November 5, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

आपल्याला कमीपणा येईल असा पोषाख करु नका – डाॅ. बाबासाहेब आंबेडकर

मुंबई येथील ‘अस्पृश्य संघटना मंडळा ‘ तर्फे हीरक महोत्सवाच्या रूपाने इमारत फंडास १००१ रु. दिल्याकारणाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चेंबूर विभागाला भेट दिली. त्याप्रसंगी जमलेल्या अफाट जनसमुदायापुढे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले मार्गदर्शनपर भाषण …

चेंबूर, मुंबई येथील ‘अस्पृश्य संघटना मंडळा ‘ तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना हीरक महोत्सवाच्या रूपाने इमारत फंडास १००१ रु. दिले. त्यानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शुक्रवार दिनांक २९ मे १९५३ रोजी चेंबूर विभागाला भेट दिली. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या भेटीबद्दल हँडबिले काढली नसूनही त्या ठिकाणी स्त्री-पुरुषांचा अफाट जनसमुदाय जमला होता.
सदर प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भाषण केले. अस्पृश्यांनी वापरावयाचा पोषाख आणि दागदागिने याबाबत डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भाषणात मार्गदर्शन केले.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले,
भगिनींनो व बंधुंनो,
तुम्ही आतापर्यंत हे एक हजार एक रुपये धरून चार हजारावर रक्कम इमारत फंडाला दिली आहे, अशी माहिती माझे मित्र व शे. का. इंप्रूव्हमेंट ट्रस्टचे सेक्रेटरी श्री. उपशाम यांनी मला दिली आहे. तुमच्या वस्तीच्या मानाने ही रक्कम बरीच मोठी आहे. एवढी रक्कम तुम्ही दिल्याबद्दल मी समाधान व्यक्त करतो. तुम्ही जसे आपले कर्तव्य पार पाडले तसेच आपले सर्व लोक जर इमारत फंडाबद्दलचे आपले कर्तव्य पार पाडतील तर मुंबईतच हा फंड एक लाखावर जमेल व आपली इमारत टोलेजंग होईल अशी मला आशा वाटते.

अलिकडे आपल्या समाजातील तरुणांचा व तरुणींचा पोशाख मला आवडतो. नेहमी आपणाजवळ कमीतकमी दोन पोशाख पाहिजेत. आपण जो धंदा करतो त्यावेळी घालावयाचा एक पोषाख व धंदा संपल्यानंतर, शूचिर्भूत झाल्यानंतर घालावयाचा दुसरा पोषाख. मी पाहातो की आमचे काही लोक निरनिराळ्या ऑफिसात व कंपन्यात कामाला असतात. तेथे त्यांना खाकी युनिफॉर्म मिळतो. हा पोशाख त्यांनी कामापुरताच घालावा. घरी आल्यानंतर त्यांनी आपल्याला शोभेल असा पोशाख करावा. नोकरी-धंद्यातलाच पोशाख सभा, समारंभात किंवा लग्नकार्यासारख्या खाजगी प्रसंगी वापरणे बरे दिसत नाही.

आपल्या समाजातील स्त्री-पुरुषांच्या पोशाखात अलिकडे पुष्कळच चांगला बदल झाला आहे, याबद्दल मला समाधान वाटते. मात्र जुन्या बायांच्या पोशाखात अद्याप बदल व्हावयास पाहिजे. त्यांना झंपर, पोलकी असा नवा पोशाख वापरणे आवडत नसेल तर त्यांनी तो वापरू नये. मात्र चोळी-लुगडे असा जुनाच पोशाख वापरावयाचा असला तरी तो व्यवस्थित वापरावा. पोशाख भारी किंमतीचाच पाहिजे, असे माझे म्हणणे नाही. पोशाख साधा का असेना, पण तो व्यवस्थित पाहिजे. पेशवाईत कपडे वापरण्यावर व दागिने घालण्यावर आपल्या लोकांवर पुष्कळच निर्बंध होते. अस्पृश्यांनी मळके व फाटकेच कपडे वापरले पाहिजेत व चांदीचेच दागिने वापरले पाहिजेत, सोन्याचे दागिने वापरता कामा नयेत असा निर्बंध होता. परंतु ते निर्बंध आता नाहीत. तरीही आमच्या जुन्या बाया वेळा, तोडे, फुल्या, मासोळ्या व जोडवी हे चांदीचे अवजड व बोजड दागिनेच वापरतात. त्यांनी ते वापरण्याचे सोडून दिले पाहिजे. नाकाला भोक पाडून भली मोठी नथ नाकात अडकविणेही बरे दिसत नाही. आपल्या पोशाखावरून आपण अमुक एका जातीचे आहोत, असे ओळखता येता कामा नये. नाही तर काही वेळा मोठी पंचाईत होते.

मी कॉलेजला शिक्षण घेत असताना एकदा लग्नकार्यासाठी आम्हाला गावी जावे लागले. आमच्याबरोबर आमच्या आप्तांपैकी काही जुन्या वळणाच्याही बाया होत्या. मी, माझे बंधु व आमच्या कुटुंबातील मंडळीचा पोशाख व्यवस्थित होता. तेव्हा बंदरावर उतरल्याबरोबर हमाली करणाऱ्या कुळवाड्यांनी आमचे सामान उचलले व ते आमच्याबरोबर चालू लागले. अर्धी अधिक वाट चालून गेल्यावर त्यांच्या लक्षात आले की, आमच्याबरोबर चाललेल्या त्या जुन्या वळणाच्या बायांची व आमची जात एकच आहे. हे समजण्याचा अवकाश, त्यांनी आमचे सामान खाली ठेवले व हमाली न मागताच ते लोक पसार झाले. शेवटी आम्हाला दोन-चार खेपा करून ते सामान मुक्कामावर न्यावे लागले.

प्रत्येकाने आपल्या घरात दहा आणे किंमतीचा बुद्धाचा फोटो लावावा.

🔹🔹🔹

संकलन – आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे