गौतम बुद्ध म्हणजे चालते बोलते, सरळ सोपे ग्रंथालयच आहे. गौतम बुद्धांनी नेहमी मानवजातीला समजेल अशाच शब्दांत साधेपणाने उच्छभू शिकवण दिलेली आहे. अशीच एक शिकवण देणारी बुद्ध कथा वाचा.
एक दिवस गौतम बुद्ध विहाराभोवती चक्कर मारत होते. त्यांना पाहून एक भिक्षू त्यांच्या जवळ आला अणि आपल्याला नवी शाल हवी असल्याचे त्याने बुद्धांना सांगितले.
बुद्धांनी त्याला विचारले, “तुझ्या आधीच्या शालीला काय झाले ?”
“तथागत ती खूप जुनी, फाटकी झाली होती. त्यामुळे मी ती बेडशीट म्हणून वापरतोय, “भिक्षूने उत्तर दिले.
बुद्धांनी पुन्हा विचारले, “पण तुझ्या जुन्या बेडशीटचे काय झाले ?” “तथागत, ते वापरून वापरून जीर्ण झाले. पार फाटले होते. म्हणून मी कापून त्याचा उशीचा अभ्रा तयार केला.” भिक्षूने उत्तर दिले.
“पण हा नवा अभ्रा शिवण्याआधी उशीला अभ्रा होताच ना ? मग त्या आधीच्या अभ्र्याचे तू काय केलेस ?” बुद्धांनी विचारले. “त्या अभ्र्यावर माझे डोके कित्येक लाख वेळा घासले गेले असेल, तथागत त्यामुळे त्याला एक मोठे भोक पडले होते. म्हणून मी त्याचे पायपुसणे बनवले” भिक्षूने अगदी प्रामाणिकपणे सांगितले.
गौतम बुद्धांचे या उत्तराने समाधान काही झाले नाही. ते नेहमी कुठल्याही प्रश्नाच्या मुळापर्यंत जायचे. त्यांनी भिक्षूला विचारले, “मला सांग, तू जुन्या पायपुसण्याचे काय केलेस ?”
भिक्षूने हात जोडले आणि म्हणाला, “तथागत, त्या जुन्या पायपुसण्याच्या अगदी चिंध्या झाल्या होत्या. वापरून वापरून धागे उसवून आतले अस्तर बाहेर आले होते. मग मी सुती धागे काढून त्याची वात तयार केली. नंतर तीच वात मी दिव्यात वापरली.” भिक्षूचे उत्तर ऐकून बुद्ध हसले. भिक्षूला मग नवी शाल मिळाली
पुनर्चक्रीकरण, पुनर्वापर, कचऱ्याची कमीत कमी निर्मिती
आपण किती तरी वस्तू विकत घेत राहतो, आणि जास्त विचार न करता त्या वापरून टाकूनही देतो. आपल्या गरजेपेक्षा अधिक गोष्टी आपण खरेदी करतो. भरपूर खरेदी करा ! भरपूर कचरा करा… हा जणू आपला मंत्रच आहे.
पाणी, झाडे, वाळू आणि माती यांसारख्या पृथ्वीवरच्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा आपण गैरवापर करतो आणि कित्येक टन निरुपयोगी वस्तू निर्माण करून कचऱ्याचे डोंगर तयार करत राहतो.
पण आपली ही वृत्ती पहिल्यापासून अशीच होती का ? वस्तू वाया घालवणे हा आपला भारतीयांचा गुणधर्मच आहे का ? तर नाही ! भारतीय लोक काटकसरी , सगळ्याचा निगुतीने वापर करणारे आणि सुज्ञ असल्याचे आपला इतिहास सांगतो.
प्रत्येक वस्तूचे अनेक उपयोग असतात- ती अनेक पिढ्या उपयोगी पडते, असा आपला विश्वास आहे. पुनर्वापर आणि पुनर्चक्रीकरण या दोन्हीची मुळे भारतीय संस्कृतीत खोलवर रुजलेली आहेत. ही गोष्टही अडीच हजार वर्षांपूर्वीची भगवान गौतम बुद्धांच्या काळातली आहे.
भौतिक जगाविषयीचा गाढ आदर आणि संवेदनशीलता स्पष्ट करणारी ही बुद्धांची गोष्ट आहे. तिने आपल्या समोर अनेक धडे ठेवले आहेत. यातून आपण काय नक्कीच धडा घेतला पाहिजे.
More Stories
प्रव्राज्य Pravjaya
CULTIVATE THE WORLD-TRANSCENDING TEACHINGS जग-अतिरिक्त शिकवणी जोपासा
गौतम बुद्धांचे मौल्यवान विचार चिंता, द्वेष आणि मत्सर दूर करतात.