भाद्रपद पौर्णिमेला पाली भाषेत ‘पोट्ठपाद मासो’ म्हणतात. ही पौर्णिमा साधारणतः सप्टेबर महिन्यात येते. या पौर्णिमेला भगवान बुद्धाच्या जीवनातील ज्या घटना घडल्यात त्या अशा भगवंताचा प्रसेनजीत राजास उपदेश, वर्षावासाची तिसरी पौर्णिमा, भगवान बुद्धाचे वर्षावास, पातिमोक्ख संस्कार विधी. या पौर्णिमेला ज्या घटना घडल्यात, त्यांचा संक्षिप्तपणे परिचय असा-
१) भगवंतांचा प्रसेनजीत राजास उपदेश
यो वे उप्पतितं कोधं, रथ भन्तंव धारये। तमहं सारिथं ब्रूमि, रस्मिग्गाहो इतरो जनो।। (धम्मपदं : २२२)
( जो आलेल्या क्रोधाला भरकटलेल्या रथाप्रमाणे थोपवून धरतो, त्यालाच मी (खरा) सारथी म्हणतो, इतर माणसे नुसती लगाम धरणारीच होत. )
कोसल देशाचा राजा प्रसेनजीत यांस भगवान बुद्ध जेतवन विहारात असल्याचे कळले. तो राजेशाही इतमामासह जेतवन विहारात गेला. भगवान बुद्धाला हात जोडून वंदन करीत म्हणाला,
“माझे हे क्षुद्र आणि अप्रसिद्ध राज्य खरोखर आज भाग्यवान झाले आहे. कारण आपल्यासारखा सत्याचा राजा, धर्मराज, जगन्नायक उपस्थित असताना, या राज्यावर आपत्ती व संकटे कशी ओढवतील? त्या अर्थी आता मला आपल्या धम्मामृताचे प्राशन करू द्या.”
राजा प्रसेनजीत यांच्या विनंतीनुसार भगवान बुद्धांनी त्यांचा धम्म थोडक्यात समजावून सांगितला. महाराजांनी तो नीटपणे ऐकावा व आत्मसात करावा, असे बुद्धांनी म्हटले आणि उपदेश दिला-
“आपल्या प्रजाजनांना एकुलत्या एक मुलाप्रमाणे माना. त्यांच्यावर जुलूम करू नका. त्यांचा नाश करू नका. आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव आपल्या ताब्यात ठेवा. कुमार्गाच्या विचाराचा त्याग करा व सन्मार्गाने जा. दुसऱ्यांना पायदळी तुडवून स्वतः उच्चपदी चढू नका. दुःखिताला सुख द्या आणि त्याला आपला मित्र माना.”
“राजेशाही बडेजावास अधिक महत्त्व देऊ नका. किंवा तोंडपूजा करणाऱ्यांची गोड शब्दात केलेली स्तुती ऐकू नका.”
“तपश्चर्येने स्वतःला क्लेश करून घेण्यात काहीही लाभ नसतो. म्हणून धम्माचे चिंतन करा व सदाचाराच्या नियमाचे महत्त्व ओळखा.”
“दुःखाचे व अनिष्ट गोष्टींचे पर्वत आपल्याभोवती सर्वत्र उभे आहेत आणि खऱ्या धम्माचा विचार केल्यानेच त्यातून आपली सुटका होऊ शकेल?”
“झाडाला आग लागली तर त्याच्यावर पक्षी कसे राहू शकतील? जिथे वासना असते तिथे सत्य राहू शकत नाही. हे ज्ञान ज्याला नाही तो विद्वान मनुष्य जरी ऋषी म्हणून त्याची स्तुती होत असली तरी तो अज्ञच समजला पाहिजे.”
“ज्याला हे ज्ञान झाले आहे, त्यालाच प्रज्ञा प्राप्त होते. ही प्रज्ञा प्राप्त करून घेणे हा जीवनाचा एकमेव उद्देश आहे. तिच्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे जीवनाचे अपयशच होय.”
“कम्मवासनेच्या भरतीपासून सर्वांनाच सारखा धोका असतो. सगळे जग त्या भरतीत वाहून जाते. जो तिच्या भोवऱ्यात सापडतो त्याची सुटका होत नाही.
परंतु प्रज्ञा ही नौका आहे आणि विचार हे तिचे सुकाणू आहे. धम्म तुम्हाला असा आदेश देतो की, तुमच्या या शत्रूपासून तुम्ही आपले संरक्षण करा.”
“आपल्या हातून दुष्कृत्ये होऊ नयेत म्हणून आपण आपले विचार तपासून पाहू या. कारण आपण जे पेरतो ते आपणाला मिळते.”
“सद्वर्तनाने आणि बुद्धीचा उपयोग करून आपले खरे श्रेष्ठत्व दाखवा. ऐहिक वस्तूंच्या व्यर्थत्वाविषयी खोल विचार करा आणि जीवन चंचल आहे, हे समजावून घ्या.”
“मन उदात्त करा आणि निश्चित ध्येयावर निष्ठा असू द्या. सद्वर्तनाच्या राजधर्माच्या नियमांचे उल्लंघन करू नका. तुमचा आनंद बाह्य वस्तूंवर अवलंबून न ठेवता तुमच्या स्वतःच्या मनावर अवलंबून ठेवा, असे कराल तर तुमची कीर्ती चिरकाल टिकेल.”२
भगवान बुद्धाची ही अमृतवाणी प्रसेनजीत राजाने अत्यंत आदराने ऐकली, आणि अंतःकरणात साठविली आणि त्यांचा उपासक होण्याचे त्यांना वचन दिले.
एकदा भगवान बुद्ध श्रावस्ती येथे राहात असता कोसलराजा प्रसेनजीत त्यांना भेटण्यासाठी आला.
राजा भगवंतांशी संभाषण करीत असता, राजवाड्यातून एक दूत आला आणि राजापाशी जाऊन त्याची राणी मल्लिका प्रसूत होऊन तिला कन्या झाल्याचे त्याने वृत्त सांगितले.
ते वृत्त ऐकून राजा खिन्न झालेला दिसला. भगवंतांनी राजाला त्याच्या खिन्नतेचे कारण विचारले.
राजा म्हणाला, “राणी मल्लिका प्रसूत होऊन कन्या झाल्याचे वाईट वृत्त नुकतेच कळले आहे.”
परिस्थिती ओळखून भगवंत म्हणाले, “राजा, कन्या ही पुत्रापेक्षा अधिक चांगली निपजण्याचा संभव आहे. ती शहाणी आणि सद्गुणी कन्या, पत्नी, माता अशा त्रिविध भूमिका करणारी आहे.”
“तिला जो पुत्र होईल तो पराक्रमी कृत्ये करील, मोठे राज्य करील, खरोखर अशा थोर पत्नीचा मुलगा आपल्या देशात मार्गदाता होईल.”
अशाप्रकारे राजा प्रसेनजीताने भगवान बुद्धांकडून हा थोर उपदेश ऐकला.
२) वर्षावासाची तिसरी पौर्णिमा
धम्मारामो धम्मरतो, धम्मं अनुविचिन्तयं । धम्मं अनुस्सरं भिक्खु, सद्धम्मा न परिहायति।। (धम्मपदं ३६४)
( धर्मात रममाण असणारा, धर्मात रत असणारा, धर्माचे चिंतन करणारा, धर्माप्रमाणे वागणारा भिक्खू सद्धम्मापासून दूर होत नाही. )*
वर्षावासाचा आरंभ आषाढी पौर्णिमेपासून होतो आणि समापन अश्विनी पौर्णिमेस होतो. या चार पौर्णिमांमध्ये ‘भाद्रपद पौर्णिमा’ ही तिसरी पौर्णिमा आहे.
या वर्षावासाच्या काळात भिक्खूगण एका स्थानात राहून भ्रमण स्थगित करीत असतात. या काळात ते बुद्ध धम्माच्या तत्त्वज्ञानाचे विचारांवर चिंतन मनन करीत असतात. धम्माची शिकवण उपासकांना दिली जाते. यावेळी त्यांच्या भोजनाची व्यवस्था उपासकांनी करावयाची असते.
यामागची पार्श्वभूमी अशी की, बुद्ध भगवान, राजगृह येथील वेळूवनात राहात होते. त्याकाळी भगवंतांनी वर्षाकाळात भिक्खूंनी एका ठिकाणी राहावे, असा नियम केला नव्हता. भिक्खू हिवाळ्यात, उन्हाळ्यात, पावसाळ्यात धर्मोपदेश करीत फिरत असत.
परंतु भिक्खूंच्या या कृत्यावर लोक टिका करीत असत. पावसाळ्यात हे भिक्खू इकडे तिकडे हिंडून ओले गवत तुडवितात, त्यायोगे बारीकसारीक प्राण्यांचा नाश होतो, असे ते म्हणू लागले. ही गोष्ट जेव्हा भगवंताला समजली तेव्हा भिक्खूंनी वर्षाकाळी एकाच ठिकाणी राहावे, असा त्याने नियम केला.
कोणत्या दिवशी वर्षावासाला सुरुवात व्हावी अशी भिक्खूंना शंका आली. तेव्हा भगवान बुद्धाने यासंबंधी उपदेश दिला. भगवंताने आषाढी पौर्णिमेच्या दिवशी पहिल्या वर्षावासाला व आषाढी पौर्णिमेनंतर एक महिन्याने दुसऱ्या वर्षावासाला सुरुवात व्हावी असा नियम केला. वर्षावासाला सुरुवात झाल्यानंतर भिक्खूने तीन महिने एका ठिकाणी राहिले पाहिजे. पण त्याला काही अपवाद आहेत- एखादा श्रद्धापूर्वक उपासक किंवा उपासिका काही दान-धर्म करीत असली तर सात दिवसांच्या मुदतीने त्याच्या किंवा तिच्या आमंत्रणावरून तिकडे जावे. भिक्खू-भिक्खुणी, आईबाप वगैरे आजारी असतील तर सात दिवसांच्या मुदतीने त्यास भेटण्यास जावे.
वर्षकाल संपल्यावर बुद्ध भगवंताच्या दर्शनास जाण्याची भिक्खूची वहिवाट असे. त्याप्रमाणे हे भिक्खूही श्रावस्ती येथे भगवंताच्या दर्शनाला येत. आपल्या
भेटीला आलेल्या भिक्खूंना कुशल समाचार विचारावा, असा बुद्ध भगवंतांचा परिपाठ होता. भगवंताने कुशल समाचार विचारल्यावर भिक्खूंनी ‘आपण मोठ्या आनंदाने वर्षाकाल घालविला’ असे उत्तर दिले. म्हणून भगवान त्या भिक्खूंना म्हणाले, ‘तुम्ही सामग्रीने आणि आनंदाने वर्षाकाल कसा घालविला ते सांगा.’ त्यावेळी त्या भिक्खूंनी, आपण परस्परांशी न बोलण्याचा नियम करून कसे वागलो, हे सर्व भगवंताला सांगितले. भगवंताच्या मते, माझ्यावर अनुकंपा करून संघाने ते दोष मला दाखवावे, मला ते पटल्यास त्याचे यथायोग प्रायश्चित्त करीन, असे त्यांनी त्रिवार म्हणावे. जे भिक्खू तरुण असतील त्यांनी ‘आयुष्मान संघ’ असे म्हणण्याऐवजी ‘भदंत संघ’ असे म्हणावे. त्यावेळी कोणी कोणाचे दोष दाखवून दिल्यास, ते त्याने सरळपणाने स्वीकारावे व संघाची माफी मागावी. ह्याप्रमाणे वर्षाकाळात संघात ऐक्य स्थापन करण्यात यावे.”
वर्षावासाच्या तीन महिन्याच्या काळात भिक्खू आंतरिक शुद्धी आणि मनोविकासाचा कसून प्रयत्न करतात. भिक्खूकडून ज्या आदर्श आचरणाची अपेक्षा आहे, त्या आचरणाचे नियम अरियवंश सुत्तात आले आहेत.
भिक्खूच्या जीवनाचे चार महत्त्वाचे पैलू आहेत. प्रथम आहे, त्याला जी वस्त्रे (चिवर) दिली जातात त्यात त्यांनी समाधानी असायला हवे. त्याने स्वतःला खूप उच्च असल्याचे भासवू नये किंवा इतरांचा द्वेषही करू नये. साधी राहणी, साधे भोजन, आसक्तीविहिन दिनचर्या असावी. शरीर रक्षणापुरती आवश्यक तरतूद करण्याची त्याला मुभा असावी. अशी मानसिकता असलेला भिक्खू साधनेत त्वरेने प्रगती करतो. निश्चितच असे सद्गुण असलेला भिक्खू साधारण जनांसाठी बलप्रद आणि प्रेरणादायक ठरतो.
३) भगवान बुद्धांचे वर्षावास
यथा अगारं दुच्छन्नं, वृद्धि न समतिविज्झति । एवं अभावितं चित्तं, रागो न समतिविज्झति ।। (धम्मपदं : १३)
(घराचे छत योग्य नसेल तर ज्याप्रमाणे तिथे वृष्टीचा प्रवेश करते. त्याप्रमाणे जर (संयमाचा) अभ्यास नसेल तर मनामध्ये राग प्रविष्ट होतो.) भगवान बुद्धाने संबोधी प्राप्त केल्यानंतर धम्म प्रचाराच्या कालावधीत ४५
वर्षे सतत पायी प्रवास करून पवित्र असा धम्म जगास दिला. भगवंतांनी आपला वर्षावास ‘सारनाथ’ येथे संपन्न केला. त्यांच्या सारनाथ येथील वर्षावासांसह एकूण ४६ वर्षावास झाले. ते त्यांनी पुढील ठिकाणी संपन्न केले.
१) सारनाथ-१, २) राजगृह-५, ३) वैशाली-२, ४) मंकुल पर्वत-२, ५) संसुमारगिरी-२, ६) कौशांबी-१, ७) परिलेयक-१, ८) नाला-१, ९) वैरंजा- १, १०) चालिय पर्वत-३, ११) श्रावस्ती-२५, १२) आलवी-१, १३) कपिलवस्तू-१, असे एकूण ४६ वर्षावास भगवंतांनी संपन्न केले.”
भगवान बुद्धाच्या श्रावस्ती येथील वर्षावास सर्वात अधिक काळाचा आहे. अनाथपिंडिकाने तथागतांना जेतवन विहार दानार्पण केले तेव्हा त्यांनी आपला १४ वा वर्षावास जेतवनातच व्यतित केला होता. तथागतांचा तो श्रावस्तीमधील आणि जेतवनातील पहिलाच वर्षावास होता. त्यानंतर पुढे आनंद तथागतांचा स्थायी सहाय्यक झाला. तेव्हा तथागतांनी या जेतवनात व इतरत्र ठिकाणी २१ व्या वर्षावासापासून तर ४४ व्या वर्षावासापर्यंत सतत १९ वर्षावास व्यतित केले होते. ६ वर्षावास शेजारच्या पूर्वोद्यान विहारात घालविले होते. म्हणजेच इ.स. पूर्व ५१४ मध्ये एक आणि इ.स. ५०७ ते ४८४ या कालावधीत २४, असे एकूण २५ वर्षावास श्रावस्तीमध्ये व्यतित केले होते.’
धम्मनिकाय, मज्झिमनिकाय आणि दीघनिकाय या तिन्ही निकायांमध्ये एकूण ८७१ निकाय म्हणजे सुत्त किंवा प्रवचने आहेत, ती सर्वच तथागतांनी या श्रावस्तीमधील २५ वर्षावासाच्या कालावधीत एकट्या श्रावस्तीतच दिली होती. त्यापैकी ८४४ प्रवचने जेतवन विहारात दिली होती. २३ प्रवचने ही विशाखेच्या पूर्वाराम विहारात दिली होती. ४ प्रवचने ही श्रावस्तीमधील अन्य ठिकाणी दिली होती.
४) पातिमोक्ख संस्कार विधी
पापञ्चे पुरिसो कयिरा, न नं कयिरा पुनप्पुनं । न तम्हि छन्दं कयिराथ, दुक्खो पापस्स उच्चयो ।। ( धम्मपदं : ११७ )
( जर पाप केले तर ते पुनःपुन्हा करू नये. त्यामध्ये रममाण होऊ नये. पापाचा संचय दुःखास कारणीभूत होतो.) १०
प्रत्येक पौर्णिमेला आणि अमावश्येला ‘पातिमोक्ख संस्कार विधी’ आयोजित केला जातो. ज्याच्या हातून प्रमाद घडला असेल, असा प्रत्येक भिक्खू पातिमोक्खाकरिता भरलेल्या परिषदेमध्ये आपल्या प्रमादाची कबुली देतो. त्यावर जसा दंड सांगितला जाईल, तसेच प्रायश्चित्त ग्रहण करतो.
भिक्खूकडून एखादा प्रमाद घडला तर त्याचे स्मरण ठेवून, त्याच्या कलंकापासून मुक्त होण्याकरिता त्याने प्रमाद कबूल करावा. कोणताही प्रमाद
कबूल केल्याने त्याचे गांभीर्य कमी होते. पातिमोक्खाचे पठण करण्याचा विधी असा-
एक आदरणीय भिक्खू संघासमोर जाहीर करतो, “आज उपोसथाचा दिवस आहे. मी पातिमोक्खाचे पठण करीन. ज्याच्या हातून प्रमाद घडला असेल, त्या भिक्खूने तो कबूल करावा. जर कुणाच्याही हातून प्रमाद घडला नसेल तर सर्वांनी गप्प राहावे; तुमच्या गप्प राहण्याने मी समजेन की, सर्वच भिक्खू प्रमादरहित, परिशुद्ध आहेत.””
तीन वेळा प्रश्न विचारल्यावरही एखाद्या भिक्खूने आपल्या स्मरणात असलेल्या एखाद्या प्रमादाची कबुली दिली नाही, तर तो बुद्धिपुरस्सर खोटे बोलतो आहे, असे गृहीत धरले जाईल. यास्तव प्रमाद घडल्यावर जो भिक्खू त्याचे स्मरण ठेवतो व त्यापासून परिशुद्ध होण्याची इच्छा करतो, त्याने आपला प्रमाद कबूल करावयास पाहिजे. तसे केल्यास भिक्खू प्रमादापासून परिशुद्ध झाला, असे समजण्यात यावे.
Bhadrapada Poornima – Potthapada Maso
More Stories
अश्विन पौर्णिमा – अस्सयुज मासो Ashwin Purnima
आषाढ पौर्णिमा Ashadha Purnima
ज्येष्ठ पौर्णिमा Jyeshtha Purnima