November 5, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

आवळेबाबूंच्या संघर्षाचे फलित “दीक्षाभूमी’ चा भूखंड

नागपूर- “”दीक्षाभूमी म्हणजे बौद्धांचे धार्मिक स्थान. यामुळे ऐतिहासिक अशा धम्मदीक्षेची भूमी आम्हाला मिळावीच. विकत देण्यास तयार असाल तर किंमत बोला, ती मोजायला तयार आहोत”… विधानसभेत असे रोखठोक आवाहन कर्मवीर बाबू हरिदास आवळे यांनी दीक्षाभूमीच्या भूखंडासाठी केले होते. तो दिवस होता 21 जुलै 1960. बाबू हरिदास म्हणजे आंबेडकरी चळवळीतील झंझावात. त्यांनी एकाच मध्यरात्री दीक्षा समारंभाच्या या पटागंणात स्तंभ उभारला. बुद्धाचा कमलपुष्पात पुतळा बसवला. तो बसवला नसता तर कदाचित दीक्षाभूमीवर असलेले हे भव्यदिव्य “स्मारक’ आज आंबेडकरवाद्यांना डोळ्यात साठवता आले नसते. असे असले तरी दीक्षेच्या जागेसाठी संघर्ष करणारे बाबू हरिदास आवळे यांची साधी प्रतिमाही दीक्षाभूमीवर नाही.

सहा डिसेंबर 1956 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले. यानंतर पहिली शोकसभा दीक्षाभूमीवर झाली. आणि त्या दिवसापासून आवळेबाबू यांना दीक्षाभूमी मिळविण्याचे वेध लागले. निवेदनापासून तर न्यायालयीन लढाई त्यांनी लढली. दीक्षाभूमीवरील स्मारक समितीला मात्र बाबासाहेबांच्या या सच्च्या सैनिकाचे विस्मरण झाले. दीक्षाभूमी मिळवण्यासाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले. दर रविवारी बौद्धांना दीक्षाभूमीवर “बुद्ध आणि त्यांचा धम्म’ ग्रंथाचे वाचन आणि बुद्धवंदना ग्रहण करण्यासाठी ते निमंत्रण देत होते. हळूहळू गर्दी होऊ लागली. तशी पोलिसांनी दखल घेतली.

दीक्षाभूमीवरील खबरबात घेण्यासाठी पोलिसही तैनात असत. पुढे पोलिस कंटाळले. हीच संधी साधून आवळेबाबूंनी बाबासाहेबांच्या जयंतीच्या पूर्व संध्येला (13 एप्रिल 1957) त्रिशरण-पंचशील, बुद्धवंदना, संघवंदना ग्रहण कार्यक्रम घेतला. कार्यक्रम सुरू झाला तसा मध्ये निळा पडदा लावला गेला. पडद्याच्या एका बाजूला जयंतीचा उत्सव तर दुसऱ्या बाजूला खड्डा खोदण्याचे काम सुरू होते. आवळेबाबूंच्या नेतृत्वात धोंडबाजी मेंढे, मनोहर गजघाटे, बिसन गायकवाड आदी कार्यकर्त्यांनी कमलपुष्पात तयार केलेली बुद्धमूर्ती गोपालनगर चौकात तयार ठेवली होती. रात्री नऊला खड्डा पूर्ण झाल्यानंतर तीन हातठेल्यांवर वाळू, विटा, सिमेंट, मुरूम आणि पाण्याचे दोन ड्रम दीक्षाभूमीवर आले. स्तंभ तयार झाला. मध्यरात्री बुद्धमूर्ती दीक्षाभूमीवर आणली गेली. बुद्धमूर्ती स्तंभावर बसवली गेली. वाऱ्यासारखी ही वार्ता शहरात पसरली. सीताबर्डीतील पोलिस दीक्षाभूमीवर तैनात झाले. बुद्धमूर्ती बसवणाऱ्यांचा शोध सुरू झाला. नागपुरातील साऱ्याच पुढाऱ्यांनी हात वर केले. आवळेबाबू नावाच्या झपाटलेल्या कार्यकर्त्याने “मी बुद्धमूर्ती बसवली’ असे छातीठोकपणे सांगितले. न्यायालयात हे प्रकरण गेले. न्यायालयात त्यांनी हे विधान केले. त्यांच्यावर खटला भरला. परंतु, ते मागे हटले नाहीत.

तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या सत्कारासाठी सर्वपक्षीय समिती तयार करण्यात आवळेबाबूंनी पुढाकार घेतला. 27 जुलै 1958 रोजी मुख्यमंत्री चव्हाण नागपुरात आले. त्यावेळी नागपूरचे डॉ. ना. भ. खरे यांच्या बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची चहापानसभा झाली. ही संधी न सोडता कम्युनिस्ट पक्षाचे ए. बी. बर्धन, बच्छराज व्यास, डॉ. खरे, पत्रकार हरकिसन अग्रवाल, काकिरवार, आमदार पंजाबराव शंभरकर, रामरतन जानोरकर यांच्या स्वाक्षऱ्या घेऊन दीक्षाभूमी बौद्धांना देण्यात यावी, असे संयुक्त निवेदन मुख्यमंत्री चव्हाण यांना दिले. मुख्यमंत्री चव्हाण यांनीही तोंडी आश्‍वासन दिले. यानंतर ऍड. ए. बी. बर्धन यांनी विधानसभेत “दीक्षाभूमी बौद्धांना देण्याचे आश्‍वासन पाळावे’ असा मुद्दा उपस्थित केला आणि पुढे बौद्धांना ही भूमी देण्याचे आश्‍वासन पाळले. अखेर पाऊणेचार एकर जागा मिळाली. परंतु, ही जागा अपुरी होती. 14 एकरही जागा द्यावी, अशी मागणी पुढे करण्यात आली. भारतीय बौद्धजन महासभेचे यशवंतराव आंबेडकर आणि खासदार दादासाहेब गायकवाड यांना जागेसंदर्भातील उपाययोजना करण्याची जबाबदारी दिली गेली. दीक्षाभूमीसाठी आवळेबाबू लढले नसते, तर कदाचित दीक्षाभूमी मिळाली नसती… या आठवणी सांगणारे भालचंद्र लोखंडे एक एक प्रसंग जसाच्या तसा ताजा करतात. दीक्षाभूमीचा भूखंड मिळाला आणि त्या ऐतिहासिक भूमीवर डॉ. आंबेडकर स्मारक समितीतर्फे दादासाहेब गवई यांच्या पुढाकाराने भव्य स्मारक उभे झाले आहे.

🙏🙏🙏🙏

समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष कर्मविर अंड बाबु हरीदास आवळे आणि सहकाऱ्यांचा वारसा आज तागायत वर्तमानातील समता सैनिक दल सेवा सुरंक्षा शीबिराच्या माध्यमातून राबवत आहे.
शतशः नमन आवळे बाबूंना

 

केवल जीवनतारे