बौद्ध धर्म दीक्षा सोहळा – नागपूर
बुद्ध धर्मानेच जगाचा उद्धार होणार आहे – डाॅ. बाबासाहेब आंबेडकर
बोधीसत्व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी येवला येथे जाहीर सभेत केलेल्या धर्मांतराच्या घोषणेला मूर्तरूप देणाऱ्या डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो अनुयायांसह धर्मांतर करून घेतलेल्या बौद्ध धर्म-दीक्षा विधी समारंभाचा ( पूर्वतयारीसह ) वृत्तांत….
” भारतीय बौद्धजन समितीचे प्रवर्तक आणि अध्यक्ष, भारतातील दलित जनतेचे कंठमणी, आंतरराष्ट्रीय किर्तीचे घटना-पंडित, अखिल भारतीय शेड्यूल्ड कास्ट्स् फेडरेशनचे संस्थापक आणि कर्णधार परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी येत्या १४ ऑक्टोबर १९५६ च्या सकाळी ८ वाजता नागपूर येथे बौद्ध धर्म दीक्षा घेण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संदेश
२६, अलीपूर रोड, दिल्ली,
ता. २३ सप्टेंबर १९५६
बौद्ध धर्म स्वीकारण्याचा दिवस व ठिकाण मी आता निश्चित केले आहे. येत्या दसऱ्यास तारीख १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे मी धर्मांतर करणार आहे.
या दिवशी सकाळी ९ ते ११ वाजता माझा धर्म-दीक्षा विधी समारंभ होईल व संध्याकाळी माझे सर्व लोकांसाठी जाहीर व्याख्यान होईल.
बी. आर. आंबेडकर,
२३ सप्टेंबर १९५६.
‘ प्रबुद्ध भारत ‘ च्या संपादकांना एक विशेष संदेश डॉ. बाबासाहेबांनी पाठविला असून बौद्ध धर्म स्वीकारावयाचा वर दिलेला दिवस, तिथी आणि समय कळविला आहे.
विजयादशमीचा मुहूर्त धर्मदीक्षेसाठी साधण्यात अत्यंत औचित्य आहे. विजयादशमी ही महान बौद्ध सम्राट अशोकाच्या विजयाचा दिन म्हणूनच पाळली जाते. अलिकडील तिनशे वर्षात पावसाळ्याच्या समाप्ती नंतर मराठे सीमोल्लंघन या विजयादशमीला करीत असत. अस्पृश्य आणि दलित समाजाच्या डोक्यावर गेली हजार वर्षे जे काळेकुट्ट ढग जमले होते ते या अडीच हजाराव्या बौद्ध वर्षाच्या विजयादशमीला धर्मचक्र नवप्रवर्तन करून डॉ. बाबासाहेब नष्ट करणार आहेत. हिंदू धर्माच्या सीमामध्ये बंदिस्त अस्पृश्य समाज या दिवशी त्यांना शतकानुशतके गुलाम ठेवणारी धार्मिक तटबंदी उल्लंघून नव स्वातंत्र्याचे उदक पिण्यास तयार होणार आहे. हेच ते खरे सीमोल्लंघन. ते केल्यावर परत यावयाचे नाही, या भीम निश्चयाने प्रत्येक अस्पृश्य दलिताचे पाऊल पुढे पडणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा बौद्ध-धर्म-दीक्षा समारंभ ब्रह्मदेशचे महास्थविर पूज्य भिक्षु चंद्रमणी संपन्न करणार आहेत. त्याचवेळी लाखो लोक बौद्धधर्माची दीक्षा घेण्यासाठी नागपूरला एकत्र येतील.
नागपूर शहरात पूर्व दिशेकडून रायपूर, दुर्ग, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यातून धर्म स्वीकारणारे इच्छुक बौद्धजन प्रवेश करतील, पश्चिम दिशेकडून वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यातून येणारे धर्मप्रवासी प्रवेश करतील, तर दक्षिणेकडून मराठवाडा, चांदा, बल्लारशहा या विभागातील बौद्ध यात्रेकरू येतील आणि उत्तर दिशेकडून उत्तर प्रदेश, मध्यभारत, भोपाळ, हुशंगाबाद, बैतूल, शिवणी आदी विभागातील जनता पथकापथकाने समारंभाच्या जागेकडे ‘ बुद्धं सरणं गच्छामि ‘ च्या घोषणा करीत येतील.
या प्रसंगी वर्धा आणि इतर भागातील सवर्ण हिंदुंचा एक प्रचंड गट बौद्ध दीक्षेसाठी येणार आहे. दीक्षा प्रसंगी पांढरे शुभ्र कपडे परिधान केले पाहिजे व दीक्षा घेणाराचे वय अठरा वर्षापेक्षा अधिक असले पाहिजे हे नियम कसोशीने पाळले जातील.
त्याच दिवशी सायंकाळी नागपूर येथेच डॉ. बाबासाहेबांचे बौद्ध धर्म स्वीकारावरील ऐतिहासिक भाषण होणार आहे. जगाच्या धार्मिक इतिहासातील या क्रांतिकारक घटनेचे प्रत्यक्ष अवलोकन करण्याची संधी व त्यात भाग घेण्याचे महद्भाग्य आपल्याला लाभलेले आहे. असे सांगतात की, भगवान बुद्धानंतर प्रथमतःच एका वेळी, एका दिवशी, एके ठिकाणी इतक्या मोठ्या संख्येने बौद्ध धर्म स्वीकार केल्याचे कोठेही नमूद नाही.
नागपूरचे वैशिष्ट्य
१९३० साली ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस लीगची स्थापना, तद्नंतर १९४२ साली अखिल भारतीय शेड्यूल्ड कास्ट्स् फेडरेशनची मुहूर्तमेढ डॉ. बाबासाहेबांनी नागपूरला केली तसेच बौद्ध धर्म स्वीकाराचा समारंभ नागपूरलाच होणार.
प्रतिज्ञेची पूर्ति
१९३५ साली डॉ. बाबासाहेबांनी, ‘ मी हिंदू म्हणून जन्माला आलो असेन पण हिंदू म्हणून मरणार नाही ‘ अशी प्रतिज्ञा केली आहे, तीची पूर्तता २१ वर्षानंतर होत आहे.
आर. डी. भंडारे
बौद्ध धर्म स्वीकारासंबंधी डॉ. बाबासाहेबांचे विचार
जे भगवान बुद्ध या देशात नांदत होते, त्यांचा तो धर्म आजही या देशाचा धर्म होईल यात मला शंका वाटत नाही.
मनुष्यत्व, समदृष्टी, बंधुभाव, प्रेम यांनी हा खरा धर्म झालेला आहे, हा धर्म तुम्ही स्वीकारा.
मी जे धर्मांतराचे कार्य आरंभिले ते नीट समजवून घ्या ; त्याचे महत्त्व पारखून घ्या व काय करायचे ते ठरवा, मात्र ते ठरल्यावर जुने ते टाकून द्या. आज मी २० वर्षे तुमच्या बद्दल विचार करीत आहे.
जो निरनिराळ्या धर्मांचा अभ्यास, मानवास करता येण्यासारखा आहे, तो मी केला आहे व शेवटी माझा अनुभव असा आहे की, बुद्धधर्माशिवाय दुसरा धर्म जगाला नाही. जगात जर कोणता धर्म राहावयाचा असेल तर तो बुद्धधर्मच होय.
ज्यांना माझ्याबरोबर बौद्ध धर्माचा स्वीकार करावयाचा असेल त्यांनी यावे. ज्या व्यक्तिचे मन स्वतंत्र नाही तो स्वतंत्र नाही. मी हिंदू धर्माचा त्याग करण्याचा पूर्ण निश्चय केला आहे. ज्यांना त्याग करावयाचा असेल त्यांनी पुढे यावे. मला जे कर्तव्य करावयाचे आहे ते मी करणार. माझ्या आयुष्यात अनेक कामे करावयाची आहेत. जितकी कामे होतील तितकी करीन. माझे वडील हिंदूधर्मात वारले. माझा परिवार याच धर्मात वारला, मीही येथे राहून चालणार नाही. अव्यवहारी मार्ग मला बदललाच पाहिजे.
( प्रबुद्ध भारत – २९ सप्टेंबर १९५६ )
या बौद्ध दीक्षेच्या कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या भारतीय बौद्धजन समितीच्या नागपूरच्या शाखेवर सोपविण्यात आली होती. त्यानुसार समितीचे चिटणीस वा. मो. गोडबोले यांनी धर्मदीक्षेचा कार्यक्रम यशस्वी होण्याच्या दृष्टीने दिनांक २१ सप्टेंबर १९५६ रोजी समितीच्या वतीने पत्रक प्रसिद्ध केले आणि ते भारतातील आंबेडकरी चळवळीतील अनेक लोकांना पाठविले होते. ते पत्रक खालीलप्रमाणे
” MASS CONVERSION
Revered Dr. BABASAHEB AMBEDKAR, the Founder and President of the Buddhist Society of India – The Bharatiya Bouddha Jana Samiti – shall embrace Buddhism at the ceremony to be held at Nagpur at 8 a. m. On the Vijaya Dashami Day – Sunday, the 14 th October, 1956. *Venerable Bhikkhu Chandramani Maha Thera of Burma, now in India, shall perform the ceremony.
People desirous of getting themselves converted shall be able to do so at the very ceremony, and shall be required to wear clean white garments.
APPEAL FOR FUNDS
In this benevolent ceremony the people of India, it is hoped, shall participate in lacs ; and shall render every possible aid to the local Branch of the Bharatiya Bouddha Jana Samiti to whom the Revered Baba has entrusted the task of managing this great ceremony. While rendering the financial aid the local benevolents shall insist on having receipts of the Samiti concerned. Outsiders will kindly remit money by money order.
Those who want to volunteer themselves to assist the management of the celebrations shall see the undersigned on or before the 30 th September, 1956.
(W. M. Godbole),
Secretary,
Bharatiya Bouddha Jana Samiti,(Nagpur-Branch), Kothari Mansion,
Sitabuldi, Nagpur. “
Dated,
21 st Sept. 1956.
( बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्म दीक्षेचा अविस्मरणीय इतिहास – वामनराव गोडबोले )
याप्रमाणे समितीच्या वतीने तारीख १४ ऑक्टोबर १९५६ रोजी आयोजित सामुदायिक धर्मांतराकरिता जाहीर पत्रक काढण्यात आले होते. ते ‘ प्रबुद्ध भारत खास पुरवणी, तारीख १२ ऑक्टोबर १९५६ ‘ मधून प्रकाशित केल्या गेले. ते येणेप्रमाणे—
“॥ नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स ॥
सामुदायिक धर्मांतर
भारतीय बौद्धजन समितीचे संस्थापक व अध्यक्ष परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा बौद्धधर्मदीक्षाग्रहणविधी ब्रह्मदेशीय पूज्य भिक्षू चंद्रमणी महास्थविर यांचे हस्ते नागपूर येथे रविवार, दिनांक १४ ऑक्टोबर, १९५६ विजयादशमीचे दिवशी होईल हे यापूर्वीच जाहीर पत्रकाद्वारे प्रसिद्ध केले आहे.
भारताच्या इतिहासातच नव्हे तर अखिल बौद्ध जगताच्या इतिहासात या महान मंगल समारंभाची छाया आबाल-वृद्ध, स्त्री-पुरुष, अबौद्ध-बौद्ध या सर्वांवरच आहे. अशा या भव्य समारंभात जनता लाखोंच्या संख्येने भाग घेईल यात शंका नाही. परमपूज्य बाबांच्या या महान समारंभाच्या व्यवस्थेचा भार भारतीय बौद्धजन समितीच्या नागपूर शाखेवर सोपविला गेला आहे. जनतेच्या – विशेषतः नागपूर निवासी जनतेच्या सहाय्याने हा भार वाहिला जाणार आहे. तरी उभ्या आयुष्यात एवढा परमपवित्र प्रसंग दुसरा नाही हे जाणून नागपूरवासी जनता तनमनधनाने मदत करील अशी आशा आहे. नागपुरात प्रत्येक मोहल्ल्यात भारतीय बौद्धजन समितीच्या नागपूर शाखेची वर्गणी पुस्तके पाठविली आहेत. तरी आर्थिक मदत देताना पावती अवश्य घ्यावी. बाहेरगावच्या मंडळींनी मनिऑर्डरने समितीच्या चिटणीसांना वर्गणी पाठवावी. या महान समारंभाच्या स्वागत समितीच्या सभासदत्वाची फी २५ रु. आहे. दिनांक १० ऑक्टोबर १९५६ ला किंवा तत्पूर्वी ही फी भरून कोणालाही स्वागत समितीचा सदस्य होता येते.
धर्माचे हे परम पवित्र कार्य अखंड आहे. त्यासाठी परमपूज्य बाबांनी भारतीय बौद्धजन समिती स्थापन केली आहे. वार्षिक वर्गणी १ रुपया देऊन समितीचे सभासद बनणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. समितीच्या सीताबर्डी येथील कार्यालयात सभासदांची नोंदणी मुंबई केंद्रीय समितीचे चिटणीस श्री. भ. स. गायकवाड हे करीत आहेत. तरी प्रत्येकाने १ रुपया देऊन नाव नोंदवून घ्यावे. ज्यांनी मागचे वर्षी वर्गणी दिली त्यांनी देखील या वर्षीची वर्गणी द्यावी व पावती घ्यावी.
या समारंभाला कसलेही तिकीट नाही. जे दीक्षा घेणारे आहेत त्यांना किंवा प्रेक्षकांना कोणालाच तिकीट किंवा फी नाही. या समारंभाला सर्वांनी उपस्थित राहावे ही विनंती.
दीक्षा घेऊ इच्छिणाऱ्यांना विनंती
दीक्षा घेऊ इच्छिणाऱ्यांनी स्वच्छ पांढरी वस्त्रे परिधान करून येणे आवश्यक आहे. मंडपात बायांसाठी व पुरुषांसाठी बसण्याची वेगवेगळी व्यवस्था आहे. तसेच प्रेक्षकांसाठी व दीक्षा घेणाऱ्यांसाठी वेगळी व्यवस्था आहे. दीक्षा घेऊ इच्छिणाऱ्यांची नोंदणी दिनांक ११ ऑक्टोबर १९५६ पासून समितीच्या कार्यालयात तसेच दीक्षेच्या जागी चालू राहील. नोंदणी करवून घेणाऱ्याला विनामूल्य दोन तिकीटे मिळतील. ती सांभाळून ठेवावीत. मंडपातील दीक्षार्थी विभागात प्रवेश मिळण्यास त्या रोजी कामी पडतील. जे जे स्वच्छ पांढरी वस्त्रे घालून येतील अशाच दीक्षार्थीना दीक्षार्थी विभागात प्रवेश मिळेल.
स्वयंसेवकांना विनंती
स्वयंसेवकांनी पांढरा हाफ् शर्ट व पांढरी हाफ् प्यांट घालून यावे. त्यांनी आजपासूनच आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आपल्या कार्याची माहिती करवून घ्यावी व त्याप्रमाणे आपले कार्य तत्परतेने करावे. दीक्षा समारंभाचे वेळी ज्यांची ज्या ठिकाणी नेमणूक केली जाईल त्यांनी त्या ठिकाणीच दीक्षा घ्यावी. दीक्षा घेणाऱ्यांनी काय म्हणावयाचे असते हे लाऊड स्पीकरवरून ऐकू येईलच. त्याप्रमाणे स्वतः म्हणावे.
बाहेरगावच्या स्वयंसेवकांच्या पथकातील मुख्यांनी स्वयंसेवक दलाचे प्रमुख श्री. क. वि. उमरे, श्री. सच्चिदानंद माणके व आर. आर. पाटील यांना भेटून आपल्या कार्याचा वाटा उचलावा.
जनतेस विनंती
हे धार्मिक कार्य परमपवित्र आहे. समारंभाचे सर्व कार्यक्रमात शांतता व स्वच्छता अगदी परिपूर्ण राहील असेच वर्तन प्रत्येकजण ठेवील अशी आशा आहे. मोहल्ल्यातून निघताना मोहल्ल्यातील सर्व स्त्री-पुरुषांनी एकत्रित जमावे व सतत ‘ बुद्धं सरणं गच्छामि ‘, ‘ धम्मं सरणं गच्छामि ‘, ‘ संघम सरणं गच्छामि ‘ सौम्य आवाजात व मधून मधून ‘ भगवान बुद्ध की जय ‘, ‘ डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जय ‘ आणि ‘ बाबासाहेब करे पुकार, बौद्ध धर्म का करो स्वीकार ‘ म्हणत पायी जावे. ज्यांना सोबत झेंडे आणावयाचे असतील त्यांनी बौद्ध झेंड्याविषयी समितीच्या कार्यालयातून माहिती मिळवून त्याप्रमाणे झेंडे तयार करावेत.
सकाळच्या व सायंकाळच्या मधल्या वेळात देखील शांततेनेच भोजनादि कार्य उरकून घ्यावीत ही विनंती आहे. लाखो लोकांची उपस्थिती असल्यामुळे ” क्यू ” लावण्याचा प्रसंग येईल तिथे तिथे रांगेत राहाणे आवश्यक राहील. आपल्या शांत चित्तावर समारंभाच्या व्यवस्थेची यशस्विता अवलंबून आहे. मंडपाबाहेरील ‘ चौकशी दफ्तरात ‘ चौकशी करावी.
कार्यक्रम
स्थळ : माता कचेरी (श्रद्धानंद पेठ) जवळील भव्य पटांगण
कार्यक्रम-दिनांक १२ ऑक्टोबर १९५६ पासून १६ ऑक्टोबर १९५६ पर्यंत राहील. खुलासेवार कार्यक्रम वेगळे पत्रक काढून प्रसिद्ध केले जातील.
अध्यक्ष – पंडित रेवाराम कवाडे, चिटणीस – श्री. वा. मो. गोडबोले,
उपाध्यक्ष श्री. स. म. मेश्राम, सहचिटणीस – श्री. मा. डो. पंचभाई,
उपाध्यक्ष – श्री. एच. डी. आवळे, सहचिटणीस – श्री. पंजाबराव शंभरकर,
उपाध्यक्ष – श्री. मारोतराव साखरकर, सहचिटणीस – श्री. क. वि. उमरे
उपाध्यक्ष – श्री. एच. एल. कोसारे, सहचिटणीस – श्री. बा. ना. वैद्य,
कोषाध्यक्ष – श्री. द. ल. पाटील, सदस्य – श्री. डब्ल्यू. एस्. कामळे,
सदस्य – डॉ. रामटेके इत्यादी २५ “
” नागपूर येथे होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या बौद्ध धर्म दीक्षा विधीस लाखोंनी हजर रहा
१४ ऑक्टोबरला आपापल्या वस्तीत सामुदायिक बुद्ध वंदना साजरी करा
तारीख १४ ऑक्टोबर १९५६ रोजी दसरा सीमोल्लंघनाच्या दिवशी बौद्ध धर्माच्या पुनरुज्जीवनाचे एकमेव भारतीय प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नागपूर येथे बौद्ध धर्म दीक्षा घेणार आहेत हे आता सुप्रसिद्ध झाले आहे. डॉ. बाबासाहेबांच्या भारतीय दलित वर्गाच्या एवढेच नव्हे तर अखिल भारत देशाच्या जीवनातील हा सर्वश्रेष्ठ व अभूतपूर्व असा समारंभ आहे. अर्थात या समारंभासाठी, सर्व दलित व इतर भारतीय बंधुभगिनींनी लाखोंच्या संख्येने हजर राहावे, अशी त्यांना आग्रहाची विनंती आहे.
नागपूर शहरी, या समारंभाबाबत प्रचंड प्रमाणावर तयारी चालू आहे. सर्व दलित कार्यकर्ते अक्षरशः तन-मन-धनाने या समारंभाच्या व्यवस्थेसाठी, प्रयत्नात गढून गेले आहेत आणि सुमारे पाच लाखांपेक्षा अधिक लोकसमुदाय हजर राहील असा अंदाज आहे.
भारतातील सर्व राज्यांमधून या समारंभास दलित बांधव हजर राहातील. गुरुत्वाकर्षणाच्या नियमाप्रमाणे, सर्व भारतातील दलित जनता नागपूर येथे जमा होणार आहे. रेल्वे, मोटारी, बैलगाड्या यांची नुसती रीघ नागपूरच्या रस्त्याने लागून राहिली आहे. नागपूरला जमणार्या प्रचंड गर्दीमुळे आपले साहित्य सुटसुटीत ठेवावे, त्याचप्रमाणे वेळप्रसंगी, मुक्कामाच्या सोयीसाठी, आपला छोटा बिछानाही सोबत घ्यावा.
ज्या दलित बांधवांना नागपूरला येण्याची इच्छा असूनही, काही अडचणीस्तव येता येत नसेल त्यांचे लक्ष, खाली प्रसिद्ध केलेल्या भारतीय बौद्ध महासभेच्या चिटणीसाच्या निवेदनाकडे आम्ही वेधू इच्छितो.
जाहीर आदेश
बंधु आणि भगिनींनो,
आपले पूजनीय नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नागपूर मुक्कामी दिनांक १४-१०-५६ रोजी सिमोल्लंघनाच्या सुमुहूर्तावर बौद्धधर्माची दीक्षा घेत आहेत. नागपूरकरांनी ह्या कामी अविश्रांत मेहनत घेऊन लाखो रुपयांची झीज सोसली आहे. ह्या त्यांच्या दिव्य कार्याने मुंबईकरांना नवी चालना मिळाली असून महामुंबईत चार लाख सभासद नोंदणीचा विधायक कार्यक्रम त्यांनी हाती घेतला आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वयात आलेल्या सर्व स्त्री-पुरुषांनी प्रत्येकी एक रुपया देऊन ” भारतीय बौद्ध महासभेचे “ सभासद व्हावयाचे आहे. इतरांबरोबर तुमच्याही खोलीतील वयात आलेल्या स्त्री-पुरुषास सभासद करून घेण्याची सर्व जबाबदारी तुमची आहे. आपल्या चाळीत स्थानिक शाखा स्थापन झाली आहे ; तिच्यामार्फतच आपण ही जबाबदारी पार पाडावी. ” भारतीय बौद्ध महासभेचा ” हा आदेश कृतीत उतरविण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.
का. वि. सवादकर, वा. कृ. कबीर,
भ. स गायकवाड, चिटणीस – भा. बौ. महासभा.
दिनांक १४ ऑक्टोबर कसा पार पाडावा
भारतीय बौद्ध महासभेच्या सर्व केंद्राधिकाऱ्यांस, शाखा प्रमुखांस तसेच इतर स्थानिक कार्यकर्त्यांस जाहीर करण्यात येते की, आपले पूजनीय नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नागपूर मुक्कामी रविवार दिनांक १४-१०-५६ रोजी बौद्ध धर्म दीक्षा घेत आहेत. त्यांच्या धर्म स्वीकारासमयी शुभेच्छा प्रकट करण्यासाठी सर्व शाखांनी आपआपल्या वस्तीत सामुदायिक बुद्धवंदना घ्याव्यात. बुद्ध वंदना अति शांत वातावरणात पार पाडण्यात याव्यात. वंदनेत सर्व स्त्री-पुरुषांनी भाग घ्यावा. वंदना सकाळी ९ ते ११ ह्या वेळात घेण्यात याव्यात. संध्याकाळी ४ वाजता सर्व केंद्राधिकाऱ्यांनी, शाखा प्रमुखांनी तसेच इतर स्थानिक कार्यकर्त्यांनी सिद्धार्थ कॉलेज, आनंदभवन येथे घेण्यात येणाऱ्या सभेस हजर राहावे.
आपले नम्र,
का. वि. सवादकर, वा. कृ. कबीर,
भ. स. गायकवाड. चिटणीस, भा. बौ. महासभा
दिनांक १३-१०-५६ पर्यंत जमणारी सर्व वर्गणी दिनांक १५-१०-५६ रोजी संध्याकाळी ६ वाजता (बुद्ध भूषण छापखाना) भा. बौ. महासभेच्या कचेरीत भरणा करावी. इतर कार्यासाठी तिचा उपयोग करू नये.
निवेदनाप्रमाणे भारतातील ठिकठिकाणच्या दलित बांधवांच्या शुभेच्छा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बौद्ध धर्म दीक्षादिनी व्यक्त करण्यासाठी, सामुदायिक बुद्ध वंदना घ्याव्यात. या बुद्ध वंदनेत, सर्व आबाल वृद्धांना समाविष्ट करून घ्यावे, कोणीही गैरहजर राहू नये. सकाळी नऊ वाजण्याचे आत सर्वांनी स्नान करून व पांढरे कपडे परिधान करून ९ ते ११ अशी सामुदायिक बुद्ध वंदना करावी. संध्याकाळी आपल्या वस्तीत, सर्वांनी एकत्र जमून, सभा घेऊन, प्रसंगाचे महत्त्व व बौद्ध धर्माची आवश्यकता यावर विवेचन करावे. या सभा अत्यंत शांत, एकोप्याच्या व बंधुभावनेने पार पाडाव्यात. सदर सूचना, भारतीय बौद्ध महासभेच्या चिटणीसांच्या निवेदनाप्रमाणे, जिल्ह्या-जिल्ह्यातील दलित बांधवांकरिता प्रामुख्याने आहेत. त्या उत्कृष्टरित्या पार पाडल्या जातील अशी खात्री आहे.
नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा बौद्ध धर्म दीक्षेचा विधी झाल्यावर मुंबई, पुणे वगैरे अन्य ठिकाणी इतर दलित बांधवांच्या सामुदायिक धर्मांतराच्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे हजर राहू शकतील की काय याची माहिती पुढे प्रसिद्ध करण्यात येईल.
ज्या कोणा दलित बांधवांना नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या बौद्ध धर्म दिक्षेचा समारंभ पाहाण्याचे भाग्य लाभणार नाही, त्यांच्याकरिता ‘ प्रबुद्ध भारत ‘ मध्ये नागपूरची इत्थंभूत माहिती पुढील अंकी देण्यात येईल, छायाचित्रे देखील प्रसिद्ध करण्यात येतील. ‘ प्रबुद्ध भारत ‘ चा खास ” बौद्ध धर्म दीक्षा-अंक ” म्हणूनच प्रसिद्ध होईल. तरी वाचकांनी आपला पुढील अंक राखून ठेवावा. ”
( प्रबुद्ध भारत – १३ ऑक्टोबर १९५६ )
‘ नवयुग ‘ मुंबईच्या वार्ताहराने या बौद्ध धम्मदीक्षेच्या सोहळ्याकरिता हजर रहाणाऱ्यांचे मुंबई ते नागपूर पर्यंतचे प्रवास वर्णन आणि नागपूर येथील सोहळ्याचे वर्णन जे केले आहे ते येणेप्रमाणे :–
” ज्यांच्या आजोबा पणजोबांना रस्त्यावर थुंकण्याची मनाई असल्यामुळे गळ्यात मडकी बांधून हिंडावे लागत होते, ज्यांच्या वाडवडिलांना रस्त्यावर ब्राह्मण येताना दिसला की, त्याच्यावर आपली सावली पडू नये, म्हणून काट्याकुट्यात उड्या माराव्या लागत होत्या आणि आजतागायत ज्यांना खेडोपाडी मृत ढोरांची व्यवस्था करावी लागते, आजतागायत ज्यांना बिगारीसाठी वेठीवर धरले जाते, त्या पाच लाख अस्पृश्य बांधवांनी जीर्णशीर्ण हिंदू धर्माचा त्याग करून ता. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे श्रद्धानंद पेठेत खास उभारलेल्या मंडपात बुद्ध धर्माची दीक्षा घेतली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या लक्षावधी अनुयायांसह ता. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर मुक्कामी बुद्ध धर्माचा स्वीकार करणार ही वार्ता सर्व महाराष्ट्रात जाहीर झाल्याबरोबर सर्व अस्पृश्य समाजात एकच खळबळ उडाली होती. वास्तविक पाहाता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घोषणेत नवीन असे काहीच नव्हते. १९३५ साली सर्व अस्पृश्य बांधवांनी धर्मांतर करावे असा ठराव डॉक्टरसाहेबांच्या नेतृत्वाखाली असलेल्या संघटनेने पास केला होता. तेव्हापासून हा विचार डॉक्टरसाहेब हे भारतातील केवळ एक विद्वान गृहस्थ नाहीत, तर अमानुषपणे हजारो वर्षे वर्णाश्रम धर्माने माणुसकी नष्ट करून टाकलेल्या कोट्यावधी दलित जनतेचे जबाबदार पुढारी आहेत. या दलित समाजाबद्दलची त्यांची आत्मीयता ही भाडोत्री नाही. या दलित समाजाबद्दल त्यांना वाटणारे प्रेम आणि कळकळ ही ” अस्पृश्य समाजाचा उद्धार केला पाहिजे ” या रजोगुणी अहंकारातून निर्माण झालेली नाही. अस्पृश्य समाजाच्या उद्धाराचे कार्य डॉक्टरसाहेबांनी उंटावरून शेळ्या हाकण्यासारखे केलेले नाही. स्वतः त्या समाजातीलच असल्यामुळे त्यांना चातुर्वर्ण्यावर आधारलेल्या हिंदू धर्मात ” स्पृश्य ” समाजातील मानवी प्राणी उत्क्रांतीचे सारे नियम गुंडाळून पशु कसा बनतो हे अगदी जवळून पाहावयास मिळाले होते. अस्पृश्य समजला गेलेला मानवी प्राणी पृथ्वीवर कोठल्याही देशात सापडणार नाही. दगडधोंड्यात सुद्धा ” ब्रह्माचा ” साक्षात्कार मिळणाऱ्या या भारतातच तो हजारो वर्षापासून आढळून येतो. हिंदू धर्माच्या ” उच्च, उदात्त, विशाल ” अशा तत्त्वज्ञानाचा अनुभव व्यक्तिशः डॉक्टरसाहेबांना अगर त्यांच्या हजारो अस्पृश्य बांधवांना क्वचितच मिळाला असेल. वास्तव जीवनात अस्पृश्य बांधवांना न्याय, दया, करुणेचा अनुभव क्वचितच येतो, आणि ” समता ” अनुभवण्यासाठी, तर प्रत्यक्ष शारीरिक मृत्युलाच कवटाळावे लागते. ” आत्मिक समता ” यामुळे साध्य होते असा सनातन्यांचा दावा आहे. बिचाऱ्या अस्पृश्य बांधवांच्या देहाला जिवंतपणी तर सामाजिक समतेचा अनुभव कधी येत नाहीच, पण मेल्यावरही त्याचे प्रेत स्पृश्य हिंदुंच्या स्मशानभूमीत परवा परवापर्यंत जाळले जाणेही अशक्य होते.
या हिंदू धर्मातून बाहेर पडण्याचा निर्णय डॉ. आंबेडकरांनी १९३५ साली घेतला. यात अस्पृश्यांना आश्चर्य ते कसले वाटणार ? त्यांना आश्चर्य याचेच वाटते की, त्यापूर्वीच हा निर्णय का घेतला नाही ? आणि १९५६ पर्यंत निर्णय घेऊन सुद्धा डॉक्टर का थांबले ? स्वतःच्या कोट्यावधी अनुयायांची गंभीर जबाबदारी आणि या अनुयायांच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय प्रश्नांमधील गुंतागुंत यामुळेच डॉक्टरसाहेबांना हा विलंब लागला असावा असे वाटते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या निर्णयाबद्दल त्यांच्याबरोबर मतभेद असू शकेल, पण त्यांच्या विलंबाचा आधार घेऊन त्यांच्या हेतुचा विपर्यास करणे हा तर शुद्ध अधमपणा होता. डॉक्टरसाहेबांच्या या उपक्रमाला ” राजकीय स्टंट ” म्हणून संबोधण्यासही काही विद्वान लोकांनी कमी केले नाही. १४ ऑक्टोबरला नागपूर मुक्कामी या तथाकथित ” स्टंटचे ” प्रात्यक्षिक ज्यांनी ज्यांनी पाहिले असेल त्यांना त्यांना या कुत्सित टीकेची चीड येणे स्वाभाविकच होते आणि तिचा फोलपणा तर मैदानावर जमलेल्या सुमारे पाच लाख लोकांनी बुद्ध धर्माची दीक्षा घेऊनच सिद्ध केला. सनातन वर्णाश्रम धर्मावर इतका जबरदस्त प्रहार भगवान बुद्धानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीच केला या विधानाला प्रत्यक्ष इतिहासाचीच ग्वाही मिळू शकते आणि म्हणूनच बाबासाहेबांच्या लक्षावधी अनुयायांच्या तोंडून आज एकच घोषणा निघत आहे ;
बाबासाहेब करे पुकार ।
बुद्धधर्मका करो स्वीकार ।
अस्पृश्य समाजाच्या आणि सवर्ण हिंदू समाजाच्या दृष्टीने सुद्धा ही युगप्रवर्तक सामाजिक घटना प्रत्यक्ष घडत असताना तिथे हजर राहाण्याची संधी मला मिळाली याबद्दल मी स्वतःला धन्य समजतो.
नागपूरला एक दिवस अगोदर पोहोचणे बरे असा सूज्ञ विचार करून मी १२ तारखेला रात्रीच नागपूर एक्सप्रेसने निघालो. टिकिट काढले आणि बोरीबंदर स्टेशनवरच खडूने लिहिलेला एक मोठा बोर्ड मी पाहिला. ” नागपूरला जाण्यासाठी स्पेशल ट्रेन रात्री सव्वा नऊला सुटणार आहे ” असे या बोर्डावर लिहिले होते. स्टेशनवर
“आकाश पाताळ एक करो l
बुद्ध धर्मका स्वीकार करो l “
” परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जय “,
” भगवान गौतम बुद्ध की जय l “
या घोषणा हजारो मुखातून होत होत्या. स्त्रिया, मुले, म्हातारे, तरुण एकच धावपळ करताना दिसत होते. अस्पृश्य समाजातील सुशिक्षित मंडळी प्रोफेसर, डॉक्टर, वकील हे आपापसात जोराजोराने ” बौद्धिक पातळीवर ” चर्चा करीत होते. अस्पृश्य समाजातील शेकडो रेल्वे कामगार, गिरणी कामगार, म्युनिसिपालिटीमधील कामगार उत्साहाने घोषणा देत होते. या वेळचे एक दृश्य मी कधीही विसरणार नाही. वयाने बहुतेक साठी उलटलेली, पण अंगापिंडाने मजबूत, पदर कमरेत खोचलेला, हातावर कोपरापर्यंत गोंदविलेले अशी एक बाई एका तरुण मुलीला हात धरून नागपूर एक्स्प्रेसच्या डब्याकडे खेचून घेऊन जात होती. जाता जाता घोषणाही देत होती. हसत होती. जास्त चौकशी करता ही बाई वडाळ्याला राहात होती असे समजले. ती, तिची सून, तिचा मुलगा सगळे कुटुंबच्या कुटुंबच नागपूरला बुद्ध होण्यासाठी निघाले होते. स्पेशल ट्रेनने या म्हणून तिची विनवणी अनेक कार्यकर्त्यांनी केली, समता सैनिक दलाच्या लोकांनीही तिला विनंती केली. पण म्हातारीने – म्हातारी कसली ती ? ते साफ नाकारले आणि ” मला पण तुमच्या दलात घ्या. ” अशी उलट तिने स्वयंसेवकांना विनंती केली. शेवटी म्हातारी डब्यात चढलीच आणि दारात उभे राहून घोषणा देऊ लागली.
स्टेशनवर आलेल्या इतर मंडळीकडेही मी कुतूहलाने पाहात होतो, आणि ते काय बोलतात ते लक्षपूर्वक ऐकत होतो. एका सुशिक्षित ब्राह्मणाची मुलगी आपल्या नोकरीवर चाललेल्या नवऱ्याला निरोप देत होती. या घोषणांनी बिचारी हैराण झालेली दिसली. काही कॉलेज विद्यार्थी आपसात ” हे काय बुवा आज नवेच ” अशा भावनेने मिस्कील चेहरा करून पाहात होते. ” अरे, डॉ. आंबेडकर बुद्ध होताहेत ” असे त्यांच्यापैकी कोणीतरी सांगितले. फर्स्ट क्लासच्या डब्याजवळ कोणीतरी सन्माननीय कॉंग्रेस पुढारी उभे होते आणि त्रासिक मुद्रा करून घोषणा ऐकत होते. त्यांच्याजवळ घोळका करून त्यांचे काही चाहते उभे होते, त्यांना या महाशयांनी सुनावले ” अरे बुद्ध व्हा नाहीतर आणखी काही व्हा. निवडणुकीची वेळ मात्र डॉ. आंबेडकरांनी बरोबर शोधून काढली अं ! ”
एका डब्यात शे. का. फे. चे मुंबई, महाराष्ट्रातील प्रमुख पुढारी आणि कार्यकर्ते बसले होते. त्यांची चर्चा ऐन रंगात आली होती. मुंबईचे आमदार बी. सी. कांबळे व के. आर. पवार वकील, पुण्याचे श्री. शंकरराव खरात वकील, सिद्धार्थ कॉलेजमधील प्रो. करडक, अहमदनगरचे श्री. डी. टी. रूपवते वकील ही मंडळी साधारणपणे माझ्या परिचयाची होती. पण त्यांच्या चर्चेमध्ये अडथळे यावयास नको म्हणून मी पलिकडच्या डब्यात जाऊन बसलो. गाडीत झोप कुठली ? प्रत्येक स्टेशनवर लोक येत होते. घोषणा चालू होत्या. कार्यकर्ते एकमेकांना मिठ्या मारीत होते. हसत होते. त्यांच्या उत्साहाला सीमा नव्हती. मनमाड स्टेशनवर तर इतकी गर्दी होती की, माणसाला उभे राहाण्याससुद्धा प्लॅटफॉर्मवर जागा नव्हती. गाडीतही जागा नव्हती. मागच्या स्पेशल ट्रेनने या, अशी कार्यकर्ते येणाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करीत होते. काही ऐकत होते, काही न ऐकताच डब्यात घुसत होते. घोषणा चालू होत्याच.
तेरा तारखेला दुपारी सव्वातीन वाजता नागपूर मुक्कामी गाडी पोहोचली. स्टेशनवर शंभर तरी स्वयंसेवक असतील. महाराष्ट्र शे. का. फे. चे अध्यक्ष श्री. दादासाहेब गायकवाड स्वतः स्टेशनवर हजर होते. स्वयंसेवक सर्वांची व्यवस्था पद्धतशीरपणे लावीत होते. स्टेशनबाहेर पडण्यास मला जवळ जवळ वीस मिनिटे लागली !
स्टेशनबाहेर रस्त्यावर, हातात पिशव्या घेतलेल्या, अंगात एक मळका सदरा, एखादी सुरकतलेली टोपी अशी हजारो माणसे दिसली. चौकशी करता समजले की, आजुबाजूच्या खेड्यापाड्यातून हे हजारो लोक नागपुरी भाषेत बोलायचे म्हणजे ” येऊन राहिलेत. ” “त्यांची उतरण्याची सोय कुठे केली आहे ? ” मी स्वयंसेवकाला विचारले. ” गावातल्या बहुतेक सगळ्या प्राथमिक शाळांच्या इमारतींमधून यांची सोय केली आहे. पण ती अपुरी पडणार असा रंग दिसतो. ”
” किती लोक समारंभासाठी येतील असे तुम्हाला वाटते ? ”
” अबब, त्ये कोन सांगणार ? दोन चार लाख तर सहज येतील. ”
मुंबईहून आलेल्या स्वयंसेवकात उत्कृष्ट शिस्त दिसली आणि अशा समारंभाचा त्यांना चांगला अनुभवही दिसला. स्टेशन बाहेर आल्याबरोबर त्यांचा शिस्तीत ” मार्च ” सुरू झाला. मधून मधून ते घोषणा देत होते. मी टॅक्सी ठरवली आणि हॉटेलमध्ये सामान टाकले. आंघोळ केली आणि वार्ताहराचे पॅड हातात घेऊन बाहेर पडलो.
नागपूर शहराला एक नवीनच स्वरूप आलेले दिसले. जिकडे तिकडे माणसेच माणसे ! झुंडीच्या झुंडी चालल्या होत्या. चातुर्वर्ण्याच्या बाहेरील
जनताजनार्दनाचे हे ” परब्रह्मी ” विशाल स्वरूप मी जन्मात कधी विसरणार नाही. आपल्या असामान्य नेत्याच्या हाकेला ओ देऊन हे लोक नागपूरला जमा होत होते. आपल्या नेत्याची आज्ञा वंदनीय मानून त्याच्या पाठोपाठ बुद्ध धर्माची दीक्षा घेण्याचा निश्चय त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता. ते गंभीर होते पण आनंदी होते. भारताच्या चारी कोनातून लाखो अस्पृश्यांनी नागपुरात गर्दी केली आहे. रेल्वे, मोटारी, रिक्षा, बैलगाड्या आदी वाहनांचा उपयोग दूर दूरहून येणारे करीत होते. वाहनांच्या धंदेवाल्यांचे उखळ पांढरे होत होते, पण यापेक्षाही जेव्हा मला हजारो अस्पृश्य बांधव पुण्यापासून पंढरीच्या यात्रेला पायी जावे त्याप्रमाणे नागपूरला येत आहेत असे दिसले, तेव्हा तर माझ्या आश्चर्याला सीमा राहिली नाही. ७५ /१०० मैलावरूनही हे लोक नागपूरला येत होते. वाटखर्चाच्या पैशाची सोय स्वतःजवळचे किडुक मिडुक विकून त्यांनी केली होती. कित्येक लोकांना गावच्या लोकांनी वर्गणी जमा करून पाठविले होते. त्यांच्या उत्साहाला सीमा नव्हती. त्यांच्या ” जय भीम ” च्या आणि इतर घोषणांना खंड नव्हता. एका काळी बौद्ध महापंडित नागार्जुन यांच्या वास्तव्याने पुनीत झालेले हे नागपूर शहर आज तमाम अस्पृश्य समाजाचे धर्मक्षेत्र झालेले दिसले.
नागपूर शहरामध्ये वाहनांची अतिशय गैरसोय आहे. मुंबईसारख्या मीटर असलेल्या टॅक्सी नाहीत आणि पुण्यासारख्या ऑटोरिक्षा नाहीत. टॅक्सी तासावर ठरवावयाची आणि किमान साडेतीन रुपये तास भाडे द्यावयाचे. टॅक्सी ड्रायव्हर ताबडतोब वर्दळीवर येणारे ; बरे सायकल रिक्षा करावी तर ते पुण्या-मुंबईकडील माणसाला कसेसेच वाटते आणि गावातील वातावरण बुद्धमय. बुद्धाच्या जयजयकाराच्या घोषणा आजुबाजूला होत असताना, एक माणूस दुसऱ्या माणसाला धापा टाकीत ओढून नेतो आहे हे दृश्यच एकंदर वातावरणाशी विसंगत वाटते. मी शेवटी एक टॅक्सी ठरविली आणि सर्व दीक्षार्थी निवासांना भेट देण्याचे ठरविले. या सर्वांची सोय प्राथमिक शाळांमधून केली होती. प्रत्येक ठिकाणी स्वयंसेवक होते आणि ते पाणी देणे वगैरे कामे त्वरेने करीत होते. बरेचसे लोक हॉटेलात जावून काही तरी खात होते, पण अनेक ठिकाणी तीन दगडाच्या चुली मांडून त्यावर कित्येक बाया भाकऱ्या भाजीत असलेल्या दिसल्या. ठिकठिकाणी लोक दहा-दहा, पाच-पाच असे बसून चर्चा करीत होते. लेनिनने कोठे तरी म्हटले आहे की, जी गोष्ट शिकण्यास एरवी वर्षानुवर्षे लागतात, तीच गोष्ट क्रांतीच्या काळात जनता काही दिवसातच शिकते. या दोन दिवसात नागपूरला जमलेल्या लाखो लोकांनी तत्त्वज्ञानाचे, धर्माचे, सामाजिक परिस्थितीचे जितके ज्ञान मिळविले तितके त्यांना आतापर्यंत कधीच मिळालेले नाही, असे म्हटल्यास बिलकूल अतिशयोक्ती होणार नाही.
अखंड चर्चा
या सर्व निवासस्थानांमध्ये अखंड चर्चा चालू होती. कामगार – शेतकरी या वर्गातीलच बहुतेक लोक दिसत होते आणि चर्चा चालली होती तरी किती प्रकारे ? काही ठिकाणी गंभीरपणे, आता आपल्या गावातील मंडळी आणि ” बामण ” काय म्हणतील याची चर्चा चाललेली दिसली. काही ठिकाणी कोणातरी वृद्ध माणसाच्या ” पंढरीला ” जाण्याची थट्टा तरुण मंडळी करीत होती. काही ठिकाणी आपल्या गावातील भूतखेत आता पळून जातील अशी ग्वाही तरुण मंडळी बरोबर आलेल्या वृद्ध मंडळींना देत होती. एके ठिकाणी तर एक तरूण खेडूत आपल्या आईला ” आता कसं तुझ्या अंगात येतंय ते बघतो ” असे हसून सांगत होता, त्याची तरूण बहीण त्याला साथ देत होती आणि हसत होती. त्याची म्हातारी आईही त्याला हसून यापुढे आता माझ्या अंगात येणार नाही असे आश्वासन देत होती. एका १५ /२० लोकांच्या घोळक्यात स्वयंसेवकांच्या मदतीने मी घुसलो आणि त्यांच्या गप्पात सामील झालो. एक कट्टर आंबेडकरवादी तरूण गोष्ट सांगत होता ती जशीच्या तशी या ठिकाणी देण्याचा मोह मला आवरत नाही. ” आमच्या गावात महारवाड्याच्या एका टोकाला आहे म्हसोबा आणि दुसऱ्या टोकाला आहे मरीआई. आम्ही एकदा काय केलं, रात्री उठून मरीआईला म्हसोबाच्या जवळ टाकून द्यावयाची असे ठरविले. अर्थात गावातले हे (त्याने काही वृद्ध स्त्री-पुरुषांकडे बोट दाखविले) आमच्या फार विरुद्ध होते पण आम्हाला तर टिंगल करायची होती, म्हणून आम्ही असं उठविलं की, मरीआई म्हसोबाकडे चालत जात होती असे आम्ही पाहिले ! तिचे वर्णन केले, मळवट वगैरे तिने कसा भरला होता तेही सांगितले आणि महारवाड्यात, त्याचा परिणामही झाला. त्या दिवशी मरीआईचे तीन-चार दगड आम्ही रात्री उचलले आणि थोडे फार चालून गेलो नाही तोच कोणाची तरी चाहूल लागली, आम्ही मरीआईच्या दगडाला तिथेच टाकले आणि पळालो. दुसऱ्या दिवशी महारवाड्यात एकच कल्लोळ उडाला. पंचाक्षरी आला आणि मंत्र बडबडायला लागला, इतक्यात आमच्यापैकी एकाच्या डोक्यात अक्कल आली आणि तो म्हणाला, अरे, मरीआई फक्त रात्री चालते, तिला निघायला उशीर झाला आणि थोडी चालली नाही तोच पहाट झाली. त्याबरोबर ती आहे तिथेच पुन्हा दगड होऊन पडली, अहिल्येसारखी, ” गोष्ट संपली आणि सारे खो-खो हसत सुटले, आणि त्यात ते वृद्ध स्त्री-पुरूष सामील झालेले दिसले. शेवटी तो म्हातारा म्हणाला, ” आता गावी गेल्याबरोबर ती मरीआई आणि तो म्हसोबा, दोघांनाबी नदीत फेकून देऊ. आता बाबांची आज्ञाच अशी आहे. बाबा सांगतो तर आपल्याला मरीआईची बी जरूरी काय ? आणि म्हसोबाची बी जरूरी काय ? ”
” रेनायझन्स ” मला प्रत्यक्षात पाहावयास मिळत होता. मनुष्याने सत्कर्मरत व्हावे येवढेच, देवाची त्याला काहीही जरूरी नाही. देव नाही. सबझूट ! या निर्णयाला लाखो लोकांनी ; या सर्व तऱ्हेचे लोकभ्रम हाडीमाशी खिळलेल्या भारतात येणे म्हणजे काय साधी गोष्ट आहे ? जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे डॉ. आंबेडकरांनी ती गोष्ट साध्य केलेली मला प्रत्यक्षात दिसली.
यानंतर मी मंडपाच्या व्यवस्थेची माहिती तेथे जाऊन मिळविली. नागपूर येथे दक्षिण अंबाझरी रस्त्यावर अंधविद्यालयापलिकडच्या प्रशस्त पटांगणात बुद्धकालीन शिल्पानुसार भव्य स्तूप उभारण्यात आला होता. सुमारे ४/५ लाख लोक बसू शकतील एवढा खुला मंडप होता.
या मंडपासमोर सडकेच्या डाव्या बाजूला दुकानांची ओळ लागलेली होती. एरवी निर्जन असलेल्या या पटांगणाला प्रचंड यात्रेचे स्वरूप आलेले दिसले. मंडपाचे काम गेले आठ दहा दिवस चालले होते. शेकडो अस्पृश्य बांधव त्या ठिकाणी श्रमदान करत होते. सुमारे ५० ते ७५ हजार रुपये या श्रमदानाने वाचविले आहेत. आता फक्त २५/३० हजार रुपये रोख दीक्षा समारंभाला लागतील असे कार्यवाह यांच्याकडून समजले. एकूण जवळ-जवळ १ लक्ष रुपये या दीक्षा समारंभाला खर्च होतील असा अंदाज आहे. ज्या स्तूपासमान व्यासपीठावरून बाबासाहेबांचा दीक्षा समारंभ झाला त्या ठिकाणी एक कायमचे स्मारक होणार असेही समजले.
नवे धर्मक्षेत्र
नागपूर हे अस्पृश्य समाजाचे नवे धर्मक्षेत्र बनणार हे आता स्पष्ट दिसते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाशी नागपूर हे प्रथमपासूनच निगडीत आहे. १९३० साली नागपूर जवळ कामठी येथेच डॉक्टरसाहेबांनी संयुक्त मतदार संघाला विरोध करून विभक्त मतदार संघाची मागणी केली. पहिले शे. का. फे. चे अधिवेशन नागपूरलाच झाले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नागपूरलाच बुद्ध धर्माची दीक्षा घेत आहेत. ‘ नागपूर ‘ जवळच रामटेकच्या टेकडीत बौद्ध महापंडित नागार्जुनची गुहा आहे. पूर्वी हे शहर बौद्धांचे तिर्थक्षेत्र होतेच. आता परत नव्याने या शहराला तेच महत्त्व प्राप्त होणार हे उघड आहे. या मंडपाच्या ठिकाणीच मला समजले की, डॉक्टरसाहेब आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. डॉ. माईसाहेब आंबेडकर हे तेथे आलेले असून त्यांचा मुक्काम बर्डीवरील शाम हॉटेलमध्ये आहे. डॉ. साहेबांना दीक्षा देण्यासाठी काशिया (प्राचीन इतिहासात कुशीनारा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या) गावाहून सुप्रसिद्ध ब्रह्मी बौद्ध भिक्षु चंद्रमणी महास्थविर हे आज नागपूरास आले आहेत, त्यांच्याबरोबर आणखीही पाचसहा बौद्ध भिक्षु आलेले आहेत.
पहाटे ३ च्या सुमारासच घोषणा ऐकून मी जागा झालो आणि खिडकीपाशी जाऊन पाहू लागलो. रस्त्यावरून मुंग्यांसारखी माणसे चालली होती. वातावरण शांत होते, घोषणा गंभीर होत्या. लोक भराभर मंडपात जागा अगोदर पटकावण्यासाठी जात होते. सकाळी सहा वाजता मीही या जनसमुदायात सामील झालो आणि मंडपाकडे निघालो. बहुतेक स्त्री-पुरुषांनी पांढरी शुभ्र वस्त्रे परिधान केलेली होती. तशा तऱ्हेची सूचना सर्वांनाच देण्यात आली होती.
मी मंडपात प्रवेश केला. मुंबई समता सैनिक दलाने व्यवस्था उत्कृष्ट ठेवली होती. कोठेही गडबड नव्हती, गोंधळ नव्हता. श्रद्धायुक्त अंतःकरणाने लोक शांतपणे मंडपात प्रवेश करून स्वयंसेवकाने दाखविलेल्या जागी बसत होते. सकाळी सात वाजताच निम्मा मंडप भरलेला दिसला. दोन अडीच लाख लोक तरी असावेत. वार्ताहरांपैकी अद्याप कोणीही आलेले नव्हते. वार्ताहरांसाठी स्टेज जवळच व्यवस्था केली होती. लाऊडस्पीकरची व्यवस्था उत्कृष्ट होती. लाऊडस्पीकरवरून नेहमीप्रमाणे मुलगी हरवली, मुलगा हरवला, अशा सूचना होत होत्या. समाज सारखा वाढत होता.
याच वेळी लाऊडस्पीकरवरून एक महत्त्वाची घोषणा झाली. ” दीक्षार्थींना प्रवेशपत्रिका देण्यात आल्या, पण दीक्षार्थींची संख्या इतकी वाढली की प्रवेशपत्रिका संपल्या. तेव्हा कोणीही मला दीक्षा घ्यावयाची असे सांगितले की, त्याला आत सोडा आणि दीक्षार्थी मंडपात नेऊन बसवा ” अशी लाऊडस्पीकरवरून घोषणा करावी लागली. समाज वाढतच होता, जनतेच्या अफाट उत्साहामुळे पूर्वनियोजित कित्येक व्यवस्था कोलमडून पडत होत्या. पण त्या उत्साहामुळेच सर्व काही व्यवस्थितपणे पार पडत होते.
मानवी प्रेमभावना
मी स्तूपाच्या आकाराच्या विशाल व्यासपीठाकडे नजर टाकली. भगवान बुद्धाची धीरगंभीर प्रतिमा सर्व मानव जातीला आपला आशिर्वाद देत होती. डॉ. बाबासाहेबांची प्रतिमा लाखो लोकांना उत्साह आणि आश्वासन देत होती. बुद्ध धर्माचा झेंडा शांतपणे वाऱ्यावर फडफडत होता. व्यासपीठावरही भगवान बुद्धाची एक प्रतिमा होती. तिच्यापुढे उदबत्या जळत होत्या. त्यांचा मंद चंदनी सुवास वातावरणात एक प्रकारे गंभीरता निर्माण करीत होता. माणूस माणसाच्या जास्त जास्त जवळ येत होता. सर्वांच्या अंतःकरणात एकच मानवी प्रेमाची भावना उफाळत होती. मित्र एकमेकांना भेटत होते. एकमेकांचे सुहास्य मुद्रेने स्वागत करीत होते. राग, द्वेष, असूया मंडपातून हद्दपार झाले होते. लाऊडस्पीकरवरून घोषणा होत होती, ‘ भगवान गौतम बुद्ध की जय. ‘
सकाळचे नऊ वाजले, जमाव वाढतच होता. मैदान जवळ जवळ पूर्ण भरलेले दिसले. वृत्तपत्र वार्ताहर अंदाज करू लागले. बहुतेक सर्वांच्या मते सुमारे पाच लाख लोक तरी जमले असावेत. परत शिट्या वाजल्या आणि एकच खळबळ उडाली. लाऊडस्पीकरवरून लोकांना शांत राहाण्याचे आदेश एकसारखे देण्यात येत होते. तीन चार मोटारी व्यासपीठाकडे येत होत्या. लाऊडस्पीकरचे आदेश मानण्याच्या मनःस्थितीत लोक नव्हते. ” परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जय ” ही एकच घोषणा लक्षावधी मुखामधून होत होती. बरोबर सव्वा नऊ वाजले होते आणि मोटारमधून उतरून दोन माणसांच्या खांद्यावर हात टाकून डॉ. बाबासाहेब हळूहळू स्टेजवर जात होते. ” पुरःस्सर गदासवे
झगडता तनू भागली ” याचे हे मूर्तिमंत दृश्य होते. लक्षावधी लोकांच्या डोक्यात एकच विचार घोळत होता. डॉक्टरसाहेबांनी स्वतःचे शरीर अक्षरशः तिळ तिळ झिजवून अस्पृश्य समाजाला काही तरी बरे दिवस दाखविले. डॉक्टरसाहेबांच्या शत्रुंना देखील हे मान्य करावे लागेल. या वेळपावेतो डॉक्टरसाहेब आणि त्यांच्या पत्नी व्यासपीठावर चढून बसल्या होत्या. घोषणांचा पहिला पूर ओसरला होता. वातावरण परत शांत होत होते आणि मुख्य समारंभाला लवकरच सुरूवात होणार होती. डॉ. आंबेडकर यांनी शुभ्र रेशमी धोतर परिधान केले होते. त्यांच्या अंगावर तशीच शुभ्र शाल होती. त्यांच्या धर्मपत्नीनेही पांढरेशुभ्र वस्त्र धारण केले होते. व्यासपीठावर शेडयूल्ड कास्ट्स् फेडरेशनचे बहुतेक पुढारी प्रामुख्याने दिसत होते. ” (नवयुग : मुंबई, रविवार दिनांक २१ ऑक्टोबर १९५६.)
(धर्मांतराच्या या ऐतिहासिक घटनेचा वेध घेणारा बी. सी. कांबळे यांचा लेख ” प्रबुद्ध भारत: डाॅ. आंबेडकर बौद्ध दीक्षा विशेषांक -दिनांक २७ ऑक्टोबर १९५६ च्या अंकात प्रकाशित झाला होता. तो इथे देत आहोत. )
डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखो अनुयायांसह घेतलेल्या बौद्ध धर्म दीक्षा – समारंभाच्या ऐतिहासिक घटनेबद्दल दिनांक २७ ऑक्टोबर १९५६ च्या प्रबुद्ध भारत : डाॅ. आंबेडकर बौद्ध दीक्षा विशेषांकात लिहीलेल्या लेखात बी. सी. कांबळे लिहीतात —
” तारीख २३ सप्टेंबर १९५६ चे ऐतिहासिक निवेदन
या बौद्ध दीक्षा विधी समारंभाच्या माहितीची सुरूवात तारीख २३-९-१९५६ पासून करावी लागेल. या तारखेस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिल्लीतील २६, अलिपूर रोडच्या आपल्या निवासस्थानातून एक निवेदन जाहीर केले. ( हे निवेदन डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लाखो अनुयायांसह घेतलेल्या बौद्ध धर्म दीक्षा विधी समारंभाच्या या वृत्तांताच्या सुरुवातीसच – डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संदेश या मथळ्याखाली दिलेले आहे.) ते निवेदन बिलकूल छोटे होते. जेमतेम ४-५ ओळींचा मजकूर त्यामध्ये होता. भारतामध्ये बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन करण्यासाठी प्रत्यक्ष बौद्ध धर्म स्वीकाराचा जो इतिहास लिहिला जाईल, त्यामध्ये इतिहासकारांना या निवेदनास खास महत्त्व द्यावे लागेल एवढेच नव्हे तर भारतीय भूमीत बौद्ध धर्माच्या पुनःश्च बीजारोपणाचे, त्यामुळे भारतभर व्हावयाच्या प्रचंड प्रसाराचे मूलांकूर या निवेदनामध्ये सापडतील.
हे निवेदन वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले होते. दैनिक बातम्या देणाऱ्या भारतीय वृत्तपत्रांनी, हे त्रोटक निवेदन, त्यांच्या सोईप्रमाणे, एका कॉलममध्ये तसेच दिले. जणू अनेक बातम्यांपैकी, ही नित्यापैकी एक बातमी असावी त्याप्रमाणे वृत्तपत्रांनी त्या निवेदनाची सामान्य दखल घेतल्याप्रमाणे वर्तन केले व त्या बातमीवरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे बौद्ध धर्म स्वीकारणार ही माहिती अखिल भारतीयांना कळली.
धर्म पुरुषांची प्रथम वाणी
तथापि, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या त्रोटक निवेदनामध्ये किती विलक्षण सामर्थ्य आहे व ते भारतीय समाजरचनेचा विचार करता, किती असामान्य प्रतीचे आहे, याची कल्पना भारतीय वृत्तपत्रांना जवळजवळ आलीच नाही, असे म्हणावे लागते. या निवेदनातील वृत्त नेहमीच्या वृत्तांप्रमाणे नव्हते. रोजची वृत्तपत्रात येणारी बातमी व सदर निवेदन यामध्ये सर्वदृष्टींनी महान फरक होता. ज्या ज्या धर्मसंस्थापकांनी, अगर त्या त्या धर्माचे पुनरुज्जीवन करणाऱ्या महापुरुषांनी, धर्म स्थापनेसाठी अथवा त्या धर्मावरील ग्लानी दूर करण्यासाठी आपली प्रथम वाणी उच्चारली त्याप्रमाणे त्या प्रथम वाणीची बातमी पोहोचविणारे हे निवेदन होते.
बौद्ध दीक्षेचा निश्चय करण्यापूर्वी
सदर निवेदनावर सही करण्यापूर्वी त्याचप्रमाणे बौद्ध दीक्षेचा विधी, ठिकाण व तारीख ठरविण्यापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी किती तासन्तास विचार केला असेल याची कल्पना कोणासही येणार नाही. हा निर्णय घेण्यापूर्वी, त्यांच्या नजरेपुढे या घटनेचे संभाव्य असे कोणकोणते परिणाम भारतातील दलित जनतेवर, भारतीयांवर व जगातील इतर जनांवर होतील, याचे चित्र खचित उभे झाले असेल. निरनिराळ्या धर्माच्या इतिहासाची पाने त्यांच्या मनःचक्षूसमोरून भराभर गेली असतील. ख्रिश्चन धर्म, मुसलमानी धर्म, बौद्ध धर्म आदी प्रमुख धर्म जगात का व कसे उदय पावले, त्यांचा प्रसार कसा झाला व त्यापैकी काहींचा अस्त का झाला याचे त्यांनी पुनः पुनः मनन केले असेल. भारतीय दलितांना
व विशेषतः मानीव अस्पृश्य समाजास बौद्ध धर्माच्या आश्रयाशिवाय दुसरा काही परिणामकारक मुक्ततेचा मार्ग आहे काय याचाही पुनः पुनः त्यांनी पडताळा घेतला असेल व शेवटी त्यांची सर्व सद्सद्विवेकबुद्धि केंद्रित होऊन परम निश्वयाने एकमेव सन्मार्ग म्हणून बौद्ध दीक्षा घेण्याचे जाहीर करणाऱ्या निवेदनावर सही केली असेल. मनोविश्लेषणाच्या दृष्टीने विचार केला तर ता. २३ सप्टेंबर १९५६ चा दिवस डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील अभूतपूर्व, हर्षयुक्त व निश्चयाच्या कसोटीला आपण उतरलो याचे अत्यंत उत्कट असे दर्शन घडविणारा ठरला आहे.
बौद्ध जगतावरील परिणाम
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बौद्ध दीक्षा घेण्याच्या निवेदनाचा चित्तवेधक परिणाम निदान भारतीय दलित वर्गात व जागतिक बौद्ध जनात झाला यात शंकाच नाही. बौद्ध जनांनी ब्रह्मदेश, सिलोन, जपान, नेपाल आदी देशांमधून या निवेदनाचे अत्यंत हर्षाने स्वागत केले. बौद्ध-दीक्षा-विधीसंबंधी, अखिल बौद्ध जगतातील जे संदेश आलेले आहेत त्यावरून ती गोष्ट बिलकूल स्पष्ट होते. या संदेशांशिवाय बौद्ध जनांनी सदर दीक्षा विधीबाबत जो बंधुभाव व्यक्त केला तो कृतीत दिसून आला. ब्रह्मदेशाचे पूज्य भिख्खु चंद्रमणी महास्थवीर हे ८० वर्षाचे ! भारतातील सर्वात वृद्ध भिख्खु ! परंतु त्यांनी आपल्या प्रकृतिमानाकडे न पहाता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना बौद्ध दीक्षा देण्यासाठी स्वतः येण्याचे मान्य केले व ते आलेही. त्यांच्या हस्तेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर व सौ. माईसाहेब आंबेडकर यांचा बौद्ध-दीक्षा-विधी पार पडला.
याशिवाय, खालील बौद्ध भिख्खु सदर समारंभास होते–
(१) थेरो पन्नातिस, सांची विहार ( भोपाळ )
(२) व्हेनरबल भिख्खु एच. सिद्धतिस, ( सिलोन )
(३) व्हेनरबल, एम. सौघरत्तना, सारनाथ ( बनारस )
(४) भिख्खु जी. प्रज्ञानंद, बुद्ध विहार ( लखनौ )
(५) नेर श्रमनेर, धम्मोदय विहार ( पश्चिम बंगाल )
(६) रिव्हीरर्ड परमसंधी
पाच कोट बौद्ध
एवढे भिख्खु निरनिराळ्या देशातून व विभागातून आले ही सामान्य घटना नव्हे. बौद्ध जगताला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बौद्ध दीक्षेबद्दल आकर्षण वाटणे दोन दृष्टींनी स्वाभाविक आहे. एक कारण हे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा दीक्षाविधी म्हणजे मोजून गणित केल्याप्रमाणे भारतातील सुमारे पाच कोट अस्पृश्य बांधवांचाच दीक्षाविधी होय हे त्यांच्या (डॉ. बाबासाहेबांच्या) मागे असलेल्या अनुयायांच्या संख्येवरून व अनुयायांच्या निष्ठेवरून मानावयास मुळीच हरकत नाही हे त्यांनी ओळखले. भारतामध्ये प्रथम दृढमूल झालेली पण आज बिलकूल सुकून गेलेली बौद्ध धर्माची पाळेमुळे पुनःश्च टवटवीत कशाने होणार असतील तर भारतातील दरेक खेड्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जे असंख्य अनुयायी आहेत, त्यांच्या दीक्षाविधीने व निष्ठेनेच होतील, हे आता बौद्ध जनास चांगलेच कळून चुकले आहे. तेव्हा या दृष्टीने बौद्ध जगताला, डॉ. बाबासाहेबांच्या बौद्ध दीक्षेबद्दल आकर्षण वाटणे स्वाभाविक होते.
मूर्तिमंत प्रज्ञा मिळाली
परंतु याहीपेक्षा दुसऱ्या दृष्टीचे आकर्षण त्यांना अधिक होते, असे म्हणावयास हरकत नाही. बौद्ध धर्मामध्ये प्रज्ञेचे स्थान सर्वश्रेष्ठ आहे. शांतता, न्याय व प्रज्ञा असा क्रम बौद्ध धर्माच्या शिकवणुकीचा आहे. बुद्ध म्हणजे प्रज्ञावंत, आणि प्रज्ञा म्हणजे ज्ञान संपन्न व जीवन विन्मुक्त ! डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अलौकिक बुद्धिमत्तेकडे सहज दृष्टी टाकली तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे मूर्तिमंत प्रज्ञाच आहे असे म्हणण्यात अतिशयोक्तिची चूक होईल असे वाटत नाही. अशी प्रज्ञामय व्यक्ती लाभणे अत्यंत दुर्मिळ असते. लक्षावधी, नव्हे. करोड़ो रुपये देखील खर्ची घालून अशा व्यक्तीचे साधे मत अगर पाठिंबा मिळविणे कठीण असते. ज्ञान ही अपूर्व मोलाची चीज आहे. अणुशास्त्राचे ज्ञान गुपितपणाने फोडण्याचे प्रकार आता सर्वांना माहीत झाले आहेत. त्यासाठी, केवढे पहारे ठेवले जातात, परराष्ट्रीय वकालतीत मसलती होतात आणि गुप्तपणे असे ज्ञानी लोक ‘ पळवून ‘ नेण्यासाठी केवढा अमाप पैसा खर्च केला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ज्ञान अतुलनीय आहे. त्यांचे धर्म विषयक ज्ञान म्हणजे, मनाच्या सूक्ष्म रचनेचे व मनुष्यत्व पूर्णत्वास नेण्यासाठी मन सुसंस्कृत बनविण्याचे ज्ञान आहे. जगातील कोणत्याही धर्माच्या प्रसारकापेक्षा सरस ठरू शकेल असे त्यांचे ज्ञान आहे. तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी, बौद्ध जगताला पाठिंबा दिलेला आहे एवढेच नव्हे तर आपले ज्ञान बौद्ध धर्मासाठी अर्पण करून बौद्ध धर्माचे ते जवळजवळ एकमेव पुरस्कर्ते बनले आहेत. नव्हे, चालू युगातील ते भारतीय बुद्धच होत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बौद्ध दीक्षेमुळे बौद्ध जगतास, अपूर्व ज्ञानाचा पुरस्कर्ता अत्यंत निकडीच्या वेळी प्राप्त झाला या दुसऱ्याही दृष्टीने अखिल बौद्धजनांना डॉ. बाबासाहेबांच्या वरील निवेदनामुळे परमहर्ष होणे स्वाभाविक आहे.
भारतातील दलित जनतेची प्रतिक्रिया अपरिमित आनंदाची होती. विशेषतः नागपूर ते मुंबई या दोन शहरात व त्या दरम्यानच्या प्रदेशात उत्साहाची प्रचंड लाटच उसळल्याप्रमाणे झाले. ‘ प्रबुद्ध भारत ‘ हे दलित जगताचे जणू काही अधिकृत असे गॅझेटच आहे. त्यामध्ये ता. २९ सप्टेंबर १९५६ व १३ ऑक्टोबर १९५६ च्या अंकात लागोपाठ बौद्ध-दीक्षा-विधीची बातमी दलित जनतेच्या झोपड्याझोपड्यातून पोहोचविण्यात आली. नागपूर भागातील ‘ सिद्धार्थ ‘, ‘ धर्मदीप ‘ ‘ धर्मदूत ‘ ‘ बोधीसत्व ‘ याही प्रसंगानुरूप प्रसिद्ध होत असलेल्या साप्ताहिकांनी मध्यप्रदेशातील विभागात सदर माहिती प्रसृत केली. नागपूर शाखेच्या भारतीय बौद्धजन महासभेच्या समितीने छापील पत्रके काढून, सर्व दलित बांधवांस, बौद्ध-दीक्षा-विधीच्या कार्यक्रमाबद्दल तपशीलवार माहिती दिली.
कार्यक्रमाचा तपशील
समितीच्या पहिल्या छापील पत्रिकेत स्वागत समितीचे अध्यक्ष श्री. रेवाराम कवाडे व श्री. वा. मो. गोडबोले यांनी खालील कार्यक्रम जाहीर केला.
सामुदायिक धर्मांतर कार्यक्रम पत्रिका
शनिवार ता. १३-१०-५६ रोजी सायंकाळी ५ ते ८ परित्राण. ८ ते १० महाबोधी सोसायटीचे जनरल सेक्रेटरी, श्री. डी. वलीसिन्हा यांचे भाषण ; आणि भगवान् बुद्धाचे चरित्र व भारतातील प्रसिद्ध बौद्ध स्थळे यावर मॅजिक लॅन्टर्न शो.
रविवार ता. १४-१०-५६ (अशोका विजयादशमी) सकाळी ८ ते ११ परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर व सौ. माईसाहेब आंबेडकर आणि इतर दीक्षार्थींची पूज्य भिक्षू चंद्रमणी महास्थविर यांच्या हस्ते बौद्ध-धर्म-दीक्षा, सकाळी ११ ते ११.२५ महाबोधी सोसायटी, कलकत्ता तर्फे परमपूज्य डॉ. बाबासाहेब यांना भगवान बुद्धांची प्रतिमा भेट. सायंकाळी ६ ते ७ महाबोधी सोसायटीचे जनरल सेक्रेटरी श्री. डी. वलीसिन्हा यांचे भाषण. सायंकाळी ८ ते ११ बोधिमंडळ, मिलिंद महाविद्यालय, औरंगाबाद यांचा ” युगयात्रा ” या मराठी नाटकाचा प्रयोग.
सोमवार ता. १५-१०-५६ सकाळी ८ ते ११ परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जाहीर भाषण. सायंकाळी ८ ते १० मॅजिक लॅन्टर्न शो.
याशिवाय स्वागत समितीने इंग्रजी भाषेत एक पत्रिका प्रसिद्ध केलेली होती. त्यानंतर स्वागत समितीने प्रसिद्ध केलेली तिसरी पत्रिका ता. १३-१०-५६ च्या ‘ प्रबुद्ध भारत ‘ च्या अंकात खास पुरवणी म्हणून प्रसिद्ध केलेलीच आहे. एवढ्या साधनानिशी बौद्ध-दीक्षा-विधी समारंभाची समयोचित माहिती भारतातील दलित वर्गांना व इतरांना देण्यात आली.
ही माहिती प्रसिद्ध झाल्या झाल्या ज्यांना ज्यांना या बौद्ध-दीक्षा-विधीसमारंभास जावयाचे होते, त्यांनी आपापल्या परी तयारी केली. रेल्वेमध्ये काम करणाऱ्या दलित बांधवांनी तर आपले रेल्वे सवलतीचे पास मुक्रर करून टाकले, भारतीय बौद्ध महासभेचे चिटणीस श्री. सवादकर, श्री. कबीर व श्री. गायकवाड यांनी पत्रके काढून, ज्यांना नागपूरास यावयाचे आहे त्यांच्या जाण्या-येण्याची रेल्वेची सवलतीची तिकीटे त्यांनी नावे नोंदविल्यास मिळवून देण्याची व्यवस्था केली जाईल असे जाहीर केले. मुंबई प्रदेश दलित फेडरेशननेही अशीच व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले. या संयुक्त प्रयत्नांमुळे, मुंबईहून एक खास रेल्वेची गाडी ता. १३ ऑक्टोबर १९५६ रोजी (ही तारीख १२ ऑक्टोबर १९५६ असायला हवी) बौद्ध दीक्षा विधीच्या आदले दिवशी रात्री सोडण्यात आली. खास गाडी, फुल भरून गेली होती. ता. १३ ऑक्टोबर १९५६ या दिवशीच्या रात्रीच्या नागपूर – एक्सप्रेसने कर्नाटकातून आलेले कर्नाटक प्रदेश शे. का. फे. चे अध्यक्ष श्री. डी. ए. कट्टी व मुंबईहून सिद्धार्थ कॉलेजचे रजिस्ट्रार श्री. तळवटकर हे निघाले. त्यांना योगायोगाने त्याच गाडीत, नासिकचे श्री. ए. जी. पवार, वकील भेटले. ” नवयुग ” ने मुद्दाम पाठविलेले खास प्रतिनिधी याच गाडीने आले. खास सुटलेल्या रेल्वे गाडीने मुंबई प्रदेश दलित फेडरेशनचे ज. सेक्रेटरी श्री. दहिविलकर बुवा, श्री. आर. जी. खरात, याशिवाय मुंबईहून वॉर्ड कमिट्यांचे असंख्य कार्यकर्ते होते. सर्वांचा निर्देश या ठिकाणी करणे अक्षरशः अशक्यप्राय आहे. एवढी ती प्रचंड गर्दी होती.
प्रवासात, गाडीमधून ही दीक्षार्थी मंडळी, ” बाबासाहेब करे पुकार, बौद्ध धर्म का करो स्वीकार “, ” भगवान बुद्ध की जय “, ” डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जय ” या व अशा घोषणा वारंवार देत होती. ठिकठिकाणची रेल्वे स्टेशने या सामुदायिक घोषणांनी दुमदुमून गेली होती. मुंबई ते नागपूर जणू अहोरात्र, जागृत जनताच चाललेली आहे असे ते अपूर्व दृश्य होते. या मंडळीत भगिनीमातांची संख्याही जवळ जवळ एक तृतियांश होती. नागपूर रेल्वे स्टेशनवर ता. १३ व १४ ऑक्टोबर १९५६ रोजी येणाऱ्या रेल्वेच्या गाड्या सर्व बौद्ध दीक्षा घेऊ इच्छिणारांनीच गच्च भरून येत होत्या.
नागपूर शहराच्या दक्षिणेस जवळ जवळ शहराच्या बाहेर अंबाझरी नावाचा रोड आहे. या रोडला लागून असलेले सुमारे १४ एकर क्षेत्राचे विस्तीर्ण मैदान बौद्ध-दीक्षा-विधीसाठी मुक्रर करण्यात आले होते. या मैदानास सभोवार तट्टे मारले होते. सर्व मैदानाच्या सभोवार सुमारे २,००० ते ३,००० विद्युत दीपांची (बल्ब्स) व्यवस्था केली होती. स्त्रियांसाठी अर्ध्या भागात स्वतंत्र व्यवस्था एका छोट्या मंडपासह केलेली होती. पुरुषांकरिता राहिलेले सर्व मैदान होते. एरवी तसा नागपुरचा अंबाझरी रोड ओसाडच असतो. पण सदर समारंभामुळे, रोडवर निरनिराळ्या प्रकारची दुकाने स्थापन झाल्याचे दिसून आले. लाल हाफ शर्टस् घातलेल्या नागपुरच्या समता सैनिक दलाने मैदानापासून अलिकडेच चार फर्लांग एवढ्यावर अंबाझरी रोडचा बंदोबस्त ठेवला होता. मुंबईचे समता सैनिक दलही, मैदानातील समुदायाची व्यवस्था ठेवित होते. एवढी प्रचंड गर्दी पण, मध्यप्रदेशाचे पोलीस क्वचित् कोठे तुरळक १०/११ पाहावयास मिळाले. बाकी, शांतता व सुव्यवस्था स्वयंसेवकांनीच ठेवली होती.
नागपूरातील धमाल
नागपूर शहर ता. १४ ला रात्री तीनलाच जागे झाले असे म्हणावयास हरकत नाही. सुमारे ४ लाख लोक तरी, नागपूर बाहेरून आलेले होते. त्यांची व्यवस्था, नागपूर शहरातील जेवढ्या शाळा, हायस्कूल आहेत, त्यांच्या इमारतीत (सुटीत रिकाम्या असल्याने) करण्यात आली. या संस्थांच्या चालकांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. परंतु एवढ्या प्रचंड लोकसंख्येस, शाळा हायस्कूलच्या इमारती कितीशा पुरेशा पडणार ? पहाटे ३ पासूनच मिरवणुकांना व घोषणांना सुरुवात होऊन, नागपूर जागे झाले. अंबाझरी रोडला एकच एक गर्दी सकाळपासून लोटली होती. खुद्द नागपूरकरच असे म्हणत होते की, या प्रकारचा लोकसमुदाय व उत्साह आजपर्यंत नागपुरात इतर कोणत्याही समारंभात दिसून आला नाही. एवढ्या प्रचंड गर्दीचा परिणाम व्यापारी नागपुरावर झाला. रिक्षा, जेवणे, यांचे दर दुप्पट वाढण्यातही दोन दिवसात घडून आला. या समारंभाची व्यवस्था व जबाबदारी भारतीय बौद्ध महासभा, नागपूर शाखेने घेतली होती व प्रामुख्याने ती जबाबदारी श्री. कवाडे, श्री. गोडबोले, श्री. पंचभाई आदिंनी पार पाडली, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देणे उचितच होईल.
हृदय भेदक प्रसंग
या बौद्ध दीक्षा घेण्याच्या विधीतील सर्वात अगदी हृदयास भिडणारा परमोच्च प्रसंग नमूद केला पाहिजे. तो प्रसंग हा की, ज्या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मनुष्यमात्रास नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा मी त्याग करतो असे म्हणाले, तेव्हा त्यांचा गळा दाटून आला व त्यांच्या डोळ्यात अश्रू चमकले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कोणते दुःख झाले असले पाहिजे ? त्यांच्यासारख्या असामान्य निश्चयाच्या या महापुरूषाच्या नेत्रातून अश्रू का यावे ? डॉ. बाबासाहेबांना असे वाटले असण्याचा संभव आहे की, मी ज्ञान मिळविण्याची पराकाष्ठा केली, उत्कृष्ट चारित्र्य ठेवले, वैयक्तिक लाभाची पर्वा केली नाही, अनेक ग्रंथ लिहून भारताच्या ‘ विचारात ‘ भर घातली, ब्रीदाने जीवन घालविले, म्हणजे ज्ञान, शील व सचोटी याबाबतीत मी कोणापेक्षा कमी नसता व गेली ३० वर्षे हिंदू धर्म समाजरचनेत राहिलो, पण केवळ, माझ्या दलित बांधवांना इज्जतीचा व स्वतंत्र बाण्याचा मार्ग दाखवितो म्हणून हिंदुंनी कोणत्या प्रकारच्या कारवाया करून माझे मार्ग बंद करण्याचे कार्य अव्याहतपणे ठेवले ? त्यांना याबाबत साध्या माणुसकीचीसुद्धा आठवण राहिलेली नाही. तेव्हा मी व माझ्या बांधवांनी असे कोणते पाप केले की, त्यांच्यामध्ये राहूनही ते आम्हास साध्या माणुसकीने राहू देत नाहीत. काहीही असो या अतिशय बिकट परिस्थितीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जो मार्ग आता आपल्या दलित बांधवांना दाखविला, तो पूर्ण ‘ स्वतंत्र ‘ बाण्याचा सर्वोत्कृष्ट आहे यात शंकाच नाही. ( प्रबुद्ध भारत : डाॅ. आंबेडकर बौद्ध दीक्षा विशेषांक – दिनांक २७ ऑक्टोबर १९५६ )
” भारत सरकार फिल्म घेणार
अस्पृश्य समाजाच्या इतिहासातील ही एक महत्त्वपूर्ण घटना असल्यामुळे भारत सरकारतर्फे या समारंभाची पूर्ण डॉक्युमेन्टरी फिल्म घेण्यात येणार असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषणही रेकॉर्ड केले जाणार आहे.
जगाचे डोळे लागले
नागपूरातील आणि नागपूरात बाहेर गावाहून आलेला लाखोंच्या संख्येतील अस्पृश्य समाज या भव्य धर्मचक्रप्रवर्तन समारंभाची तहानभूक विसरून उत्कंठेने प्रतिक्षा करीत आहे यात नवल नाही, सर्व जगाचे डोळे आज या समारंभाकडे लागले असून, सर्व देशांचे वार्ताहर येथे आलेले आहेत. ( दैनिक तरुण भारत : नागपूर – दिनांक १५ ऑक्टोबर १९५६ )
बौद्ध दीक्षेचा सोहळा
समारंभासाठी १४ एकर क्षेत्राचे पटांगण सभोवार तट्ट्या मारून तयार केले होते. एकूण तीन मंडप होते. मधील मंडप सुमारे ४०’ x २०’ होता. त्याजवर बौद्धकालीन स्मृती दर्शविणारा स्तूप उभारण्यात आला होता. या मध्यवर्ती मंडपातच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा बौद्ध-दीक्षा-विधी करण्यात आला. दोन्ही बाजूच्या मंडपांपैकी एक स्त्रियांकरिता व दुसरा प्रमुख नागरिकांसाठी होता. मध्यवर्ती मंडपासमोर वृत्तपत्रांच्या वार्ताहरांकरिता खास बसण्याची सोय केली होती. स्वदेशी व परदेशी मिळून जवळजवळ ३० वार्ताहर व फोटोग्राफर्स हजर होते. मंडपावर व विस्तीर्ण पसरलेल्या मैदानात ठिकठिकाणी बौद्धधर्मी निशाणे फडकत होती. निळा, तांबडा, हिरवा असे पट्टे असलेली ती निशाणे होती.
५ लाखांवर उपस्थिती
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महास्थविर भिख्खु चन्द्रमणी यांचेसमवेत सकाळी साडे नऊला समारंभ स्थळी आले. तोपर्यंत संपूर्ण मंडप भरून गेला होता. अदमासे ५ ते ६ लक्षापर्यंत जनसमुदाय उपस्थित झाला होता. त्यापैकी जवळ जवळ ३ ते ४ लक्ष लोक बाहेर गावचेच होते.
त्यावेळी ” भगवान बुद्ध की जय “, ” बाबासाहेब करे पुकार, बौद्ध धर्मका करो स्वीकार ” अशा घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले.
व्यासपीठावर अग्रभागी एका मेजावर बुद्धाचा ब्राँझचा पुतळा ठेवण्यात आला होता व त्याचे दोन्ही बाजूला एकेक सिंह होता व समोर उद प्रज्वलित होत होता.
बाबासाहेबांच्या पिताजींचे स्मरण
समारंभास कु. इंदुताई वराळे यांनी स्वागत पद गाऊन सुरवात केली. तद्नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील या एका महान क्रांतिकारी घटनेच्या प्रसंगी दीक्षा विधीअगोदर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पिताजी, कै. रामजी मालोजी आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी सर्व पाच लाखांवरील जनता काही मिनिटे स्तब्ध राहिली. नंतर डॉ. बाबासाहेब व माईसाहेब यांनी पूज्य चंद्रमणी यांच्यासमोर उभे राहून, भगवान बुद्धाच्या मुर्तिपुढे आपले हात एकत्रित जोडून,
नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस
(अर्थ :– त्या भगवान बुद्धाला माझे नमन असो ; की, जो जीवन मुक्त, संपूर्ण व जागृत आहे.)
असे पाली भाषेत लागोपाठ तीन वेळा म्हटले. पुढे पूज्य चंद्रमणी यांनी उभयतांना खालील पाली भाषेतील सरणत्तयं (तीन अनुसरणें), पन्चसीलानी (पाच शीले) म्हणावयास सांगून ती म्हणवून घेतली.
सरणत्तयं ( तीन अनुसरणे )
बुद्धं सरणं गच्छामि ॥
धम्मं सरणं गच्छामि ॥
संघ सरणं गच्छामि ॥
दुतियम्पि, बुद्धं सरणं गच्छामि ॥
दुतियम्पि, धम्मं सरणं गच्छामि ॥
दुतियम्पि, संघं सरणं गच्छामि ॥
ततियम्पि, बुद्धं सरणं गच्छामि ॥
ततियम्पि, धम्मं सरणं गच्छामि ॥
ततियम्पि, संघं सरणं गच्छामि ॥
(अर्थ :– मी बुद्धाला अनुसरतो.
मी त्याच्या धर्माला अनुसरतो.
मी त्याच्या संघाला अनुसरतो.
दुसऱ्यांदा मी बुद्धाला अनुसरतो.
दुसऱ्यांदा मी त्याच्या धर्माला अनुसरतो.
दुसऱ्यांदा मी त्याच्या संघाला अनुसरतो.
तिसऱ्यांदा मी बुद्धाला अनुसरतो.
तिसऱ्यांदा मी त्याच्या धर्माला अनुसरतो.
तिसऱ्यांदा मी त्याच्या संघाला अनुसरतो.)
पन्चसीलानि । ( पाच शीले )
पाणातिपाता वेरमणी
सिक्खापदं समादियामि ||१||
अदिन्नादाना वेरमणी –
सिक्खापदं समादियामि ||२||
कामेसु मिच्छाचारा वेरमणी
सिक्खापदं समादियामि ||३||
मुसावादा वेरमणी –
सिक्खापदं समादियामि ||४||
सुरा-मेरय-मज्ज-पमादठ्ठाना वेरमणि –
सिक्खापदं समादियामि ||५||
अर्थ :–
(१) मी जीवहिंसेपासून अलिप्त राहाण्याची प्रतिज्ञा करतो.
(२) मी चोरी करण्यापासून अलिप्त राहाण्याची प्रतिज्ञा करतो.
(३) मी कामवासनेच्या अनाचारापासून अलिप्त राहाण्याची प्रतिज्ञा करतो.
(४) मी खोटे बोलण्यापासून अलिप्त राहाण्याची प्रतिज्ञा करतो.
(५) मी मद्य, मादक तसेच इतर सर्व मोहात पाडणाऱ्या मादक वस्तूंच्या सेवनापासून अलिप्त राहाण्याची प्रतिज्ञा करतो.
बुद्धाच्या चरणी
शेवटी उभयतांनी, भगवान बुद्धाच्या प्रतिमेस स्वच्छ कमलांचा पुष्पहार अर्पण केल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्यक्षात आपले मस्तक भगवान बुद्धाच्या चरणी ठेवून तीन वेळा वंदन केले.
तद्नंतर डॉक्टरसाहेब म्हणाले,
भगिनींनो व बंधुजनहो,
आम्ही दोघांनी तुमच्यासमोर भिक्खु चंद्रमणी यांच्या हस्ते बौद्ध धर्माचा अनुग्रह केला आहे. चंद्रमणी हे भारतातील सर्वात वयस्क भिक्खु आहेत. आता आमचा जो बौद्ध धर्म अनुग्रह झाला तो पाली भाषेत झाला. त्या अनुग्रहाचे मराठी भाषांतर करून, पुनः अनुग्रह घेत आहे. ” ( प्रबुद्ध भारत : आंबेडकर बौद्ध दीक्षा विशेषांक – दिनांक २७ ऑक्टोबर १९५६ )
यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची गंभीर वाणी लाऊडस्पीकरवरून ऐकू आली :–
” बंधु भगिनींनो, अनुग्रह आता तुम्हाला मराठीतही समजला आहे. आता मी तुम्हा सर्वांना बुद्ध धर्माची दीक्षा देणार आहे. ज्यांना हिंदू धर्माचा त्याग करून बुद्ध धर्म स्वीकारावयाचा आहे त्यांनी कृपा करून उभे राहावे आणि माझ्यामागून शब्दांचे उच्चारण करावे.
सर्वच्या सर्व समाज, म्हणजे सुमारे पाच लाख लोक उभे राहिले. फक्त आम्ही काही वार्ताहरच याला अपवाद होतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या सर्व लोकांना बौद्ध धर्माची दीक्षा गंभीरपणे दिली.
तद्नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिक्षाविधीचा एक भाग म्हणून बावीस प्रतिज्ञा दीक्षार्थींकडून वदवून घेतल्या.” ( नवयुग : दिनांक २१ ऑक्टोबर १९५६ )
त्या पुढीलप्रमाणे :–
” बौद्ध जनांच्या प्रतिज्ञा असे म्हणून त्यांनी खालील प्रतिज्ञा घेतल्या —
(१) मी ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
(२) मी राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
(३) मी गौरी-गणपती इत्यादी हिंदुधर्मातील कोणत्याही देवदेवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही
(४) देवाने अवतार घेतले, यावर माझा विश्वास नाही.
(५) बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे हा खोटा आणि खोडसाळ प्रचार होय, असे मी मानतो.
(६) मी श्राद्धपक्ष करणार नाही ; पिंडदान करणार नाही.
(७) बौद्ध धम्माच्या विरुद्ध विसंगत असे कोणतेच आचार कर्म मी करणार नाही.
(८) कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणांचे हातून करवून घेणार नाही.
(९) सर्व मनुष्यमात्र समान आहेत, असे मी मानतो.
(१०) मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करीन.
(११) मी भगवान बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन.
(१२) मी बुद्धाने सांगितलेल्या दहा पारमिता पाळीन.
(१३) मी सर्व प्राणीमात्रावर दया करीन, त्यांचे लालनपालन करीन.
(१४) मी चोरी करणार नाही.
(१५) मी खोटे बोलणार नाही.
(१६) मी व्यभिचार करणार नाही.
(१७) मी दारू पिणार नाही.
(१८) मी प्रज्ञा, शील आणि करूणा या बौद्ध धम्माच्या तीन तत्त्वांची सांगड घालून माझे जीवन चालविन.
(१९) माझ्या जुन्या, मनुष्यमात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या आणि मनुष्यमात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा मी त्याग करतो व बुद्धाच्या धम्माचा स्वीकार करतो.
(२०) बुद्ध धम्म हा सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे.
(२१) माझा नवा जन्म होत आहे, असे मी मानतो.
(२२) इतःपर मी बुद्धाच्या शिकवणीप्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो.
हा संपूर्ण समारंभ सुमारे ५० मिनिटे चालू होता. स्वतः बाबासाहेब आंबेडकर आणि सौ. माईसाहेब यांचा दीक्षाविधी ९-४० ते ९-४५ या पाच मिनिटात झाला. बौद्ध धर्मदीक्षा घेतल्यानंतर बाबासाहेबांना पुष्पहार घालून त्यांचे स्वागत करण्यात आले. नंतर १० वाजता सामुदायिक दीक्षाविधी झाला व ‘ सरणांच्या ‘ त्रिवार घोषणेनंतर ‘ डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जय ‘ चा निनाद वातावरणात घुमला.
यावेळी अ. भा. महाबोधी समितीचे सरचिटणीस श्री. वलीसिन्हा यांनी बाबासाहेबांना एक चिकण मातीची बुद्ध प्रतिमा भेट म्हणून दिली.
बौद्ध धर्माची दीक्षा ज्यांनी घेतली त्यात पुढील प्रमुख व्यक्तींचा समावेश होतो. बॅ. राजाभाऊ खोब्रागडे (शे. का. फे. चे सरचिटणीस), महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष श्री. भा. कृ. गायकवाड, श्री. आर. डी. भंडारे (अध्यक्ष, मुंबई प्रदेश फेडरेशन), शांताबाई दाणी, श्री. सी. एन. मोहिते, श्री. गो. ति. परमार (गुजरात शाखेचे अध्यक्ष), श्री. वा. कां. परमार, श्री. डी. जी. जाधव, सौ. सरोजिनी जाधव, पुण्याचे श्री. वि. रा. रणपिसे, श्री. ससालेकर, श्री. हरिदास आवळे, श्री. सदानंद फुलझेले, श्री. अहोटे, श्री. व्ही. एस्. पगारे, श्री. उपशाम, श्री. बी. एस्. मोरे, श्री. बी. एच. वराळे, श्री. धोंडीराम पगारे, श्री. यशवंतराव आंबेडकर (बाबासाहेबांचे पुत्र), श्री. मुकुंदराव आंबेडकर, श्री. बी. सी. कांबळे वगैरे. याचवेळी न्या. भवानीशंकर नियोगी, श्री. कुलकर्णी (बुद्ध समितीचे चिटणीस), औरंगाबादच्या मिलिंद कॉलेजचे प्रिन्सिपॉल श्री. एम. व्ही. चिटणीस, श्री. बी. एस्. कबीर आदि सवर्ण हिंदुंनीही बौद्ध धर्माची दीक्षा घेतली.
सकाळचा हा कार्यक्रम ११ वाजेपर्यंत चालू होता. नंतर रात्री औरंगाबादच्या मिलिंद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘ युगयात्रा ‘ या नाटकाचा चांगला प्रयोग करून दाखविला. त्यावेळी सौ. माईसाहेब आंबेडकर उपस्थित होत्या.
थोरांचे शुभ संदेश !
डॉ. बाबासाहेबांच्या बौद्ध-दीक्षा-विधीनिमित्ताने ब्रह्मदेशाचे पंतप्रधान यू. बा. स्वे, तसेच माजी पंतप्रधान यू. नू., पूर्व पाकिस्तान बुद्धिस्ट कॉन्फरन्सचे पूज्य प्रियदर्शी सिहाबिर, आंध्रा बुद्धिस्ट असोसिएशन अध्यक्ष पी. बी. सेनगुप्ता, बौद्ध धर्मकुंवर सभेचे (कलकत्ता) डॉ. अरविंद बारुआ, एम्. ए., पीएच. डी., बार ॲट-लॉ, कोलंबोचे एच. डब्ल्यू. अमरासुरीया, रंगूनचे महाथेरो पन्नलोक, कोझिकोडे येथील महाबोधी बुद्धिस्ट मिशनचे भिख्खु धर्मानंद वगैरे अनेक थेरो, बौद्ध भिक्खु व महापुरुषांचे संदेश आले. दीक्षाविधी संपल्यानंतर बाबासाहेबांचे अभिनंदन आणि अभीष्टचिंतन करणारे संदेश वाचून दाखविण्यात आले. त्यापैकी काही निवडक संदेश येथे संक्षेपाने दिले आहेत–
ब्रह्मदेशाचे पंतप्रधान यू. बा. स्वे व माजी पंतप्रधान, यू. नू.
आपल्या संदेशात म्हणतात :–
” पंतप्रधान यू. बा. स्वे व माजी पंतप्रधान यू. नू. या दोघांनाही तारीख १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या बौद्धदीक्षा विधी समारंभाचे निमंत्रण मिळाल्याबद्दल आनंद वाटतो. दोघांवरही अनेक कामांची जबाबदारी असल्यामुळे, त्यांना नागपूर येथे तारीख १४ आक्टोबर रोजी हजर राहाता येत नाही याबद्दल खेद होतो. मात्र, यू. बा. स्वे व यू. नू. हे दोघेही सदर समारंभास व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अतिशूभ इच्छितात व डॉ. आंबेडकर यांना धन्यवाद देतात. डॉ. आंबेडकरांचा बौद्ध-धर्म-दीक्षाविधी समारंभ अपूर्व आहे. त्यांना भारतात तसेच ब्रह्मदेशातही आदरयुक्त भावनेने मानले जाते. “
कोलंबोचे एच. डब्ल्यू. अमारसूरिया आपल्या संदेशात म्हणतात :–
” तारीख १४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यांचे अनुयायी, चहाते, बौद्ध धर्म दीक्षा घेणार असल्याचे वाचून अत्यानंद झाला. १४ ऑक्टोबर हा जगामधील सर्व बौद्धजनांना सुवर्ण अक्षराने लिहून ठेवावा लागेल यात संशय नाही. आधीच्या माझ्या कार्यामुळे नागपूरला येऊ शकत नाही, याबद्दल मला खेद वाटतो. डॉ. आंबेडकर यांचे मी हार्दिक अभिनंदन करतो. सर्वसाधारण अखिल बौद्ध जनात, बुद्ध शासनास उच्च दर्जा प्राप्त करून घेण्यासाठी व विशेषतः शास्त्रोक्त पायावर भारतात बुद्ध शासन पुनश्चः प्रस्थापित करण्यासाठी डॉ. आंबेडकर यांना दिर्घायुष्य लाभो. ”
डॉ. अरविंद बारुआ ( एम. ए., पीएच.डी., बार -ॲट-लॉ. ) कलकत्त्याहून पाठविलेल्या संदेशात लिहितात
” डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यांचे अनुयायी बौद्ध दीक्षा घेऊन बौद्ध जगात समाविष्ट होत आहेत, त्यांचे मी मनःपूर्वक स्वागत करतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध दीक्षा घेण्याबाबत घेतलेला निर्णय अक्षरशः युगप्रवर्तक आहे. त्यांचेबद्दल मला परम आदर आहे. बौद्ध धर्मास पुनः उच्चपदी नेण्यास व सांप्रतची धर्मग्लानी दूर करण्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या दैदिप्यमान व्यक्तिची जगातील बौद्धजनास आज फारच आवश्यकता आहे. त्यांच्या अष्टपैलू व्यक्तित्त्वाने व प्रज्ञेने ते जगातील बुद्ध शासनाचा आदर मिळवतील अशी माझी खात्री आहे आणि त्यांनी आता या महान कार्यासाठी पुढे यावे अशी माझी विनंती आहे.
१४ ऑक्टोबर १९५६ च्या नागपूरच्या शुभप्रसंगी मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या थोर शिकवणुकीशी निष्ठा व त्यांच्या अनुयायांशी शुद्ध बंधुभाव अंतःकरणपूर्वक व्यक्त करतो. ”
रंगूनचे महाथेरो, यू पन्नलोक आपल्या संदेशात म्हणतात :–
” डॉ. आंबेडकर व त्यांचे अनुयायी ता. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी बौद्ध दीक्षा घेऊन, भगवान बुद्धाच्या शिकवणुकीच्या तीन आश्रयाखाली येणार हे समजल्यावर हर्ष झाला. त्यांना सर्वांना मी शुद्ध व मुक्त जीवन चिंतितो. भगवान बुद्धाचे अष्टमार्ग सर्वांनी अनुसरावे व मानवमात्राचे दुःख नष्ट करून खऱ्या शांततेचे प्रतीक ‘ निर्वाण ‘ त्यांना प्राप्त व्हावे असे प्रार्थितो ”
( प्रबुद्ध भारत : डॉ. आंबेडकर बौद्ध दीक्षा विशेषांक – दिनांक २७ ऑक्टोबर १९५६ )
सोमवार दिनांक १५ ऑक्टोबर १९५६ रोजी सकाळी १० ते १२ पर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे बौद्ध धर्माचा स्वीकार यासंबंधी उद्बोधक, स्फूर्तिदायक आणि अत्यंत तळमळीचे माहितीपूर्ण भाषण दीक्षामंडपात झाले. लाखो लोक ते भाषण उन्हात उभे राहून व जागा मिळेल तसे बसून एकाग्रतेने ऐकत होते.
बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्यानंतर दुसर्या दिवशी सोमवार दिनांक १५ ऑक्टोबर १९५६ रोजी बौद्ध धर्माच्या स्वीकारासंबंधी दीक्षामंडपात केलेल्या उद्बोधक, स्फूर्तिदायक आणि अत्यंत तळमळीच्या, माहितीपूर्ण भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,
” सर्व बौद्धजनहो आणि उपस्थित पाहुणे मंडळी,
काल आणि आज सकाळी जो बौद्ध दीक्षा घेण्याचा व देण्याचा विधी समारंभ या ठिकाणी घडून आला त्याचे स्थान, विचारवंत लोकांना कदाचित अवघड वाटत असेल. त्यांच्या व माझ्याही मताने कालचा समारंभ आज व आजचा समारंभ काल व्हावयास पाहिजे होता. आपण हे कार्य अंगावर का घेतले, त्याची जरूरी काय व त्याने काय होईल, याची छाननी करून घेणे आवश्यक आहे. ते समजावून घेण्यानेच आपल्या कार्याचा पाया मजबूत होईल. हे समजावून घेण्याचे कार्य आधी व्हावयास हवे होते. परंतु काही गोष्टी अशा अनिश्चित असतात की, त्या आपोआपच घडत असतात. आता या विधीबाबत व्हावयाचे तसे घडले आहे खरे. तथापि अशी दिवसांची अदलाबदल झाली तरी मोठेसे काही बिघडले नाही.
पुष्कळसे लोक मला असा प्रश्न करतात की, या कार्याकरिता तुम्ही नागपूर हेच शहर का ठरविले ? अन्य ठिकाणी हे कार्य का केले नाही ? काही लोक असे म्हणतात की, आर. एस. एस. ची – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मोठी पलटण नागपूर येथे असल्यामुळे त्यांच्या उरावरती म्हणून आम्ही ही सभा या शहरात घेतली आहे. हे मुळीच खरे नाही. त्यासाठी नागपूर येथे हे कार्य घेतलेले नाही. आमचे कार्य इतके मोठे आहे की, आयुष्यातील एक एक मिनिट देखील कमी पडतो. आपले नाक खाजवून दुसऱ्याला अपशकून करण्यासाठी मजजवळ वेळ नाही.
हे ठिकाण निवडण्याचे कारण निराळे आहे. ज्यांनी बौद्ध इतिहासाचे वाचन केले असेल त्यांना हे कळून येईल की, भारतात बौद्ध प्रसार जर कोणी केला असेल तर तो नाग लोकांनी केला. नाग लोक आर्याचे भयंकर शत्रु होते. आर्य व अनार्य यांच्यामध्ये लढाया व तुंबळ युद्धे झाली. आर्य लोकांनी नागांना जाळून टाकल्याचे दाखले पुराणात सापडतात. अगस्ती मुनीने त्यातून फक्त एक नाग मनुष्य वाचविला. त्याचेच आपण वंशज आहोत. ज्या नाग लोकांना एवढा छळ सोसावा लागला त्यांना वर येण्यास कोणीतरी महापुरुष हवा होता ; त्यांना तो महापुरुष गौतम बुद्ध भेटला. भगवान बुद्धाचा उपदेश नाग लोकांनी सर्व भारतामध्ये पसरविला. असे आपण नाग लोक आहोत. नाग लोकांची मुख्य वस्ती नागपूर येथे व आसपास होती असे दिसते. म्हणून या शहरास ‘ नाग-पूर ‘ म्हणजे नागांचे गाव असे म्हणतात. येथून सुमारे २७ मैलावर नागार्जुनाची टेकडी आहे. नजिकच वाहणारी जी नदी आहे ती नाग नदी आहे. अर्थातच या नदीचे नाव येथे राहाणाऱ्या लोकांवरून पडले आहे. नागांच्या वस्तीमध्ये वाहणारी जी नदी ती नाग नदी आहे. हे स्थळ निवडण्याचे हे मुख्य कारण आहे. नागपूर यामुळे निवडले आहे. यामध्ये कोणालाही खिजविण्याचा कोठेच प्रश्न नाही. तशी भावनाही नाही. आर. एस्. एस्. चे कारण माझ्या मनाला शिवलेही नाही. तसा कोणी त्याचा अर्थ करून घेऊ नये.
इतर कारणावरून कदाचित् विरोध वाटू शकेल. हे ठिकाण विरोधासाठी पसंत केलेले नाही हे आता मी सांगितलेच आहे. मी हे जे कार्य आरंभले आहे त्यासाठी माझ्यावर अनेक लोकांनी व वृत्तपत्रांनी टीका केलेली आहे. काहींची टीका कडक आहे. त्यांच्या मते मी माझ्या गरीब बिचाऱ्या अस्पृश्य लोकांना भलतीकडेच नेत आहे. आज जे अस्पृश्य आहेत ते तसेच अस्पृश्य राहातील व जे हक्क अस्पृश्यांना मिळाले आहेत ते मात्र नष्ट होतील, असे सांगून आमच्यातील काही लोकांना ते बहकवीत आहेत. आमच्यातील अज्ञ लोकांना पगदंडीने जा असे ते म्हणतात. आमच्यातील काही तरूण व वयोवृद्ध लोकांवर कदाचित त्याचा परिणाम होत असेल. त्यामुळे लोकांच्या मनामध्ये संशय निर्माण झाले असतील तर त्या संशयाची निवृत्ती करणे हे आपले कर्तव्य आहे आणि अशा संशयाची निवृत्ती करणे म्हणजे आपल्या या चळवळीचा पाया मजबूत करणे आहे.
मागे आपण लोकांनी मांस खाऊ नये म्हणून चळवळ केली होती. त्यामुळे स्पृश्य लोकांवर मोठी गदा आल्याप्रमाणे त्यांना वाटत होते. त्यांनी जिवंत म्हशीचे दूध प्यावयाचे आणि ती म्हैस मेल्यानंतर मात्र आम्ही मृत म्हशीला खांद्यावर घेऊन जावयाचे, हा प्रकार विचित्र नव्हे काय ? आम्ही त्यांना म्हणतो की तुमची म्हातारी मेली तर तिला आम्हाला का नेऊ देत नाही ? त्यांनी मेलेली म्हैस द्यावी तशी म्हातारीही द्यावी. त्यावेळी कोणीतरी मनुष्य ‘ केसरी ‘ मधून पत्रव्यवहार करून, अमुक अमुक गावी दर वर्षाला ५० ढोरे मरतात, त्यांच्या कातड्यांची, शिंगांची, हाडांची, मांसाची शेपटीची, खुरांची मिळून ५०० रुपया इतकी किंमत होईल ; व मृत मांस सोडल्यामुळे एवढ्या प्राप्तीला हे लोक मुकतील, असा प्रचार त्यावेळी केसरी मधून होत असे. त्याच्या प्रचाराला उत्तर द्यावयाची आवश्यकता खरे म्हणजे काय होती ? पण आमच्या लोकांना असे वाटे, या गोष्टीला आमचा साहेब उत्तर देत नाही, तर साहेब करतो तरी काय ?
एकदा मी संगमनेरला सभेला गेलो होतो. सभा झाल्यानंतर संध्याकाळी जेवणाची व्यवस्था केली होती. त्यावेळी मजकडे एक चिठ्ठी केसरीच्या त्या बातमीदाराने पाठविली व मला विचारले, ” अहो, तुम्ही तर तुमच्या लोकांना मेलेली ढोरे ओढू नका म्हणून सांगता. त्यांची हलाखी किती आहे ? त्यांच्या बायकांना लुगडे चोळी नाही, त्यांना अन्न नाही, त्यांना शेतीवाडी नाही, अशी त्यांची अत्यंत बिकट परिस्थिती असता, दरवर्षी त्यांना मिळणारे कातड्यांचे, शिंगांचे, मांसांचे ५०० रुपयांचे उत्पन्न फेकून द्या म्हणून सांगता, यात तुमच्या लोकांचा तोटाच नाही काय ? ”
मी म्हणालो, तुम्हाला याचे उत्तर कोठे देऊ ? ते येथे पडवीत देऊ की सभेत देऊ ? लोकांच्या समोरच सवालपट्टी झालेली बरी. मी त्या गृहस्थांना विचारले तुमचे म्हणणे एवढेच की आणखी काही आहे ? ते गृहस्थ म्हणाले, ” एवढेच म्हणणे आहे व एवढ्याचेच उत्तर द्या.” मी त्या गृहस्थास विचारले, तुम्हास मुले, माणसे किती आहेत ? त्यांनी सांगितले मला पाच मुलगे आहेत, भावालाही ५/७ मुले आहेत. मी म्हणालो तर तुमचे कुटुंब मोठे आहे. तेव्हा तुम्ही व तुमच्या नातेवाईकांनी त्या गावची मेलेली सर्व ढोरे ओढावीत; आणि ५०० रुपयांचे उत्पन्न घ्यावे. हा फायदा तुम्ही अवश्य घ्यावा. शिवाय दरवर्षी मी. स्वतः तुम्हाला ५०० रुपये वर देण्याची व्यवस्था करतो, माझ्या लोकांचे काय होईल, त्यांना अन्न, वस्त्र मिळेल की नाही ते माझे मी पाहीन, मग एवढी फायद्याची गोष्ट तुम्ही का सोडून देता ? तुम्ही का हे करीत नाही ? आम्ही हे काम केले म्हणजे फायदा होतो, आणि तुम्ही केले म्हणजे फायदा नाही ? ओढा ना तुम्ही मेलेली ढोरे !
काल एक ब्राह्मणाचा मुलगा मजकडे येऊन म्हणाला, ” पार्लमेंट, असेब्ल्यांमध्ये तुमच्या लोकांना राखीव जागा दिल्या आहेत, त्या तुम्ही का सोडता ? ” मी त्यास म्हणालो, ” तुम्ही महार व्हा व त्या जागा पार्लमेंट, असेंब्ल्यांमध्ये भरा. नोकरी खाली असली की त्या जागा भरतात. त्यासाठी कोणा ब्राह्मणांचे, कोणा इतरांचे किती अर्ज येतात ! मग नोकऱ्यांच्या जागा भरतात तशा या राखीव जागा तुम्ही ब्राह्मण लोक महार बनून का भरत नाही ?
आमचे नुकसान झाले तर तुम्ही का रडता ? असा माझा त्यांना सवाल आहे. खरे म्हणजे मनुष्यमात्राला इज्जत प्यारी असते, लाभ प्यारा नसतो. सद्गुणी व सदाचारी बाईला व्यभिचारामध्ये किती फायदा असतो हे माहीत असते. आमच्या मुंबईत, व्यभिचारी बायांची एक वस्ती आहे. त्या बाया सकाळी ८ ला उठल्या की न्याहारीसाठी शेजारच्या हॉटेलात वर्दी देतात आणि म्हणतात (डॉक्टरसाहेबांनी यावेळी आवाजात फरक करून नक्कल करून सांगितले) ” सुलेमान, अरे खिम्याची प्लेट व पावरोटी घेऊन ये. ” तो सुलेमान ते घेऊन येतो, शिवाय चहा, पाव, केक वगैरेही आणतो. पण माझ्या दलितवर्गीय भगिनींना साधी चटणीभाकरी देखील मिळत नाही ; मात्र त्या इज्जतीने राहातात. त्या सदाचारानेच राहातात.
आम्ही झगडतो आहोत ते इज्जतीकरिता ! मनुष्यमात्राला पूर्णावस्थेस नेण्याकरिता आम्ही तयारी करीत आहोत, त्यासाठी वाटेल तो त्याग करण्याची आमची तयारी आहे. हे वृत्तपत्राचे लोक (त्यांच्याकडे वळून) माझ्या मागे गेली ४० वर्षे हात धुवून लागले आहेत. माझ्यावर केवढी टीका त्यांनी आजवर केली ! मी त्यांना म्हणतो, ” अजून तरी विचार करा, आतातरी पोरकटपणाची भाषा सोडून काही प्रौढ भाषा वापरा. ”
आम्ही बौद्ध धर्मीय झालो तरी राजकीय हक्क मी मिळवीन याची मला बालंबाल खात्री आहे. ( डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष व प्रचंड टाळ्या) मी मेल्यावर काय होईल हे सांगता येणार नाही. या चळवळीसाठी फार मोठे काम करावे लागेल. आम्ही बौद्ध धर्म स्वीकारल्यामुळे काय होईल, अडचणी आल्याच तर त्या कशा टाळता येतील, त्यासाठी काय युक्तिवाद व खटाटोप करावा लागेल, याचा मी पूर्ण विचार केला आहे. माझ्या पोतडीत सर्व काही भरलेले आहे. ते काय प्रकाराने भरले आहे ते मला पूर्ण माहीत आहे. हे जे हक्क मिळविले ते मीच माझ्या लोकांच्यासाठी मिळविले. ज्याने हे हक्क मिळविले ते तो पुन्हा मिळवून देईलच ! हे हक्क व सवलती मिळवून देणारा मीच आहे ; आणि मी पुन्हा या सवलती मिळवून देईन अशी मला खात्री आहे. म्हणून सध्या तरी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेऊन चालले पाहिजे. विरोधी प्रचारात काही तथ्य नाही हे मी सिद्ध करून देईन.
मला एका गोष्टीचे मात्र आश्चर्य वाटते. एवढा वादविवाद सर्वत्र होतो आहे. पण एकाही माणसाने ” मी बौद्ध धर्मच का स्वीकारला ” हा प्रश्न मला विचारला नाही. कोणताही दुसरा धर्म न स्वीकारता हाच धर्म का स्वीकारला, हा कोणत्याही धर्मांतराच्या चळवळीतील मुख्य आणि महत्त्वाचा प्रश्न असतो. धर्मांतर करताना धर्म कोणता व का घ्यावयाचा हे तावून सुलाखून पाहिले पाहिजे. आम्ही हिंदू धर्मत्यागाची चळवळ १९३५ पासून येवले येथे एक ठराव करून हाती घेतली. ” मी हिंदू धर्मात जन्मलो तरी हिंदू धर्मात मरणार नाही ” अशी प्रतिज्ञा मी मागेच केली होती आणि काल मी ती खरी करून दाखविली. मला इतका आनंद झाला आहे, हर्षवायुच झाला आहे. नरकातून सुटलो असे मला वाटते. मला कोणी अंधभक्त नको आहेत. ज्यांना बौद्ध धर्मात यावयाचे आहे त्यांनी जाणिवेने आले पाहिजे. त्यांना तो धर्म पटला पाहिजे.
मनुष्यमात्राच्या उत्कर्षाला धर्म ही अत्यंत आवश्यक वस्तू आहे. मला माहीत आहे की कार्ल मार्क्सच्या वाचनामुळे एक पंथ निघाला आहे. त्याच्या म्हणण्याप्रमाणे धर्म म्हणजे काहीच नाही. त्यांना धर्माचे महत्त्व नाही. त्यांना सकाळी ब्रेकफास्ट (न्याहारी) मिळाली, त्यात पाव, मलई, लोणी, कोंबडीची टांग वगैरे असले, पोटभर जेवण मिळाले, निवांत झोप मिळाली, सिनेमा पाहावयास मिळाला की सगळं संपलं. हे त्यांचं तत्त्वज्ञान ! मी त्या मताचा नाही. माझे वडील गरीब होते ; म्हणून मला या प्रकारचे सुख काही मिळालेले नाही. माझ्याइतके कष्टमय जीवन कोणीही आयुष्यात काढलेले नाही. म्हणून माणसाचे जीवन सुखसमाधानाच्या अभावी कसे कष्टमय होते याची मला जाणीव आहे. आर्थिक उन्नतीची चळवळ आवश्यक आहे असे मी मानतो. त्या चळवळीविरूद्ध मी नाही. माणसाची आर्थिक उन्नती व्हावयास पाहिजेच.
पण मी याबाबत एक महत्त्वाचा फरक करतो. रेडा, बैल व माणूस यामध्ये फरक आहे. रेडा व बैल यांना रोज वैरण लागते. माणसासही अन्न लागते. मात्र दोहोत फरक हा आहे की, रेडा व बैल यांना मन नाही ; मनुष्याला शरीराबरोबर मनही आहे. म्हणून दोन्हीचाही विचार करावयास हवा. मनाचा विकास झाला पाहिजे. मन सुसंस्कृत झाले पाहिजे. ते सुसंस्कृत बनविले पाहिजे. ज्या देशातील लोक अन्नाशिवाय माणसाचा सुसंस्कृत मनाशी संबंध नाही असे म्हणतात त्या देशाशी अगर लोकांशी संबंध ठेवण्याचे मला काहीच प्रयोजन नाही. जनतेशी संबंध ठेवताना माणसाचे शरीर जसे निरोगी पाहिजे तसे शरीर सुदृढ होण्याबरोबर मनही सुसंस्कृत झाले पाहिजे. एरवी मानव जातीचा उत्कर्ष झाला असे म्हणता येणार नाही.
मनुष्याचे शरीर अथवा मन हे रोगी का असते ? त्याची कारणे ही की, त्यास एकतर शारीरिक पीडा असते किंवा मनाला उत्साह नसतो. मनात उत्साह नसेल तर अभ्युदयही नाही. हा उत्साह का राहात नाही ? त्याचे पहिले कारण हे की, मनुष्यास अशा रीतीने ठेवण्यात आले आहे की त्याला वर येण्याची संधी मिळत नाही ; अगर आशा राहात नाही. त्यावेळी त्यास उत्साह कोठून असणार ? तो रोगीच असतो. ज्या माणसाला आपल्या कृतीचे फळ मिळू शकते, त्यास उत्साह प्राप्त होतो. नाही तर शाळेत शिक्षक असे म्हणू लागला की, कोण रे हा ? हा तर महार ! आणि हा महारडा पहिल्या वर्गात पास होणार ? याला प्रथम श्रेणी कशाला पाहिजे ? तू आपला तृतीय श्रेणीतच राहा – पहिल्या वर्गात येणे हे ब्राह्मणाचे काम ! अशा व्यवस्थेत त्या मुलाला काय उत्साह मिळणार ? त्याची उन्नती ती काय होणार ? उत्साह निर्माण करण्याचे मूळ मनात आहे. ज्याचं शरीर व मनही धडधाकट असेल, जो हिम्मतबाज असेल, मी कोणत्याही परिस्थितीतून झगडून बाहेर पडेल असा ज्यास विश्वास वाटतो, त्यांच्यामध्येच उत्साह निर्माण होतो व त्याचाच उत्कर्ष होतो. हिंदू धर्मात अशी काही विलक्षण तत्त्वप्रणाली ग्रंथित केलेली आहे की, त्यापासून उत्साहच वाटत नाही. माणसाला निरूत्साही करून टाकणारी परिस्थिती हजारो वर्षे टिकली तर जास्तीत जास्त कारकुनी करून पोटे भरणारे लोक होतील. या पलिकडे दुसरे काय होणार ? या कारकुनांचे रक्षण करावयास मोठा कारकून पाहिजे.
मनुष्याच्या उत्साहाला काही कारण असेल तर मन ! तुम्हाला मिलचे मालक माहीत आहेत. ते गिरण्यावर मॅनेजर नेमतात व त्यांच्याकरवी मिलमधील काम करवून घेतात. हे मिलचे मालक कसल्या ना कसल्या व्यसनात असतात. त्यांच्या मनाचा सुसंस्कृत असा विकास झालेला नसतो. आपल्या मनाला उत्साह वाटावा म्हणून आपण चळवळ केली, तेव्हा कोठे शिक्षण सुरू झाले. मी लंगोटी घालून शिक्षणाला सुरूवात केली. शाळेमध्ये मला प्यावयास पाणी सुद्धा मिळाले नाही. पाण्याशिवाय शाळेत मी किती तरी दिवस काढले ! मुंबईसारख्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये देखील अशीच परिस्थिती होती. अशी परिस्थिती असेल तर दुसरी काय अवस्था निर्माण होणार ? कारकुनीच निर्माण होईल !
मी दिल्लीच्या एक्झिक्युटिव्ह कौन्सिलमध्ये असताना लॉर्ड लिन्लिथगो व्हाईसरॉय होते. मी त्यांना म्हणालो, तुम्ही सर्वसामान्य खर्च तर करताच, पण मुसलमानांकरता अलिगड युनिव्हर्सिटीस तीन लाख रुपये शिक्षणाकरता खर्च करता. त्याचप्रमाणे बनारसच्या हिंदू विद्यापीठासही तुम्ही तीन लाख रुपये देता. मात्र आम्ही हिंदू नाही की मुसलमान नाही. आमच्यासाठी काही करावयाचे म्हटले तर त्यांच्या हजारो पटीने जास्त करावयास हवे. निदान आमच्यासाठी मुसलमानांइतके तरी करा. तेव्हा लिन्लिथगोने सांगितले, तुम्हाला याबाबत काय लिहून आणावयाचे ते आणा ! त्याप्रमाणे मी एक मेमोरंडम लिहिले. ते चोपडे अजून मजजवळ आहे. युरोपियन लोक मोठे सहानुभूतीचे होते. त्यांनी माझे म्हणणे मान्य केले. पण घोडे जे पेंड खाऊ लागले ते हे पैसे कोणत्या गोष्टीवर खर्च करावयाचे त्यावर ! त्यांना वाटत होते, आमच्यातील मुली शिकलेल्या नाहीत, त्यांना शिक्षण द्यावे, त्यांची बोर्डिंगे काढावीत व त्यावर, ते पैसे खर्च करावेत. आमच्यातील मुलींना शिकविले व सुशिक्षित केले तरी त्यांना वेगवेगळ्या पक्वान्नांचे पदार्थ करावयास घरी सामान कोठे आहे ? त्यांच्या शिक्षणाचा शेवटी परिणाम काय ? इतर गोष्टीवरील रक्कम सरकारने खर्च केली व शिक्षणावरील अडवून ठेवली.
म्हणून एके दिवशी मी लिन्लिथगोकडे गेलो आणि या शिक्षणावरील खर्चाबाबत म्हणालो, ” तुम्हाला राग येणार नसेल तर एक प्रश्न विचारतो. मी एकटा ५० ग्रेज्युएटच्या समान आहे की नाही ? ” ते त्यांना मान्य करावे लागले. नंतर मी पुन्हा विचारले, ” याचे कारण काय ? ” ते म्हणाले, ” ते कारण आम्हास माहीत नाही.” मी म्हणालो की, ” माझी विद्वत्ता एवढी मोठी आहे की, मी राजवाड्याच्या टोकावर जाऊन बसू शकतो. मला अशी माणसे हवी आहेत, कारण तेथून सर्वत्र टेहळणी करता येते. आमच्या लोकांचे संरक्षण करावयाचे असेल तर अशी पारध करणारी माणसे निर्माण झाली पाहिजेत. कारकून काय करणार ? ” त्यासरशी लिन्लिथगोस माझे म्हणणे पटले, व त्या वर्षी १६ विद्यार्थ्यांना विलायतेत उच्च शिक्षण घेण्यासाठी पाठविण्यात आले. त्या १६ जणांपैकी जशी काही मडकी कच्ची, काही पक्की असतात त्याप्रमाणे काही कच्ची, काही पक्की निघाली. ही गोष्ट निराळी ! पुढे राजगोपालाचारी यांनी ही उच्च शिक्षणाची योजना रद्द करून टाकली.
या देशात आम्हाला हजारो वर्षे निरुत्साही करून ठेवील, अशी परिस्थिती आहे. ही परिस्थिती जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्या उन्नतीबद्दल उत्साह उत्पन्न होणे शक्य नाही. या बाबतीत या धर्मात राहून आम्ही काहीच करू शकत नाही. मनुस्मृतीमध्ये चातुर्वर्ण्य सांगितले आहे. चातुर्वर्ण्य व्यवस्था ही मनुष्यमात्राच्या उत्कर्षाला अत्यंत घातक आहे. मनुस्मृतीत लिहिले आहे की, शूद्रांनी फक्त सेवा चाकरी करावी. त्यांना शिक्षण कशाला ? ब्राह्मणाने शिक्षण घ्यावे, क्षत्रियाने शस्त्रे धारण करावीत, वैश्याने व्यापार उदीम करावा व शूद्राने चाकरी करावी. ही घड़ी कोण उलगडू शकेल ? ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य वर्णाच्या लोकांना काही ना काही फायदा आहे, शूद्रांचे काय ? तीन वर्ण सोडले तर इतर जातीत काही उत्साह उत्पन्न होईल काय ? चातुर्वर्ण्याची व्यवस्था काही फुकाफुकी नाही ; ही रुढी नाही ; हा धर्म आहे.
हिंदू धर्मामध्ये समता नाही. गांधींना एकदा मी भेटावयास गेलो असता ते म्हणाले, ” मी चातुर्वर्ण्य मानतो. ” मी म्हणालो, ” तुमच्यासारखे महात्मे चातुर्वर्ण्य मानतात ! पण हे चातुर्वर्ण्य कोणते व कसे ? (हाताच्या पंजाची बोटे एकावर एक येतील असा हात करून) हे चातुर्वर्ण्य उलट की सुलट : चातुर्वर्ण्याची सुरूवात कोणीकडून व शेवट कोठे ? ” गांधींनी या प्रश्नाचे उत्तर दिले नाही आणि देणार तरी काय ? आमचा ज्या लोकांनी नाश केला त्यांचा देखील या धर्माने नाश होईल ! हा मी हिंदू धर्मावर उगीच आरोप करीत नाही. हिंदू धर्मामुळे कोणाचाही उद्धार होऊ शकणार नाही. तो धर्मच नष्टधर्म आहे.
आपला देश परकीयांच्या ताब्यात का गेला ? युरोपमध्ये १९४५ पर्यंत लढाया चालू होत्या. जेवढे सैन्य मरत असे तेवढे रिक्रूट भरतीमुळे पुढे येत असे. त्यावेळी कोणीही आम्ही लढाई जिंकली असे म्हणू शकले नाही. आमच्या देशाचे सगळे काही निराळे ! क्षत्रिय मेले की आम्ही खलास! आम्हाला जर शस्त्रे धारण करण्याचा अधिकार असता तर हा देश पारतंत्र्यात गेला नसता. मग कोणीही हा देश जिंकू शकले नसते !
हिंदू धर्मामध्ये राहून कोणाचा काहीही उद्धार होणार नाही. हिंदू धर्म रचनेप्रमाणे वरिष्ठ वर्णांना व जातींना फायदे आहेत हे खरे आहे. पण इतरांचे काय ? ब्राह्मण बाई बाळंतीण झाली की तिची नजर हायकोर्ट जज्जाची जागा कोठे रिकामी आहे त्याकडे असते. आमची झाडूवाली बाई बाळंतीण झाली तर तिची नजर कोठे झाडूवाल्याची जागा रिकामी आहे तिकडे असते. अशी विचित्र रचना हिंदू धर्माच्या वर्णव्यवस्थेने केलेली आहे. यातून सुधारणा ती काय होणार ? उत्कर्ष हा फक्त बौद्ध धर्मातच होऊ शकेल.
बौद्ध धर्मात ७५ टक्के ब्राह्मण भिक्षु होते. २५ टक्के शूद्रादी होते. परंतु भगवंतांनी सांगितले, ” हे भिख्खुहो, तुम्ही निरनिराळ्या देशातून व जातीतून आला आहात. आपल्या प्रदेशातून नद्या वाहतात तेव्हा त्या पृथक पृथक असतात, मात्र त्या सागरास मिळाल्या की त्या पृथक राहात नाहीत. त्या एकजीव व समान होतात. बौद्ध संघ हा सागराप्रमाणे आहे. या संघात सर्व सारखे व समान ! ” सागरात गेल्यावर हे गंगेचे पाणी किंवा हे महानदीचे पाणी असे ओळखणे अशक्य असते. त्याप्रमाणे बौद्ध संघात आले म्हणजे आपली जात जाते व सर्वजण समान असतात, अशी समता सांगणारा एकच महापुरुष आहे, आणि तो महापुरूष म्हणजे भगवान बुद्ध होय. ( प्रचंड टाळ्या )
काही लोक असे म्हणतात, तुम्ही धर्मांतर करण्यास इतका अवधी का लावला ? इतके दिवस काय करीत होता ? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. धर्म पटवून देणे हे काम सोपे नाही. ते एका माणसाचे काम नाही. धर्माबाबत विचार करणाऱ्या कोणत्याही माणसास हे समजून येईल. माझ्यावर जेवढी जबाबदारी आहे, तेवढी जबाबदारी जगातील कोणत्याही माणसावर नाही. मला अधिक आयुष्य लाभल्यास मी योजलेले कार्य पूर्ण करीन. ( डॉ. बाबासाहेब चिरायू होवोतच्या घोषणा व निनाद.)
महार बौद्ध झाले तर काय होईल, असे काही लोक म्हणतील. असे त्यांनी म्हणू नये, असे माझे त्यांना सांगणे आहे. ते त्यांना धोकादायक होईल. वरिष्ठ व संपत्तीवान वर्गाला धर्माची आवश्यकता वाटणार नाही. त्यांच्यामधील अधिकारावर असलेल्या साहेब लोकांना राहाण्यास बंगला आहे. त्यांची सेवा करावयास चाकर नोकर आहेत, त्यांना धन संपत्ती आहे, मानमरातब आहे, अशा माणसांना धर्माबद्दल विचार अगर चिंता करण्याचे कारण नाही.
धर्माची आवश्यकता गरिबांना आहे. पीडित लोकांना धर्माची आवश्यकता आहे. गरीब मनुष्य जगतो तो आशेवर. Hope ! जीवनाचे मूळ आशेत आहे. आशाच नष्ट झाली तर जीवन कसे होईल ? धर्म आशादायी बनवितो, व पीडितांना, गरिबांना संदेश देतो ; ” काही घाबरू नकोस, होईल, जीवन आशादायी होईल ” म्हणून गरीब व पीडित मनुष्यमात्र धर्माला चिकटून राहातो.
जेव्हा युरोपमध्ये ख्रिस्ती धर्म शिरला त्यावेळी रोमची व आसपासच्या देशांची परिस्थिती अतिशय हलाखीची होती. लोकांना पोटभर जेवणही मिळत नव्हते. त्यावेळी गरीब लोकांना खिचडी वाटण्यात येत असे. त्यावेळी ख्रिस्ताचे अनुयायी कोण झाले ? गरीब पिडलेले लोकच झाले. युरोपमधील सर्व गरीब व कनिष्ठ जनता ख्रिस्ती बनली. हा ख्रिश्चन धर्म भीक मागणाऱ्यांचा आहे, असे गिबनने म्हटले होते. ख्रिस्ती धर्म हा युरोपमध्ये सर्वांचा धर्म कसा झाला, याचे उत्तर द्यावयास गिबन आज हयात नाही ; नाहीतर याचेही उत्तर त्याला द्यावे लागले असते.
काही लोक असे म्हणतील, हा बौद्ध धर्म महारड्या-मांगांचा धर्म आहे. ब्राह्मण लोक भगवंताला ‘ भो गौतम ‘ म्हणजे ‘ अरे गौतम ‘ असे म्हणत
असत. ब्राह्मण बुद्धाला असे हिणवीत-चिडवीत असत. पण राम, कृष्ण, शंकर यांच्या मूर्ती परदेशात विकावयास ठेवल्या तर किती खपतील ते पाहावे. पण बुद्धाची मूर्ती ठेवली तर एकही मूर्ती शिल्लक राहाणार नाही. ( टाळ्यांचा कडकडाट ) आता घरातल्या घरात ( भारतात ) हे पुष्कळ झालं, बाहेर काही दाखवा ; जगात नाव जाहीर आहे ते फक्त बुद्धाचेच ! तेव्हा ह्या धर्माचा प्रसार झाल्याशिवाय कसा राहील ?
आमच्या वाटेने आम्ही जाऊ ; तुमच्या वाटेने तुम्ही जावे. आम्हाला नवीन वाट मिळाली आहे. हा आशेचा दिवस आहे. हा अभ्युदयाचा, उत्कर्षाचा मार्ग आहे. हा मार्ग काही नवीन नाही. हा मार्ग कोठून आणलेला नाही. हा मार्ग येथलाच आहे. भारतातीलच आहे. या देशामध्ये २००० वर्षे बौद्ध धर्म होता. खरे म्हणजे, या पूर्वीच आम्ही बौद्ध धर्मात का गेलो नाही, याचीच आम्हाला खंत वाटते. भगवान बुद्धाने सांगितलेली तत्त्वे अजरामर आहेत. पण बुद्धाने मात्र तसा दावा केलेला नाही. कालानुरूप बदल करण्याची सोय त्यात आहे. एवढी उदारता कोणत्याही धर्मात नाही.
बौद्ध धर्माचा नाश झाला याचे मुख्य कारण मुसलमानांच्या स्वाऱ्या हे होय. मुसलमानांनी स्वाऱ्यांमध्ये मूर्ती फोडून टाकल्या. बौद्ध धर्मावर यामुळे पहिले आक्रमण झाले. त्यांच्या स्वाऱ्यांना भिऊन बौद्ध भिख्खु नाहीसे झाले. कोणी तिबेटला गेले ; कोणी चीनला गेले ; कोणी कोठे गेले ! धर्माचे संरक्षण करण्यासाठी उपासक लोक हवे असतात. वायव्य सरहद्द प्रांतात एक ग्रीक राजा होता. त्याचे नाव मिलिंद. हा राजा सदोदीत वादविवाद करीत असे. वादविवादाची त्यास मोठी आवड होती. तो हिंदुंना सांगे, जो कोणी वादविवादपटू असेल त्याने येऊन वादविवाद करावा. त्याने पुष्कळांना निरूत्तर केले होते.
एकदा त्याला बौद्ध लोकांबरोबर वादविवाद करावा असे वाटले व वादविवादपटू कोणी बौद्ध असल्यास त्यास घेऊन यावे असे त्याने सांगितले. तेव्हा बौद्ध लोकांनी नागसेनास विनंती केली की, तुम्ही या वादविवादात बौद्ध जनांची बाजू मांडावी. नागसेन विद्वान होता. तो पूर्वीचा ब्राह्मण होता. नागसेनाचा व मिलिंदचा जो वादविवाद झाला तो पुस्तक रूपाने जगाला माहीत आहे. त्या पुस्तकाचे नाव ” मिलिंद पन्ह ” आहे. मिलिंदाने असा प्रश्न विचारला की, ” धर्मास ग्लानी का येते ? नागसेनाने त्याचे उत्तर देऊन त्याची तीन कारणे सांगितली.
पहिले कारण हे की, एखादा धर्मच कच्चा असतो. त्या धर्माच्या मूळ तत्वात गांभीर्य नसते. तो कालिक धर्म बनतो व काळापुरता असा धर्म टिकतो.
दुसरे कारण हे की, धर्म प्रचार करणारे विद्वान लोक नसतील तर धर्मग्लानी होते. ज्ञानी माणसांनी धर्म-ज्ञान सांगितले पाहिजे. विरोधकांशी वादविवाद करण्यास धर्माचे प्रचारक सिद्ध नसतील तर धर्माला ग्लानी येते. आणि
तिसरे कारण हे की, धर्म व धर्माची तत्त्वे विद्वानासाठी असतात. प्राकृत व सामान्य लोकांकरिता मंदिरे-देवळे असतात. ते तेथे जाऊन आपल्या श्रेष्ठ विभूतीचे पूजन करतात.
आपण बौद्ध धर्म स्वीकारताना ही कारणे लक्षात ठेवली पाहिजेत. बौद्ध धर्माची तत्त्वे कालिक, काही कालापुरती आहेत असे कोणासही म्हणता यावयाचे नाही. आज दोन हजार पाचशे वर्षानंतरही बुद्धाची सारी तत्त्वे सर्व जग मानते. अमेरिकेमध्ये बुद्धाच्या दोन हजार संस्था आहेत. इंग्लंडमध्ये तीन लाख रुपये खर्च करून बौद्ध मंदीर बांधण्यात आले आहे. जर्मनीतही तीन, चार हजार बौद्ध संस्था आहेत. बुद्धाची तत्त्वे अजरामर आहेत. तथापि बुद्धानी असा दावा केला नाही की, हा धर्म ईश्वराचा आहे. बुद्धानी सांगितले माझे वडील प्राकृत होते ; माझी आई प्राकृत बाई होती. हा धर्म तुम्हाला वाटेल तर घ्यावा. हा धर्म जेव्हा तुमच्या बुद्धीला पटेल तेव्हा तो तुम्ही स्वीकारा. एवढी उदारता दुसऱ्या कोणत्याही धर्मात सांगितलेली नाही.
बौद्ध धर्माचा मूळ पाया काय आहे ? इतर धर्मात व बौद्ध धर्मात फार फरक आहे. इतर धर्मात बदल हा घडून यावयाचा नाही. कारण मनुष्य व ईश्वर यांचा संबंध ते धर्म सांगतात. इतर धर्माचे म्हणणे असे की, ईश्वराने सृष्टी निर्माण केली. ईश्वराने आकाश, वायु, चंद्र, सूर्य सर्व काही निर्माण केले. आम्हाला ईश्वराने काहीही करावयाचे शिल्लक ठेवले नाही, म्हणून ईश्वरास भजावे ! ख्रिस्ती धर्माप्रमाणे तर मृत्यूनंतर एक निर्णयाचा दिवस Day of Judgement असतो व त्या निर्णयाप्रमाणे सर्व काही घडते. देव व आत्मा यांना बौद्ध धर्मात जागा नाही. भगवान बुद्धानी सांगितले, जगात सर्वत्र दुःख आहे ; ९० टक्के माणसे दुःखाने पिडलेली आहेत. त्या दुःखातून पिडलेल्या, गरीब माणसांना मुक्त करणे हे बौद्ध धर्माचे मुख्य कार्य आहे. बुद्धापेक्षा कार्ल मार्क्सने वेगळे काय सांगितले ? भगवंतानी जे सांगितले ते वेड्या वाकड्या मार्गाने सांगितले नाही.
बंधुंनो, मला सांगावयाचे होते ते सांगितले. हा धर्म सर्वतोपरी परिपूर्ण आहे. त्यास लांछन कोठेच नाही. हिंदू धर्माची अशी काही तत्त्वप्रणाली आहे
की त्यामधून उत्साहच निर्माण होऊ शकत नाही. हजारो वर्षांपासून परवापर्यंत आपल्या समाजामधून एकही मनुष्य ग्रॅज्युएट अगर विद्वान होऊ शकला नाही. मला सांगावयास हरकत नाही की, माझ्या शाळेत झाडलोट करणारी एक बाई होती. ती मराठा होती. ती मला शिवत नसे. माझी आई मला सांगत असे की मोठ्या माणसास मामा म्हणत जा. पोस्टमनला मी मामा म्हणत असे. (प्रचंड हशा) लहानपणी शाळेत असताना मला तहान लागली होती. मी मास्तरांना तसे सांगितले. मास्तरांनी माझ्या संरक्षणाकरिता चपराशाला दुसरीकडून बोलाविले व याला नळावर ने असे सांगितले. आम्ही नळावर गेलो. चपराशाने मग नळ सुरू केला व मी पाणी प्यालो. मला शाळेत पाणी प्यावयास मिळत नसे. पुढे मला डिस्ट्रिक्ट जज्जाची नोकरी देऊ केली होती. पण ती घोरपड मी गळ्यात बांधून घेतली नाही. माझ्या बांधवांचे कार्य मग कोण करील, असे माझ्यापुढे कोडे होते, म्हणून मी नोकरीच्या बंधनात अडकलो नाही.
मला वैयक्तिकरित्या या देशातील कोणतीही गोष्ट अशक्य नाही. (टाळ्या) तुमच्या डोक्यावर वैश्य, क्षत्रिय, ब्राह्मण अशी जी उतरंड रचली आहे ती कशी उलटेल व मोडेल हा खरा प्रश्न आहे. म्हणून या धर्माचे ज्ञान सर्वप्रकारे तुम्हाला करून देणे हे माझे कर्तव्य आहे. मी पुस्तके लिहून तुमच्या शंका कुशंका दूर करीन व ज्ञानाच्या पूर्णावस्थेला तुम्हास नेण्याचे सर्व प्रयत्न करीन. आज तरी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून वागले पाहिजे.
मात्र तुमचीही जबाबदारी मोठी आहे. तुमच्याबद्दल इतर लोकांना आदर वाटेल, मान सन्मान वाटेल अशी तुम्ही कृती केली पाहिजे. हा धर्म म्हणजे आपण एक गळ्यात मढ़े अडकवून घेत आहोत असे मानू नका. बौद्ध धर्माच्या दृष्टीने भारताची भूमी सध्या शून्यवत् आहे. म्हणून आपण उत्तम रीतीने धर्म पाळण्याचा निर्धार केला पाहिजे. नाही तर महार लोकांनी तो निंदाजनक स्थितीस आणला असे होऊ नये म्हणून आपण दृढनिश्चय केला पाहिजे. हे आपल्याला साधले तर आपण आपल्या बरोबर देशाचा, इतकेच नव्हे तर जगाचाही उद्धार करू. कारण बौद्ध धर्मानेच जगाचा उद्धार होणार आहे. जगात जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत शांतता राहाणार नाही.
हा नवा मार्ग जबाबदारीचा आहे. आपण काही संकल्प केला आहे. काही इच्छिलेले आहे, हे तरुणांनी लक्षात घ्यावे. त्यांनी केवळ पोटाचे पाईक बनू नये. आपल्या प्राप्तीचा निदान २० वा हिस्सा या कामी देईन, असा निश्चय करावा. मला सर्वांना बरोबर न्यावयाचे आहे. प्रथम तथागताने काही व्यक्तींना दीक्षा दिली व त्यांना ” या धर्माचा प्रचार करा ” असा आदेश दिला. त्याप्रमाणे पुढे यश व त्याच्या ४० मित्रांनी बौद्ध दीक्षा घेतली. यश हा श्रीमंत घराण्यातील होता. त्यांना भगवंताने सांगितले, हा धर्म कसा आहे ? तर
” बहुजन हिताय बहुजन सुखाय, लोकानुकंपाय, धम्म आदि कल्याणं, मध्य कल्याणं, पर्यावसान कल्याणं. ” त्या वेळच्या परिस्थितीप्रमाणे तथागताने आपल्या धर्माच्या प्रचाराचा मार्ग तयार केला. आता आपणालाही यंत्रणा तयार करावी लागेल म्हणून समारंभानंतर दरेकाने दरेकाला दीक्षा द्यावी. दरेक बौद्ध माणसाला दीक्षा देण्याचा अधिकार आहे असे मी जाहीर करतो.
🔹🔹🔹
✍️ संकलन – आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे
More Stories
स्वातंत्र्य, माणूसकी, समान हक्क मिळतील तेच स्वातंत्र्य – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सत्ता कोणाचीही असो अस्पृश्यांना दडपण्याचाच प्रयत्न होईल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
युद्धोत्तर हिंदुस्थानपुढे मोठमोठे प्रश्न उपस्थित होणार आहेत – डॉ. बाबासाहेब आंबेडकर