August 28, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

आज साधुत्वाचा केवळ सांगाडा राहिला आहे – डाॅ. बाबासाहेब आंबेडकर

मुंबई इलाखा अस्पृश्य संत समाजाच्या परिषदेच्या अधिवेशनात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले अध्यक्षीय भाषण….

मुंबई इलाखा महार परिषदेकरिता खास उभारलेल्या भव्य मंडपात डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १ जून १९३६ रोजी  मुंबई इलाखा अस्पृश्य संत समाजाच्या परिषदेचे अधिवेशन  मुंबई येथे भरले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केल्यापासून अखिल अस्पृश्य वर्गातच नव्हे तर अखिल हिंदू समाजात मोठी खळबळ उडून गेली आहे. स्पृश्य हिंदू समाजाच्या जुलुमाखाली वर्षानुवर्षे खितपत पडलेल्या अस्पृश्य बांधवांना डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली धर्मांतराची घोषणा देववाणी वाटली असल्यास नवल नाही. या धर्मांतराच्या घोषणेनंतर सर्व हिंदुस्थानभर अस्पृश्यांच्या सभा, परिषदा भरून त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घोषणेला पाठिंबा देणारे ठराव पास करून, आपली धर्मांतराची जय्यत तयारी दाखविली. धर्मांतराला विरोधी वृत्ती दाखविणारे व दुसऱ्यांच्या ओंजळीने पाणी पिऊन स्वार्थ साधणारे काही ‘ हरिजन ‘ वगळल्यास अस्पृश्य जनतेला धर्मांतराचे महत्त्व पटले आहे आणि त्यांनी आपल्या सक्रीय तयारीसाठी मुंबईस जशी अखिल मुंबई इलाख्यातील महार बांधवांनी परिषद भरवून डॉ. बाबासाहेबांच्या धर्मांतराच्या ठरावास सामुदायिकरीत्या पाठिंबा दिला, तसाच, मातंग बांधवांनीही दिला आणि त्याच धोरणानुसार मुंबई इलाख्यातील संत-महंत, साधु, वैरागी वगैरे लोकांनीही आपली ही परिषद दिनांक १ जून १९३६ रोजी भरविली होती.

या परिषदेच्या पूर्व तयारीसाठी साधु-संत मंडळींनी एक स्वागत मंडळ व कार्यकारी मंडळ स्थापून पुढीलप्रमाणे विनंतीपत्र प्रसिद्ध केले होते….
” या परिषदेत आपल्या सर्व संत समाजातील, सर्व संत मंडळींनी धर्मांतराच्या ठरावाला पाठिंबा देऊन सदर ठरावाची अंमलबजावणी करण्याकरिता, आपले परमपूज्य व सन्मान्य पुढारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ज्या दिवशी धर्मांतर करावयास लावतील, त्याच दिवशी नक्की आपण सर्व लहान थोर संत मंडळींनीही त्यांचे बरोबर धर्मांतर करण्यास सिद्ध झाले पाहिजे. अशा प्रकारचा ठाम विचारविनिमय ठरवून आपल्या संत समाजाचे पुढील धोरण निश्चित केले जाणार आहे. त्याचप्रमाणे संत समाजाच्या हिताच्या सर्व बाबतींचा पूर्णपणे विचार होऊन पुढील कार्याची रूपरेषा आखण्यात येईल, वगैरे. ” ही परिषद यशस्वी करण्याकरिता स्वागताध्यक्ष महंत शंकरराव नारायणदास बर्वे, कर्पुरनाथ गोकुळनाथ, तारकानाथ विठ्ठलनाथ, वैद्य शंकरनाथ लक्ष्मणनाथ, हरिदास योगानंद, दशरथनाथ विठ्ठलनाथ, किसनदास शंकरदास महंत, रामनाथ कडकनाथ, योगिनाथ रघुनाथ, जगन्नाथ भडकनाथ, काशिनाथ तुळशीनाथ महंत, सोमनाथ दशरथनाथ, भक्तिदास वगैरे मंडळींनी बरीच जीवापाड मेहनत घेतली होती. कोणत्याही समाजावर बहुधा संत महंतांचाच अधिक पगडा बसलेला असतो. अशा परिस्थितीत ह्या हिंदू धर्मानुसार आजपर्यंत अस्पृश्य वर्गात वावरणाऱ्या संत महंतांनीच धर्मांतराला प्रवृत्त व्हावे ही गोष्ट विशेष अभिनंदनीय आहे. असो.

परिषदेपूर्वी स्वागतपर पदे झाली. अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेबांची निवड झाल्यावर चहुबाजुनी टाळ्यांचा कडकडाट झाला आणि त्यांच्या जयजयकाराने परिषदेमधील वातावरण दुमदुमून गेले. प्रथम स्वागताध्यक्ष महंत शंकरदास नारायणदास बर्वे यांनी सर्वांचे प्रेमाने स्वागत केले. त्यांनी नियोजित अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ब्रह्मवेत्ते व तत्त्वज्ञानी असा उल्लेख करून घर्मांतर व संताचे कर्तव्य या मुद्यावर स्वागतपर भाषण केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या मुंबई इलाखा अस्पृश्य संत समाजाच्या परिषदेमध्ये खालील ठराव सर्वानुमते पास करण्यात आले. —

ठराव १ ला. – अखिल मुंबई इलाखा संत परिषद, मुंबई ही पूर्ण विचाराअंती असे जाहीर करते की, अखिल भारतीय अस्पृश्यांचे सर्वमान्य पुढारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या धर्मांतराच्या घोषणेला व मुंबई इलाखा महार परिषदेने पास केलेल्या धर्मांतराच्या ठरावाला पाठिंबा देत आहे.
सूचक :– १. भक्तिदास विठ्ठलदास, २. गंगाराम रघुनाथ,
मांडणार :– साळुंकेबुवा.
अनुमोदन :– हरिश्चंद्र ज्ञानदेव गायकवाड, कमालदास सेवादास.

ठराव २ रा. – धार्मिक, शैक्षणिक, राजकीय वगैरे बाबतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जे विचार व संदेश तोच संत समाजाचा धर्म व प्रचार-आचार यापुढे राहणार असून संत समाज त्या व्यतिरिक्त आपले कोणतेही धोरण ठेवणार नाही. असे ही संत परिषद जाहीर करते.
मांडणार :– – हरिदास तोरणे मास्तर.
अनुमोदन :– शिवराम गोपाळ जाधव, विठ्ठलनाथ तुळशीनाथ महंत.

ठराव ३ रा. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराची घोषणा केल्याप्रमाणे व सर्व अस्पृश्य समाजास धर्मांतर करण्याचे जाहीर केलेले असून हिंदू धर्माव्यतिरिक्त दुसरा धर्म स्वीकारण्याचे निश्चित केले आहे. आपणास या नव्या धर्माची शिकवण अस्पृश्य समाजाला देणे जरूर असल्यामुळे ही संत परिषद या नव्या धर्माच्या शिक्षणार्थ आपले प्रचारक त्या नव्या धर्माचे शिक्षण घेऊन अस्पृश्य समाजाला नव्या धर्माची ओळख व शिकवण देण्यासाठी आपले प्रचारक देण्यास तयार आहे.
मांडणार :– पतितपावन बुवा.
अनुमोदन – दिगंबरनाथ नागनाथ कांबळे.

वरील ठरावावर प्रमुख मंडळींची भाषणे झाल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भाषण करण्यास विनंती करण्यात आली.

तेंव्हा मुंबई इलाखा अस्पृश्य संत समाजाच्या परिषदेत बोलताना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले,
” संत मंडळी आणि बंधु भगिनींनो,
मी जरी स्वतः साधु नसलो, तरी माझे घराणे साधुचे आहे. माझ्या घराण्यामध्ये जवळजवळ तीन पिढ्यापर्यंत मोठी माणसे साधु होऊन गेली. माझ्या आयुष्यातील बराचसा भाग संत समागमात गेलेला आहे. साधुंच्या हातून आपल्याला पुष्कळशी कामगिरी करून घेता येईल असे मला वाटते व त्या सर्वांचा विचार करण्यासाठी आज ही संत परिषद बोलाविण्यात आली आहे.

आपल्यातील संत लोकांनी एक मोठी कामगिरी केली आहे. हिंदू धर्मात शूद्र लोकांना विद्या मिळण्याचा अधिकार नव्हता. एवढेच नव्हे तर तुम्ही मनुस्मृती चाळली, तर तीत तुम्हाला एक गोष्ट आढळून येईल की, त्या मनुस्मृतीत जो कोणी शूद्र वेदाध्ययन करील, त्याची जीभ कापून टाकावी, त्याच्या कानात गरम शिशाचा रस ओतावा, असे उल्लेख आढळतात. या संत समाजाने अस्पृश्य वर्गाला ज्ञान देण्याचे महत्कार्य केले. त्यांनी केलेले श्रम व सोसलेला छळ अवर्णनीय आहे. शूद्रांनी ज्ञान संपादन करू नये, यासाठी हिंदू धर्माने केलेल्या कडेकोट बंदोबस्तातून व कोंडमाऱ्यातून या लोकांनी ज्ञान प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांची ज्ञानलालसा फारच मोठी होती. याच समाजाने काही धार्मिक ग्रंथ असे लिहिले आहेत की, तसे ग्रंथ मिळणे आज कठीण जाईल. आज अनेक अस्पृश्य संतांजवळ कित्येक हस्तलिखित पुरातन ग्रंथ आहेत, तसे हिंदू धर्माच्या अभिमान्यांजवळही नसतील. या संत समाजाने अस्पृश्यांना जे ज्ञान दिले, त्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी राहिले पाहिजे.

आज संत समाजाची परिस्थिती काय आहे ? ज्या लोकांनी हा जो संतपणा स्वीकारला त्याचा त्यांना काय फायदा झाला आहे ? त्यांनी आजवर काय कमावले ? त्यांच्या ईश्वरभक्तीने व ज्ञानप्राप्तीने त्यांची अस्पृश्यता नष्ट झाली काय ? त्यांच्यावर लादलेला अस्पृश्यतेचा कलंक कधीच धुतला गेला नाही. संत महार तो महारच राहिला. महार संत कितीही विद्वान असला, तो मोठा धर्मवेत्ता असला, तरी तो ब्राम्हणाचा गुरु होऊ शकत नाही. अशा तऱ्हेची वचने हिंदू धर्माच्या शिलेदारांनी लिहून ठेवलेली आहेत.

संत समाजाची आज आपल्याला काय जरुरी आहे, याचा आपण विचार केला पाहिजे. संत समाजाची स्थापना प्रथम भगवान बुद्धाने केली. त्यांच्या काळी त्या समाजाला भिक्षु समाज असे म्हणत असत. भगवान बुद्धाने भिक्षु समाज का स्थापन केला ? त्याचे कारण असे की, समाजातील सर्व लोक प्रपंचात सापडल्यामुळे त्यांची बौद्धिक वाढ होत नाही. तो समाज सत्याला तसाच समाजाला पारखा होतो. याकरिता स्वार्थरहित असा आदर्श समाज असावा, या विचाराने बुद्धाने भिक्षु समाज स्थापन केला. त्याने भिक्षुंवर अनेक निर्बंध घातले. त्याचे कारण असे की, त्यांचे मन संसारात परत गुरफटू नये. भिक्षुंचे मुख्य कार्य स्वधर्माचा प्रचार व प्रसार करणे हे होते. आजचा हा संत समाज बुद्धाच्या वेळी असलेल्या भिक्षु समाजाचेच परंतु दुर्धारलेले स्थित्यंतर आहे. मुळची भिक्षुत्वाची कल्पना नष्ट झाली असून, तो एक उदर भरण्याचा धंदा होऊन बसला आहे.

संतावर समाजाची जबाबदारी असली पाहिजे. परंतु आजचे साधु लोक काय करतात ? अंगाला राख फासून समाजापासून दूर राहतात. निव्वळ जटा, दाढी, माळा, रंगीत फडकी ह्या बाह्य लक्षणांनी खरा साधु होत नाही. समाजात जिकडे तिकडे अधोगती झालेली दिसून येते. समाजात ठिकठिकाणी जुलूम-जबरदस्ती केली जाते. समाजात होत असलेला अन्याय, जोर-जुलूम यांचा प्रतिकार करणे साधुंचे कर्तव्य आहे. तेच लोककल्याण आहे, तीच खरी लोकसेवा आहे.

या संत लोकांची धर्मांतराच्या कार्याकरिता फारच मदत होईल. आपण जो नवा धर्म स्थापन करणार आहोत, त्या धर्माचे महत्त्व गावोगावी, कानाकोपऱ्यातून पोहचविण्याकरिता या साधु लोकांचा फार मोठा उपयोग होण्यासारखा आहे. हे लोक धर्मोपदेशाचे कार्य उत्तम रीतीने करू शकतील. या विद्वान लोकांच्या हातून नवीन धर्माची शिकवण देण्याची कामगिरी उत्तम तऱ्हेने पार पाडली जाईल.

आज केवळ साधुत्वाचा सांगाडा राहिला आहे. तेव्हा ह्या साधु लोकांनी या नव्या कार्यक्रमाचा आपल्या अंगात संचार करून घेऊन नवे जीवन प्राप्त करून घ्यावे. आज स्वार्थत्यागाला महत्त्व आहे. नुसत्या माळांना नाही. तेव्हा संत समाजाने नवा धर्म स्थापन करण्याचे महान कार्य शिरावर घ्यावे, एवढे सांगून मी माझे भाषण संपवितो.”

***

या परिषदेला संत महंतांप्रमाणे इतरही आमंत्रित मंडळी हजर होती. त्यामध्ये मुंबई इलाखा महार परिषदेचे अध्यक्ष मि. बी. एस्. व्यंकटराव, भाई अनंतराव चित्रे, मे. शिवतरकर, सुभेदार सवादकर, डी. व्ही. प्रधान, एम. के. कर्णिक, दिवाकर पगारे, रेवजीबुवा डोळस, संभाजी तुकाराम गायकवाड, अण्णासाहेब पोतनीस, चांगदेव मोहिते, शांताराम अनाजी उपशाम, ॲ. कवळी, देवराव नाईक, अमृतराव रणखांबे, भाऊराव गायकवाड वगैरे प्रमुख मंडळी हजर होती. तसेच संत महंत मंडळीपैकी, पतितपावनदास बुवा, गणपतबुवा ऊर्फ मडकेबुवा. शिवराम गोपाळ जाधव, सेवकनाथ शृंगीनाथ, जगन्नाथ तारकनाथ, गणेशनाथ सिद्धनाथ, बुद्धिनाथ विठ्ठलनाथ, भाविकनाथ भडकनाथ, चंचळनाथ भडकनाथ, भडकनाथ आलखनाथ, सेवकनाथ केशवनाथ, माधवदास देवकादास, मेनीनाथ तारकनाथ, किसनदास गोविंददास, गोपिनाथ गंगानाथ, अंकुशबुवा राघोजी फणसे, किसनदास शंकरदास, संभुनाथ गोविश्वनाथ, मंत्रीनाथ गरीबनाथ, चतुरनाथ चितगंगानाथ, आदिनाथ मेनीनाथ, दशरथनाथ विठ्ठलनाथ, रामनाथ कडकनाथ, बालकनाथ सेवकनाथ, श्रीपतीदास मुक्तिदास, यमाजीदास पांडवदास, अंबरदास लक्ष्मणदास, रमाजीनाथ आत्मारामनाथ, कमालदास सेवादास व गरीबनाथ तारकनाथ वगैरे मंडळी हजर होती.

संत परिषदेमधील वरील ठरावावर झालेली भाषणे फारच परिणामकारक व विचारविनिमय करण्यासारखी झाली. एकंदरीतच या परिषदेच्या माध्यमातून इतर समाजबांधवांप्रमाणे अस्पृश्य संत मंडळीचा डॉ. बाबासाहेबांच्या कार्याला किती आपुलकीचा पाठिंबा आहे याची प्रत्यक्ष खात्री पटल्याशिवाय राहाणार नाही. हिंदू धर्माच्या रूढीप्रमाणे आजपर्यंत या संत मंडळींनी जे आचार-विचार व्यवहारात रूढ केले होते त्यांना या परिषदेत शपथपूर्वक मूठमाती देण्यात आलीच, शिवाय ज्या हिंदू धर्मातील धर्मग्रंथांनी आजपर्यंत अस्पृश्य जनतेची दिशाभूल केली, ज्यांना विषमतेच्या व गुलामगिरीच्या वातावरणात खितपत ठेविले आणि स्वाभिमानाला पारखे केले त्या धर्मग्रंथांचे जाहीररीत्या या परिषदेमध्ये दहन करण्यात आले.

या परिषदेमध्ये याशिवाय आणखी एक मोठी महत्त्वाची गोष्ट घडून आली. आज हजारो वर्षे हे साधुसंत हिंदू धर्माच्या रूढीच्या शिकवणीने वागत होते. त्यांनी दाढ्यामिशा वाढवून ते जटाधारीही बनले होते. यांच्या गळ्यात माळांची पेटी लोंबकळत होती. अनेक सांप्रदायिपंथाचे संत हातात, कानात व गळ्यात गंडे, दोरे, माळा यांनी सुशोभित झालेले होते. परंतु डॉ. बाबासाहेबांनी हिंदू धर्माच्या विषमतेचे व अस्पृश्यांवरील अन्यायी वागणुकीची जेव्हा त्यांना धर्मांतराच्या घोषणेने जाणीव करून दिली तेव्हा यांचे डोळे खाडकन उघडले गेले. त्यांनी डॉ. बाबासाहेबांच्या घोषणेनुसार वागण्याचा मनाच्या निश्चयाने निर्धार केला आणि या परिषदेमध्ये हजारो वर्षे मनावरील घडलेल्या संस्काराने स्वीकारलेल्या साधुसंतांच्या अलंकाराचा त्याग केला. परिषदेच्या भव्य मंडपात तयार केलेल्या अग्निकुंडात शेकडो साधुसंतांनी आपल्या दाढ्या, मिशा, जटा व उपकरणे आणि संतमहंतगिरीची सर्व निशाणी अग्निनारायणाला अर्पण करून आपल्या धर्मांतराच्या निश्चयाचा निर्णय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या देखत प्रत्यक्ष कृतीने जाहीर केला. या साधुसंतांच्या निश्चयी बाण्याचे आणि त्यांनी आपले दाखविलेले मनोधैर्य स्पृश्यवर्गीय साधुसंतांनाच काय पण इतर जनांनाही उदाहरणीय झाले आहे.

संत समाजाच्या या अधिवेशनाचा इतर अस्पृश्य समाजावर बराच परिणाम झाला आहे. दाढी, मिशा व जटा अग्निला अर्पण करून मुक्त झालेल्या संतांना, अस्पृश्य समाजात धर्मांतरासंबंधी प्रचार कार्य करण्यासाठी किंवा ज्या ज्या कार्यामुळे समाजहित साधले जाईल असे कार्य दिले जाईल आणि अशा प्रकारची समाजसेवा करण्याचे कित्येक साधुसंतांनी कबूल केले आहे. देवदेवतांच्या भजन पूजनात व्यर्थ कालाचा व्यय करण्यापेक्षा जनसेवा निःस्वार्थ बुद्धीने करणे हीच खरीखुरी ईश्वरसेवा ठरणार आहे. एकंदरीत हे संत परिषदेचे कार्य विशेष यशस्वी तर झालेच, परंतु हजारो वर्षे ज्या रूढीयुक्त धर्माच्या नावाखाली हे संत नांदत होते त्यांचा दांभिकपणा त्यांना कळून येताच ते त्या ढोंगी धर्माचा त्याग केवळ डॉ. बाबासाहेबांच्या धर्मांतराच्या घोषणेने करण्यास तयार झाले आणि त्याप्रमाणे त्यांनी प्रत्यक्ष कृती केली हे सर्व अस्पृश्य संत समाजाला भूषणावह आहे. हा सर्व दाढी, जटा अग्निला अर्पण करण्याचा समारंभ संपल्यावर संत परिषदेचे अधिवेशन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयजयकारात संपविण्यात आले.

***

                                                             संकलन – आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे