January 16, 2026

Buddhist Bharat

Buddhism In India

‘तुझी सावित्री अन् माझी सावित्री…!’

सखे,आपण दोघंही
सावित्रीला आईच मानतो
पण,फारचं वेगळी आहे
तुझी सावित्री अन् माझी सावित्री

तुझी सावित्री म्हणे
स्वर्गापर्यंत धावली पतीच्या प्राणासाठी
माझ्या सावित्रीनं धरतीवरचं
स्वर्ग उभा केला स्त्री शिक्षणासाठी

तुझी सावित्री पूजापाठ,आचार विचार
अन् सात जन्माची महती सांगणारी
माझी सावित्री स्त्री सन्मानासाठी दगड धोंडे
अन् शेणाचा मारा अंगावर झेलणारी

तुझी सावित्री धर्मग्रंथात
अन् भाकड कथांत रमणारी
माझी सावित्री अंधश्रद्धा,रूढी-परंपरांना
छेद देवून सनातन्यांशी लढणारी

सखे,तुझी सावित्री वाचली तर
वडाचं झाड अन् सत्यवानच कळणार
माझी सावित्री फक्त एकदाच वाच
तुला नक्कीच स्त्री मुक्तीचं द्वार दिसणार…!

संदीप देविदास पगारे,
खानगावथडी, नांदूर मधमेश्वर,नाशिक
भ्रमणध्वनी क्रमांक ७६२०५१२१६५