July 31, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

बौद्ध पुस्तकांचा खजिना अर्थात बुद्धिस्ट पब्लिकेशन सोसायटी – Buddhist Publication Society, Lanka.

A treasury of Buddhist books i.e. Buddhist Publication Society - Buddhist Publication Society, Lanka.

१९५७ मध्ये लंकेतील कॅंडी शहरात करुणारत्ना या उपासकाने नातेवाईकांच्या स्मरणार्थ बौद्ध धर्माचे एक छोटेखानी पुस्तक इंग्रजीमध्ये छापून मोफत वाटण्याचे ठरविले. मात्र ते पुस्तक छापून झाल्यावर त्यांना अचानक कल्पना सुचली की हे एकच पुस्तक छापून का थांबायचे ? अजून धम्माची छोटीछोटी पुस्तके छापून त्यांचा प्रसार का करू नये.? त्यांनी ही कल्पना त्यांचे मित्र रिचार्ड अभयसेखरा आणि जर्मन भिक्खू न्यानापोनिका थेर यांना सांगितली. धम्माचे कार्य म्हटल्यावर सर्वांनी सहमती दर्शविली. आणि मग बौद्ध धम्मावरती छोटी पुस्तके छापून ती प्रसिद्ध करण्याचे ठरविण्यात आले. यासाठी छोटी संस्था स्थापन करण्यात आली. आणि तिचे नाव BPS ठेवले म्हणजेच Buddhist Publication Society.

त्याच दरम्यान १९५०-६०-७० च्या दशकात जगभर बौद्ध साहित्याची मागणी प्रचंड वाढली होती. Buddhist Publication Society ने याच वेळी थेरवादी बौद्ध परंपरेतील मूळ पालि भाषेतील ग्रंथ इंग्रजीतून प्रसिद्ध केल्यामुळे अपेक्षेबाहेर प्रतिसाद मिळाला. सुरवातीला चारपाच पुस्तके छापण्याचा संकल्प असलेल्या संस्थेने बौद्ध धम्मावरील अनेक सुंदर पुस्तके नंतर प्रसिद्ध केली. त्यामुळे संस्थेचे नाव जगभर झाले. मित्र, परिवार, दानकर्ते, हितचिंतक आणि धम्माची भावना मनात ठेवून काम करणारे प्रामाणिक कर्मचारी यांच्यामुळे बुद्धिस्ट पब्लिकेशन सोसायटीला भरघोस पाठिंबा मिळाला. सुरवातीपासून न्यानापोनिका थेर हे संस्थेचे सचिव होते. १९९४ मध्ये त्यांचे निधन झाल्यावर या पब्लिकेशन हाऊसची धुरा अमेरिकन भिक्खू बोधी यांनी घेतली. २००५ मध्ये न्यानतुसिता यांनी संपादनाचा कार्यभार स्वीकारला आणि संस्थेचा कारभार सगळा डिजिटल करून टाकला. त्यामुळे जगाच्या कानाकोपऱ्यातून लंकेच्या BPS च्या वेबसाईटवर धम्माच्या पुस्तकांसाठी, त्यांचे वाचन करण्यासाठी रीघ लागली.

BPS ने नुसतेच धम्माच्या पुस्तकांचे प्रकाशन केले नाही तर त्याचबरोबर अनेक दुर्मिळ पुस्तकांचे पुनर्मुद्रण सुद्धा केले. त्यामध्ये नारदा महाथेर यांचे The Buddha & his Teaching, पियदस्सी थेर यांचे The Buddha’s Ancient Path आणि भिक्खू न्यानामोली यांचे Life of the Buddha ही क्लासिक पुस्तके होती. तसेच त्रिपिटकातील दिघनिकाय, मज्जिमनिकाय, धम्मपद, उदान आणि इतिवृत्त यांची भाषांतरीत पुस्तके प्रसिद्ध केली. तशीच ती वेबसाईटवर उपलब्ध करून दिली. भिक्खू न्यानमोली यांचे विशुद्धमग्गाचे भाषांतर The Path of Purification तसेच A Compressive Manual of Abhidhamma ही दुर्मिळ पुस्तके देखील सोसायटीने जतन करून ठेवली आणि वेबसाईटवर उपलब्ध केली. Heart of Buddhist Meditation हे आदरणीय न्यानापोनिका यांचे ध्यानावरील एक उत्कृष्ट पुस्तक मानले जाते. तसेच धम्माविषयी अनेक संशोधनपर लेख आणि निबंध यांचे प्रकाशन The Wheel आणि Bodhi Leaves या अंतर्गत BPS ने केले. १९९३ मध्ये BPS ने धम्मदान प्रोजेक्ट राबविला. या अंतर्गत बौद्ध धर्माच्या पुस्तकांचे जगभर अनेक विहारात, केंद्रात, वाचनालयात मोफत वाटप केले.

BPS ने थेरवादी बुध्दिझमची मोठी लायब्ररीच स्थापन केली. १२०० च्या वर धम्म पुस्तके प्रकाशित केली. तसेच वेबसाईटवरून अनेक पुस्तके वाचण्यासाठी फ्री डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. असंख्य पुस्तके, निबंध, लेख, इतिहास यांचा साठा वेबसाईटवर असून आयुष्यभर बौद्ध साहित्य वाचण्याची सोय करून देण्यात आली आहे. सम्राट अशोक यांच्याबद्दलचे अनेक संशोधनपर लेख मला या साईटवर नुकतेच मिळाले. तरी धम्मासबंधीच्या पुस्तकांसाठी वाचकांनी www.bps.lk या साईटला जरूर एकदा भेट द्यावी व वाचनतृप्ती करावी. कारण धम्म जेवढा अधिक वाचाल तेवढा पुढे कृतीत उतरेल. धम्माच्या वाचनाने मनाची मशागत होईल आणि ते अधिक समृद्ध बनेल. आयुष्य सुखी आणि समाधानी होईल.