दुसऱ्या राऊंड टेबल परिषदेला जाण्यापूर्वी अखिल अस्पृश्य मानलेल्या वर्गाकडून डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना समारंभपूर्वक दिलेल्या निरोप प्रसंगी पुरूषवर्गाला उद्देशून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले अंतःकरण पिळवटून टाकणारे भाषण….
अखिल अस्पृश्य वर्गाचे प्रतिनिधी म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर विलायतेला भरणाऱ्या दुसऱ्या राऊंड टेबल परिषदेला शनिवार दिनांक १५ ऑगस्ट १९३१ रोजी जाणार होते. त्यानिमित्ताने अखिल अस्पृश्य मानलेल्या वर्गाकडून शुक्रवार दिनांक १४ ऑगस्ट १९३१ रोजी कोटामधील सर कावसजी जहांगीर हॉलमध्ये डॉ. पी. जी. सोळंकी यांच्या अध्यक्षतेखाली डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना प्रेमाचा निरोप देण्याचा समारंभ साजरा करण्यात आला होता.
शुक्रवार दिनांक १४ ऑगस्ट १९३१ रोजी रात्री आठ वाजता प्रथम भगिनीवर्गातर्फे बाबासाहेबांना निरोप देण्यात आला. याप्रसंगी अस्पृश्य मानलेल्या असंख्य भगिनीवर्गाच्या समुदायाने कावसजी हॉल फुलून गेला होता.
याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भगिनीवर्गातर्फे तसेच पुरुषवर्गातर्फे निरोप देण्यात आला.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रकृती विशेष सुधारलेली नव्हती तरी पण त्यांनी याप्रसंगी येऊन महिलावर्गाला व पुरुषवर्गाला स्वतंत्रपणे अगदी पोटतिडकीने मार्गदर्शन केले.
[ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी याप्रसंगी प्रथम भगिनीवर्गाला उद्देशून मार्गदर्शनपर भाषण केले. ( पहा – अस्पृश्य स्त्रियांनी सर्वांगीण सुधारणेसाठी झटावे – डाॅ. बाबासाहेब आंबेडकर) ]
त्यानंतर म्हणजेच भगिनीवर्गाच्या सभेनंतर रात्री १० वाजेपर्यंत पगारे बंधु चांदोरीकर यांच्या सामाजिक जलशाचा कार्यक्रम झाला. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी जलशेवाल्यांचे अभिनंदन करून आभार मानले व त्यांना आपल्या हस्ते एक रौप्य पदक अर्पण केले.
पुरुषवर्गाचा निरोप घेताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी फारच परिणामकारक भाषण केले. त्यांचे अंतःकरण पिळवटून टाकणारे भाषण ऐकून सर्वांची मने भावी लढ्यासाठी उत्सुक झालेली दिसत होती. अध्यक्ष डॉ. सोळंकी यांनी विलायतेला जात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कामगिरीची सर्वांना जाणीव करून दिल्यावर डॉ. आंबेडकर साहेब बोलावयास उठले.
याप्रसंगी पुरुषवर्गाला मार्गदर्शन करताना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले,
आपणास आजपर्यंत मिळालेल्या यशाचे वाटेकरी डॉ. सोळंकीही आहेत हे मला विसरून चालणार नाही. आपला लढा बिकट आहे व आपल्या कार्यात यश मिळविणे कठीण काम आहे. या परिषदेमध्ये अखिल हिंदुस्थानातून प्रत्येक पक्षाचे, पंथाचे, जातीचे मिळून जवळ जवळ १२५ प्रतिनिधी आहेत. या प्रतिनिधीत आपल्या समाजातर्फे अवघे दोनच प्रतिनिधी निवडले जावेत ही मोठ्या दुःखाची गोष्ट आहे. आम्ही दोघे एका बाजूला व इतर प्रतिनिधी एका बाजूला अशा परिस्थितीत येत्या राऊंड टेबल परिषदेत कितपत यश मिळेल हे आजच मला सांगता येत नाही. प्रयत्नांची पराकाष्ठा करणे हे मी माझे कर्तव्य समजतो. तुमचे माझ्यावरील इतके अलौकिक प्रेम पाहून मला प्रत्येक कार्य करण्याची उमेद वाटते ; आणि या उमेदीच्या बळावर मी माझ्या कार्याचा पायाच बांधला आहे ; आणि आपल्या स्वातंत्र्याचा लढा लढण्यात जितके यश मिळविता येईल तितके मिळवीन. मी परत येईपर्यंत तुम्ही मात्र आपली संघटना अधिक व्यापक करून माझ्या मागे डॉ. सोळंकी यांच्या नेतृत्वाखाली आपले कार्य करीत रहा.
दुसरी महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे माझी म. गांधींबरोबर जी मुलाखत झाली त्यात मला पूर्णपणे निराशा दिसून आली. आपल्या राजकीय हक्कासंबंधी म. गांधी आजच्या परिस्थितीत काहीच करू शकत नाही व त्यांना आमच्यासाठी जितके आपलेपणाच्या भावनेने काम करावयाचे आहे तितके करता येणे अशक्य आहे. गांधींच्या मुलाखतीची सविस्तर हकिगत तुम्हाला जनता पत्राच्या माहितीवरून कळेलच. अशा आणीबाणीच्या प्रसंगी आपण आपले बळ अधिक वाढवा व आपला लढा नेटाने पुढे चालवा. येत्या सिंहस्थामध्ये नाशिक क्षेत्री जो सत्याग्रह होणार आहे तेथे जाऊन पैशाने व मनुष्यबळाने सहाय्य करा. मंदीर प्रवेशाच्या सत्याग्रहाने नाशिक जिल्ह्याने मोठीच कामगिरी बजाविली आहे ; आणि म्हणून आपण त्यांच्या हाकेला ‘ ओ ‘ देऊन तो लढा कितीही बिकट वाटला तरी पार पाडण्याची जबाबदारी आपलेपणाच्या नात्याने स्वीकारा. नाशिक जिल्ह्याप्रमाणे पुणे जिल्हाही मागासलेला नाही असे मला आता वाटू लागले आहे. दोन महिन्यापूर्वी ‘ पुणे जिल्हा बहिष्कृत परिषद ‘ भरली होती. तिच्या एकंदर कार्यावरून लवकरच त्या जिल्ह्यात मोठी जोमाने चळवळ सुरू होईल. ही परिषद यशस्वी करून पुणे जिल्हा कोणत्याही जबाबदारीच्या कार्याला तयार आहे असे माझे मित्र श्री.रेवजीबुवा डोळस यांनी माझ्या नजरेस आणून दिले. त्यांनी आपल्या सहकारी मित्रांच्या सहाय्याने ही चळवळ आपल्या जिल्ह्यात अशीच उज्वल स्वरूपात चालू ठेवावी. समता सैनिक दलाच्या आजच्या शिस्तीचा मला अभिमान वाटतो. तरीपण ही शिस्त आणि कर्तव्यनिष्ठा त्यांनी कायम ठेवून आपले कार्य यशस्वी करण्याचा संकल्प व्यापक स्वरूपात करावा. आपली शिस्त व संघटना कायम ठेवून आपले जबाबदारीचे कार्य आपण माझ्या गैरहजेरीत उत्तमप्रकारे पार पाडाल अशी आशा बाळगतो.
🔹🔹🔹
यानंतर डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपले भाषण संपविले.
संकलन – आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे
More Stories
स्वातंत्र्य, माणूसकी, समान हक्क मिळतील तेच स्वातंत्र्य – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सत्ता कोणाचीही असो अस्पृश्यांना दडपण्याचाच प्रयत्न होईल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
युद्धोत्तर हिंदुस्थानपुढे मोठमोठे प्रश्न उपस्थित होणार आहेत – डॉ. बाबासाहेब आंबेडकर