विलायतेला जाण्यापूर्वी समता सैनिक दलाच्या सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले अध्यक्षीय भाषण….
नोव्हेंबर १९३६ मध्ये डाॅ. बाबासाहेब आंबेडकर विलायतेला गेले होते. त्यापूर्वी त्यांनी दिनांक ७ नोव्हेंबर १९३६ च्या जनता मध्ये जाहीर केल्यानुसार रविवार, दिनांक ८ नोव्हेंबर १९३६ रोजी सकाळी ९ वाजता दामोदर हॉल, परेल, मुंबई येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली समता सैनिक दलाची एक जाहीर सभा बोलाविली होती.
या सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाषण करावयास उभे राहिले तेव्हा टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला.
या सभेत केलेल्या आपल्या अध्यक्षीय भाषणात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर
म्हणाले,
मी उद्या काही जरूरीच्या कामकाजाकरिता विलायतेला जात आहे. माझ्या गैरहजेरीत आपणास फार मोठी जबाबदारीची कामगिरी बजावायची आहे. आपणास ठाऊक आहेच की, नवीन राज्यघटनेनुसार आपल्या अस्पृश्य समाजाला कायदे मंडळात १५ राखीव जागा मिळाल्या आहेत. त्या कायदे मंडळाची निवडणूक येत्या फेब्रुवारी महिन्यात होईल. आपणास मिळालेल्या या पंधरा जागा या इलाख्याच्या निरनिराळ्या जिल्ह्यात विभागल्या गेल्या आहेत. या जागांकरिता मी आपल्या स्वतंत्र मजूर पक्षातर्फे निरनिराळ्या ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. या निवडणुकी लढविण्यासाठी मी व माझ्या सहकारी मित्रमंडळींनी मिळून हा स्वतंत्र मजूर पक्ष का स्थापन केला याचा खुलासा प्रथम करतो. काँग्रेससारखी बलाढ्य व सुसंघटित संस्था या देशात असताना ही नवीन संस्था काढण्याची आवश्यकता का भासली याचे उत्तर अगदी सरळ आहे. काँग्रेसचे मुख्य ध्येय म्हटले म्हणजे स्वातंत्र्य. मला व माझ्या सहकाऱ्यांना हे ध्येय मान्य आहे, परंतु ते साध्य करणे म्हणजे साधीसुधी गोष्ट नव्हे. त्याला सत्याग्रहासारखे गांधीजींचे शस्त्र बोथट पडणारे आहे. कायदेभंगानेही सरकारकडून स्वातंत्र्य मिळविता येणे अशक्य कोटीतली -विशेषतः शक्तिबाहेरची- गोष्ट आहे, असे प्रत्येकाला वाटत आहे. असे असूनही आपण निष्फळ स्वातंत्र्याची वल्गना करण्यात काय अर्थ आहे ? जोपर्यंत खरेखुरे स्वातंत्र्य मिळविण्याची अंगी धमक नाही तोपर्यंत सनदशीर मार्गाने आपल्या ध्येयाचा मार्ग गाठणे अधिक हिताचे आहे, असे आमचे प्रामाणिक मत आहे. तशात हिंदुस्थान हे एक राष्ट्र नाही. या देशात निरनिराळ्या ४,००० जाती आहेत. या निरनिराळ्या जातींच्या बंडामुळे जातिभेद, प्रांतभेद, तंटे, बखेडे आणि धर्मभेदाचे गंभीर प्रसंग, यामुळे एकी होणे अशक्य आहे. हिंदू, मुसलमान व ख्रिस्ती यांचे एकच ध्येय नाही. समजा आजच्या परिस्थितीत इंग्रज सरकारचे छत्र नाहीसे झाले तर ज्यांना एकराष्ट्रीयत्वाचे ध्येय मान्य नाही, असे जात्याभिमानी आणि धर्माभिमानी लोक आपापसात झगडून स्वतःच्या हाती राजकीय सत्ता घेण्याचा प्रयत्न करतील.
दुसऱ्या बाजूनी विचार करता कॉंग्रेस व आमचा पक्ष यात पुढीलप्रमाणे भेद आहे. कॉंग्रेसला आजच्या नवीन सुधारणा अपुऱ्या वाटतात आणि यासाठी कायदे मंडळात जाऊन या सुधारणांच्या निषेधार्थ ती मंडळे मोडून टाकणे आवडते. परंतु आम्हाला या सुधारणा अपुऱ्या वाटत असूनही कायदे मंडळात जाऊन या सुधारणान्वये कार्य करून अधिकाराच्या बळावर अधिक हक्क मिळविण्याचा सतत प्रयत्न करणे आम्हाला आवडते. कायदे मंडळे मोडून पोरखेळ खेळत राहण्याचे आजचे दिवस राहिले नाहीत. खरे स्वातंत्र्य मिळविण्याची जी खरी शक्ती ती आपल्या हाती नसताना -तितकी अंगी धमक नसताना- स्वातंत्र्याचे हवेत मनोरे बांधणे शेवटी अपायकारक ठरतील. तशात कॉंग्रेस हे एक कडबोळे आहे. तिच्यात बेकार, मजूर, भांडवलवाले, सावकार, शेतकरी, कुळे, जमीनदार, लहान-मोठे व्यापारी, मध्यमवर्ग वगैरे परस्परविरोधी हितसंबंधांच्या लोकांची एक मोट आहे. थोडक्यात सांगावयाचे म्हणजे ही एक विळ्या-आवळ्यांची मोट आहे. रक्त शोषण करणाऱ्यांची व रक्त शोषण केले जाणाऱ्यांची मित्र म्हणून कशी सांगड घातली जाणार ? आज कॉंग्रेस धनिकांच्या मगरमिठीत बसली आहे. ती गोरगरीब, कामकरी व शेतकरी जनतेचे कोणते हित करणार ? काँग्रेस ही संस्था शेतकरी-कामकरी वर्गांची संस्था नाही. ती भांडवलदारांची पाठीराखी आहे. तिच्या हातून बहुजन अशा श्रमजिवी लोकांचे हित होणे कठीण आहे. त्याच्या उलट आमचा स्वतंत्र मजूर पक्ष हा निर्भेळ वर्ग तत्त्वाच्या पायावर उभारलेला आहे. आम्हाला जितके कामकरी व शेतकरी वर्गाचे हितरक्षण जिव्हाळ्याने करता येईल तितके कॉंग्रेसला करता येणे अगदीच अशक्य आहे. पददलित, गोरगरीब अशा श्रमजिवी वर्गाचे हितरक्षण व संवर्धन करणे हेच आमच्या पक्षाचे मुख्य कार्य आहे. तत्त्वांच्या बाबतीत तडजोड न करता कायदे मंडळातील कोणत्याही पक्षाशी तपशीलाच्या बाबतीत योग्य प्रसंगी सहकार्य करू. तसेच मी अस्पृश्य समाजाला सोडून इतर जातींच्या लोकांशी सहकार्य करून संगनमत का केले, अशाप्रकारचा प्रश्न मला विचारण्यात येतो. त्यासंबंधी सांगायचे म्हणजे असे की, नवीन राज्यघटनेनुसार स्थापन होणाऱ्या लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये एकंदर १७५ सभासद निवडून जाणार आहेत. या १७५ सभासदांमध्ये आपले अस्पृश्य समाजाचे १५ सभासद असणार. या पंधरा जणांच्या मदतीने कुणाला काहीच काम करता येणे शक्य नाही. यासाठी आपल्या मदतीला जास्त लोकांची आवश्यकता आहे आणि हे लोकसुद्धा आपल्याच विचारसरणीचे व आपले मित्र असेच पाहिजेत. यासाठी ज्या ज्या स्पृश्य माणसांनी आजपर्यंत आपुलकीने सहाय्य केले, ज्यांनी आपल्या समाजकार्यासाठी स्वार्थत्याग केला अशा मनुष्यांना आपण निवडून देऊन आपल्या पक्षात सामील करून घेणे आवश्यक आहे. यासाठी यापुढे आता निष्कारण तर्ककुतर्क काढून वेळ गमावू नका. आमच्या पक्षातर्फे ज्या कार्यक्रमाची आखणी केली आहे ती पार पाडण्यासाठी आपापसातील भांडणे, तंटे, मारामाऱ्या वगैरे अनिष्ट प्रकार बाजूला ठेवा. शिस्तीला व तत्त्वाला जागून वागलात तर आज माझ्या हातून आपल्या समाजाकरिता जे अल्प प्रमाणात काम करता आले आहे ते अधिक प्रमाणात करून घेण्याची मला प्रबळ अशी शक्ती प्राप्त होईल. तत्त्वाकरिता व शिस्तीकरता लढता लढता मी कायदे मंडळाच्या निवडणुकीत पडलो तरी हरकत नाही. परंतु मुंबई जी वार्ड व उपनगर विभागातर्फे उभे राहिलेले आपले उमेदवार मि. काळोखे यांना तुम्ही निवडून आणले पाहिजे. त्यातच तुमचे कल्याण आहे. त्यातच तुमची सारी अब्रू आहे. यावेळी महार-मांग हा जातीभेद मानू नका. आपण यापुढे सर्व एकच आहोत, ही उज्ज्वल भावना हृदयात निरंतर जागृत ठेवा.
आता मी दुसऱ्या एका महत्त्वाच्या मुद्याकडे वळतो. तो म्हणजे : मी सर्वच उमेदवार महार जातीचे निवडून इतर समाजाच्या लोकांना उभे केले नाही. हा होय ! खरे पाहिले म्हणजे या बाबतीत आम्ही अधिक खोलात जाऊ नये, हे बरे ! तरी पण आज ज्यांनी राष्ट्रीय हरिजन पक्ष काढून या आरोपाला तोंड फोडले आहे त्यांना उत्तर हे दिलेच पाहिजे. या राष्ट्रीय हरिजन पक्षवाल्यांना मी एकाच नावाने संबोधू इच्छितो. हे लोक ‘ लेभागू ‘ लोक आहेत. यांना चांभार म्हणून मी माझ्या पक्षातून वगळले नाही. त्यांनी त्याप्रमाणे वाटेल ती ओरड करावी, त्याची मला बिलकूल कदर नाही. त्यांची निवड न करण्यात त्यांचा ‘ लेभागूपणाच ‘ कारणीभूत झाला आहे. जिथे मिळेल तिथे जायचे. तत्त्वाची-शिस्तीची यांना कधीच जाणीव नसावयाची. मिळेल ते ओटीत टाकून स्वतःकरिताच घेऊन जायचे, हाच त्यांचा धर्म ! आम्ही महाड सत्याग्रह केला, स्वावलंबनाच्या निरनिराळ्या चळवळी केल्या, नाशिक सत्याग्रह केला, फार कशाला पुणे-करार प्रसंगाचे उदाहरण घ्या. आम्ही तत्त्वाकरिता प्राणावर बेतेपर्यंत काँग्रेसशी व तिचे पंचप्राण गांधीशी झगडत असता हे राष्ट्रीय हरिजनवाले अगदी अचूक आमच्या शत्रूच्या कँपात बसलेले ! अशा लेभागू लोकांना प्राप्तीच्या वाट्याच्या वेळी हात पसरला असता त्यांना काहीतरी देण्यात आम्हीतरी का उदारपणा दाखवावा ! वटवाघुळाच्या वृत्तीने ज्यांना आपले जिणे जगावयाचे आहे त्यांच्या आरोपाची आणि कांगावखोरपणाची पर्वा मला वाटत नाही. इतकेच नव्हे तर पुणे कराराच्या पूर्वी गांधीजींनी प्राण पणास लाविला तेव्हा ह्या लोकांना गांधीजींना वाचविण्यासाठी कायदे कौन्सिलात मुळीच जागा नको होत्या. मग आता माझ्या प्रयत्नामुळे मिळालेल्या ह्या जागा हे का मागतात ? खरे पाहिले तर या राष्ट्रीय हरिजन पक्षातले प्रमुख पुढारी म्हणविणारे श्री. नारायणराव काजरोळकर वेळ पडल्यास डॉ. सावरकरांच्या ओटीत बसतील, श्री. पी. बाळू देशभक्त वल्लभभाईंच्या ओटीत धडपडत असताना दिसतील. अशा परिस्थितीत या पक्षाची शेवटी काय अवस्था होईल हे आजच सांगून उपयोगी नाही. अशा या खऱ्या परिस्थितीवर कधी कोणी प्रकाश पाडला आहे काय ? आमच्या पक्षाशी ज्याने आजपर्यंत सहकार्य केले व आमच्या कार्याच्या यशासाठी जे झटले ते श्री. शिवतरकर मास्तर हे चांभार समाजातले एक प्रमुख आहेत. त्यांना दुर्दैवाने म्युनिसीपल कमिटीकडून कायदे मंडळाच्या निवडणुकीसाठी उभे राहाण्याची परवानगी मिळाली नाही. त्यामुळे त्यांना आमच्या पक्षातर्फे उमेदवार म्हणून उभे करता आले नाही. असो.
खरे पाहिले असता मला या कायदे मंडळात जाण्यापेक्षा कायदे मंडळाच्या बाहेर राहूनच कार्य करण्यात अधिक बरे, असे वाटते. माझ्यापुढे आज धर्मांतराचा प्रश्न आहे. नवीन कॉलेजची काळजी आहे व इतर बरीच सार्वजनिक कामे आहेत. तरीसुद्धा आपणा सर्वांच्या इच्छेसाठी मी या नवीन पक्षाच्या संगनमताने कायदे मंडळात शिरण्याचा संकल्प केला आहे. माझी पूर्ण खात्री आहे की, माझ्या या संकल्पात कॉंग्रेस काटे पेरल्याशिवाय राहणार नाही. पैशाच्या बळावर काँग्रेस मला विरोध करण्याचे अनेक प्रकारचे प्रयत्न करील व आज त्यांनी त्याप्रमाणे प्रयत्न चालविले आहेत. यासाठी आपण सर्वांनी शिस्तीने संघटित झाले पाहिजे आणि आपली प्रत्येकाची सर्व मते यावेळी मला मिळाली पाहिजेत. मी निवडून येण्यासाठी तत्त्वापासून ढळणार नाही, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेविली पाहिजे. आपणास कुणी मदत करणार नाही आणि अशावेळी फंदफितुरीच्या मोहाला तुम्ही बळी पडता कामा नये. ज्यांना उमेदवार म्हणून घेता आले नाही असे असंतुष्ट लोक फंदफितुरीच्या मार्गाला लागलेले आहेत. त्यांच्या फंदफितुरीला केवळ स्वाभिमानासाठी तरी बळी पडू नका. तुम्ही विचार करा की, ज्या वृक्षाच्या छायेखाली आपणास गुण्यागोविंदाने बसावयाचे आहे, ज्या वृक्षाच्या छायेने आपणास पूर्ण समाधान मिळणार आहे ती छाया तुम्ही नष्ट करण्याचा, ह्या छायेच्या फांद्या कुऱ्हाडीने तोडून टाकण्याचा दुष्टपणा करणार नाही अशी मला खात्री आहे. स्वार्थाला, लोकांच्या चिथावणीला बळी पडून जे आज अविचाराचे आणि दुष्टपणाचे कृत्य करावयास प्रवृत्त झाले आहेत त्यांच्या पदरी यश कितपत मिळेल याबद्दल शंका आहे, परंतु ते आज आपलीच कुऱ्हाड आपल्याच पायावर मारून घेत आहेत. या सर्वप्रकारच्या कारवायापासून अलिप्त राहून मी माझ्या सहकाऱ्यांच्या मदतीने जो कार्यक्रम तुमच्यापुढे ठेवीत आहे तो तुम्ही, समता सैनिक दलातील प्रत्येक सैनिकानी शिस्तीने पार पाडला पाहिजे.
आपल्याला बऱ्याच बलाढ्य शत्रूंशी टक्कर द्यावयाची आहे. यासाठी कमीत कमी दोन हजार समता सैनिकांची उभारणी या मुंबई शहरात झाली पाहिजे. आपल्याजवळ मुबलक मनुष्यबळ असल्यावर, शिस्तीच्या व संघटनेच्या बळावर वाटेल त्या बिकट परिस्थितीत मार्ग काढणे कधीही कठीण झाले नाही. माझ्या निवडणुकीबाबत कॉंग्रेस व इतर हितशत्रू पुष्कळ प्रकारची कारस्थाने रचून, माझा त्यांच्या मार्गातील काटा काढून टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत. माझी खात्री आहे की, माझ्या निवडणुकीच्या वार्डातील प्रत्येक अस्पृश्य मतदार मला मत दिल्याशिवाय राहणार नाही आणि हे कार्य समता सैनिक दलाने प्रत्यक्ष हाती घेऊनच करावयास पाहिजे आणि माझी खात्री आहे की, माझ्या गैरहजेरीत ही मोठी जबाबदारी समता सैनिक दलाचा प्रत्येक शिस्तीचा शिपाई इमानेइतबारे पार पाडील. मी या कार्यासाठी एक कमिटी नेमली आहे. तिच्या मदतीने तुम्हास तुमचे कर्तव्यकर्म पार पाडता येईल.
🔹🔹🔹
✍️ संकलन – आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे
More Stories
स्वातंत्र्य, माणूसकी, समान हक्क मिळतील तेच स्वातंत्र्य – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सत्ता कोणाचीही असो अस्पृश्यांना दडपण्याचाच प्रयत्न होईल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
युद्धोत्तर हिंदुस्थानपुढे मोठमोठे प्रश्न उपस्थित होणार आहेत – डॉ. बाबासाहेब आंबेडकर