारांच्याच जीवावर उठतो. ही मंडळी म्हणजे शाहीर संभाजी भगत म्हणतात तसे, उजेडाचे पारधी आणि अंधाराचे सारथी आहेत. समाजात जेवढा अधिक अंधार असेल तेवढा या लोकांचा धंदा तेजीत राहतो. त्यामुळे कुणी उजेड पेरायचा प्रयत्न केलाच तर त्याला जीवंत ठेवले जात नाही. डोक्यातला मेंदू नावाचा अवयव भट-भिक्षूकशाहीच्या नादाने कुंठीत झालेला समाज स्वत:हून या अजगरी विळख्यातून बाहेर पडत नाही. शरिराला पडलेला अजगराचा विळखा जसा करचून मारत नेतो तसा भारतीय समाजाला पडलेला भटशाहीचा व ब्राम्हण्यवादाचा विळखा समाजाला संपवतो आणि लुटतो आहे. त्याची स्वतंत्र माणूस म्हणून जगण्याची शक्यता संपुष्टात आणतो आहे. या बदमाशांनी आपल्या धार्मिक दुकानदारीसाठी बहूजन समाज असाच वेठीस धरला आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, “गुलामाला तो गुलाम असल्याची जाणिव करून द्या मग तो पेटून उठेल !” इथे ब्राम्हण्यशाहीत आकंठ बुडालेल्या येड्यांना स्वत:च्या दास्यत्वाचा बोध होत नाही आणि त्यांना करूनही घ्यायचा नाही. त्यांना तो बोध कधीच होवू नये यासाठीच त्यांच्या माथी दासबोधाची पारायण थापून त्यांचे दास्यत्व कायम ठेवण्याचा पाजीपणा केला जातो आहे.

समाजात अंधश्रध्देचा अंधार फार माजला आहे. लोक शिकून सवरून विचार करायला तयार नाहीत. मेंदूचा उपयोग करायला तयार नाहीत. बुवाबाजी आणि भोंदूगिरीचा मानसिक आजार मोठ्या प्रमाणात समाजात फोफावला आहे. एकवेळ गुप्तरोग परवडला पण हा भोंदूगिरीचा आणि बुवाबाजीचा मानसिक आजार फार भयंकर आहे. दिवसेंदिवस समाज या रोगाने ग्रस्त होताना दिसत आहे. ज्या महाराष्ट्राने देशाला पुरोगामी विचार दिला, जिथे महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखी दिग्गज माणसं जन्माला आली. ज्यांनी समाजात प्रबोधनाचे आभाळाएवढे काम केले, जिथे वैदिक धर्माला व भटशाहीला आव्हान देत समतेची पताका फडकवणारा वारकरी सांप्रदाय निर्माण झाला, ज्या वारकरी सांप्रदायाने व त्यातील संतांनी हे सगळं खुळ नाकारले, त्यावर कोरडे ओढले, त्या विरूध्द बंड केले त्या महाराष्ट्रात हे फोफावतय याचे वाईट वाटते. संत तुकारामांनी तर या प्रकारावर वीज कोसळावी तसे आपल्या गाथेतून प्रहार केलेले आहेत. पण संत तुकारामांना समजून कोण घेतो ? ते जीवंतपणी विमानात बसून वैकुंठाला गेल्याचा पाजीपणा आणि बदमाशी उत्सव म्हणून साजरा करतो हा समाज. अशा समाजाकडून काय अपेक्षा ठेवायच्या ?

धर्माधिकारी यांच्या पुरस्कार सोहळ्यात लोकांचे हकनाक जीव गेले. राज्यात जे सरकार आहे ते ही या गारद्यांचेच आहे. उजेडाच्या पारध्यांचे आणि गारद्यांचेच सरकार सत्तेत असेल तर वेगळ काय घडणार ? अशा गारद्यांचे सरकार जनतेला या घाणीतून बाहेर काढू शकत नाही. तशी मानसिकता असती तर फडणवीसांनी सर्व शिक्षा अभियानाला पाचशे कोटी आणि कुंभमेळ्याल्या अडीच हजार कोटी दिलेच नसते. महाराष्ट्रात असे अनेक बुवा-बाबा फोफावले आहेत. त्यांचे त्यांचे सांप्रदाय लोकांच्या गर्दीने फुलून जाताना दिसतात. या प्रत्येक बुवा-बाबाच्या दरबारात विज्ञानाचा आधार घेत अंधाराच्या आरत्या चालतात. विज्ञानाच्या सहाय्यानेच अंधाराचे साम्राज्य निर्माण करण्याचे षढयंत्र रचले जाते आहे. समाजाला चमत्काराच्या सोलकडी थापा सांगून अश्मयुगाकडे नेण्याचा प्रयत्न केला जातो. लोकांना विवेकनिष्ठ होवू दिले जात नाही. लोकांना विज्ञानवादी होवू दिले जात नाही. धर्माच्या आडून समाज नासवला जातो आहे. जोपर्यंत समाज जागा होत नाही, झोपेचे सोंग सोडत नाही तोवर असेच लोक मरत राहणार. या मरणाचं सोयरसुतक कुणालाही असणार नाही. गारद्यांना या लोकांच्या मरणाचे काय वाटणार आहे ? गुलाम मरतात तेव्हा मालकाच्या काळजात कळ येत नसते. असे दहा-वीस नव्हे हजारो लोक मेले तरी त्यांना काहीच फरक पडत नाही. जॉर्ज आरवेल यांनी त्यांच्या अँनिमल फॉर्म या पुस्तकात जी स्थिती मांडली आहे अगदी तसेच चित्र आजच्या भारतीय समाजाचे आहे. हा अंध व गतीमंद समाज अजून किती महापुरूष पचवून करप्या ढेकरा देतोय काय माहित ? बुवाबाजीच्या व भोंदूगिरीच्या बजबजपुरीतून बाहेर पडत कधी उमलेल का ? हा खरा प्रश्न आहे.

दत्तकुमार खंडागळे संपादक वज्रधारी, मो. 9561551006

Dutt Kumar Khandagale Editor Vajradhari, Mobile No :. 9561551006