जगातल्या सगळ्या प्रेमकथा या प्रियकराला -प्रेयसीच्या मिलनावर आधारलेल्या आहेत. सोबत जगता आलं नाही म्हणून रोमिओ जुलिएट,हिर-रांझा ,लैला मजनू सगळ्यांनीच आत्महत्या केली. पण सिद्धार्थाची आकांक्षा पाहून यशोधरेने या सहवासावरच पाणी सोडलं …तेही कायमच…यशोधरेचं इतकं उदात्त प्रेम हे इतिहासात कायमच दुर्लक्षित राहिलं. प्रेमाकडे भारतात फक्त आसक्ती ,मिळवण्याची आशा म्हणून पाहिलं गेलंच नाही..तर प्रेम हे अध्यात्म आहे… प्रेम म्हणजे शांतता आहे… प्रेम म्हणजे त्याग आहे…दोन जणांपुरती राहील आणि त्यातच विरून जाईल त्यांच्यासोबत संपेल हे प्रेम हे कधीच भारतीयांना पटलंच नाही. म्हणून भारतातल्या प्रेमकथांकडे प्रेमासारखं पाहिलंच गेलं नाही पण जगाला प्रेम शिकवलं भारतानेच. अशीच एक प्रेमकथा जी कधीच चर्चिली जात नाही. जी कधीच बोलली जात नाही..ती आहे यशोधरा आणि बुद्धाची.. बुद्ध म्हणजे शांतता. ..बुद्ध म्हणजे प्रेम …बुद्धाने सांगितली तीच जगण्याची युक्ती बुद्धाचा मार्ग..हीच खरी मु्क्ती…
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनीही बुद्धच आपलासा केला…बाहेरचे विझणारे दिवे पाहून विझण्यापेक्षा आपल्यातला विवेकाचा दिवा प्रज्वलित करायला बुद्धाने शिकवलं. पण बुद्ध बुद्ध होण्याआधी एक शाक्य कुळातला एक राजकुमार होता. जगासाठी कणव वाटणारा, दु:ख पाहून तळमळणारा, हिंसेमुळे आहत होणारा एक दयाळू राजकुमार होता. सिद्धार्थ होता.
सिद्धार्थाचं जगासाठी तळमळणं , माणसांची काळजी वाटणं, मनातला करूणाभाव या साऱ्याने एक तरूणी पुरती भारावून गेली होती. लग्नात वरण्याआधी तिनं कधीच त्याला मनात वरलं होतं. ती सिद्धार्थाच्या प्रेमात पडली होती. शाक्यांमधले एक सन्माननीय शाक्य म्हणजे दंडपाणी…त्या दंडपाणींची मुलगी म्हणजेच ही यशोधरा! लग्न करणार तर फक्त सिद्धार्थशी हे तिने कधीच मनात ठरवलं होतं. ..ती खऱ्या अर्थाने बुद्धाची प्रेयसी होती. यशोधरा राधा जशी कृष्णामागे रानोमाळ भटकली तशी सिद्धार्थामागे रानोमाळ भटकली नाही. मीरेसारखं जळी स्थळी काष्ठी सिद्धार्थाला तिने शोधलं नाही. ना जुलिएट ,हीरसारखी तिने सिद्धार्थासाठी प्रेमाच्या विराण्या रचल्या. यशोधरेने सिद्धार्थाला माणूस म्हणून स्विकारलं होतं. त्याचं वेगळेपण आपलसं केलं होतं.
त्याकाळी स्वयंवराची पद्धत अस्तित्वात होती. राजकुळातली स्त्रीयांना स्वयंवरातून आलेल्या राजकुमार , सरदार पुत्रांमधून आपला जोडीदार निवडण्याचा अधिकार होता. त्या प्रथेप्रमाणे यशोधरेचे वडील दंडपाणी यांनी तिचं स्वयंवर ठरवलं. तेव्हा स्वयंवराला सिद्धार्थाला बोलावणार का असा प्रश्न तिने वडिलांना विचारला. तर सिद्धार्थ एकटा राहतो, संत विद्वानांसोबत जगतो असा अवलिया कधीही घर सोडून जाऊ शकतो ही भीती दंडपाणींनी व्यक्त केली. सिद्धार्थाची सोबत यशोधरेला आवडेल का ? तो इतर तरूणांसारखा तिच्यावर कौतूकांचा वर्षाव करणारा नव्हता,जगण्याचा छोट्या छोट्या आसक्तीमध्ये अडकणारा नव्हता ,त्यामुळे त्याला बोलवू नये अशी त्यांची इच्छा होती.. पण यशोधरेने त्यांना विरोध केला. संतांसोबत राहणं हा काय गुन्हा आहे का? असं विचारलं. अखेर दंडपाणी यशोधरेसमोर झुकले आणि स्वयंवराला सिद्धार्थाला बोलावलं गेलं. अर्थातच यशोधरेने सिद्धार्थाला निवडलं. अनेक राजकुमारांचे डोळे पाणावले. अनेकांचा भ्रमनिरास झाला.पण सिद्धार्थाचे वडील शुद्धोधन मात्र खूश होते. त्या दोघांचं लग्न लावून देण्यात आलं.
यशोधरेने एक पत्नी म्हणून नेटका संसार केला. पण यशोधरा ही सहचारिणी नव्हतीच कधी ती खरं तर प्रेयसीच होती. आता बायको प्रेम करते की नाही यावरून वाद होतीलही पण यशोधरा पहिले प्रेयसी होती आणि मग पत्नी होती. ती सिद्धार्थाच्या प्रत्येक भूमिकेत त्याच्यासोबत होती. पण एक संधी म्हणून…त्यांना जगाच्या मुक्तीचा मार्ग शोधायचा होता. शाक्यांच्या राज्यात राहून ते शक्य नव्हतं. जगाच्या समस्यांचं कारण शोधायचं होतं. खरतर यशोधऱा बुद्धाची पत्नी होती, यशोधराही सिद्धार्थासोबत जाऊ शकली असती.पतीशिवाय तिचं आयुष्य कसं होईल हा विचारही तिच्या डोक्यात डोकावला असेल. पण ती गेली नाही. कारण इथे यशोधरेतली प्रेयसी जागी झाली. सिद्धार्थाची जगासाठी असलेली तळमळ त्याने तिला बोलून दाखवली होती. त्यामुळे आपण त्याच्यासोबत गेलो तर तिला हवं ते सुख मिळेल ही पण सिद्धार्थाची इच्छा पूर्ण होणार नाही. सिद्धार्थाला जगाच्या सगळ्यांच्या दु:खावर औषध शोधायचं होतं. मुक्तीचा मार्ग शोधायचा होता. यशोधरा ही त्याचा मार्गातील अडचण झाली असती. तिने त्याला संसारात अडकवलं असतं.
सिद्धार्थाचं स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून तिने स्वत:च्या संसारसुखावर पाणी सोडलं. हा त्याग म्हणजे खरं प्रेम असतं. जगातल्या सगळ्या प्रेमकथा या प्रियकराला -प्रेयसीच्या मिलनावर आधारलेल्या आहेत. सोबत जगता आलं नाही म्हणून रोमिओ जुलिएट,हिर-रांझा ,लैला मजनू सगळ्यांनीच आत्महत्या केली. पण सिद्धार्थाची आकांक्षा पाहून यशोधरेने या सहवासावरच पाणी सोडलं …तेही कायमच…यशोधरेचं इतकं उदात्त प्रेम हे इतिहासात कायमच दुर्लक्षित राहिलं. सिद्धार्थ राज्य सोडून गेला. पुढे शाक्य कोलियांमधला वाद मिटला. सिद्धार्थाला परत बोलवायला काही हरकत नाही असं शाक्यांमधले ज्येष्ठ बोलू लागले. फक्त यशोधराच त्याला बोलवू शकत होती. पण तिने कधीच परत बोलवायचा प्रयत्न केला नाही. कारण सिद्धार्थाच्या मार्गात तिला अडसर व्हायचं नव्हतं. नंतर तिने दुसरं लग्नही केलं नाही. तर राहुलला..त्यांच्या मुलाला वाढवण्यात आणि म्हाताऱ्या सासू सासऱ्यांची काळजी घेणं योग्य समजलं.
आणि त्यातही रानावनात सिद्धार्थ जसा जगत असेल तशी यशोधरा महालात जगत होती. तिने महालातल्या सगळ्या सुखसोयी नाकारल्या. जमिनीवरच झोपू लागली. तिने सिद्धार्थाच्या स्वप्नांसाठी त्याच्या ध्येयाखातर हा मार्ग स्विकारला होता. म्हणून ती त्याची पत्नी होण्यापेक्षाही प्रेयसी म्हणून श्रेष्ठ ठरते.
पुढे सिद्धार्थाचा बुद्ध झाला. जगाच्या मुक्तीचा मार्गही त्याने शोधला. शांततेचा मार्ग शिकवणारा बुद्ध अखेर आपल्या मायदेशी परत आला. तेव्हा अख्खं कपिलवस्तू त्याला भेटण्यासाठी मरत होतं. बुद्धाला भेटायला ही झुंबड उसळली. पण यशोधरा मात्र आपल्या कक्षातच बसली..ती त्यांना जाऊन भेटली नाही. आपला प्रियकर आपल्याला येऊन भेटेल याची वाट ती पाहत राहिली. आणि सारं जग ज्याला भेटण्यासाठी तळमळत होतं…ते बुद्ध स्वत: यशोधरेला येऊन भेटले. ती ढसाढसा रडली. वर्षानुवर्ष मनात साठवून ठेवलेलं प्रेम अश्रूंच्या वाटे तिने मोकळं केलं. तिची तळमळ तिचा त्याग तिचं झुरणं वाया गेलं नव्हतं. तिच्या या त्यागामुळेच जगाला बुद्ध मिळाला होता. त्याच्या आशांसाठी तिने स्वत:च्या हक्काचा आकांक्षांचा साऱ्याचाच त्याग केला होता….यापलीकडे प्रेम काय असतं. समोरच्यासाठी सर्वस्व देणं हेच तर प्रेम असतं. पण आपल्या कुटुंबाच्या मानसन्मानाला शोभेल असंच तिचं वागणं होतं. ती कुठेच वाहवत गेली नाही. तिने स्वत:ची सगळी कर्तव्य पार पाडली. जगातल्या अनंत वंचित पीडित शोषितांच्य दु:खासमोर माझं दु:ख काय हा विचार तिच्या मनात होता.
पुढे य़शोधरेने बुद्धाचा मार्ग स्विकारला .ती भिकुण्णी झाली. तिने बुद्धाच्या तत्वज्ञानाचा तिने प्रसार केला. कारण या तत्वज्ञानासाठी बुद्ध आयुष्यभर झटला होता. यासाठीच त्याने आयुष्यभर अट्टाहास केला होता. पुढे आयुष्याच्या शेवटच्या वळणावर आपला मृत्यू जवळ आल्याचं तिचा लक्षात आलं. ७८ व्या वर्षी..तेव्हा या यशोधरेतली प्रेयसी जागृत झाली. ज्याच्यासाठी ती जगली होती त्या बुद्धाला जाऊन भेटली. ती बुद्धाला म्हणाली मी तुमचा निरोप घ्यायला आले आहे. तिने त्याची परवानगीही घेतली नाही. जाऊ का असं विचारलंही नाही. ती कधी सिद्धार्थाच्या इच्छेबाहेर नव्हतीच मुळी. आतातर दोघंही साऱ्या दु:खातून मुक्त झाले होते. यशोधरेने बुद्धासाठी त्याग केला….
एक मुलगी..एक सून… एक पत्नी…आणि स्वत:च्या सगळ्या इच्छा विसरणारी
एक अमर्याद प्रेम करणारी एक प्रेयसी! हीच होती यशोधरा….
More Stories
🧡 बुद्धांचे मैत्रीविषयक विचार 🧡 Buddha’s Thoughts On Friendship
🐍 Nag Panchami and Buddha Dhamma – A Buddhist Perspective 🐍 नाग पंचमी : परंपरेतून समजून घेणे
Buddhist Story अंगुलिमाल – खुनी भिक्षू बनतो!