July 26, 2025

Buddhist Bharat

Buddhism In India

आम्ही आज कदाचित लढाई हरलो असू , पण युद्ध मात्र आम्ही जिंकणारच जिंकणार – डाॅ. बाबासाहेब आंबेडकर

बाॅम्बे सेंट्रल, मुंबई येथील भव्य सत्कार समारंभात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले भाषण ….

दिनांक २५ जून १९४६ रोजी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वागतासाठी भव्य सभेचे आयोजन केले होते. दिनांक २५ जून १९४६ रोजी संध्याकाळी ४.१५ वाजता फ्रन्टियर मेलने धडाड धडाड करीत बाॅम्बे सेंट्रल स्टेशनात प्रवेश केला, त्यावेळी हजारो लोकांच्या हर्शोल्लासात काढलेल्या शिट्यांचा एकच गलका उठला. बाॅम्बे सेंट्रल स्थानक, स्थानकाबाहेरचे रस्ते, स्थानकाच्या गच्च्या, पुलाचे कठडे असा सर्व परिसर लहान-थोर, स्त्री-पुरुष व बालकांनी आणि त्यांच्या हर्शोल्लासाने फुलून गेला होता. अफाट समुद्रात तुफानाने लाटांची बेफाम खळबळ व्हावी, अगदी तशाच तऱ्हेची बाॅम्बे सेंट्रल स्टेशनात स्वागतासाठी जमलेल्या ८०,००० स्त्री-पुरुष, बालकांची भव्य जनसमुद्रात जोराची खळबळ उडाली. बेभान झाल्यामुळे त्यांनी आपआपसात खेटाखेटी सुरू केली. सकाळी ७ वाजल्यापासून अन्न-पाण्याशिवाय अगदी निष्ठेने तिष्ठत बसलेल्या त्या अफाट जनसमुदायाला झालेल्या त्रासामुळे आलेला शीण नाहीसा होऊन त्यांचे चेहरे फुललेल्या कमळाप्रमाणे प्रसन्न झाले. त्यांची हृदये उचंबळून आली आणि त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू पाझरू लागले. त्यांच्यात जोराचा गलबला सुरू झाला आणि त्यांनी गंभीर, प्रदीर्घ गर्जना करण्यास सुरूवात केली.

समता सैनिक दलातील ५,००० बाणेदार वीर, बरेचसे रेल्वे पोलीस व त्यांचे अधिकारी या अफाट समुदायाची व्यवस्था लावता लावता अगदी थकून, दमून गेले.

ऑल इंडिया शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी श्री. बापूसाहेब पी. एन्. राजभोज, मुंबई प्रांतिक शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनचे अध्यक्ष दादासाहेब बी. के. गायकवाड व मुंबईतील जनतेचे आवडते पुढारी ॲ. आर. डी.भंडारे आणि डॉ. बाबासाहेबांचे चिरंजीव भाऊसाहेब यशवंतराव आंबेडकर यांनी सामोरे जाऊन डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या खास डब्यातून खाली उतरून घेतले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता सैनिक दलाच्या दुतर्फा रांगेतून सलामी घेत जात असता कित्येक लोक त्यांच्या पायावर दर्शनासाठी उड्या घेत होते. मे. ॲ. भंडारे हे अगदी पुढे असल्यामुळे व दलाचे सर्वाधिकारी एम्. एम्. ससाळेकर यांनी खबरदारीने माणसांना बाजूला सारून रस्ता मोकळा केला जात होता.

काही अंतर चालून आल्यावर बाबासाहेबांच्या स्वागताप्रित्यर्थ कोवळ्या अर्भकांना काखेशी घेऊन वाऱ्याकावऱ्याची, पावसापाण्याची इतकेच काय परंतु स्वतःच्या व त्यांच्या तहान भुकेची पर्वा न करता अगदी तत्परतेने तिष्ठत बसलेल्या सुमारे १५,००० महिलांनी बाबासाहेबांवर आपल्या ओंजळीतील सुमनांनी अविरत अभिषेक केला. त्या प्रसंगाने सर्वांची हृदये भरून आली आणि जगातल्या कोठल्याही परमेश्वराचे ठायी नसलेली अलोट भक्ती आणि अढळ प्रेम डॉ. बाबासाहेबांवर असल्याचे अस्पृश्यांनी जगाच्या निदर्शनास आणून दिले.

डॉ. बाबासाहेबांना तसेच पुढे नेवून अगदी ऐनवेळी तयार केलेल्या उंच व्यासपिठावरील भव्य आसनावर बसविले.

हजारो पुष्पहार डाॅ. बाबासाहेबांच्या गळ्यात पडत होते आणि जनसमुदायात अपूर्व उत्साहाच्या लहरी निर्माण होत होत्या. त्यातच  ‘ आंबेडकर कौन है, दलितोंका राजा है ‘,  ‘ आंबेडकर जिंदाबाद, थोडे दिनमें भिमराज ‘,  ‘ शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशनचा विजय असो ‘,  ‘ स्वतंत्र मताधिकार हासिल करो ‘ अशा प्रमुख जयघोषांच्या गर्जना होत होत्या आणि बाॅम्बे सेंट्रल स्टेशन व आजूबाजूचा परिसर एकसारखा दुमदुमत होता.

स्टेशनच्या आवारातील आवाजाचे पडसाद स्टेशनाबाहेरील राजरस्त्यावर गेल्यामुळे तेथे रेंगाळत असलेल्या हजारो अस्पृश्य लोकांची एकच धावपळ उडाली आणि पुराच्या लोंढ्याप्रमाणे असंख्य माणसांचा लोंढा बाॅम्बे सेंट्रल स्टेशनच्या आवारात घुसल्यामुळे स्टेशन व त्यालगतचा खुला भाग भरगच्च भरून गेला. स्टेशनच्या गच्च्या, पुलाचे कठडे वगैरेवर लोकांनी अगोदरच गर्दी करून सोडली होती आणि वहानांची रहदारी जेथल्या तेथे खोळंबली होती.

जेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जनसमुदायाला उद्देशून दोन शब्द बोलावयास उठले तेव्हा प्रचंड गर्जनांचा व टाळ्यांचा प्रदीर्घ कडकडाट झाला. डॉ. बाबासाहेबांच्या चेहऱ्यावर दूरच्या प्रवासाचा त्रासिकपणा दिसण्याऐवजी त्यांची मुद्रा प्रसन्न दिसत होती. अत्यानंदाची तेजोवलये त्यांच्या चेहऱ्याभोवती विलसत होती.

मुंबईच्या दलित जनतेने केलेल्या या अभूतपूर्व स्वागतप्रसंगी बोलताना प्रारंभी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,
मी दिल्लीहून पराभूत होऊन आलो नाही. परिक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे सांत्वन करतात, त्याप्रमाणे माझ्या सांत्वनार्थ ही सभा नाही. माझ्या आयुष्यात मी कधी अपयशी झालो नाही. मी माझ्या दलित समाजासाठी गेल्या चार वर्षात जी कामगिरी केली, तिच्याबद्दल हे माझे स्वागत होत आहे, हे माझ्या शत्रुंनी व अस्पृश्य समाजाच्या हितशत्रुंनी ध्यानात ठेवावे. (प्रचंड टाळ्या)

व्हाईसरॉयने नुकत्याच घोषित केलेल्या नव्या हंगामी सरकारच्या मंत्रिमंडळात अस्पृश्य वर्गाचा प्रतिनिधी घेण्यात आला हा खरोखरच आपला विजय आहे. १९४५ साली भरलेल्या सिमला परिषदेत हिंदुस्थान सरकारात अस्पृश्यांचा एकही प्रतिनिधी घेण्यास गांधींनी नकार दिला होता. आता व्हाईसरॉयनी निवडलेले श्री. जगजीवनराम यांनाच गांधींनी त्यावेळी स्पष्टपणे सांगितले होते की, ‘
मध्यवर्ती सरकारात अस्पृश्य प्रतिनिधीला स्थान मिळणार नाही.’ परंतु एक वर्षानंतर आता अस्पृश्य वर्गाचा हा हक्क मान्य करण्यात आला आहे, हे आमच्याच चळवळीचे फळ आहे. आम्ही आमच्या संघटित चळवळीनेच ते मिळविलेले आहे.

मध्यवर्ती सरकारात अस्पृश्य वर्गाला स्थान मिळाले हीच महत्त्वाची गोष्ट आहे. व्यक्तीला महत्त्व नाही. त्या जागेवर आमचे कुत्रे जरी जाऊन बसले तरी आमची हरकत नाही. (प्रचंड हंशा व टाळ्या) व्हाईसरॉयने सुचविलेला माणूस लायक असेल तर प्रश्नच नाही. कालांतराने त्याची लायकी आपोआपच सिद्ध होईल, मात्र मी पुन्हा एकदा स्पष्टपणे सांगतो की, अस्पृश्य वर्गाला राज्य कारभारात भाग घेण्याचा अधिकार मिळाला हे आपल्याच चळवळीचे फळ आहे. पण आमची मागणी एवढ्यानेच संपली नाही. आमच्या न्याय्य मागण्या मिळाल्याशिवाय आमची चळवळ थांबणार नाही. मुसलमानांच्या निम्म्याने आमची लोकसंख्या असल्यामुळे त्या प्रमाणात आम्हाला सरकारात जागा मिळाल्या पाहिजे.

१९४२ च्या चळवळीत गांधींनी ‘ करेंगे या मरेंगे ‘ अशी घोषणा केली. आमच्या लढ्याचे ब्रीदवाक्य व घोषवाक्यही तेच आहे. आमचे ध्येय साध्य होईपर्यंत आम्ही प्राणपणाने झगडू. आम्ही आज कदाचित लढाई हरलो असू, पण युद्ध मात्र आम्ही जिंकणारच जिंकणार. (प्रचंड टाळ्या)

मुंबई हे आपल्या चळवळीचे केंद्र आहे आणि म्हणूनच चार वर्षानंतर पुन्हा या चळवळीत दुप्पट उत्साहाने भाग घेण्यासाठी मी तुमच्यात येत आहे. माझे फक्त कार्यक्षेत्र बदलले आहे. आता तुमच्याशी माझा अधिक संबंध येणार आहे. आपली संघटना अभेद्य करा, आपसातील मतभेदांना मूठमाती द्या. यापुढे आपले दरवाजे उघडे ठेवा आणि निर्भय बनून आपला लढा जोरदार करा. स्वतःच्या कुटुंबाच्या पलिकडे नजर टाकून स्वतःच्या समाजासाठी थोडा स्वार्थत्याग करा. अखेर यश तुमचेच आहे. असा स्फूर्तिशाली संदेश देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपले तेजस्वी भाषण टाळ्यांच्या प्रचंड गजरात व ” जयभीम ” च्या गगनभेदी निनादात संपविले.

🔹🔹🔹

शेवटी श्री. मडकेबुवांनी कार्यकर्त्यांचे, स्वयंसेवकांचे नि लोकसमुदायाचे आभार मानल्यावर लोक आनंदीत अंतःकरणाने व उल्हसित मनाने घरोघर निघून गेले. अशारितीने ही विराट स्वागत सभा अत्यंत यशस्वीपणे पार पडली.

***

संकलन – आयु. संघमित्रा रामचंद्रराव मोरे