February 23, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

बुद्धधर्मीय देशांनी धर्माच्या वाढीसाठी त्याग करावा – डाॅ. बाबासाहेब आंबेडकर

‘ सिलोन बुद्धिस्ट कॉंग्रेस ‘ ने आयोजित केलेल्या ” जागतिक बुद्ध परिषदेत ” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले भाषण….

‘ सिलोन बुद्धिस्ट कॉंग्रेस ‘ ने सिलोनची जुनी राजधानी कॅण्डी येथे दिनांक २५ मे १९५० पासून दिनांक ६ जून १९५० पर्यंत चालणारी ” जागतिक बुद्ध परिषद ” आयोजित केली होती. त्यात आशिया व युरोपीय राष्ट्रांचे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित राहणार होते. या परिषदेत बुद्ध धर्माच्या शिकवणुकीनुसार जगात शांतता स्थापनेचा विचार करण्यात येणार होता. मुख्य प्रधान डी. एस्. सेनानायके प्रतिनिधींचे कोलंबो रेसकोर्सवर स्वागत करणार होते. या परिषदेत भारत सरकारचे कायदे मंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रामुख्याने भाग घेणार होते.

या परिषदेत भाग घेण्यासाठी दिनांक २३ मे १९५० रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हैद्राबाद मार्गे मद्रासला आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वागतासाठी हजर असलेल्या अधिकारी, कार्यकर्ते, चाहते यात प्रामुख्याने कामराज नाडर यांचा समावेश होता. ” बुद्ध धर्माबद्दल आस्था असल्यामुळे व मला परिषदेचे आमंत्रण असल्यामुळे मी तिकडे जात आहे.” असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पत्रकारांना सांगितले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोलंबोकडे रवाना झाले.

आजपासून ६ वर्षांनी बुद्ध युगास २,५०० वर्षे पुरी होणार असून त्यावेळी जगात बुद्धधर्माची जोरात लाट पसरलेली असेल असा आशावाद जागतिक बुद्ध भ्रातृसंघाची स्थापना करण्याचा ठराव मांडताना सी. बी. नुगावाला या सिलोनी बुद्धप्रमुखाने कॅण्डी (सिलोन) येथे भरलेल्या परिषदेत व्यक्त केला. या ठरावास इंग्लंडच्या कु. कॉन्स्टन्स लाऊन्सबरी, ब्रह्मदेशचे यू चान चन, बंगालचे डॉ. अरविंद बरुआ, जपानचे रिरी नाकायमा, इटालीचे लोकनायक व थायलंडचे सुखित निमहेंद्र यांनी पाठिंबा दिला.

दिनांक २६ मे १९५० रोजी तेथील ‘ टेम्पल ऑफ दि ट्रुथ ‘ नावाच्या मंदीरात २७ देशांचे बुद्धधर्मीय प्रतिनिधी जमले होते व त्यांच्यामध्ये बुद्ध धर्माच्या पुनरुज्जीवनाविषयी चर्चा झाली. भारताचे कायदेमंत्री डॉ. बी. आर. आंबेडकर हे या प्रसंगी उपस्थित असले तरी ते या परिषदेचे अधिकृत प्रतिनिधी नव्हते म्हणून अधिकृत चर्चेचे वेळी त्यांनी भाग घेतला नाही. जागतिक मैत्रीसंबंधीचा ठराव परिषदेने मंजूर केल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले.

‘ सिलोन बुद्धिस्ट कॉंग्रेस ‘ ने आयोजित केलेल्या या ” जागतिक बुद्ध परिषदेत ” केलेल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,
मी जरी या भ्रातृसंघाचा सभासद झालो नसलो तरी माझ्या भेटीचा उद्देश फार खोल आहे. साऱ्या बुद्ध देशांनी केवळ भ्रातृसंघ न स्थापता बुद्धधर्माच्या प्रचारार्थ त्याग करण्याची तयारी ठेवली पाहिजे. बुद्ध धर्माचे समारंभ भारतातील लोकांना पाहावयास मिळावे व बुद्ध धर्माचा बाह्योपचारच केवळ पाळला जातो की खरा बुद्ध धर्म आचरला जातो हे भारतीयांना समजावे अशी माझी इच्छा आहे. बुद्ध धर्म जागृत आहे की तो केवळ परंपरागत आहे हे पाहाण्याचाही आपला हेतू आहे.

त्यांनी आपल्या भाषणात केवळ जागतिक मित्रत्वासंबंधीच्या ठरावाबद्दल असमाधान व्यक्त केले. बुद्धधर्मीय देशांनी त्या धर्माच्या वाढीचे कंकण बांधून त्यासाठी त्याग केला पाहिजे, अशातऱ्हेची घोषणा या परिषदेत व्हायला हवी होती; असा अभिप्राय त्यांनी व्यक्त केला.
आणि
डॉ. बाबासाहेब आंबेडकर असेही म्हणाले की,
(१) “बुद्ध धर्माचे आचार नि उपचार भारतामध्ये पाहावयास मिळत नाहीत, ते पाहाण्याची संधी साधावी;
(२) तसेच, मूळ तत्त्वांशी विसंगत अशा श्रद्धांनी बुद्धधर्मी लोक कितपत ग्रासले आहेत व मूळ शुद्ध स्वरूपात तो धर्म कितपत राहिला आहे हे पहावे;
आणि
(३) जग सिलोनला बुद्धधर्मी म्हणते म्हणून सिलोन बुद्धधर्मानुयायी आहे की तो धर्म आजही जिवंत स्वरूपात येथे नांदत आहे याचा शोध घ्यावा;

ह्या त्रिविध उद्देशांनी मी या परिषदेला आलो. मित्रत्वाच्या ठरावाप्रमाणे मी अधिकृत मित्र नसलो तरी येथे येण्यात माझा हेतू अधिक गंभीर स्वरूपाचा आहे.

                                 🔹🔹🔹

संकलन – आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे