November 5, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ग्रंथसंपदेचे होणार डिजिटायझेशन. इंदू मिल स्मारकाबाबतच्या दिरंगाईबद्दल खंत : किरीट सोलंकी, अध्यक्ष, केंद्रीय अनुसूचित जाती-जमाती आयोग

मुंबई – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ग्रंथसंपदेचे डिजिटायझेशन करण्यात येणार आहे. सिद्धार्थ महाविद्यालयाच्या वास्तूच्या मजबुतीकरणासाठी ४० कोटी रुपये खर्च येणार असून, त्याबाबत राज्याच्या सचिवांसोबत बैठक घेणार असल्याची माहिती केंद्रीय अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष डॉ. किरीट सोलंकी यांनी दिली.

आयोगाच्या सदस्यांनी सोमवारी (ता. २८) सिद्धार्थ महाविद्यालयाच्या बुद्ध भवन या इमारतीतील डॉ. आंबेडकर यांच्या ग्रंथालयाला भेट दिली.

फोर्टमधील पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सिद्धार्थ महाविद्यालयाच्या बुद्ध भवन आणि आनंद भवन या दोन इमारती आहेत. त्यापैकी बुद्ध भवनामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ग्रंथालय आहे. या ग्रंथालयात बाबासाहेबांनी खरेदी केलेले दुर्मीळ ग्रंथ आहेत.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनीघटना लिहिण्यापूर्वी ‘रिपब्लिकन’ या शब्दावर संशोधन केले होते. त्याचे हस्तलिखित या ठिकाणी आहे. भारतीय राज्यघटनेची मूळ प्रत बाबासाहेबांच्या सहीनिशी येथे जतन करण्यात आली आहे. ‘प्रॉब्लेम ऑफ रुपी’ या प्रबंधाची पहिली प्रत, महिलांविषयी त्यांनी लिहिलेला लेख, व्हायोलिन शिकत असताना नोटेशन, ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाची पहिली आवृत्ती असे दुर्मीळ साहित्य या ग्रंथालयात आहे.

या ठिकाणी गांधी, नेहरू यांच्याविषयीच्या ग्रंथांची स्वतंत्र दालने आहेत. इतिहास, संस्कृत, अर्थशास्त्र, विज्ञान, भारतीय स्वातंत्र्याविषयीचे ग्रंथ आहेत. मराठी साहित्य, नाटके अशी विपुल ग्रंथसंपदा बुद्ध भवनामध्ये जतन करण्यात आली आहे. याची पाहणी आयोगाच्या सदस्यांनी केली.

डॉ. सोलंकी यांच्या नेतृत्वाखालील आयोगाच्या सर्व सदस्यांचे स्वागत पीपल्स एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी या वेळी केले. प्राचार्य अशोक सुनाटकरी यांनी महाविद्यालयाच्या आगामी प्रकल्पांचे सादरीकरण केले.

इंदू मिल स्मारकाबाबतच्या दिरंगाईबद्दल खंत

दादर येथे इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यात येत आहे. मात्र, या स्मारकाच्या कामात दिरंगाई होत असल्याची खंत आयोगाचे अध्यक्ष डॉ. सोलंकी यांनी व्यक्त केली. सोमवारी चैत्यभूमीची पाहणी करून इंदू मिलच्या जागेवर जाऊन स्माकारच्या कामाची आयोगाच्या सदस्यांनी पाहणी केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची समृद्ध ग्रंथसंपदा पाहून आयोगाचे सदस्य प्रभावित झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ग्रंथसंपदेचे डिजिटायझेशन आणि सिद्धार्थ महाविद्यालयाची वास्तू हेरिटेज असल्याने त्याचे मजबुतीकरण यासाठी ४० कोटी रुपये खर्च येणार असून त्याबाबत राज्याच्या सचिवांसोबत बैठक घेणार आहोत.

– किरीट सोलंकी, अध्यक्ष, केंद्रीय अनुसूचित जाती-जमाती आयोग.