जावळी तालुका स्वतंत्र मजूर पक्ष परिषद – दुसर्या अधिवेशनात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले मोलाचे मार्गदर्शन….
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जावळी तालुक्याला भेट द्यावी अशी जावळी तालुक्यातील जनतेची फार दिवसांपासून इच्छा होती आणि तशातच शनिवार दिनांक २१ मे १९३८ रोजी सकाळी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सुभेदार सवादकरांना भेटण्याकरिता पांचगणी मुक्कामी येणार आहेत असे गुरुवार दिनांक १९ मे १९३८ रोजी सायंकाळी समजताच एक दिवसाचे आत जावळी तालुका स्वतंत्र मजूर पक्ष परिषद अधिवेशन दुसरे मे. आमदार भाई चित्रे, बी. ए., एम. एल. ए. यांच्या अध्यक्षतेखाली भरविण्याचे कार्यकर्त्यांनी जाहीर केले. शुक्रवारी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत सर्व कार्यकर्त्यांनी जाहीर पत्रके व प्रचारकार्य करण्याचे काम पांचगणीपासून आसपास सहा मैलातील खेडे गावात केले. शनिवारी सकाळी बरोबर साडे दहाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मे. आमदार भाई चित्रे, मे. रेवजी बुवा डोळस, मे. नानासाहेब सुरबा टिपणीस, मे. कोवळे व सरदार यांचेसह पांचगणी स्वतंत्र मजूर पक्ष शाखेच्या ऑफिसात येऊन पोचले. ऑफिसात शाखेचे चेअरमन मे. डॉ. एस्. एस्. बंदिसोडे यांनी त्यांचे स्वागत केल्यावर थोड्या विश्रांतीनंतर तेथेच अल्पोपहार करण्यात आला. दुपारी १२ ला सर्व मंडळी डॉ. बिलिमोरियाच्या हॉस्पिटलमध्ये सुभेदार सवादकरांना भेटण्यास गेली. प्रथमतः काही कुशल – मंगल प्रश्न वगैरे झाल्यानंतर बाबासाहेबांनी सुभेदार सवादकरांच्या प्रकृतीमानाची चौकशी केली. प्रकृती साधारण सुधारत असल्याचे पाहून डॉ. बाबासाहेबांना समाधान वाटल्याचे दिसले. सुभेदारांना स्वतःच्या प्रकृतीपेक्षा इलाख्यात समाजकारण व राजकारण कसे काय चालले आहे याचीच चिंता लागून राहिली आहे, असे दिसले. त्यांनी एका मागून एक असे अनेक प्रश्न विचारण्यास सुरूवात केली व बाबासाहेबांनी आणि भाई चित्रे, टिपणीस वगैरे मंडळींनी त्यांची शांतपणे उत्तरे दिलीत. सुभेदार सवादकरांचे अंतःकरणात कसली तरी खळबळ उडून गेलेली त्यांच्या चर्येवरून दिसून येत होती. मधून मधून त्यांचे नेत्रातून एकदोन अश्रुबिंदूही चमकत होते. शेवटी बाबासाहेब म्हणाले, “सुभेदार, प्रकृती उत्तम सुधारेपर्यंत अगदी हालचाल करू नका आणि डॉक्टर हुकूम देईपर्यंत हॉस्पिटलचे बाहेर निघू नका.” अशातऱ्हेने बरोबर दीड तास सुभेदार साहेबांच्या सहवासात घालवून जड अंतःकरणाने सर्वांनी सुभेदारांचा निरोप घेतला. सर्व मंडळींना पोचविण्याकरिता सुभेदारसाहेब काही अंतरापर्यंत रस्त्यावर आले होते. तेथून दोन वाजता सेंट लुकस नर्सिंग होमचे मेडिकल सुपरिन्टेन्डेन्ट डॉ. क्युलर यांचे निवासस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व इतर सन्माननीय पाहुण्यांना थाटाची पार्टी झाली. त्यानंतर सर्व मंडळी जवळच असलेल्या परिषदेच्या भव्य तंबूकडे जाण्यास निघाली. बॅन्डचा सुस्वर आवाज चालू होता व खशीचे लेझिम खेळगडीही लोकांची करमणूक करीत होते. पांचगणीचे समता सैनिक दल आपापल्या युनिफॉर्ममध्ये हजर होते. परिषदेच्या चालकांना प्रचारकार्याकरिता जरी एकच पुरा दिवस मिळाला होता तरी जनसमूह दोन हजारापर्यंत जमला होता. परिषदेच्या द्वाराजवळ प्रथमतः सर्व स्त्रियांनी बाबासाहेबांना आरती घेऊन ओवाळले व पुष्पहार अर्पण केले. समता सैनिक दलाची व बॅंडची सलामी झाली. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयनादाचा ध्वनी गगन भेदीत होता. अशा थाटात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर इतर पाहुण्यांसह स्टेजवर विराजमान झाले. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. यानंतर स्वागताध्यक्ष श्री. बंदिसोडे व भाई अनंतराव चित्रे यांची भाषणे झाली.
याप्रसंगी बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,
आज नऊ दिवस झाले मी सारखा दौऱ्यावर आहे. रात्री मी महाडला दोन वाजेपर्यंत भाषण केलेले आहे व सकाळी पहाटेसच उठून हा पांचगणीचा प्रवास केला आहे. त्यामुळे मला येथे भाषण करण्याचे त्राण राहिले नाही. तुम्ही सर्वांनी जो माझा सत्कार केला आहे, त्याबद्दल मी ऋणी आहे. मी काहीतरी बोलावे अशी तुमची इच्छा आहे परंतु काय करू मला तुम्हाला यावेळी निरुत्साही करावे लागत आहे आणि तुम्ही त्याबद्दल रागावणार नाही, अशी मला आशा आहे. पुन्हा एकदा माझे येणे या बाजूला होईल त्यावेळी मला तुम्हाला जे काही सांगावयाचे आहे ते सांगेन. आज तूर्त एवढेच सांगतो की, सुदैवाने येथे स्वतंत्र मजूर पक्षाची शाखा स्थापन झालेली आहेच, तिचे सर्वांनी सभासद व्हावे व आपल्या पक्षाचे बळ वाढवावे. मला आणखी बोलता येत नाही म्हणून भी पुन्हा आपली माफी मागून रजा घेतो.
🔹🔹🔹
संकलन – आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे
More Stories
स्वातंत्र्य, माणूसकी, समान हक्क मिळतील तेच स्वातंत्र्य – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सत्ता कोणाचीही असो अस्पृश्यांना दडपण्याचाच प्रयत्न होईल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
युद्धोत्तर हिंदुस्थानपुढे मोठमोठे प्रश्न उपस्थित होणार आहेत – डॉ. बाबासाहेब आंबेडकर