📚 बुद्ध आणि त्यांचा धम्म
✍🏻 भिमराव रामजी आंबेडकर
एम. ए, पी – एच.डी, डी.एस.सी, एल एल.डी, डी.लिट, बार-ॲट-लॉ
प्रथम खंड : भाग पहिला – जन्म ते प्रव्रज्या.
१. शाक्यांचा आपला संघ होता. वीस वर्षाच्या वयानंतर प्रत्येक शाक्य युवकाला शाक्य संघाची
दीक्षा दिली जात असे. दीक्षित झाल्यावर तो युवक शाक्य संघाचा सदस्य होत असे.
२. सिद्धार्थ गौतमाचे वय वीस वर्ष पूर्ण झाले होते. संघात दीक्षित होण्याची आणि संघाचे सदस्यत्व प्राप्त करण्याची सिद्धार्थाकरिता ही वेळ योग्य होती.
३. शाक्यांचे एक सभागृह होते. त्याला ते संथागार म्हणत. हे संथागार कपिलवस्तू नगरीत होते. संघाच्या सभा संथागारात आयोजित होत असत.
४. सिद्धार्थाला शाक्य संघात दीक्षित करण्याच्या हेतूने शुद्धोदनाने शाक्य पुरोहितास संघाची सभा आयोजित करण्यास सुचविले.
५. त्यानुसार कपिलवस्तूच्या संथागारात शाक्यांची सभा आयोजित करण्यात आली.
६. संघाच्या सभेत पुरोहिताने सिद्धार्थाला संघाचे सदस्यत्व बहाल करण्याचा प्रस्ताव सादर केला
७. शाक्य सेनापती आपल्या स्थानी उभे राहिले, आणि संघाला संबोधून म्हणाले, “शाक्य कुळातील शुद्धोदनाच्या कुटुंबात जन्मलेला सिद्धार्थ गौतम शाक्य संघाचा सदस्य होऊ इच्छितो. तो वीस वर्षाचा असून संघाचा सदस्य होण्यास सर्व दृष्टींनी योग्य असा आहे. म्हणून मी असे प्रस्तावित करितो की, त्याला शाक्य संघाचे सदस्यत्व बहाल केले जावे. या प्रस्तावाला ज्यांचा विरोध आहे त्यांनी बोलावे अशी मी प्रार्थना करतो.”
८. कोणीही या प्रस्तावाच्या विरोधात बोलले नाही. “दुसऱ्यांदा मी असे सूचित करितो की, या प्रस्तावाच्या विरोधात असणारांनी बोलावे.” सेनापती म्हणाले.
९. कोणीही प्रस्तावाच्या विरोधात उभे राहिले नाही. पुन्हा एकदा सेनापती बोलले.” तिसऱ्यांदा मी असे सूचित करितो की, जे या प्रस्तावाच्या विरोधात आहेत त्यांनी बोलावे.”
१०. तिसऱ्यांदा सुद्धा कोणीही प्रस्तावाच्या विरोधात बोलण्यास उभे राहिले नाही.
११. संघाच्या कार्यपद्धतीचा असा नियम होता की, आधी प्रस्ताव मांडल्याशिवाय कोणत्याही विषयावर चर्चा होत नसे आणि प्रस्तावाचे तीनदा वाचन झाल्याशिवाय प्रस्ताव पारित होत नसे.
१२. सेनापतींचा प्रस्तावक तीनदा वाचन झाल्यावर कसल्याही विरोधाशिवाय पारित झाला म्हणून सिद्धार्थ शाक्य संघाचा सदस्य झाल्याचे विधिवत् घोषित करण्यात आले.
१३. त्यानंतर शाक्य पुरोहित आपल्या स्थानी उभे राहिले. त्यांनी सिद्धार्थाला आपल्या स्थानी उभे राहण्याची सूचना केली.
१४. सिद्धार्थाला उद्देशून पुरोहित म्हणाले, ‘संघाने आपले सदस्यत्व बहाल करून तुझा सन्मान केला आहे याची तुला जाणीव आहे काय?’ ‘होय, महोदय’ सिद्धार्थ उत्तरला.
१५. ‘संधाच्या सदस्यत्वाच्या उत्तरदायित्वाची तुला माहिती आहे काय ? “महोदय, खेदपूर्वक सांगावेसे वाटते की, सदस्यत्वाच्या उत्तरदायित्वाची मला माहिती नाही. महोदय, जर त्याविषयो माहिती मिळाली तर मला आनंदच होईल” सिद्धार्थ उत्तरला.
१६. “मी तुला सर्वप्रथम संघ सदस्याच्या कर्तव्याची जाणीव करून देणार आहे.” पुरोहित म्हणाले त्यानंतर क्रमवार त्यांनी ही कर्तव्ये कथन केली. “१. तू तनमनधनाने शाक्यांच्या हितांचे संरक्षण केले पाहिजे. २. तू संघाच्या सभांना अनुपस्थित राहता कामा नये. ३. एखाद्या शाक्याच्या आचरणातला कोणताही दोष तुला आढळून आल्यास भय किंवा पक्षपात न बाळगता सर्वासमक्ष कथन केला पाहिजे. ४. तुझ्यावर एखाद्या गुन्ह्यासंबंधी दोषारोपण करण्यात आल्यास तू त्याचा राग मानू नये तुझा दोष असेल तर तसे स्वीकारावे, नसेल तर तसे स्पष्ट सांगावे.”
१७. यापुढे पुरोहित म्हणाले, “यानंतर मी तुला हे सांगणार आहे की, कशामुळे संघाच्या सदस्यत्वासाठी अपात्र म्हणून घोषित केले जाते.” “१. जर तू बलात्कार केला असेल तर तू संघाचा सदस्य राहू शकणार नाहीस. २. जर तू हत्या केली असेल तर तू संघाचा सदस्य राहू शकणार नाहीस. ३. जर तू चोरी केली असेल तर तू संघाचा सदस्य राहू शकणार नाहीस. ४. तू खोटी साक्ष दिल्याचे सिद्ध झाल्यास तू संघाचा सदस्य राहू शकणार नाहीस.”
१८. “महोदय, मी आपला ऋणी आहे,” सिद्धार्थ म्हणाला, “शाक्य संघाच्या शिस्तीसंबंधाने नियम मला सांगितल्याबद्दल. मी तुम्हाला आश्वासन देतो की शब्द आणि भाव दोन्ही रूपात मी त्यांचे पालन करण्याचे अथक प्रयास करीन.”
The Buddha and His Dhamma | भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म | बुद्ध आणि त्यांचा धम्म
More Stories
बुद्ध आणि त्यांचा धम्म – भाग पाचवा – १. बुद्ध आणि वैदिक ऋषी.
बुद्ध आणि त्यांचा धम्म – भाग चवथा – ४. बोधिसत्व असलेले गौतम सम्यक् सम्बोधी प्राप्त झाल्यावर बुद्ध झाले.
बुद्ध आणि त्यांचा धम्म -भाग चवथा – ३. नव्या धम्माचा आविष्कार