December 24, 2024

Buddhist Bharat

Buddhism In India

अश्विन पौर्णिमा – अस्सयुज मासो Ashwin Purnima

Ashwin Purnima

अश्वीन पौर्णिमेला पाली भाषेत ‘अस्सयुज मासो’ म्हणतात. ही पौर्णिमा साधारणतः ऑक्टोबर महिन्यात येते. या पौर्णिमेला भगवान बुद्धाच्या जीवनाच्या संबंधित ज्या घटना घडल्यात त्या अशा वर्षावासातील अंतिम पौर्णिमा, सम्राट अशोकाची विजया दशमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे धम्मचक्र प्रवर्तन. या पौर्णिमेला ज्या घटना महत्त्वाच्या आहेत, त्यांचा संक्षिप्तपणे परिचय असा

१) वर्षावासातील अंतिम पौर्णिमा

इध वस्सं वसिस्सामि, इध हेतन्तगिम्हिसु।

इति बालो विचिन्तेति, अन्तरायं न बुज्झति ।। (धम्मपदं : २८६)

( वर्षाकाळात येथे राहीन, हेमंतात येथे राहीन, ग्रीष्मात येथे राहीन, असला विचार मूर्ख करतो, पण (अंतराय) विघ्नांचा तो विचारच करीत नाही. )’

अश्वीन पौर्णिमा ही वर्षावासातील अंतिम पौर्णिमा आहे. वर्षाकाल संपल्यानंतर बुद्ध भगवंताच्या दर्शनास जाण्याची भिक्खूंची वहिवाट असे. आपल्या भेटीला आलेल्या भिक्खूंना कुशल समाचार विचारावा असाच भगवंतांचा परिपाठ होता.

या वर्षावास काळात ज्यांनी ज्यांनी सहकार्य दिले, त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली जात असे. वर्षावास काळात उपासिकांमध्ये व्यवस्थापिका होण्याचा बहुमान ज्यांना दिला, ती होती. विशाखा मिगारमाता !

भगवान बुद्ध श्रावस्ती येथे जेतवनात अनाथपिंडिकाच्या आरामात राहात होते. विशाखा मिगारमाता या प्रसिद्ध उपासिकेने आपल्या घरी भगवान बुद्धाला आणि त्यांच्या भिक्खू संघाला जेवणाचे आमंत्रण दिले. दुसऱ्या दिवशी जेवण्याच्या वेळी भिक्खूसंघ तयार आहे की काय, हे पाहण्यासाठी आपल्या दासीला तिने विहारात पाठविले.

त्यावेळी भयंकर जोराची पावसाची सर आली होती. भिक्खू चीवरे विहारात ठेवून पर्जन्यस्नानासाठी आवारात उभे होते. ते उघड्या देहांनी स्नान करीत होते. त्यांना पाहून दासी लज्जित झाली. तिला वाटले ते भिक्खू नसून पावसात देह भिजवून घेणारे कुणी नग्न तपस्वी आहेत. ती तशीच परत आली आणि विशाखेला म्हणाली, “आर्ये, विहारात भिक्खू नसून सर्व आजीवक आहेत.” (आजीवक म्हणजे नग्न राहणारे श्रमण) परंतु त्या शहाण्या उपासिकेने भिक्खू पर्जन्यस्नान करीत आहेत, हे तेव्हाच ओळखले.

भगवान बुद्ध भिक्खू संघासह आपल्या घरी आल्यावर सर्वांचा विशाखेने योग्य आदर सत्कार केला. सर्वांना जेवू घातले. सर्वांचे जेवण झाल्यावर ती भगवंताला म्हणाली, ‘भगवान, मला आपणाकडून आठ वर हवे आहेत.”

भगवान म्हणाले, “विशाखा, वर कोणते आहेत हे समजल्यावाचून तथागत वर देऊ शकत नाही.”

विशाखा म्हणाली, मी मागणार आहे ते वर उचित आणि निरुपद्रवी असेच आहेत. बुद्धाने अनुज्ञा देताच विशाखा म्हणाली, “१) आयुष्यभर वर्षाकालात भिक्खूसंघाला चिवरे द्यावी, अशी माझी इच्छा आहे. २) आगंतुक भिक्खूला भिक्षा देऊ इच्छिते. ३) प्रवासास जाणाऱ्या भिक्खूला भिक्षा देऊ इच्छिते. ४) रोगी भिक्खूला भिक्षा देऊ इच्छिते. ५) रोग्यांच्या सेवकाला भिक्षा देऊ इच्छिते. ६) रोग्यांना औषधांचा पुरवठा करू इच्छिते. ७) संघाला रोज खीर देऊ इच्छिते.

८) भिक्खुणी संघाला स्नानाच्या वेळी वापरण्यासाठी वस्त्रे देऊ इच्छिते. त्यावर भगवंत म्हणाले, “विशाखे, हे आठ वर मागण्याची कारणे कोणती ?” विशाखेने हे आठ वर मागण्याची पार्श्वभूमी सविस्तररीत्या विशद केली. भगवंतांनी विशाखेला पुन्हा प्रश्न विचारला, “हे आठ वर मागण्यात तुझा काय लाभ?” त्यावर विशाखा म्हणाली, “एक प्रकारे माझ्या नैतिक सामर्थ्याचा किंवा सप्त संबोधीचा उपयोग केल्यासारखे होईल. भगवान, हे आठ वर मागण्यात माझ्झा हा लाभ होणार आहे.”

त्यानंतर तथागतांनी पुढील शब्दात विशाखेचे आभार मानले, “शीलसंपन्न उपासिका श्रद्धायुक्त मनाने आणि निःस्वार्थी वृत्तीने जे काही दान देईल ते दान दिव्य, दुःखनाशक आणि सुखकारक ठरेल. अपवित्रता आणि कलंक ह्यापासून मुक्त असलेल्या मार्गाने जीवन कंठीत असताना सुखी जीवन तिला प्राप्त होईल. सत्प्रवृत्तीमुळे तिला सुख मिळेल आणि आपल्या दातृत्वाने तिला आनंद प्राप्त होईल.””

विशाखेने पूर्वाराम विहार संघास दान दिला आणि उपासिकांमध्ये व्यवस्थापिका होण्याचा बहुमान तिला प्राप्त झाला.

२) अशोक विजयादशमी

मया पवत्तितं चक्कं धम्मचक्कं अनुत्तरं ।

सारिपुत्तो अनुवतेत्तेति अनुजातो तथागतं ।।

( मी प्रस्थापित केलेले धम्मचक्र सारिपुत्त चालवीत आहे. तथागताच्या मागोमाग जाणारा तो आहे. )

भगवान बुद्धाने प्रवर्तित केलेले धम्मचक्र त्याकाळी सारिपुत्तासारख्या अनेक अनुयायांनी चालविले परंतु त्यानंतर बुद्धाच्या धम्मचक्राला जी ऐतिहासिक गती दिली ती सम्राट अशोकाने !

सम्राट अशोकाने राज्याभिषेकाच्या आठव्या वर्षी कलिंगची लढाई जिंकली. ते युद्ध त्यांच्या जीवनातील शेवटचे युद्ध ठरले. त्या युद्धात एक लक्ष सैनिक मारले गेले, दीड लक्ष सैनिक जायबंदी झाले आणि तीन लक्ष सैनिकांना बंदी बनविण्यात आले. युद्धात मारल्या गेलेल्या सैनिकांच्या विधवांच्या रडण्याने आणि बालकांच्या आक्रोशाने त्यांच्या मनावर गंभीर परिणाम झाला. त्याला खूप पश्चात्ताप झाला.

सम्राट अशोकाच्या शोकाकूल मनाच्या अवस्थेत त्याला शांतीची गरज होती. त्याचवेळी भिक्खू मोग्गलीपुत्त तिस्स या भिक्खूची भेट झाली. त्याने सम्राट अशोकास ‘अप्पमाद वग्ग’ याचा उपदेश केला.

अप्प मादो अमतपदं प्रमादो मच्चूनो पदं। अप्पमत्ता न नियन्ति ये पमत्ता यथा मता ।।

( अर्थात, प्रमाद न करणारा अमृतपदाचा साधक बनतो आणि प्रमाद करणारा मृत्यूपदाचा, अप्रमादी माणसे मरत नाहीत परंतु प्रमादी माणसे नेहमी मृत्यूसमान असतात. )

ज्या दिवशी मोग्गलीपुत्त तिस्स यांच्या संपर्कात सम्राट अशोक आला आणि त्याने सम्राट अशोकाला ‘उपासक’ पदाची दीक्षा दिली, तो दिवस अश्वीन शुद्ध दशमीचा होता. इ.स.पू. २६६ ला घडलेल्या घटनेस ‘अशोक विजया दशमी’ असे म्हटले जाते.

सम्राट अशोकाने बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि त्यांच्या राज्यात बौद्धधम्माला शीर्षस्थ स्थान प्राप्त झाले. त्यांच्या साम्राज्यातील बहुसंख्य जनता धम्माकडे वळली. त्यांचे शासन हे ‘धम्मशासन’ ठरले. स्वतः धम्माचे ‘दायाद’ बनण्यासाठी स्वतःचे पुत्र महेन्द्र आणि पुत्री संघमित्रा यांना भिक्खू संघात प्रवेश दिला. त्यांना श्रीलंकेत धम्मप्रचारास पाठविले.

सम्राट अशोकाने धम्मतत्त्वानुसार जीवन व्यतित करण्याचा प्रारंभ केला. धम्मगुरू मोग्गलीपुत्त तिस्स यांच्या प्रेरणेने बौद्ध स्थळांची त्यांनी यात्रा केली. त्यांनी धम्मकार्यासाठी ठिकठिकाणी विहारांची निर्मिती केली. प्रजेच्या कल्याणासाठी त्याने धम्माची नीतीतत्त्वे शिलालेखावर खोदविली. पाचव्या शतकात भारतात आलेला चिनी प्रवासी फाहियान आणि सातव्या शतकात आलेला चीनी प्रवासी हयू-एन-त्संग यांनी या सर्व शिलालेखांचा उल्लेख सविस्तर केला आहे.

सम्राट अशोकाने या शिलालेखांसाठी, स्तूपांसाठी, भगवान बुद्धाच्या जीवनाशी संबंधित स्थळांची निवड केली. उदा. बुद्धाचे जन्मस्थान ‘लुंबिनी,’ बोधिप्राप्तीस्थान – ‘बोधगया,’ धम्मचक्रप्रवर्तन स्थान ‘सारनाथ,’ महापरिनिर्वाण स्थान – ‘कुशीनगर’ तसेच भगवान बुद्धांनी जिथे जिथे वर्षावास संपन्न केले असे स्थळ आहेत – नालंदा, संकिसा, राजगृह, श्रावस्ती, वैशाली, कपिलवस्तु, गांधार, तक्षशिला इ. ठिकाणी स्तूपे उभारली.

सम्राट अशोकाच्या काळापर्यंत भगवान बुद्धाची प्रतिमा तयार झाली नव्हती. त्यामुळे धम्मस्तूप व बुद्धाच्या जीवनाशी संबंधित प्रतीकांचे पूजन केले जात असे. जसे सिद्धार्थाच्या जन्माचे प्रतीक ‘हत्ती,’ महाभिनिष्क्रमणाचे प्रतीक घोडा, सम्यक संबोधी प्राप्तीचे प्रतीक-बोधिवृक्ष, प्रथम धम्म-उपदेशाचे प्रतीक ‘धम्मचक्र’ आणि महापरिनिब्बाणाचे प्रतीक – स्तूप अथवा चैत्य होत.

भगवान बुद्धाच्या महापरिनिब्बाणानंतर त्यांच्या अवशेषांची आठ भागांमध्ये विभागणी करून त्या अस्थी आठ राज्यांना देण्यात आल्या होत्या – १) अजातशत्रू- ‘राजगृह’, २) शाक्य ‘कपिलवस्तू’, ३) बुली- ‘अलकप्प’, ४) कोलीय – ‘रामग्राम’, ५) मल्ल ‘पावा’, ६) लिच्छवी ‘वैशाली’, ७) ब्राह्मण- ‘वेठदीप’, ८) मल्ल- ‘कुशीनगर.’ या सर्व ठिकाणाहून धातू काढून आणि त्यांची अनेक संख्येत विभागणी करून सम्राट अशोकाने त्या अवशेषांवर विविध ठिकाणी ८४,००० स्तूप बनविले. सम्राट अशोकाचे हे धम्म अभिलेख भारतात सर्वत्र पसरलेले होते.

संपूर्ण भारतवर्ष सम्राट अशोकाच्या आधिपत्याखाली होते. काबूल, अफगाणिस्तानपर्यंत त्यांचे साम्राज्य होते. जनतेवर असीम प्रेम करणारा हा सम्राट एका शिलालेखात म्हणतो, ‘मी असे ठरविले आहे की, जनतेच्या तक्रारी ऐकण्यासाठी मला केव्हाही व कुठेही बोलवावे मग मी बागेत विहार करीत असो, भोजन करीत असो, अंतःपुरात असो किंवा झोपलेला असो, जनतेच्या सेवेसाठी मी हजर राहीन, “* हाच सम्राट आपल्या तिसऱ्या शिलालेखात म्हणतो,’ ज्या प्रमाणे माझ्या मुलांना इहलोक व परलोकात सुख व वैभव प्राप्त व्हावे अशी माझी इच्छा आहे. त्याप्रमाणेच सर्व लोकांनाही सुखशांती लाभावी अशी माझी मनीषा आहे.”

ज्या दिवशी सम्राट अशोकाला मुक्तीचा राजमार्ग गवसला तो दिवस आहे अश्वीन पौर्णिमेचा ! अश्वीन पौर्णिमा बौद्ध जगतामध्ये मोठ्या श्रद्धेने स्मरण केली जाते, ती सम्राट अशोकामुळे !

३) डॉ. आंबेडकरांचे धम्मचक्र प्रवर्तन

अप्पका ते मनुस्सेसु, ये जना पारमामिनो ।

अथायं इतरा पजा, तीरमेवानुधावति ।। (धम्मपदं ८५)

( मनुष्यात असे फार थोडे लोक असतात की जे पलीकडचा तीर गाठतात. बाकीचे नुसती तीरावरच धावपळ करतात. )

भगवान बुद्धाने वैशाख पौर्णिमेला जे ऐतिहासिक धम्मचक्र प्रवर्तन केले, तेच धम्मचक्र सम्राट अशोकाने इ.स.पू. २६६ ला आश्विन शुद्ध दशमीला पुन्हा प्रवर्तित केले. याच दिवसाला ‘विजयादशमी’ किंवा ‘अशोक विजयादशमी’ म्हणतात.

बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी याच पार्श्वभूमीवर जागतिक कीर्तीचे धम्मचक्रप्रवर्तन केले ते अशोक विजया दशमीच्या आधारावर. त्यामुळे धम्माचा इतिहास बुद्ध, अशोक व डॉ. आंबेडकर या तीन सन्माननीय नावांनी अनुबंधित झाला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लक्षावधी अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली, ही घटनाच जागतिक कीर्तीची आहे. त्यामुळे बौद्ध जगतात डॉ. आंबेडकरांना ‘बोधिसत्त्व‘ या पदवीने सन्मानीत केले जाते.

‘बोधि’ म्हणजे बुद्धत्व किंवा महान ज्ञान आणि ‘सत्त्व’ म्हणजे प्राणी. ‘बोधिसत्त्व’ म्हणजे जो कधी ना कधी निश्चितपणे बुद्ध किंवा महाज्ञानी बनेल, असा बुद्धत्व प्राप्तीकरिता प्रयत्नशील माणूस. अर्थात बुद्ध होण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य बुद्धत्व प्राप्त होण्यापूर्वी सिद्धार्थाला बोधिसत्त्व म्हणत असत.

बोधिसत्त्वाला सतत दहा जन्मापर्यंत ‘बोधिसत्त्व‘ राहावे लागते. जन्म म्हणजे मानसिक परिवर्तन. जेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली तेव्हा त्यांनी प्रतिज्ञा घेतली होती की, ‘आता माझा नवा जन्म झाला आहे.’ बोधिसत्त्व म्हणजे काय? या प्रश्नाची सविस्तर माहिती डॉ. आंबेडकरांनी ‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या त्यांनी लिहिलेल्या ग्रंथात दिलेली आहे. ”

डॉ. आंबेडकरांनी आधुनिक काळात केलेले धम्मचक्र प्रवर्तन अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यांनी आपल्या अनुयायांना बुद्धाचा धम्म देताना ‘बावीस प्रतिज्ञा’ देऊन धम्माला आधुनिक रूप दिले. त्यांनी लिहिलेला ‘दी बुद्ध अॅन्ड हिज धम्म’ हा ग्रंथ ही विचारसंहिता आहे; तर त्यांनी अनुयायांना दिलेल्या ‘बावीस प्रतिज्ञा’ ही आचारसंहिता आहे.

डॉ. आंबेडकरांनी भारतभूमीत ही धम्मक्रांती करून संपूर्ण जगाला धम्माची नवी दिशा दिली. बौद्ध विचारवंतांमध्ये जे विविध विचारप्रवाह विविध यानांच्या रूपाने विद्यमान होते, त्यात बदल घडवून ‘नवयान‘ उद्धृत केले. यातच आधुनिक धम्मचक्र प्रवर्तनाची वैशिष्ट्यता दिसेल.

यासोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘सारा भारत बौद्धमय करीन’ ही घोषणा देखील केली. ‘भारताचे संविधान’ हे या घोषणेला परिपोषक आहे. भारताने स्वीकारलेले न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्य बौद्ध तत्त्वज्ञानाची देण आहे. राष्ट्रपती भवनात बौद्ध विचाराचा उपदेश, अशोकचक्राला राष्ट्रीय प्रतीकाचा दर्जा, पाली भाषेला राष्ट्रीय भाषेत स्थान आदी गोष्ट डॉ. आंबेडकरांनी करून भारत बौद्धमय करण्याच्या दृष्टीने एक राजमार्ग निर्माण केला.

नागपूरच्या नाग संस्कृतीच्या नगरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जे आधुनिक धम्मचक्रप्रवर्तन केले त्या स्थानाला ‘दीक्षाभूमी’ म्हटले जाते. या दीक्षाभूमीला अशोक विजयादशमी दिनी देश-विदेशातून लक्षावधी जनता दरवर्षी येत असते. ही दीक्षाभूमी समस्त बौद्धांसाठी प्रेरणास्थळ झालेले आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिब्बाण झाल्यानंतर ज्या स्थळी त्यांना अग्नी देण्यात आला, त्या स्थळाला ‘चैत्यभूमी‘ (मुंबई) असे म्हणतात.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आयुष्य एका बोधिसत्त्वाचे होते. त्यांनी भगवान बुद्धाचा धम्म २५०० त्या वर्षी भारतात पुन्हा पुनरागामित केला. त्यामुळे त्यांना ‘मैत्रेय बुद्ध‘ म्हणून संबोधण्यात येते. सम्राट अशोक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली धम्मचक्र प्रवर्तन हे अश्वीन पौर्णिमेच्या शुद्ध दशमीलाच केले, त्यामुळे अश्वीन पौर्णिमा ही समस्त बौद्धांसाठी ‘नवा जन्म’ झाल्याचे प्रतीत करून देणारी महत्त्वपूर्ण पौर्णिमा आहे.