April 25, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

मनाची एकाग्रता – झेन कथा

एका तरुण तिरंदाजाला त्याच्या तिरंदाजीवर खूप गर्व होता. त्याला कळले की एक झेन बौद्ध आचार्य तिरंदाजी मध्ये खूप निष्णात आहे. तो त्यांना भेटायला गेला. वार्तालाप झाल्यावर तिरंदाजने आचार्यांना तिरंदाजीचे आव्हान दिले.
आचार्यांनी ते स्वीकारले. तरुणाने तेथेच एका दूरवरच्या झाडावर निशाणा सादत एक बाण सोडला. तो बरोबर झाडाच्या मध्यभागी खोडात घुसला. त्यानंतर तरुणाने दुसरा बाण मारला. हा बाण पहिल्या बाणाला भेदत त्याची दोन तुकडे केले. जिंकल्याचा अविर्भावात तरुणाने आचार्यांना विचारले, “यापेक्षा अधिक काय आहे तुमच्याकडे?
आचार्यांनी त्याला खुणावले आणि जवळच्या डोंगरावर चलायला सांगितले. डोंगर चढल्यावर, एका कड्याच्या टोकावर एक ओंडका जमिनीवर गाडला होता. ओंडक्याचे दुसरे टोक दरीत होते. दरी अतिशय खोल होती.
आचार्य त्या ओंडक्यावर चालत गेले आणि निशाणा लावत दरीच्या पलीकडील झाडावर बाण सोडला. बाण खोडात घुसला. आचार्य शांतपणे परत आले आणि तरुणाला खुणावत हे करायचे आवाहन केले. तरुणाने दरीत पाहिले आणि त्याला घाम सुटला! खोल दरी पाहून तो थरथर कापू लागला!
आचार्यांनी त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाले, तुझी तिरंदाजी छान आहे पण मन अस्थिर आहे. आधी मनावर निशाणा साध, त्याला स्थिर कर…मग कोणत्याही परिस्थितीत निशाणा अचूक लागेल !
मनोपुब्बङग्मा धम्मा, मनोसेट्ठा मनोमया…
अतुल भोसेकर
9545277410